आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतीय हॉकीचा संघामध्ये ओडिशा सरकारचे मोठे योगदान आहे. आता तुम्ही म्हणाल ओडिशा सरकारचा आणि हॉकी संघांचा काय संबंध? आहे ना, दोन्ही गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे..!
टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये पुरुष हॉकीसंघानं ४९ वर्षांच्या अंतरानंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर, महिला संघानं पहिल्यांदाचं सेमीफायनलमध्ये प्रवेश करत इतिहास रचला. त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही संघ आणि ओडिशा सरकारचं अभिनंदन करणारे संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होते.
पुरुष हॉकी संघाचा तत्कालीन उपकर्णधार बिरेंद्र लाक्रा आणि महिला संघातील खेळाडू, दीप ग्रेस एक्का हे दोघे ओडिशातील आहेत, हे झालं एक कारण. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही संघाच्या या यशामध्ये ओडिशा सरकारचा अविभाज्य वाटा होता.
जेव्हा आपले दोन्ही राष्ट्रीय संघ संकटात होते तेव्हा ओडिशा सरकारनं पुढे येत संघांना आधार दिला होता. आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल की, हॉकीच्या दोन्ही राष्ट्रीय संघांना ओडिशा सरकारची स्पॉन्सरशिप आहे!
सहारा इंडियाचा दोन्ही महिला व पुरुष हॉकी संघांसोबत २०२१ पर्यंत करार होता. मात्र, अचानक हॉकी इंडियानं सहाराची स्पॉन्सरशिप रद्द केली. मुदतीपूर्वी करार संपवण्याचं कोणतही अधिकृत कारण दिलं नव्हतं. सहारा कंपनी संकटांनी घेरलेली असल्यामुळं परस्पर विचारविनिमय करून कारार रद्द निर्णय घेतल्याचं हॉकी इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं त्यावेळी सांगितलं होतं. १९९५ पासून सहारा हॉकीच्या राष्ट्रीय संघांशी संलग्न होती.
सहाराचा ‘सहारा’ गेल्यानंतर हॉकी संघ निराधार झाले होते. अशा वेळी सहाराच्या जागी सर्व राष्ट्रीय हॉकी संघांचा (कनिष्ठ आणि वरिष्ठ, पुरुष व महिला संघ) स्पॉन्सर म्हणून ओडिशा सरकार समोर आलं. २०१८ मध्ये ओडिशा सरकारनं हॉकी इंडियासोबत पाच वर्षांचा करार केला. हॉकी इंडिया आणि ओडिशा सरकार यांच्यात १५० कोटी रुपयांचा हा करार झालेला आहे. राष्ट्रीय संघांना स्पॉन्सरशिप देणारं ओडिशा हे पहिलं आणि एकमेव राज्य आहे.
ओडिशा सरकारनं स्पॉन्सरशिप देण्याचा घेतलेला निर्णय हा नक्कीच धाडसी म्हणावा लागेल. ज्यावर्षी त्यांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली त्यावर्षी आपले पुरुष आणि महिला हॉकी संघांचं वेळापत्रक एकदम भरगच्च होतं. याचाचं अर्थ संघ जितके व्यस्त तितका त्यांचा खर्च देखील जास्त असणार होता. दोन्ही राष्ट्रीय संघ २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि एशियन गेम्समध्ये सहभागी झाले होते. त्यासोबतच लंडनमध्ये झालेल्या महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सहभागी झाला होता. तर, पुरुष संघ देखील वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पुरुष हॉकी वर्ल्डकपचं यजमानपद ओडिशाकडं होतं.
खेळ हा ओडिशाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. खेळांचा राज्याच्या विकासात अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. फील्ड हॉकी, ॲथलेटिक्स, टेनिस, रग्बी युनियन, रग्बी सेव्हन्स, फुटबॉल आणि क्रिकेट हे ओडिशातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.
ओडिशाचं आणि हॉकीचं जुनं नातं आहे. राज्य सरकारकडे हॉकी इंडिया लीगमधील ‘कलिंगा लान्सर्स’ची मालकी आहे. भुवनेश्वरमध्ये ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ आणि ‘हॉकी वर्ल्ड लीग’सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत.
ओडीशाला चेष्ठेत ‘हॉकीचा पाळणा’ म्हणून ओळखलं जातं. कारण आतापर्यंत अनेक प्रतिभावंत खेळाडू ओडिशातून आलेले आहेत. दिलीप टिर्की, इग्नेस टिर्की आणि लाजरस बार्लासारखे महान खेळाडू ओडिशाचीच निर्मिती आहेत. तर, आताचे युवा खेळाडू बीरेंद्र लाकरा, अमित रोहिदास, दिप्सन टिर्की, नमिता टोप्पो आणि दीप ग्रेस एक्का हे देखील ओडिशाच्या मातीत तयार झालेले आहेत.
पुरुष आणि महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनल्समध्ये पोहचले होते, तर ओडिशा सरकारची मान अभिमानानं उंचावली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले. ‘आपले दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाल्याचा अतिशय आनंद होता.
हॉकीशिवाय रग्बी या खेळाला देखील ओडिशा सरकारनं आधार दिला आहे. २०२०मध्ये ओडिशा सरकार आणि इंडियन रग्बी फुटबॉल युनियन (आयआरएफयु) यांच्यात तीन वर्षांचा करार झालेला आहे. या करारानुसार २०२३ पर्यंत भारतीय राष्ट्रीय रग्बी संघांला ओडिशा सरकार स्पॉन्सर करणार आहे. याशिवाय खेळाडूंना उच्च कार्यक्षमता प्रशिक्षण आणि कंडिशनिंग देखील उपलब्ध करून देणार आहे.
राष्ट्रीय हॉकी संघांचे पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रायोजकत्व, नंतर आयएसएलमध्ये ओडिशा एफसीला पाठिंबा दिल्यानंतर ओडिशानं राष्ट्रीय रग्बी संघांला स्पॉन्सर करून आणखी एक बेंचमार्क सेट केला आहे.
ओडिशामध्ये कृषी-आधारित अर्थव्यवस्था आहे. (त्यात आता हळूहळू उद्योगांचा वाटा वाढत आहे) औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या इतर राज्यांचा विचार केला असता तुलनेनं ओडिशा गरीबच म्हणावं लागेल. मात्र, तरी देखील या राज्यानं राष्ट्रीय संघाना स्पॉन्सरशिप देण्याचं धाडस दाखवलं, या गोष्टीचं जितकं कौतुक करावं तितक कमीच आहे. आता फक्त आपल्या पुरुष आणि महिला संघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करून ओडिशा सरकारचा मान राखतील यात शंकाच नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










