मॅडम कामांनी पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकवला होता.. तेही विदेशात!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात जो रणरागिणी झाल्या त्यातले एक तेजस्वी नाव म्हणजे मॅडम भिकाजी कामा. भिकाजी कामा आहे यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या इतिहासामध्ये आदराने घेतले जाते.

भारताच्या भूमीबाहेर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

आज आपल्या देशाचा तिरंगा प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी देशभरात अनेक ठिकाणी डौलाने फडकत असतो. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा तर भारताला स्वतःचा झेंडाही नव्हता.

भारतावर इंग्रजांचे राज्य असल्यामुळे इंग्रजांचा युनियन जॅक हाच भारताचा अधिकृत झेंडा म्हणून अनेक ठिकाणी वापरला जात असे. त्यावेळी भारताचा ध्वज असला पाहिजे अशी कल्पनाही कोणाच्या नव्हती.

जर्मनीमधील स्टूटगार्ड येथे सोशालिस्ट काँग्रेसच्या झालेल्या परिषदेमध्ये मॅडम भिकाजी कामा भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्या परिषदेला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक देशाचा स्वतःचा झेंडा होता. मात्र भारतासाठी ब्रिटिश युनियन जॅक हाच झेंडा ठेवण्यात आला होता.

भिकाजी कामा यांनी इंग्रजांचा युनियन जॅक हातात घेण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी भारताचा झेंडा पहिल्यांदा त्या परिषदेमध्ये फडकावला.

आज या घटनेकडे वळून बघितले तर कदाचित असे वाटू शकते की यात काय एवढे विशेष आहे?

1905 साली बंगालची फाळणी झाली, लोकांमध्ये प्रचंड असंतोष माजला होता. राष्ट्रवादाची भावना पहिल्यांदाच लोकांच्या मनात रुजू लागली होती. भारतात इंग्रजांविषयी क्रोध पसरण्यास सुरुवात झाली होती. आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीव लोकांच्या मनाला स्पर्श करू लागलेली होती.

या पार्श्वभूमीवर भारताला स्वतःचा झेंडा नसणे आणि युनियन जॅकला भारताचा झेंडा म्हणून अधिकृतरीत्या वापरले जाणे ही भारत ब्रिटिशांचे मांडलिक आहे याची ग्वाहीच होती.

जर्मनी येथे भारतातर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेलेल्या भिकाजी कामा यांना हीच गोष्ट खटकली होती.

ब्रिटिशांचा झेंडा भारताचा झेंडा हा कदापि होऊ शकत नाही. जर मी भारताची प्रतिनिधी म्हणून येथे उपस्थित आहे तर मी भारताचा झेंडा फडकवणार अशी भूमिका त्यांनी घेतली.

भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईमध्ये एका श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कपड्यांचे श्रीमंत व्यापारी होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. शिक्षण झाल्यानंतर त्यांचा विवाह रुस्तम कामा नावाच्या एका धनाढ्य वकीलाबरोबर झाला.

रुस्तम कामा इंग्रजांचे वकिल होते. ते या सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावर होते. तर भिकाजी कामांना भारतावर प्रचंड प्रेम आणि इंग्रज सरकारबद्दल प्रचंड राग होता. त्यामुळे लग्नानंतरही नवऱ्याच्या पदाची पर्वा न करता त्यांनी आपले देश कार्य चालूच ठेवले.

1896 साली मुंबईमध्ये प्लेगची साथ पसरली होती तेव्हा भिकाजी कामा यांनी रस्त्यावर उतरून गरीब वस्त्यांमध्ये जाऊन काम केले. 

परिणामतः त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली भारतात उपचार उपलब्ध नव्हते म्हणून त्यांना उपचार घेण्यासाठी रुस्तम कामांनी त्यांना ब्रिटनला पाठविले.

यथावकाश मॅडम भिकाजी कामा भारतामध्ये परतल्या. परंतु भारतातील स्थिती पाहून त्यांचे मन चिंतित होत असे. इंग्रजांनी भारतावर कब्जा केलेला आहे आणि भारत पारतंत्र्यात मध्ये आहे ही जाणीव त्यांना बैचेन करत असे. स्वतः धनाढ्य कुटुंबात जन्मलेल्या असून आणि तितक्याच तोलामोलाच्या कुटुंबात विवाह झालेला असून देखील त्यांनी कायम देशहिताचा विचार केला हे विशेष.

मॅडम कामा यांनी दादाभाई नवरोजी यांच्या सेक्रेटरीचे काम देखील केले होते. त्यांनी लंडनमध्ये असताना तिथे भारतीय पुस्तके प्रकाशित करण्याचे मोठे काम केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक “1857 चा स्वातंत्र्यलढा” लंडनमध्ये प्रकाशित करण्यासाठी मॅडम कामांनी मोठी सहायता केलेली होती.

1907 जर्मनीमधील स्टुटगार्ट शहरामध्ये जी आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती त्याला अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेला मॅडम कामा या भारताच्या सन्माननीय सदस्य म्हणून उपस्थित होत्या.

इथेच त्यांनी पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकवला.

भारताचा हा पहिला ध्वज हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचा होता. सगळ्यात वरच्या भागात हिरवा पट्टा, मधल्या भागात पिवळा पट्टा आणि शेवटी लाल रंगाचा पट्टा अशी त्याची रचना होती.

वरच्या हिरव्या पट्ट्यावर 8 कमळाची फुले रंगवलेली होती. जी तेव्हाच्या भारतातील आठ प्रांताचे प्रतिनिधित्व करत होती. झेंड्याच्या मध्यभागी वंदे मातरम अशी अक्षरे देवनागरी लिपी मध्ये लिहिलेली होती. या झेंड्याच्या शेवटच्या पट्ट्यावर एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी चित्रे काढलेली होती. 

हिरवा रंग उत्साहाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून, लाल रंग शक्तीचे प्रतीक म्हणून आणि पिवळा रंग विजयाचे प्रतीक म्हणून या ध्वजात वापरले होते. 

हा ध्वज वीर सावरकर यांनी अन्य क्रांतिकारी मित्रांबरोबर मिळून बनवला होता. या झेंड्याच्या रंगांमधून भारतातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध असा एकसंध भारतीय समाज दाखविण्याचा देखील प्रयत्न केला होता.

मॅडम कामा फक्त झेंडा फडकावून थांबल्या नाहीत. याच सोशालिस्ट काँग्रेसमध्ये मॅडम कामा यांनी जाहीरपणे ब्रिटिश सरकारवर ताशेरे ओढण्याचे साहस दाखवले.

“भारतात ब्रिटिश सरकार कायम राहणे हे मानवतेला कलंक आहे. ब्रिटन हा भारतीयांच्या अधिकारांना हानी पोहोचवण्याचे कार्य करीत आहे.” हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले.

मॅडम कामा यांच्या कृतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत देशाचा स्वतःचा असा वेगळा झेंडा असणे ही भारताच्या सार्वभौमत्वाची निशाणी आहे हे जगाला सगळ्यात पहिल्यांदा याच घटनेतून कळलेले होते.

भारत ब्रिटनच्या अधिपत्याखाली खुश नाही आणि त्याला स्वातंत्र्य हवे आहे ही भावना या कृतीतून मॅडम कामा यांनी अधोरेखित केली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मॅडम कामा यांचे योगदान अमूल्य मानले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!