आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
डॉन का इंतज़ार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है..
डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है।
हे डायलॉग आठवताच आपल्या डोळ्यांसमोर डॉनमधील अमिताभ बच्चनचा चेहरा नक्कीच येत असेल. चित्रपट सृष्टीतील या डॉनने आजही रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. पण, खऱ्याखुऱ्या जगातही पोलिसांना चकमा देऊन लपूनछपून राहणारे डॉन काही कमी नाहीत.
अगदी आजही कित्येक गुन्हेगार आहेत ज्यांना देशोदेशीचे पोलीस शोधत आहेत. शस्त्रास्त्रांच्या जोरावर इतर देशांना जेरीस आणून, तिथे हिं*सक कृत्ये करून त्या देशातील सुरक्षा व्यवस्थेला सळो की पळो करून सोडणारे हे द*हश*तवादी किंवा गुन्हेगार अनेक देशाच्या वांटेड लिस्टमध्ये असणे काही आश्चर्याची गोष्ट नाही.
पण, कुठेही ह*ल्ले किंवा खू*नखराबा न करताही फक्त बौद्धिक डावपेच आखून सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल करणारा एक असामान्य हॅकर देखील आज अनेक देशांच्या मोस्ट वांटेड लिस्टवर आहे. या हॅकरने अमेरिकेसारख्या महासत्तेलाही गुंगारा दिला आहे. बड्याबड्या देशांचे गुप्त दस्तावेज खुले करून या हॅकरने या राष्ट्रांचा रोष ओढवून घेतला आहे.
आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानामुळे कित्येक क्लिष्ट गोष्टी सोप्या झाल्या. देशादेशांच्या निकटवर्ती संबंधातून “ग्लोबल व्हिलेज”सारखी संकल्पना जन्माला आली. पण, याच तंत्रज्ञानाने तितकीच असुरक्षितताही वाढली. सायबर गुन्हे आणि सायबर वॉ*रसारखे धोके निर्माण झाले. संवेदनशील माहिती असुरक्षित बनली.
देशांतील सरकारची काही धोरणं जनतेपासून आणि इतर देशांपासूनही गुप्त ठेवले जातात, यामध्ये विशेषत: सुरक्षाविषयक कारवायांचा समावेश अधिक असतो. जागतिकीकरणात देशोदेशीच्या सीमा धूसर झाल्या असल्या तरी, प्रत्यक्ष सीमांवरील धोकेही तितकेच वाढले आहेत आणि सीमांवरील धोक्याइतकीच गुप्त माहिती उघड होण्याचेही धोके वाढले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या एका कंप्युटर प्रोग्रामरने अनेक मोठ्या देशांच्या सुरक्षा व्यवस्थेची अशीच वाईट अवस्था करून सोडली होती. या हॅकरने जगातील अनेक राष्ट्रांची झोप उडवली होती. विकीलीक्स या वेबसाईटवरून त्याने या देशांची अत्यंत गोपनीय माहिती उघड करून या देशांचे पितळ उघडे केले होते.
विकीलीक्स या नावावरूनच तुम्ही त्या खुंखार हॅकरचेही नाव ओळखलेच असेल. हो अगदी बरोबर ज्युलियन असांज!
ज्युलियन हा मूळचा ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. त्याने कंप्युटर प्रोग्राम हॅक करण्याचे असे काही कसब अवगत केले आहे की मोठमोठी सुरक्षा असलेले कंप्युटर्सही तो सहज हॅक करू शकतो. ऑस्ट्रेलियातील क्विसलँड येथे असांजचा जन्म झाला.
ज्युलियनच्या जन्माआधीच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्युलियनला “असांज” हे आडनाव त्याच्या दुसऱ्या पित्याकडून मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या क्विसलँड युनिव्हर्सिटीतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच वयात त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक सर्वांना जाणवत होती. म्हणूनच युनिव्हर्सिटीत असताना त्यांनी प्रोग्रामिंग, गणित आणि फिजिक्ससारखे विषय निवडले होते.
त्याचे वर्गमित्र त्याला कंप्युटरमधील किडा म्हणत असत. पण, तेव्हा कुणीही असा विचार केला नसेल की, आपल्या हॅकिंग कौशल्याने एक दिवस हा पोरगा भल्याभल्यांची झोप उडवेल. युनिव्हर्सिटीत असतानाच आपल्या मित्रांसमवेत त्याने एक हॅकिंग ग्रुप बनवला होता. करियरच्या सुरुवातीला त्याने अमेरिकेतील अनेक मोठ्या वेबसाईट हॅक केल्या होत्या.
