आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकविसाव्या शतकात विज्ञानाची प्रचंड प्रगती झाली. त्या प्रगतीने आज शिखर गाठले असून अगदी इलेक्ट्रीक वाहनांपर्यंत आपण मजल मारली आहे. आता आपली वाटचाल इलेक्ट्रीक वाहनांकडून हायड्रोजन वाहनांकडे होत असून हायड्रोजनवर चालणारी वाहने कित्येक पटीने किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहेत. युनायटेड नेशन्सने काही वर्षांपूर्वी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठरवून दिले होते. ती ध्येये गाठण्यासाठी हायड्रोजन-पॉवर्ड गाड्या उपयोगी ठरतात. आपण याआधीही पाण्यावर चालू शकणाऱ्या गाडीबद्दल वाचलं आहे, तसंच काहीसं तंत्रज्ञान हे हायड्रोजन-पॉवेर्ड कार्सचं असतं असं म्हटलं तरी चालेल.
हायड्रोजन-पॉवर्ड वाहनांचे तंत्रज्ञान नवीन असल्याने अनेक कंपन्या यावर संशोधन करून आपापली नवीन उत्पादने आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. युनायटेड स्टेट्समधील ऍरिझोनातील ‘निकोला कॉर्पोरेशन’ कंपनीने हायड्रोजन-पॉवेर्ड ट्रक्स तयार करण्याचा दावा केला होता. जगप्रसिद्ध टेस्ला कंपनी ज्याप्रमाणे इलेक्ट्रीक आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार्स बनवते, अगदी त्याचप्रमाणे एखादा नाविन्यपूर्ण प्रयोग करावा या हेतूने कंपनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रक्सवर संशोधन केल्याचा दावा केला होता.
इतकंच नाही तर टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रीक वाहनांमध्ये ज्या बॅटरीज् असतात त्यापेक्षा दुप्पट क्षमतेच्या बॅटरीज् बनवल्याचा दावा या कंपनीने केला आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित करून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात, पण या हायड्रोजन-पॉवर्ड गाड्या पाण्याची वाफ उत्सर्जित करतात, ज्यामुळे वायू प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही.
हायड्रोजन-पॉवर्ड ट्रक्स केवळ १५ मिनिटे चार्जिंग केल्यानंतर १००० किलोमीटर्सचा टप्पा सहज गाठू शकतात असाही निकोला कंपनीने दावा केला आहे. हायड्रोजनवर चालणारे ट्रक्स, एवढा कमी चार्जिंग टाइम आणि या सगळ्या दाव्यांबरोबरच रिलीज केलेला हायड्रोजन-पॉवर्ड ट्रकचा व्हिडीओ. या सर्व गोष्टींमुळे अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
कंपनीच्या अपेक्षेपेक्षा मोठी गुंतवणूक त्यांना मिळाली. गुंतवणुकीच्या रकमेचा आकडा तब्बल ३३० कोटी डॉलर्स एवढा होता. इतकंच नाही तर या कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) तब्बल ३४०० कोटी डॉलर्स एवढा मोठा होता. हा आयपीओ सुप्रसिद्ध फोर्ड मोटर्सच्या आयपीओपेक्षाही मोठा होता. फोर्डचा आयपीओ २८०० कोटी डॉलर्स होता. या सगळ्याचं श्रेय जातं कंपनीचे तत्कालीन सीईओ आणि संस्थापक ट्रेव्हर मिल्टन यांना. एवढे यशस्वी आणि ऐतिहासिक संशोधन केलेल्या कंपनीचे संस्थापक आज त्याच कंपनीचे ‘माजी सीईओ’ आहेत, कारण, हे सगळं फेक आहे असे अनेक आरोप आजवर त्यांच्यावर आणि कंपनीवर झाले.
हिंडनबर्ग रिसर्च हे नाव गेल्या काही महिन्यांमध्ये बरंच प्रसिद्ध झालं होतं. अमेरिकेतीलच हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने भारतातील अदानी उद्योग समूहावर अनेक प्रकारचे आरोप लावून कंपनीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या काही उद्योजकांपैकी एक असलेल्या गौतम अदानींना मोठं नुकसान झालं असतं तर त्याचा प्रभाव भारताच्या अर्थव्यवस्थेवरही पडला असता. सुदैवाने या सगळ्या प्रकरणात अदानी उद्योग समूहाचे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले नाही.
याच हिंडनबर्ग रिसर्चने हायड्रोजन-पॉवेर्ड ट्रक्स तयार करण्याचा दावा करणाऱ्या निकोला कंपनीवरही अनेक आरोप केले असून या कंपनीकडे हायड्रोजनच्या बळावर ट्रक्स चालतील असे कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय कंपनीने सांगितल्याप्रमाणे कोणतीही बॅटरी त्यांच्याकडे नाही असाही दावा हिंडनबर्ग रिसर्चने केला. तर निकोला मोटर्सने प्रसिद्ध केलेला तो व्हिडीओ खोटा असून केवळ एका डोंगर माथ्यावरून जनरल मोटर्स कंपनीचा ट्रक सोडला आणि त्याचंच शूटिंग केलं असाही आरोप त्यांनी लावला आहे.
या सर्व कारणांमुळे आज निकोला मोटर्सच्या हायड्रोजन-पॉवर्ड ट्रक्स तयार करण्याच्या स्टार्ट-अपचा हा घोटाळा स्टार्ट-अप जगतातील सर्वांत मोठा घोटाळा ठरला असून ट्रेव्हर मिल्टन दोषी आढळून आले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप आहे.
‘निकोला’ मोटर्सला ट्रकिंग उद्योगामधील ‘टेस्ला’ बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. या दोन्ही कंपन्यांनी आपापली नावे विद्युत क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे अल्टरनेटिंग करंट निर्माण करणाऱ्या ‘निकोला टेस्ला‘ यांच्या नावावरून घेतले आहे. निकोला कंपनीला इमिशन-फ्री हायड्रोजन-पॉवर्ड ट्रक्स बनवायचे होते, ज्याप्रमाणे टेस्लाने चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क तयार केले त्याप्रमाणे प्रमुख महामार्गांवर हायड्रोजन फ्युएल सेंटर्सचे नेटवर्क बनवायचे होते. या दोन्ही कंपन्यांना आपापल्या क्षेत्रात ‘निकोला टेस्ला’प्रमाणेच क्रांती घडवून आणायची होती. पण निकोला मोटर्सच्या सीईओच्या हव्यासापोटी ही महत्त्वाकांक्षा सध्या तरी अपूर्णच राहिली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.