आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूका होणार आहेत, यात रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून आज नावारूपाला आली त्यात अमेरिकेच्या अनेक राष्ट्रध्यक्षांनी मोठे योगदान दिले आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन यांनी आधुनिक अमेरिकेची पायभरणी केली तर त्या अमेरिकेला गृहयुद्धाच्या पाशातून मुक्त करत, कृष्णवर्णीय लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार देण्याचे काम केले अब्राहम लिंकन यांनी!
अमेरिकेच्या इतिहासातील फाळणी टाळणारा महापुरुष म्हणून ज्यांनी कीर्ती मिळवली त्या अब्राहम लिंकन यांच्या जीवन चरित्रावर आज आपण दृष्टिक्षेप टाकुया…
अब्राहम लिंकन यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १८०९ केंटुकी प्रांतात झाला. वडील थॉमस लिंकन शेती करत. अब्राहमला एक मोठी बहीण होती, सारा. अब्राहमनंतर झालेल्या मुलाचा लहान असतानाच मृत्यू झाला.
जमिनीच्या विवादामुळे त्याला कुटुंबासह दोन वेळा स्थलांतर करावं लागलं. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने शाळेत प्रवेश घेतला, परंतु अब्राहमने शिकावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती.
त्यामुळे नाईलजास्तव वडिलांना मदत करण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. वाचनाची अब्राहमला कमालीची आवड होती. दुसऱ्याकडून पुस्तके घेऊन तो वाचन व अभ्यास करत.
वयाच्या नवव्या वर्षी १८१८ मध्ये अब्राहमची आई नान्सीचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी बहीण सारावर आली. एका वर्षानंतर वडील थॉमस यांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आईने त्याच्यावर खूप प्रेम केलं. त्याला अभ्यास करण्यातही तिने मदत केली.
वडिलांचा अभ्यास करण्यास असलेल्या विरोधामुळे त्यांनी नावेतून मालवाहतूक करण्याचं काम सुरू केलं, त्यासोबत तो लोकांच्या शेतात कामही करत.
काही काळानंतर त्यांना एका दुकानात नोकरी मिळाली. तिथे त्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळू लागला. कुठल्याही कॉलेजात न जाता त्यांनी तिथे कायद्याचा अभ्यास सुरू केला. त्याच वेळी त्यांना जवळच निवृत्त जज राहत असल्याची माहिती मिळाली, ज्यांच्याकडे कायद्याची खूप पुस्तके होती.
त्यांच्याकडे जाऊन अब्राहमने त्यांना पुस्तके वाचायला मिळावीत यासाठी विनंती केली. यासाठी जज आनंदाने तयार झाले. त्यांच्याकडे काम करण्यास कोणी नसल्यामुळे अब्राहम त्यांना घरकामात मदत करत असे. यामध्येही अब्राहम खूप खुश होता.
काही काळानंतर एका गावात ते पोस्टमास्टर बनले. यामुळे लोक त्यांना ओळखायला लागले होते आणि त्यांचा आदरही करत.
त्याकाळी गुलामगिरीची प्रथा कळसाला पोहोचली होती. पहिल्यापासूनच त्यांना गुलामांवर होणाऱ्या अत्याचाराची चीड होती.
याच विचाराने त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यादरम्यान त्यांची पोस्टमास्टरची नोकरीही गेली.
लिंकन सहसा स्त्रियांपासून दूरच राहत पण वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांना रुटलेज नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. परंतु दुर्भाग्य असं की काही दिवसातच तीच एका गंभीर आजाराने निधन झालं. याचा लिंकनवर खूप मोठा परिणाम झाला. तासनतास ते तिच्या कबरीजवळ रडत बसत.
यावेळी सर्वच गोष्टी अब्राहम लिंकन यांच्या मनाविरुध्द घडत होत्या. एक वेळ अशीही आली होती जेव्हा ते चाकुसारख्या धारधार गोष्टीपासून दूर राहत. कारण नैरश्यामुळे स्वतःचा जीव घेऊ अशी त्यांना भीती होती. त्यांच्या मित्राने मनोबल वाढवून त्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली.
वकिली करण्याचा परवाना मिळाल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी कधीही गरीबांकडून कसलीच फिस आकारली नाही. त्यांनी कधीही खोटी केस लढवली नाही. पैसे न घेण्यामुळे ते यातही अयशस्वी राहिले, परंतु असं केल्याने त्यांना मात्र मनःशांती मिळत असे. त्यांनी वीस वर्ष अशाच प्रकारे वकिली केली.
तत्पूर्वी निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी सैन्यामध्ये कॅप्टन म्हणून काम केले. 1834 मध्ये Illinois State legislatureमध्ये व्हिग (Whig Party) पार्टीचा सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर त्यांना लोकप्रियता मिळू लागली.
1842 मध्ये त्यांनी मेरी टोड हिच्याशी विवाह केला. तिने रॉबर्ट, एडवर्ड,विली आणि अशा चार मुलांना जन्म दिला. यातील रॉबर्ट सोडता इतर सर्व लहानपणीच वारले.
त्यावेळी अमेरिकेत काळ्या वर्णाच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध वातावरण तापलं होतं. दक्षिणेतील राज्य गुलामगिरीचे समर्थन करत,तर उत्तरेकडील लोक याविरुद्ध होते.
1860मध्ये रिपब्लिकन पार्टीकडून निवडणूक लढवत त्यांनी डेमॉक्रॅटिक पार्टीच्या जॉन ब्रेकीनरीजचा पराभव केला.
राष्ट्रपती झाल्यानंतर दक्षिणेकडील राज्यांनी गुलामगिरीच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अब्राहम लिंकनचाही गुलामगिरीला विरोध होता. पण सर्व राज्यांना एकत्र ठेऊ इच्छित होते.
यातच 1861 मध्ये अमेरिकेत यादवी युद्धाला सुरुवात झाली. हे रक्तरंजित युद्ध चार वर्ष चाललं. 1863 मध्ये लिंकन यांनी Emancipation Proclamation वर सही करून गुलामगिरी संपुष्टात आल्याची घोषणा केली. मे 1860 मध्ये यादवी युद्ध संपले.
त्यानंतर १३व्या घटनादुरुस्तीनुसार गुलामगिरी मोडीत काढण्यात आली. आणि एकसंध अमेरिका पुन्हा अस्तित्वात आली. मानवी हक्कांसाठी लढल्यामुळे लिंकन अमेरिकेचे हिरो बनले.
युद्धाच्या काही दिवसानंतर फोर्ड थिएटर येथे नाटक पाहताना जॉन बूथ नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी 15 एप्रिल 1865 रोजी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेच्या सर्वात महान राष्ट्रपतीमध्ये त्यांची गणना होते. माउंट रशमोर नॅशनल मेमोरियलमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडर रुझवेल्ट यांच्यासोबत त्यांचीही प्रतिमा कोरलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.