या वृद्ध महिलेने आपल्या सहाशे रुपये कमाईतले पाचशे रुपये करोनालढ्यासाठी दिलेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेली अनेक महिने जगभरात कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातलाय. चीनमधून निघालेला हा विषाणू आज सगळीकडे पसरून हजारो लोकांचा जीव घेतो आहे. भारतही यातून सुटलेला नाही. मार्च महिन्यापासून आधी आठ दिवस मग चौदा मग एकवीस असं करत आज सत्तरहुन अधिक दिवस झाले देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.

सगळेच व्यवहार ठप्प झालेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. हातावर पोट असणारे, पेन्शनर लोक, घरकाम करणाऱ्या बायका या तर हाल तर विचारूच नका. सरकार आणि इतर ngoनी सगळ्यांनाच आपापल्या परीने या संकटातून बाहेर निघण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

मोठेमोठे उद्योगपती, नट-नट्या, श्रीमंत, मध्यमवर्गीय सगळ्यांनीच पैसे, वेळ, अन्नदान अशा वेगवेगळ्या स्वरूपात जमेल तशी मदत केली.

कर्नाटकातसुद्धा मोठ्या प्रमाणात धर्मदायी संस्थांच्या वतीने, NGO च्या मदतीने विविध ठिकाणी मदतकार्य सुरू आहेत.

असंच काम म्हैसूर इथे रोटरी हेरिटेज म्हैसूरच्या वतीने चेन्नगिरीकोप्पलू आणि जवळपासच्या भागात अन्नदान करण्यासाठी पाकीट भरण्याचे वगैरे काम चालू होते. अचानक तिथले प्रमुख मंजुनाथ यांच्याकडे एक 70 वर्षाच्या आजीबाई येतात. त्यांना वाटतं की या आपल्याकडे मदत घ्यायलाच आल्या आहेत. म्हणून ते त्यांना फूड पॅकेट देऊ करतात. आजी त्याला नकार देऊन संकोचत पदराआड ठेवलेली एकुलती एक पाचशेची नोट काढतात.

त्या मंजुनाथला म्हणतात की,

मी गेला महिनाभर बघतेय की तुम्ही या भागात अविरतपणे काम करताय, अन्नदान करताय. ते बघून मला वाटलं की मी पण तुम्हाला काही मदत करावी म्हणून मी इथे आले. माझी 600 रुपयेच पेन्शन आहे त्यातले मी 500 देऊ शकते. कमी आहेत फार माहितीये पण तुम्ही त्याचा स्वीकार केलात तर मला फार आनंद होईल.

आणि ती नोट त्यांनी मंजुनाथच्या हवाली केली. तिथले सगळे कार्यकर्ते या प्रकाराने भांबावून गेले. अम्मांना फूड पॅकेट देत होतो याची जरा त्यांना लाजच वाटली. बऱ्याच वेळा नाही म्हणूनही शेवटी अम्मा ऐकेचना हे बघून त्यांच्या मानाखातर रोटरी हेरिटेजच्या कार्यकर्त्यांनी ती मदत स्वीकारली.

या आजींचं नाव होतं कमलअम्मा.

अम्मा चेन्नगिरीकोप्पलू इथेच राहतात. नवरा काही वर्षांपूर्वी वारला. म्हणायला दोन मुलं आहेत पण त्यांचा आधार न घेता अम्मा चार घरची कामं करतात. शिवाय नवरा गेल्यानंतर त्याची दरमहा 600 रुपये इतकी पेन्शन सरकार त्यांना देतं. तेवढीच काय त्यांची कमाई.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्यावर त्या ज्याठिकाणी काम करायच्या त्यांनी अम्मांच्या स्वास्थ्यासाठी म्हणून त्यांना आता काही दिवस कामावर येऊ नका म्हणून सांगितलं. तेव्हापासून ही दरमहा 600 रुपये येणारी पेन्शनच काय तो अम्माचा आधार आहे.

पण जेव्हा त्यांनी बघितलं की आज हजारो लोकं बेघर झालेत, त्यांच्या एक वेळच्या जेवणाचे हाल होतायत. त्यावेळी त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या तुटपुंज्या कमाईचा ९०% भाग गरजूंना दिला.

खरंतर आज सगळ्या टाटा-बिर्ला-अंबानींनी करोडो रुपये कोविड रिलीफ फंडमध्ये दिलेत. पण आपल्या थोड्याशा कमाईतून ९०% टक्के दान करणाऱ्या कमलअम्मांएवढं मोठं मन फार कमी लोकांचं आहे.

आज सगळ्यांना या महामारीने ग्रासलेले असताना असे प्रसंग, अशी माणसं खरंच एक नवी उमेद, नवी प्रेरणा देऊन जातात. “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या ओळी सार्थ ठरवतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!