आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लिओनार्ड ऑयलर हे नाव कदाचित तुम्ही अजूनही ऐकले नसेल. पण, विद्यापीठात गणित किंवा पदार्थविज्ञानशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे नाव नक्कीच माहिती असेल. लिओनार्ड ऑयलर (१७०७-१७८३) हे गणिताच्या क्षेत्रातील मोठे गणितज्ज्ञ मानले जातात. परंतु फक्त गणितच नाही तर ‘दा विंची’प्रमाणे ऑयलर यांनी देखील विज्ञानाच्या अनेक शाखांत बहुमुल्य योगदान दिले आहे. ऑप्टिक्स, खगोलशास्त्र, संगीतशास्त्र (म्युझिकॉलॉजी), यांत्रिकी (मेकॅनिक्स) आणि द्रव गतिशीलता (फ्लुइड डायनॅमिक्स) अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी या सर्व क्षेत्रातील अस्ताव्यस्त सिद्धांतांना एकत्र करून त्यांच्यात सुसूत्रता आणली.
विज्ञानाच्या क्षेत्रातील ऑयलर यांचे काम इतके मोठे आहे की, त्याचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. आजच्या विज्ञानात वापरले जाणारे अनेक सिद्धांत हे त्यांनी मांडलेल्या सिद्धांतावरच आधारित आहेत.
त्यांनी संशोधित केलेले सिद्धांतांची संख्या फार मोठी आहे. तरीही त्यांच्या नावावर एकही सिद्धांत सांगितला जात नाही.
आज विद्यापीठ स्तरावर जे गणित शिकवले जाते, त्याचा बराचसा भाग हा ऑयलर यांचे संशोधन आहे.
ऑयलर यांची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण असल्याचे लहानपणीच लक्षात आले होते. परंतु, ऑयलर यांचे वडील एक क्लर्क असल्याने त्यांची इच्छा होती की ऑयलर यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा. त्याकाळचे ज्येष्ठ गणितज्ज्ञ झां बेर्नुली यांच्या संपर्कात आल्यावर ऑयलर यांनी तरुणपणीच गणिताचा अभ्यास सुरु केला.
झां बेर्नुली यांना युरोपमध्ये एक ज्येष्ठ गणितज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. झां बेर्नुली आणि ऑयलर यांचे वडील घनिष्ठ मित्र होते. झां बेर्नुली स्वतः दर रविवारी ऑयलरची शिकवणी घेत असत. इथूनच विज्ञानाच्या अभ्यासाला गती मिळाली.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. १७२७ साली रशियाच्या सेंट पिट्सबर्ग सायन्स अकॅडमीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. इथे त्यांनी स्वतःला संशोधनात अक्षरश: बुडवून टाकले.
इथे कामाचा ताण आल्याने १७३८ मध्ये त्यांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला.
याआधी सलग तीन वर्षे त्यांना वरचेवर ताप येत होता. एका डोळ्याची दृष्टी गेल्याचे खापर मात्र सेंट पिट्सबर्ग विद्यापीठात नकाशे बनवण्याच्या कामावरच फोडले. सेंट पिट्सबर्ग विद्यापीठातील परिस्थिती बदलल्याने ते जर्मनीला निघून गेले. तिथेही त्यांच्या डाव्या डोळ्यात मोतीबिंदू वाढला आणि तोही डोळा कायमचा निकामी झाला.
दोन्ही डोळ्याने अंध झाले तरी, त्यांच्यातील सकारात्मक दृष्टी आणि संशोधनाची उर्मी हरवली नाही. दोन्ही डोळे अंध झाले तरी, इतक्या मोठ्या घटनेने खचून न जाता या संकटातही त्यांनी संधी शोधली. याकडे त्यांनी खूपच सकारात्मक दृष्टीने पहिले.
यावर ते फक्त इतकेच म्हणाले की, “आता माझी नजर विचलित होणार नाही.”
