आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० पासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घालायला सुरुवात केली होती. चीनच्या वुहानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये या विषाणूचा संसर्ग सुरू झाला होता. नोवेल कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला कोविड-१९ असे नाव देण्यात आले होते. तसे तर कोरोना विषाणूचा आकार तर अत्यंत सूक्ष्म आहे परंतु त्याने संपूर्ण जगाला हैरान करून टाकले आहे. कधी कधी वाटते की आता या विषाणुचा संसर्ग कमी होईल आणि सगळ काही पूर्ववत होईल, परंतु तेवढ्यातच पुन्हा एकदा या कोरोनाचे नव-नवीन प्रकार (व्हेरिएंट) येतात आणि हळूहळू निर्बंध वाढण्यास सुरुवात होते.
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत असताना, जगात एका नव्या संकटाने दार ठोठावले आहे. फ्रान्समध्ये या विषाणूचा एक नवीन प्रकार (IHU variant) सापडला असून त्याला IHU असे नाव देण्यात आले आहे.
जगभरातील तज्ज्ञांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे संसर्गाची अजून एक नवी लाट येऊ शकते, असे मानले जात आहे. या प्रकाराच्या जनुकीय रचनेमध्ये ४६ उत्परिवर्तन आणि ३७ डिलिशन आहेत. यामुळे स्पाईक प्रोटीनवर बऱ्यापैकी प्रभाव पडतो.
IHU प्रकार हा B.1.640 चा उप-वंश आहे आणि त्याचा शोध फ्रान्समधील Institut Hospitalo-Universitres (IHU) येथील संशोधकांनी घोषित केला आहे. यामुळेच या प्रकाराला आयएचयू असे नाव देण्यात आले आहे. हे B.1.640.2 म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. हा नवा प्रकार अशा वेळी आला आहे जेव्हा ओमीक्रॉन व्हेरिएंटने जगभरात दहशत पसरवली आहे. ओमीक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. WHO ने ओमीक्रॉनला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित केले आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, नोव्हेंबर २०२१ च्या मध्यात IHU प्रकाराच्या काही केसेस आढळून आल्या होत्या. IHU हे ओमीक्रॉनच्या अधिकृत शोधापूर्वी सापडले. आफ्रिकेतील कॅमेरून (ज्या खंडात ओमीक्रॉन देखील सापडला) मधून परत आलेल्या फ्रान्समधील एका माणसामध्ये नवीन प्रकार आढळला. त्याला फुफ्फुसाशी संबंधित लक्षणे जाणवू लागली आणि त्यानंतर त्याला कोरोना चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याच वेळी, त्याच्या शरीरात B.1.640.2 प्रकाराची लागण झाल्याची खात्री झाली. त्यानंतर दक्षिण-पश्चिम फ्रान्समध्ये आणखी ११ केसेस सापडल्या.
कोरोनाचा हा प्रकार नवीन नाही. COVID संसाधने आणि महामारीविषयक डेटाचा एक मुक्त-स्रोत डेटाबेस Outbreak.info अनुसार, B.1.640 प्रथम १ जानेवारी २०२१ रोजी आढळला होता. त्यात म्हटले आहे की या प्रकाराशी संबंधित ४०० केसेस आतापर्यंत सापडले आहेत.
आतापर्यंत १९ देशांमध्ये B.1.640 हा कोरोनाचा व्हेरिएंट आढळला असून त्यातील एकजण भारतात देखील आहे. जागतिक डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या ८९७६३ जनुकीय सिक्वेन्समधून भारतात IHU चा शिरकाव झालेलं समजलं आहे. B.1.640 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे फ्रान्स (२८७), काँगो (३९), जर्मनी (१७) आणि युनायटेड किंगडम (१६) मध्ये नोंदवली गेली आहेत.
आतापर्यंत फ्रान्समध्ये नव्याने IHU प्रकारांची फक्त डझनभर केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. इतर कोणत्याही देशात या नवीन व्हेरिएंटची कोणत्याही नवीन केसेस नोंदवल्या गेल्या नाहीत. कोरोनाव्हायरसच्या इतर प्रकारांपेक्षा B.1.640.2 अधिक मजबूत आहे की वेगाने पसरतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हेच कारण आहे की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप IHU प्रकारांना घातक म्हणून विचारात घेतलेले नाही. MedRxiv मध्ये प्रकाशित केलेल्या प्री-प्रिंट पेपरनुसार, IHU प्रकारातील विषाणूजन्य, महामारीविज्ञान किंवा क्लिनिकल वैशिष्ट्यांवर अंदाज लावणे म्हणजे अति करण्यासारखे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.