आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत स्वतंत्र होऊन ३० वर्षांपेक्षाही जास्तीचा काळ लोटला होता, तरी भारताचं युद्ध काही संपलं नव्हतं. हे वारंवार दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांनी आणि युद्धांनी सिद्ध होत होतं, स्वराज्याची प्राप्ती होऊनही अजून “सुराज्य” मिळालं नव्हतं. १९८०-९० चं दशक तर भारतासाठी अनेक अर्थांनी अडचणीचं ठरलं.
याच दशकात खलिस्तानी दहशतवादाने कळस गाठला होता. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था आणि सैन्याच्या मदतीने अनेक खलिस्तानी दहशतवादी संघटनांनी आपली कामं करण्याची ठिकाणं अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान अशा अनेक देशांत कार्यान्वित केली होती आणि भारताला चहू बाजूंनी घेरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
आपला शेजारी पाकिस्तान ज्याप्रमाणे भ्याड हल्ले करून भारताला डिवचतो, त्याचप्रमाणे खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतभरात उच्छाद मांडायला सुरुवात केली होती.
१९८५ च्या जूनच्या महिन्यात २३ तारखेला जवळ जवळ ३३० लोक एअर इंडियाच्या १८२ या विमानात भारतात जाण्यासाठी बसले. हे विमान मॉँटरिअल, लंडन, नवी दिल्ली या ठिकाणी थांबून शेवटी मुंबईला जाणार होतं. अचानकच आयर्लंडच्या किनाऱ्यावरून पुढे आल्यानंतर रडारवरून हे विमान दिसेनासं झालं.
एअर इंडियाचं १८२ कनिष्क हे प्रवासी विमान अटलांटिक समुद्रावर ३१००० फुटाच्या उंचीवर बॉम्बस्फोट होऊन, समुद्रात कोसळल्याची माहिती तपासानंतर मिळाली. या स्फोटात एकूण ३२९ नागरिकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये २६८ कॅनडियन, २७ ब्रिटिश तर २४ भारतीय नागरिकांचा समावेश होता. कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा नरसंहार म्हणून ओळखला जातो.
बॉंबस्फोटानंतर लगेचच लौरेन्टियन फॉरेस्ट नावाच्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला अटलांटिक महासागरात विमानाचा मलबा आणि काही तरंगत असलेले मृतदेह दिसले. भारतीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विमान बॉम्बस्फोटाने उध्वस्त झाल्याचा अंदाज वर्तवला. या आधी अशा प्रकारचे बोइंग-७४७ विमानं जमिनीवर उध्वस्त झाली आहेत, हवेत बॉम्बद्वारे उध्वस्त होणारं हे पहिलंच बोइंग-७४७ विमान.
बॉम्बहल्ल्याने ३२९ लोकांचा प्राण घेतला होता, त्यामध्ये २२ त्या विमानाचेच कर्मचारी होते, यापैकी फक्त १३२ मृतदेह सापडले, १९७ मृतदेह समुद्रातच हरवले. विमान दोन भागात तुटल्याने काही लोक विमानाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते हे आठ मृतदेहांवरून हे सिद्ध झालं होत. मृतांमध्ये तब्बल ८२ ते ८६ प्रवासी लहान मुलं होती तर ६ इन्फन्ट्स (शिशु) होते, विमानात २९ कुटुंबं होती.
या घटनेच्या एक तासाच्या आतच टोकियो विमानतळावर सामानवाहू गाडीवर स्फोट झाल्याची बातमी आली. हे सामान कॅनडाहून आलेल्या कॅनडियन पॅसिफिक एरलाईन्स या विमानातून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ठेवण्यासाठी नेलं जात होतं. या हल्ल्यात दोन सामान वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
कॅनडियन अन्वेषण अधिकाऱ्यांच्या मते वॅनकोव्हर विमानतळावरून एम. सिंग नावाच्या एका माणसाच्या दोन सुटकेस टोरंटो विमानतळावर आणल्या गेल्या, पण मिस्टर सिंग मात्र या सुटकेससोबत नव्हते. त्यापैकी एक सुटकेस एअर इंडियाच्या १८२ कनिष्क विमानात ठेवण्यात आली, तर दुसरी कॅनडियन पॅसिफिक एरलाईन या टोकियोला जाणाऱ्या विमानात ठेवण्यात आली.
