आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२०१९ साली जैश-ए-मोहम्मद या आतं*कवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय द*हश*तवादी म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केले. हा तोच अजहर आहे, ज्याने २००१ साली संसदेवर ह*ल्ला केला होता. हा तोच अजहर आहे ज्याने २०१६ चा पठाणकोट ह*ल्ला घडवून आणला होता. अगदी पुलवामा ह*ल्ल्यामागेसुद्धा याचाच हात असण्याची शंका आहे.
भारताच्या अथक प्रयत्नांनंतर आणि अर्थातच संयुक्त राष्ट्रातील देशांच्या पाठींब्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय द*हश*तवादी म्हणून घोषित करण्यात आले. पण हे घडवून आणण्यामागे एका व्यक्तीचा खूप मोठा हात आहे.
ती व्यक्ती म्हणजे संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन.
जवळपास साडेचार वर्षांची कारकीर्द पूर्ण करुन नुकतेच या पदावरून सय्यद अकबरुद्दिन निवृत्त झाले. जेव्हा एखादी सक्षम व्यक्ती इतक्या महत्त्वाच्या पदावर असते, तेव्हा त्या पदाची शोभा अजूनच वाढीला लागते. असंच काहीसं सय्यद अकबरुद्दिन यांच्याबाबतीत झालं.
अकबरुद्दिन यांचा जन्म २७ एप्रिल, १९६० रोजी हैदराबाद येथे झाला. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील प्रो. बशिरुद्दिन देखील भारतीय डिप्लोमॅट होते. काही वर्षे कतारमध्ये त्यांनी राजदूत म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यानंतर ते उस्मानिया विद्यापीठाच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर म्हणून काम करत होते. त्यांच्या आईसुद्धा इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. असे म्हणतात की, अकबरुद्दिन यांना डिप्लोमसिचे गुण त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले आहेत.
सय्यद अकबरुद्दीन १९८५च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतात आणि भारताबाहेर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. त्यांचं पहिलं पोस्टिंग कैरो येथे झालं. तिथेच त्यांनी उर्दु भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यानंतर त्यांनी दोन वेळा सौदी अरेबियामध्ये काम केलं. सुरुवातीला १९८८ ते १९९२ मध्ये रियाधला तर २००० ते २००४ मध्ये जेदाह येथे त्यांनी ‘कौन्सिल जनरल ऑफ इंडिया’ म्हणून काम केले.
१९९५ ते ९८ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदा भारताचा सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं. त्या मिशनचा मुख्य उद्देश UNSC रिफॉर्म आणि शांतता प्रस्थापित करणे हा होता. २००५ पर्यंत विदेश मंत्रालयात संचालक म्हणून काम पाहिलं. २०११ पर्यंत व्हिएन्नाच्या आंतरराष्ट्रीय अणुसंशोधन केंद्राचे काम केल्यावर ते भारतात परतले.
२०१५ पर्यंत त्यांनी विदेश मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली व २०१६ साली संयुक्त राष्ट्र संघाचे स्थायी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
संयुक्त राष्ट्र संघात प्रत्येक मुद्द्यांवर त्यांनी भारताची बाजू अतिशय खंबीरपणे मांडली. क्लायमेट चेंजच्या मुद्द्यावर त्यांनी भारताला एक लीडर म्हणून पुढे आणलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या 50kw च्या “महात्मा गांधी सोलर पार्क” ची उभारणी करण्यामागे त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
एवढंच नाही तर चीनचा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय आ*तंक*वादी म्हणून घोषित करण्याला सुरुवातीपासूनच विरोध होता. पण तरीही अकबरुद्दिन मात्र या मुद्द्यावर अडून होते. त्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि सरतेशेवटी अजहरला आंतरराष्ट्रीय आ*तंक*वादी म्हणून घोषित करण्यात आले.
याचा अर्थ तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही प्रवास करू शकणार नाही. त्याला सर्व देशांमधून ब्लॅक लिस्ट करण्यात येईल. याशिवाय जेव्हा जेव्हा चीनने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी बखुबीने तो हाताळला.
ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखला स्पेशल स्टेटस देणारे कलम ३७० भारत सरकारने बरखास्त केले. याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात खूप धडपड केली. पण त्याचे सगळे प्रयत्न या एका माणसामुळे फोल ठरले. अकबरुद्दिन त्यांच्या पत्रकार परिषदेतील उत्तरांसाठी, हजरजबाबीपणासाठी तेवढेच प्रसिद्ध होते जेवढे त्यांच्या कामासाठी.
एका पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तरं देताना स्पष्टपणे सांगितले की, “कलम ३७० आणि त्याच्याशी निगडित सगळे प्रश्न हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी आणि सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळावी यासाठी घेण्यात आला आहे. परंतु पाकिस्तान याला जि*हादी रूप देऊन केवळ भडका उडवू पहात आहे, पण भारत हे कधीही होऊ देणार नाही.”
संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. क्लायमेट चेंजचा मुद्दा, मसूदला आंतरराष्ट्रीय आ*तंक*वादी म्हणून घोषित करण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा असो, त्यांनी केलेलं काम इतर स्थायी सदस्यांपेक्षा वेगळ्या धाटणीचं, निश्चितच वाखाणण्याजोगं होतं.
३० एप्रिल २०२० रोजी ते निवृत्त झाले. निवृत्त होतानासुद्धा त्यांनी जगाला भारतीय संस्कृतीचं प्रतिक दाखवलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांचा “भारताची परंपरा आहे की आम्ही कधीच हात मिळवून हॅलो म्हणत नाही आम्ही समोरच्याला मान देऊन हात जोडून नमस्ते म्हणतो. आज इथून जाताना मी तुम्हाला तसाच नमस्कार करू इच्छितो“, अशा शब्दात निरोप घेतला.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाचं नाव सर्व स्तरावर उंचावण्यासाठी असे अनेक प्रशासकीय अधिकारी काम करत राहतात. त्यांचं कधीच, कुठेच नाव होत नाही. त्यांच्या कामाचा गाजावाजा होत नाही. राजकारण्यांच्यासोबत असे अधिकारी आपलं सगळं आयुष्य देशासाठी जाळून प्रसिद्धीपासून मात्र अलिप्त राहतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.