आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या भूमीच्या संपन्नतेकडे अनेक परकीय शासक आकर्षित झाले, अनेकांनी भारतावर आपले शासन प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहिले. अनेकांनी भारतावर आक्र*मण करून इथल्या साधन-संपत्तीचा सर्वनाश केला आणि या देशातील असंख्य मंदिरांना जमीनदोस्त केले. अनेक आक्र*मक भारतात आले आणि इथून प्रचंड प्रमाणात संपत्ती लुटून आपल्या मायदेशी परतले, पण काही शासक असे देखील होते, जे केवळ भारतावर राज्य करण्याच्या इराद्याने भारतात आले होते आणि त्यांनी याठिकाणी काही दशके, काही शतके राज्य केलं.
भारतावर स्वारी करायला आलेल्या सर्व विदेशी आक्र*मकांपैकी एक होता मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर.
समरकंदच्या ओढीने तो भारतात आला. पानिपताचा रणसंग्राम यानंतर खानवा यु*द्ध, चंदेरी यु*द्ध आणि घाघराचे यु*द्ध जिंकून बाबराने उत्तर भारतात आपले वर्चस्व कायम करत मुघल राजवटीची स्थापना केली.
असं म्हणतात की सुरुवातीला बाबराच्या मनात भारतावर राज्य करण्याचा विचार देखील नव्हता. त्याला फक्त समरकंद जिंकायचे होते, त्याच्या डोक्यावर फक्त समरकंदचे वेड होते. त्याला कुठल्याही परिस्थितीत समरकंद हवे होते. त्याने अनेक वेळा समरकंदवर ह*ल्ला केला आणि प्रत्येक वेळी त्याला अत्यंत मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. बाबर हा स्वभावाने फार क्रू*र होता, त्याचा रक्ताचा एक एक थेंब फक्त शत्रूच्या सं*हारासाठी बनलेला होता.
१४ फेब्रुवारी १४८३ मधे जन्माला आलेला जहीर उद दिन मुहम्मद बाबर हा पित्याच्या बाजूने तैमूरचा पाचवा वंशज होता तर आईच्या बाजूने तो चंगेज खानचा वंशज होता. क्रू*रता त्याच्या नसानसात भिनलेली होती. तो शक्तिशाली होता पण त्याला शेवटपर्यंत समरकंदवर विजय मिळवता आला नाही.
बाबराचे पिता उमर शेख हे मिरझा फरगाना या उझबेकिस्तानच्या एका छोट्या राजगदीचे राजे होते आणि बाबर १२ वर्षांचा असताना त्यांचा मृत्यू झाल्याने बाबराला सिंहासनावर बसविण्यात आले. पण तो उत्तम शासक नसल्याने त्याची त्याच्या नातेवाईकाने सिंहासनावरून हकालपट्टी केली. यानंतर एकीकडे बाबराच्या काकाने आणि दुसरीकडे बाबराच्या मामाने मिरझा फरगानावर आक्र*मण करण्याची तयारी सुरु केली.
बाबराचा त्याच्या स्वकीयांनी विश्वासघात केला होता. अंततः त्याला मैदान सोडून पळ काढावा लागला होता. या दरम्यानच्या काळात बाबर हा अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये जाऊन राहिला. याच ठिकाणी त्याला समरकंदची पहिल्यांदा माहिती मिळाली.
बाबराला हे माहिती होते की समरकंदची स्थापना त्याचा पणज्याने अर्थात तैमूरने केली आहे, यामुळे तो स्वतःला समरकंदचा सम्राट म्हणवून घेऊ लागला. दोन वर्ष वनात काढल्यानंतर १४९६ मध्ये त्याने समरकंदवर आक्र*मण केले. इथे त्याने तब्बल ७ महिने यु*द्ध केले, अत्यंत लहान सैन्य घेऊन जाऊन देखील अगदी प्राण पणाला लावून लढला. शेवटी त्याला या यु*द्धात अपयशच आले. पण समरकंदच्या यु*द्धानंतर बाबराच्या अडचणी संपल्या नव्हत्या, या यु*द्धकाळात त्याच्या एका विश्वासू सरदाराने देखील त्याला फसवून मिरझा फरगान या बाबराच्या राज्यावर आपले प्रभुत्व निर्माण केले.
पाठीत सुरा खुपसणाऱ्या या विश्वासघातकी सरदाराचा सर्वनाश करण्याचा दृष्टीने बाबराने फरगानावर आक्र*मण केले.
पण इथेही त्याच्या अडचणी संपल्या नाहीत, त्याचेच अनेक सैनिक त्याची साथ सोडून शत्रूला जाऊन मिळाले. आता स्वतःचे राज्य आणि सैन्य गमावल्यानंतर बाबर एकटा पडला होता. त्याच्याकडे त्याच्या वडिलांच्या काही विश्वासू सरदारांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. पण सर्वकाही गमावून देखील बाबराला समरकंदवर आपले शासन प्रस्थापित करायचे होते.