टोकियो मध्ये पोहोचलेल्या या सुटकेसने आपलं काम टोकियो ते मुंबई जाणाऱ्या विमानात ठेवण्याआधीच समानवाहू गाडीवर केलं. या दोन्ही हल्ल्यांमागे कॅनडात असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं तपासानंतर सिद्ध झालं.
तलविंदर सिंग परमार, हर्दियाल सिंग जोहल, सुर्जन सिंग गिल आणि इंदरजित सिंग रेयात या चौघांनी मिळून या हल्य्याचा कट रचला आणि हल्ला घडवून आणला. तलविंदर सिंग परमार हा हल्य्याचा प्रमुख सूत्रधार होता तर इंदरजित सिंग रेयातने बॉम्ब तयार करण्याचं काम केलं होतं. तर हर्दियाल सिंग जोहल आणि सुर्जन सिंग गिल यांच्यावरचा कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे कट रचणाऱ्यांपैकी फक्त एक जण इंदरजित सिंग याला लंडनमधून फेब्रुवारी १९८८ मध्ये अटक करण्यात आली. पुढे १९८९ मध्ये त्याला कॅनडा सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले. १९९१ साली त्याच्यावर खटला चालवला गेला, या सुनावणीनंतर बॉम्ब बनवण्याच्या आरोपाखाली त्याला १० वर्षं कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
सन २००० मध्ये एअर इंडियाच्या १८२ कनिष्क या विमान बॉम्बस्फोटाचा तपास नव्याने सुरु करण्यात आला, त्या मध्ये सिद्ध झालेल्या गुन्ह्यांच्या आधारावर इंदरजित सिंग याला पुन्हा अटक करण्यात आली. २०१० मध्ये त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला विमान बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असल्याने ९ वर्षं कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तरी त्याची सुटका तीन वर्षांपूर्वीच म्हणजे २०१७ मध्ये झाली.
२००० साली सुरु करण्यात आलेल्या नव्या तपासात आणखी दोन आरोपीना अटक झाली, रिपुदमन मलिक आणि अजैब सिंग बगरी. पैकी रिपुदमन मलिकने या भ्याड दहशतवादी हल्ल्यासाठी वित्तपुरवठा केला होता आणि हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तलविंदर सिंग परमार याच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचं उघड झालं.
इंदरजित सिंग रेयातच्या जबानीतील विसंगतींमुळे (अर्थात कॅनडियन अधिकाऱ्यांशी झालेल्या गुप्त”करारामुळे”) रिपुदमन मलिक आणि अजैब सिंग बगरी यांच्यावरील गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. परिणामतः जाणीवपूर्वकरित्या निर्माण केल्या गेलेल्या साक्षी पुराव्यांच्या आभावामुळे या दोन्ही संशयितांची “निर्दोष” मुक्तता करण्यात आली.
आज रिपुदमन मलिक वॅनकोव्हरमध्ये राहतो आणि तो करोडोंचा मालक आहे.
कट रचणाऱ्यांमध्ये मुख्य असलेल्या आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा संस्थापक असलेल्या तलविंदर सिंग परमार याने बॉम्बस्फोटांनंतरच दहशतवादाचं केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानमध्ये पळ काढला. १९९२ साली भारतीय पंजाब पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. त्याच्याबरोबर आणखी दोन पाकिस्तानी सुद्धा त्या चकमकीत मारले गेले.
पाश्चिमात्य देशांतील इतकी कडक आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था भेदून खलिस्तानी दहशतवाद्यांद्वारे हा हल्ला करून ३०० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचे प्राण घेण्यात आले. कदाचित याचं कारण म्हणजे बेजबाबदारपणा आणि अप्रामाणिकपणा. विमानतळावरील बेजबाबदार कामगारांच्या कारभारामुळे बॉम्बने भरलेल्या सुटकेस विमानापर्यंत पोहोचल्या. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाश्चिमात्य देश त्यांच्या प्रत्यक्ष भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर गंभीर झाले.
आजमितीस पुन्हा एकदा दहशतवाद डोकं वर काढताना आपल्याला दिसतोय, अशा वेळी सध्यातरी आपापले मतभेद आणि मनभेद बाजूला ठेऊन मानवतेचा शत्रू असलेल्या या दहशतवादाच्या राक्षसाविरुद्ध सबंध मानवतेने युद्ध पुकारायला हवं. तथापि जे दहशतवादाविरोधात लढा देऊ इच्छित नाहीत आणि जाणीवपूर्वकरित्या त्यांचं समर्थन करतात त्यांना माणूस म्हणायला हवं का?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.