आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येकाला उत्तम रहस्यमयी कथा आवडतातच. पण जेव्हा एखाद्या रहस्याचा समाधानकारक शेवट होत नाही तेव्हा काय होते? अशीच एक घटना १९९२ साली ट्रान्सकॅनडा हायवेवर घडली होती. अनेकदा अशा रहस्यमयी घटनांचा उलगडा कधीच होत नाही. कित्येकदा उलगडा झाला तरी तो काही कारणास्तव दाबून ठेवला जातो. काही रहस्ये कित्येक वर्षांनंतर उलगडतात, अशाच एका घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मिल-बे येथील रहिवासी ‘जेनेट फॅरिस’ १९९२ साली अल्बर्टा येथे एका लग्नाला जात असताना अचानक गायब झाली होती. जेनेटला दोन अपत्य आणि पाच नातवंडं होती. ती स्वतः ट्रान्सकॅनडा हायवेवर गाडी चालवत होती आणि क्रेडिट कार्डच्या रेकॉर्डनुसार ती गायब व्हायच्या आधी ट्रान्सकॅनडा हायवेवर सॅल्मन आर्ममध्ये गॅस भरण्यासाठी थांबली होती.
जेनेटचे कुटुंब आणि स्थानिक पोलिसांनी तिच्या शोधात अनेक दिवस घालवले. महामार्गावर तिचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता आणि सर्व ठिकाणी अनेक वोल्युन्टीर्सची देखील तैनाती करण्यात आली होती. परंतु ती कुठेही सापडली नाही. जेनेटची नात एरिन त्यावेळी फक्त १२ वर्षांची होती, ती म्हणाली, “मी दुःखी आहे, हे मला माझ्या पालकांसमोर कबूल करायचे नव्हते, कारण कदाचित यानेच मी आशा गमावली आहे हे सिद्ध होईल”. जेनेटचे कुटुंब दुविधेत होते कारण जेनेट बेपत्ता होती आणि तिचा मृतदेहसुद्धा सापडला नव्हता, त्यामुळे हे प्रकरण इतक्यात शांत होण्यासारखे नव्हते.
अनेक दिवस प्रयत्न करूनही जेनेटचा कुठेच पत्ता लागेना. मग पोलिसांनी आणि कुटुंबानेही आशा सोडून दिली. पोलिसांनी मात्र आपल्या रेकॉर्डमध्ये तिची आणि गाडीची माहिती ठेवली होती. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही जेनेट कोठेही सापडली नाही, शेवटी पोलिसांनीही हात वर केले आणि केसची फाईल कायमची बंद केली.
पण काही वर्षांनी, मॅक्स वेरेन्का, यांनी ब्रिटिश कोलंबियाच्या ग्रिफिन लेकच्या पृष्ठभागावर काहीतरी विचित्र गोष्ट तरंगताना पहिली. तरंगणारी ती गोष्ट काही साधेसुधे नव्हते आणि मॅक्सच्या मते त्यात काहीतरी गडबड होती. मॅक्सचे कुटुंब ग्रिफिन लेकच्या काठावरील काही केबिन्सचे मालक आहेत. मॅक्सला सतत प्रश्न विचारायची सवय होती.
ट्रान्सकॅनडा हायवेपासून फक्त दहा फूट अंतरावर हा तलाव होता. तलावात काही विचित्र नक्कीच पहिले हे मॅक्सने सांगितले. परंतु ते प्रत्यक्षात काय आहे याची कोणालाही खात्री नव्हती. काही दिवसांनंतर व्हेरेन्का कुटुंबाने स्थानिक पोलिसांना पाचारण केले आणि त्यांना मॅक्सला काहीतरी विचित्र दिसले होते त्याठिकाणी नेले.
मॅक्सने आपला गो-प्रो कॅमेरा सोबत घेतला आणि तो तलावात उतरला. कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड झाले. या रेकॉर्डिंगमध्ये मॅक्सच्या संशयानुसार खरंच काहीतरी विचित्र होते. या तलावात एक कार उलटी पडलेली आढळून आली. या कारवर पाण्यातील झाडे, बुरशी आणि असंख्य लहान लहान मासे होते.
ही कार तलावाच्या पाण्यात १५ फूट खोलवर उलटी पडली आहे याची खात्री झाल्यानंतर तीन दिवसांनी स्थानिक पोलिसांनी आपल्याबरोबर एक डायव्हर्सची टीम आणली. त्यांना या गाडीबरोबरच एक लायसन्स प्लेट सापडली. ही लायसन्स प्लेट १९९२ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या केसशी संबंधित होती. त्यानंतर एका स्थानिक टो कंपनीला घटनास्थळी आणले गेले. कारला केबल जोडण्यात आल्या आणि कार तलावावरून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये एका मृतदेहाचे अवशेषही सापडले.
विशेष तपासानंतर आणि संशोधनानंतर हे वाहन आणि त्यातील मृतदेहाचे अवशेष हे व्हॅनकूवरच्या ७० वर्षीय महिला, जेनेट फॅरिसचे आहेत याची पोलिसांनी खात्री केली. सुमारे २८ वर्षांपूर्वी, जेनेट फॅरिस ऑक्टोबर १९९२ मध्ये या तलावाजवळील ट्रान्सकॅनडा हायवेवरूनच बेपत्ता झाली होती.
मॅक्सने केवळ त्याच्या परिश्रमाने आणि निरीक्षण शक्तीने २८ वर्ष न उलगडलेले रहस्य सोडवले. मॅक्सच्या जन्माच्या तब्बल १४ वर्षांपूर्वी जेनेट बेपत्ता झाली होती. ग्रिफिन सरोवरातून जेनेटचे अवशेष सापडले तेव्हा ही बातमी फॅरीस कुटुंबाला धक्का देणारी ठरली. खरंतर जेनेटच्या कुटुंबाच्या आनंदाला सीमा नव्हती.
जेनेटची नात म्हणते, “आम्ही आता योग्यरित्या शोक प्रकट करू शकतो आणि तिच्या स्मृतींना तिला आमच्याकडून जसं हवं होतं त्याप्रमाणे सन्मान देऊ शकतो.” तर अशा प्रकारे तीन दशके जुने रहस्य सोडवले गेले. जेनेट फॅरिसचे मृतावशेष आता तिच्या पतीच्या कबरीशेजारी पुरण्यात आले आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.