बाबराने आपल्या निवडक निष्ठावंत सरदारांना सोबत घेऊन पुन्हा आपले सैन्य उभारायला सुरुवात केली. छोटे सैन्य घेऊन त्याने फारगानवर आक्र*मण केले. यावेळी त्याचा विजय झाला आणि त्याला पुन्हा आपले राज्य परत मिळाले. आपले राज्य पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर त्याने समरकंदवर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी समरकंदवर मोहम्मद शायबानीचे राज्य होते. १५०१ साली बाबराने समरकंदवर आक्र*मण केले आणि याठिकाणी त्याचा मोहम्मद शायबानीने अत्यंत निष्ठुरपणे पराभव केला. बाबराला अटक करण्यात आली.
तुरुंगात असताना मोहम्मद शायबानीला त्याने संधी प्रस्ताव पाठवला आणि मुक्ततेची याचना केली. या प्रस्तावात त्याने शायबानीच्या बहिणीशी विवाह करण्याची मागणी केली होती. शायबानीने हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याला मुक्त केले. बाबरला आता कळून चुकले होते की समरकंद त्याच्या आवाक्याबाहेर आहे. तो आपले उरलेले सैन्य घेऊन जंगलांमध्ये काही वर्ष भटकत राहिला.
या काळात खुसरो शाह समरकंदवर चालून आला, पण मोहम्मद शायबानी त्याचा देखील पराभव केला. त्याच्या सैनिकांनी त्याच जंगलात आश्रय घेतला जिथे बाबर होता. बाबरची आणि त्या सैनिकांची जंगलात गाठ पडली. बाबराने त्या सैनिकांना समरकंदवर विजय मिळवता येऊ शकतो असा विश्वास दिला, त्यामुळे त्या सैनिकांनी आणि सरदारांनी बाबरचे नेतृत्व स्वीकारले. यामुळे बाबराच्या राज्याला आसपासचा अनेक राज्यांचा प्रदेश येऊन जोडला.
बाबराने स्वतःला बादशहा म्हणवून घेण्यास सुरुवात केली. त्याने पुन्हा एकदा समरकंदवर आक्र*मणाची तयारी सुरु केली. यावेळी त्याने इराणच्या सम्राटाकडे मदत मागितली.
इराणच्या सम्राटाने सैनिकी मदत करण्याचे आश्वासन दिले पण त्या मोबदल्यात त्याने बाबरला इस्लामच्या सुन्नी पंथाचा त्याग करून शिया पंथाचा स्वीकार करण्याची मागणी केली.
समरकंद हे बाबराच्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय होते. त्याने त्यासाठी शिया होणे स्वीकारले. आता त्याला इराणच्या सैन्याची साथ लाभली होती आणि त्याने विशाल सैन्य घेऊन समरकंदवर आक्र*मण केले. एवढ्या विशाल सैन्यापुढे समरकंदचा सैन्याचा निभाव लागला नाही. अखेरीस बाबर समरकंदचा अनभिषिक्त सम्राट बनला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
इराणच्या सम्राटाने बाबराला त्याचा राजवटीत येणाऱ्या सर्व सुन्नी मुस्लिमांची कत्तल करण्याचे अथवा त्यांना शिया पंथीय बनवण्याची मागणी केली. बाबरकडे जरी सत्ता असली तरी तो इराणच्या सम्राटाच्या विरोधात जाऊ शकत नव्हता, त्यामुळे त्याने सम्राटाची मागणी मान्य केली. त्याने जबरदस्ती सुन्नी मुस्लिमाना शिया बनवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या साम्राज्यात मोठा विद्रोह उसळला, यामुळे बाबराला समरकंद सोडून पळ काढावा लागला.
ज्या राज्याला मिळवण्यासाठी इतके कष्ट घेतले, ते असे हातचे घालवून बसल्यानंतर बाबर अफगाणिस्तानात आला, त्यावेळी अफगाणिस्तानात युसूफ़जाई टोळ्यांचे शासन होते, या टोळ्या एकमेकांशी यु*द्ध करायचा. ज्यावेळी बाबर आला त्यावेळी अफगाणी लोकांवर कर लावण्यास सुरुवात केली, यामुळे या टोळ्या चिडल्या आणि त्यांनी बाबराच्या विरोधात बंड पुकारले.
आता बाबराने संपूर्ण मुस्लिम जगताचे शत्रुत्व अंगावर ओढवून घेतले होते. अरबी, तुर्की, मंगोल, शिया, सुन्नी, अफगाणी हे सर्वच मुस्लिम विरोधात गेल्याने बाबराने नव्या प्रदेशाचा शोध सुरु केला. याकाळात त्याची नजर भारतावर गेली.
भारतावर त्याचा पणजा तैमूरने आक्र*मण केले होते, त्यावेळी लुटलेल्या धनदौलतीचे किस्से बाबराने ऐकले होते, याच विचाराने तो देखील भारतात आला. भारतात आल्यावर त्याने दिल्लीच्या लोधी वंशाच्या सुलतानाचा पानिपतच्या यु*द्धात पराभव केला आणि दिल्लीवर आपले राज्य प्रस्थापित केले. त्याने पुढे खंगवा, चंदेरी आणि घाघराच्या यु*द्धात विजय मिळवत, भारतात साम्राज्य विस्तार केला.
जर त्याकाळी बाबराने समरकंदवर आपले प्रभुत्व निर्माण केले असते तर तो कधीच भारतात आला नसता आणि भारतात रक्तरंजित मोगलाई आली नसती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