यावेळी त्यांचे वय होते ५९ वर्षे. पण याच काळात म्हणजे १७७५ साली दर आठवड्याला गणितातील एक शोधनिबंध सादर करत असत. या अपंगत्वाचा बाऊ करण्याऐवजी त्यातूनही पुढे जात नवनवीन शोध लावण्याची उर्मी जिंवत ठेवली.
लहानपणापासूनची तल्लख बुद्धी याकाळात अजूनच तरतरीत झाली. त्यांची बुद्धी इतकी तल्लख होती की गणितातील कूट प्रश्न ते मनातल्या मनात सोडवत. अगदी ५० दशांश अंकापर्यंतची आकडेमोडही ते मनातल्या मनात करू शकत.
इतका मोठा आघात होऊन, शारीरिक अपंगत्व येऊनही त्यांच्यातील सर्जनशीलता कमी होण्याऐवजी अजून वाढली. त्यानंतर ते परत रशियात आले. रशियाच्या कॅथरीन द ग्रेटच्या सत्ताकाळात त्यांना रशियात परत येण्यासाठी विनवण्यात आले. येथे त्यांना मोठ्या रकमेचा चेक आणि त्याच्या सोबतच सरकारी नोकरीत उच्च स्थानावर रुजू करून घेण्याचे वचन देण्यात आले. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि आयुष्यातील उर्वरित दिवस द कॅथरीनच्या अधिपत्याखाली रशियात व्यतीत केले.
या सगळ्या प्रवासात त्यांचे संशोधन कार्य अव्याहतपणे सुरु होतेच. गणित आणि भौतिकशास्त्रातील त्यांचे योगदान म्हणजे तर आधुनिक विज्ञानाचा पाया ठरेल. गणितातील Σ (सिग्मा), π (पाय) या आणि अशा बऱ्याच चिन्हांचा शोध त्यांनीच लावला आहे. बीटा आणि गॅमा यासारख्या स्थिरांकाचा (काँस्टंट्स) शोधही त्यांनीच लावला. गणित आणि भौतिकशास्त्रातील बरेचसे मुलभूत संशोधन त्यांनीच केले आहे.
त्यांनी जी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली त्याचे संकलन करण्याचे काम आजही सुरु आहे. बीजगणित, ज्योतिषशास्त्र, भौतिक या विषयांवर त्यांनी लिहिलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य होते. पॅरीस आणि सेंट पिट्सबर्ग येथील अकादमीने त्यांना अनेक सन्मान देऊन पुरस्कृत केले.
न्यूटन किंवा आईनस्टाईनसारखी प्रसिद्धी ऑयलर यांच्या वाट्याला आली नसली तरी, त्यांचे विज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य अजिबात दुर्लक्ष करण्याजोगे नाही. उलट या दोघांपेक्षाही ऑयलर यांचे काम किती तरी अफाट आणि मोठे आहे.
परंतु ऑयलर यांनी मांडलेले सिद्धांत त्याच्याच नावानी न सांगता त्यांच्यानंतर ज्या कुणी या सिद्धांताची फेरतपासणी करून त्याची सत्यता पडताळली त्याच्याच नावांवर खपवले जातात. ही बाब मोठी खेदजनक आहे. त्यांनी विज्ञान आणि विज्ञानाच्या बहुतेक शाखांमध्ये जे योगदान दिले आहे, ते पाहता त्यांना तेवढा न्याय मिळाला नाही असे वाटते. त्यामुळेच विज्ञान क्षेत्रातील त्यांची ख्याती मर्यादित राहिली.
सेंट पिट्सबर्ग इथे असतानाच युरेनस या नव्या ग्रहावर त्यांचा अभ्यास सुरु होता. आपल्या कार्यात मग्न असतानाच ब्रेन हॅमरेजने त्यांचा मृत्यू ओढवला. आयुष्यभर विज्ञान जगलेला हा माणूस शेवटच्या क्षणी देखील आपल्या नव्या संशोधनाबाबत चर्चा करत होता. खरे कर्मयोगी असेच असतात ज्यांना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्या कामानेच पछाडलेले असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








