दोनशे वर्ष बांधकामासाठी लागले तरीही हा मनोरा तिरकाच बांधल्या गेला

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इटलीच्या पिसा शहरातील झुकत्या मनोर्‍याचे नाव शाळेत असताना अनेक लोकांनी ऐकलेले आहे. जगातील सात आश्चर्यापैकी हा मनोरा एक आश्चर्य मानले जायचे. 2000 साली जगभरातील नवीन सात आश्चर्ये शोधण्यासाठी सुरुवात करण्यात आली. जगभरातील विविध ठिकाणांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. इंटरनेटवर लोकांना त्यांच्या पसंतीचे ठिकाण निवडण्यास सांगितले. ज्या ठिकाणाला सगळ्यात जास्त लोकांची मते मिळतील त्याच्यानुसार जगातील नवीन सात आश्चर्ये मुक्रर करण्यात आली. यामध्ये आपला इटलीचा झुकता मनोरा पाठीमागे पडला.

इटली बघायला जाणारे पर्यटक मात्र या पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला आवर्जून भेट देतात. जसा फ्रान्सचा आयफेल टॉवर त्या देशातील एक प्रसिद्ध ठिकाण मानले जाते तसाच इटली शहरातील हा पिसाचा झुकता मनोरा इटली देशाचे एक वैशिष्ट्य मानले जाते. याचा इतिहास जर पाहायला गेला तर तो या मनोऱ्याप्रमाणेच विचित्र आणि विलक्षण आहे.

या मनोर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मनोरा एका बाजूला झुकलेला तर आहेच पण दरवर्षी तो थोडाथोडा एकाच बाजूला झुकत चालला आहे. एक मोठी सात मजली इमारत ही झुकलेल्या अवस्थेत कशी उभी राहू शकते हे बघण्यासाठी दरवर्षी पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.

या मनोर्‍याचे बांधकाम अकराव्या शतकाच्या सुमारास सुरू झाले होते. त्या काळामध्ये स्थापत्यशास्त्राचा इतका विकास देखील झालेला नव्हता. तिथे सात मजली उंच मनोरा बांधायचे काम या वास्तूच्या रचनाकाराने आपल्या शिरावर घेतले.

पण बांधताना काय चूक झाली माहिती नाही. कदाचित पाया कमकुवत राहिला असेल, बांधकाम ढिसाळ पद्धतीने झाले असेल पण, तीन मजले बांधून झाल्यानंतर ही इमारत एका बाजूला झुकते आहे हे पाहून ताबडतोब काम थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. तब्बल आठ वर्षे काम चालून देखील फक्त तीन मजले पूर्ण झाले होते आणि तेही एका बाजूला कलले होते.

11व्या शतकात पिसा हे एक समृद्ध राज्य होते तेव्हा संपूर्ण इटली देशाचा विस्तार झालेला नव्हता. या मनोऱ्याबाबत अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकराव्या शतकात तीन मजले बांधून झाल्यानंतर या मनोर्‍याचे बांधकाम जवळपास शंभर वर्षे थांबले आणि ते नंतर बाराव्या शतकात पुन्हा सुरू झाले.

1272 साली हा मनोरा पुन्हा बांधायला घेतला गेला. झिझोवानी द सीमन या स्थापत्यशास्त्रज्ञाने या मनोर्‍याचे पुढचे बांधकाम करायला सुरुवात केली. पुढच्या सहा वर्षात हे बांधकाम सातव्या मजल्यापर्यंत गेले. हा मनोरा उत्तर दिशेकडे झुकला होता. त्याला पुन्हा सरळ कसा आणता येईल या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या.

परंतु पहिले चार मजले बांधल्यानंतर उत्तरेकडे झुकलेला हा मनोरा नंतरचे तीन मजले त्याच्यावर बांधल्यानंतर दक्षिणेकडे झुकला. सात मजले पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जवळपास ऐंशी वर्षे या मनोर्‍याचे काम थांबले. 

मग पुन्हा 13व्या शतकात 1360 ते 1370 या कालखंडामध्ये सगळ्यात वरचा बेल टॉवर बांधला गेला आणि अशा रीतीने हा मनोरा तयार झाला. सगळ्यात वरच्या बेल टॉवर मध्ये सात घंटा बसवल्या गेल्या होत्या. या सातही घंटा मधून वेगवेगळे सात सूर निघतात.