हॅकिंगमध्ये असांजचा हात कुणीही धरू शकणार नाही. त्याचे हॅकिंगमधले कसब वादातीत आहे. मोठमोठे कंप्युटर त्याने अगदी लीलया हॅक केले होते. यामध्ये अमेरिकेतील सर्वांत सुरक्षित गणले जाणारे कंप्युटरदेखील सामील होते.
२००६ साली त्याने विकीलीक्स ही स्वतःची वेबसाईट बनवली. या वेबसाईटने तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. २००६पर्यंत आणि त्यानंतरही काही काळ ज्युलियन असांज हे नाव तसे कुणाला फारसे परिचित नव्हते. पण, चार वर्षातच हे नाव सर्रास सगळ्यांच्या तोंडात रुळले.
विकीलीक्सवर असांजने अनेक गुप्त दस्तऐवज खुले केले. हे असे दस्तऐवज होते, जे सरकार कधीही उघड करत नाही. देशांतील सरकारे आणि सेना या कागदपात्रांना फारच सुरक्षित ठेवतात. अशी गुप्त कागदपत्रे जाहीर प्रकाशित झाल्याने जगभर सनसनाटी निर्माण झाली.

आपल्या कागदपत्रांच्या सुरक्षेच्या बाबतीत अनेक देश जागरूक झाले. काही देशांची तर झोप उडाली. २०१२ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने बगदादवर जे हवाई ह*ल्ले केले त्यासंबधीचे गुप्त दास्ताऐवज विकीलीक्सवर प्रकाशित झाल्यानंतर अमेरिकेच्या पायाखालची तर जमीनच सरकली.
या दस्ताऐवजानुसार, अमेरिकेने बगदाद वर जे काही ह*ल्ले केले ते पूर्वनियोजित होते. अमेरिकेच्या सैन्याचे अनेक दाव्यांमागील फोलपणा या दास्ताऐवजातून स्पष्ट होत होता.
कोणत्याही देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी पंगा घेणे ही बाब तशी सोपी नव्हती. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा बुरखा खुलेआम फाडल्याने अमेरिकेला जबरदस्त हादरे बसले. या कृत्याने असांजविरोधात गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. अमेरिकेने असांज विरोधात वॉरंट जारी केले. यानंतर असांज चांगलाच अडचणीत आला.
फक्त अमेरिकाच नाही तर त्याने स्वतःच्या देशाचीही पोलखोल केली. ऑस्ट्रेलियन सरकारची अनेक गुप्त कागदपत्रे प्रकाशित केली.
यानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्री जुलिया गीलार्ड यांनी असांजच्या सर्व उद्योगांना बेकायदा घोषित करून त्यांना टाळे लावले. परंतु, ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी तेव्हा असांजची पाठराखण केली होती.
इतके सगळे कारनामे केल्यानंतर उघडपणे वावरणे असांजसाठी अगदी कठीण बाब बनून गेली. देशोदेशीच्या सरकारांनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली. तरीही असांजची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. उलट, त्याच्या बचावासाठी अनेकदा नागरिक रस्त्यावर उतरले.

२००८ साली त्याला इक्नोमिस्टकडून दिला जाणारा न्यू मिडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावरून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज बांधता येईल. टाईम्स ग्रुपकडूनही त्याला रीडर्स चॉइस अवार्डने सन्मानित करण्यात आले होते.
स्वीडन सरकारनेही त्याच्या विरोधात अटक वारंट जारी केल्यानंतर त्याच्या अडचणीत आणखीन भर पडली. पुढे असांजने इक्वेडोर दुतावासात राजकीय शरणागती पत्करली होती. ब्रिटनच्या अनेक राजकारण्यांचा असांजला अशा प्रकारे आश्रय देण्याला विरोध होता.
परंतु पुढे एप्रिल २०१९ मध्ये इक्वाडोरच्या काही राजकारण्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यामुळे त्याला दूतावासातून निष्कासित करण्यात आले आणि त्याला ब्रिटन सरकारने अटक केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








