आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चित्रपट : इंसेप्शन (Inception )
वर्ष : २०१०
शैली : विज्ञान कल्पनारम्य (Sci-Fi)
भाषा : इंग्रजी (हिंदीमधेही उपलब्ध)
स्वप्न – आपल्या सगळ्यांसाठी एक दैनंदिन गोष्ट जरी असली तरी आपल्याला अचंबित करण्याची क्षमता स्वप्नांमध्ये असते हे नाकारता येणार नाही. विज्ञानालाही स्वप्नांचं कोडं पूर्णपणे सोडवता आलेलं नाही. आपल्या सर्वांच्याच मनात स्वप्नांविषयी कुतुहूल असतं आणि त्यावर पडणारे असंख्य प्रश्न. स्वप्नांचा विषय, समजायलाच एवढा कठीण आहे की त्यावर एखादा चित्रपट बनवून तो लोकांच्या गळी उतरवणे म्हणजे महाकठीणच काम. पण हे शिवधनुष्य उत्कृष्टपणे एका चित्रपटाने पेललंय.
त्या चित्रपटाचं नाव आहे “इंसेपशन”.
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते “ख्रिस्टोफर नोलन” नावाच्या कसलेल्या दिग्दर्शकानं. नोलन हा हॉलीवूडमधील एक नावाजलेला दिग्दर्शक असून त्याच्या कामाची झलक ही त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांवरून येते.
चित्रपटाची सुरुवात होते डोमिनिक कौब नावाच्या इसमापासून जो एक व्यावसायिक चोर असतो. आपल्या प्रशिक्षित साथीदारांच्या मदतीने चोरी करतो. पण ही चोरी कुठल्या हिऱ्यामोत्यांची चोरी नसते. ती मानवी मनातील माहिती, कल्पना आणि गुपितांची चोरी असते. मानवी मन आपली गुपितं अंतर्मनात म्हणजे सुप्त मनात (Subconscious Mind) सुरक्षित ठेवतं. तिथून आपल्या नकळत ही गुपितं चोरण्यात कौब आणि त्याचा साथीदार आर्थर यांचा हातखंडा असतो.
पण एखाद्याच्या मनात घुसणार कसं तेही त्या व्यक्तीच्या नकळत, आणि त्याच्या मनातील गोष्टींची चोरी करणार कशी?
कौब त्यासाठी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. तो त्या व्यक्तीच्या सुप्त मनात प्रवेश करण्यासाठी स्वप्नांचा उपयोग करतो. त्या व्यक्तीला बेशुद्ध करून आपल्या साथीदारांसोबत तो त्याच्या स्वप्नात प्रवेश करून तिथून त्याच्या सुप्त मनातून ती गुपितं, कल्पना तो माहिती करून घेत असतो आणि हे सगळं त्या व्यक्तीला कळणारही नाही इतक्या शिताफीने.
अशीच एका ‘सायतो’ नावाच्या व्यावसायिकाच्या मनातील गुपित चोरायची कामगिरी करताना कौब आणि त्याचे साथीदार पकडले जातात. सायतो संधीचा फायदा घेऊन त्यांना स्वतःसाठी एक काम करण्याची गळ घालतो. पण हे काम नेहमीसारखं मनातील गुपित चोरण्याइतकं सरळ नसत. असं काम आतापर्यंत कोणीच केलेलं नसतं.
सायतोला एका व्यक्तीच्या सुप्तमनात स्वप्नाच्या आधारे कल्पना रुजवायची असते. ती व्यक्ती म्हणजे ‘रॉबर्ट फिशर’– सायतोच्या प्रतिस्पर्धी कंपनीचा उत्तराधिकारी. सायतोला रॉबर्टच्या मनात त्याची स्वतःचीच कंपनी संपवायची कल्पना रुजवायची असते.
कौब सुरुवातीला नकार देतो पण जेव्हा सायतो त्याबदल्यात कौबवर बायकोच्या हत्येच्या असलेल्या आरोपातून सुटका करून द्यायची हमी देतो तेव्हा तो या कामाला होकार देतो.
काम हातात घेतल्यानंतर कौब त्यासाठी स्वतःची एक टीम तयार करतो. रॉबर्टच्या अंतर्मनात घुसण्यासाठी व त्याच्या मनात कंपनी संपवण्याची कल्पना रुजवण्यासाठी कौब स्वप्नांच्या तीन पायऱ्यांची योजना आखतो. स्वप्नांच्या तीन पायऱ्या म्हणजे स्वप्नाच्या आत स्वप्न आणि त्याच्या आत एक स्वप्न.
त्याच्या टीममध्ये सहभाग असतो-
एम्स- स्वप्नांमधील बहुरुप्या,
युसूफ- गुंगीच्या औषधाचा तज्ञ,
अरियाडने- स्वप्नांचं डिझाईन एका चक्रव्यहाप्रमाणे तयार करणारी आर्किटेक्ट
आणि
आर्थर- मदतनीस.
चित्रपटाचा वेग हा सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकदम लयीत आहे. तो कुठेही रटाळ वाटत नाही आणि याच सर्व श्रेय हे निर्विवादपणे दिग्दर्शकाला जातं. लिओनार्डो, मायकेल केन, जोसेफ लेवीट, टॉम हार्डी, एलेन पेज यांनी स्वतःच्या पात्रांना योग्य न्याय दिलाय.
चित्रपट पाहताना लेखकाचं स्वप्नाबद्दल असलेलं वैज्ञानिक ज्ञान, लेखकाची बारीक निरीक्षणं मन जिंकून जातात. स्वप्नांच्या तीन पायऱ्यांमधील थरार दिग्दर्शकाने अचूक टिपला आहे. पूर्णवेळ चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
चित्रपटाची पटकथा, चित्रीकरण, कला दिग्दर्शन, व्हिजुअल इफेक्ट या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटातील थरारक क्षण जिवंत करण्याचं काम केलयं पार्श्वसंगीतानं. हॅन्स झिमर या संगीतकाराने दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटाला चार चांद लावलेत.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाने पूर्ण जगातून तब्बल ८१ कोटी डॉलरची कमाई केली. या चित्रपटाला ४ ऍकेडमी अवार्ड्स बरोबरच इतरही अवार्ड्स मिळाले.
कौब आणि त्याचे सहकारी आपल्या कामात यशस्वी होतात का?
कौब त्याच्या बायकोच्या मृत्यसाठी कारणीभूत कसा ठरतो ?
कौबची मेलेली बायको त्यांच्या कामात कसा अडथळा आणते ?
व्यक्तीच्या मनात स्वप्नाच्या आधारे कल्पना स्थापन करणं, रुजवणं शक्य आहे हे कौबला कसं कळतं?
या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील. चित्रपट पाहण्यासाठी घालवलेला वेळ कामी वाया जाणार नाही हे नक्की!
या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.