या मनोर्‍याला तयार होण्यासाठी तब्बल दोनशे वर्षांचा काळ लागला. बरं, इतकी वर्षे बांधकाम होऊनसुद्धा हा मजला एका बाजूला झुकलेल्या अवस्थेतच राहिला. त्याचा एका बाजूला कलण्याचा दोष जर सोडला तर ही इमारत रोमन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते.

गेली अनेक शतके ही इमारत जरी उभी असली तरी ती हळूहळू एका बाजूला कलत आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी हा मनोरा कोसळून पडेल ही भीती गेली काही शतके प्रत्येक इटालियन माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. 

1934मध्ये बेनिटो मुसोलिनीने हा कलता मनोरा अजून जास्त कलु नये म्हणून त्यामध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले. त्यानुसार आधुनिक स्थापत्य अभियंता यांना पाचारण केले गेले. मनोऱ्याच्या पायथ्याशी मोठी छिद्रे पाडून त्याच्या मध्ये सिमेंट भरले गेले परंतु याचाही काही उपयोग झाला नाही.

तोपर्यंत या वास्तूला जागतिक प्रसिद्धी मिळाली .आता तसे बघायला गेले तर सदोष बांधकामामुळे हा मनोरा एका बाजूला कललेला आहे. परंतु यामुळेच तो जगप्रसिद्ध झाला.

हा मनोरा भूकंप आला तर कोसळेल अशी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली. बाराव्या शतकापासून या मनोऱ्याच्या परिसरामध्ये पाच ते सहा वेळा प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के बसले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे झुकत्या मनोर्‍याला काहीही झाले नाही. 

हा मनोरा भूकंपामध्ये जमीनदोस्त का झाला नाही यावर अलीकडच्या काळामध्ये मोठे संशोधन केले गेले. त्यानुसार एका शास्त्रज्ञाच्या तुकडीला या पाठीमागचे रहस्य उलगडण्यात थोडेफार यश मिळाले आहे.

हा मनोरा बांधण्याच्या वेळी त्याच्या पायामध्ये जी माती टाकली गेली त्याच्यामुळे हा मनोरा भूकंपात देखील स्थिर राहिला असे अनुमान या शास्त्रज्ञांनी काढलेले आहे. या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी सॉईल स्ट्रक्चर इंटरॅक्शन असे नाव दिले आहे. मनोर्‍याचे बांधकाम जितके मजबूत आहे तितकीच त्याच्या पायाशी असलेली जमीन भुसभुशीत आणि मऊ आहे त्यामुळे या मनोर्‍याला भूकंपापासून संरक्षण मिळाले.

युनेस्कोने या इमारतीला जागतिक वारसा असे संबोधले. 1990 साली या मनोर्‍याचे कलणे वाढले म्हणून हा मनोरा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. तिथून पुढे अकरा वर्षे हा मनोरा पर्यटनासाठी बंद राहिला.

सातव्या मजल्यावर बसलेल्या बेल टॉवरमधल्या सगळ्या मोठ्या घंटा देखील त्याचे कलणे कमी व्हावे म्हणून काढून टाकण्यात आल्या. हा मनोरा त्याच्या मूळ स्थितीत आणण्यासाठी इटालियन सरकारने 90च्या दशकात रेस्‍टोरेशन प्रकल्प सुरू केला होता.

2001 साली हा प्रकल्प पूर्ण झाला. त्याचे परिणाम पुढच्या काही वर्षात दिसले. या मनोर्‍याचे कलणे हळूहळू कमी झाले. अर्थात जरी जगभरातले स्थापत्य शास्त्रज्ञ या मनोर्‍याला सरळ करण्यामध्ये गुंतलेले असले तरीही सर्वार्थाने हा मनोरा कधीही सरळ झालेला नाही आणि पुढेही होणार नाही.

आज हा मनोरा पर्यटकांसाठी खुला आहे आणि पुढील अनेक वर्षे पर्यटक स्थापत्यशास्त्राचा हा अद्भुत नमुना बघू शकतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!