ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग ४ – सिगारेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तंबाखू हा पदार्थ आज भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केला जातो. धुम्रपान करण्यासाठी देखील तंबाखूचा मोठा वापर केला जातो. असंख्य लोकांना तंबाखूचे भयंकर व्यसन लागले आहे. हे व्यसन फार दुर्धर असून यामुळे लोकांच्या एकूण आरोग्यावर फार गंभीर दुष्परिणाम झाला आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे माहिती असून देखील तंबाखू सेवन हे भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते.

तंबाखू, बिडी आणि सिगारेट या तिन्ही गोष्टी ब्रिटीश आमदनीत लोकप्रिय झाल्या आणि आज त्या स्वतंत्र भारताच्या सरकारसाठी एक मोठी डोकेदुखी ठरल्या आहेत.

बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात असे नमूद केले आहे की, भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज शासकांनी तंबाखू आणि बिडी आणली, पुढे ब्रिटीशांनी आधुनिक सिगारेटी भारतात आणल्या. चहा आणि सिगारेट या दोन्ही गोष्टींचे व्यसन भारतीय समाजाला ब्रिटीशांनीच लावले होते.

तंबाखू, बिडी आणि सिगारेटच्या व्यसनामुळे ब्रिटीश काळातदेखील अनेक लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले होते. असंख्य लोकांचे आरोग्य या तंबाखूच्या व्यसनाने पुरते ढासळले होते. एकीकडे प्लेग, मानमोडी आणि देवी यांसारख्या आजारांनी लोकांचा जीव जातोय हे बघून ब्रिटीश लोकांनी त्यांचे लसीकरण करायला सुरुवात करून, त्यांचे प्राण वाचवले आणि नंतर त्याच लोकांना तंबाखू, बिडी आणि सिगारेटचे व्यसन लावून त्यांचे आरोग्य पुन्हा धोक्यात घातले.

तंबाखूमुळे ब्रिटीश आमदनीत किती लोक मृत्यू पावले याचा पक्का आकडा जरी उपलब्ध नसला तरी ही संख्या लाखांच्या घरात होती.

तंबाखू भारतात लोकप्रिय होण्याअगोदर देखील भारतात लोक हुक्का आणि चिलीम ओढायचे, या सर्व गोष्टी अरबी लोकांनी भारतात आणल्या होत्या. परंतु या गोष्टी तंबाखू इतक्या भारतात लोकप्रिय झाल्या नाहीत, काही श्रीमंत राजघराणे आणि उमराव घराणे सोडले तर इतरांना या गोष्टींचा गंध देखील नव्हता.

भारत आणि युरोपमध्ये प्राचीन काळापासून जमिनीमार्गावर व्यापार सुरु होता. अरबी लोक या व्यापाराचे मुख्य सूत्रधार होते, भारतातून युरोपात वस्त्र, मसाले आणि नीळीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. परंतु, १५व्या शतकाच्या सुरुवातीला ऑटोमन तुर्कांनी रोमन शासकांना पराभूत करत कॉन्स्टिटिनोपल शहरावर आपले शासन प्रस्थपित केले, हे शहर युरोप आणि आशियाचे द्वार होते.

ऑटोमन तुर्कांनी या मार्गावर चालणाऱ्या व्यापारावर निर्बंध आणले, यामुळे भारतातून युरोपात होणाऱ्या मालाचा पुरवठा कमी झाला. युरोपियन शासकांनी भारताकडे जाणारे समुद्री मार्ग शोधून काढण्यासाठी अनेक खलाशांना पाचारण केले. यापैकी एक होता, ख्रिस्तोफर कोलंबस.

कोलंबसला वाटले की आपण जर पश्चिम दिशेला पुढे जात राहिलो तर भारताला जाऊन पोहचू. पण तो भारतात पोहचलाच नाही, त्याने नव्या भूप्रदेशाला शोधून काढले. त्याला आधी वाटले आपण भारतात पोहचलो, पण नंतर त्याला कळून चुकले की, हा नवाच भूप्रदेश आहे. तो आधी ज्या बेटांवर येऊन पोहचला त्याने त्या बेटांचे, ‘इंडिज’ असे नामकरण केले.

या बेटावर राहणाऱ्या आदिवासी लोकांकडून त्याला टोमॅटो, बटाटा, मका आणि तंबाखू या रोपांची माहिती मिळाली, मग तो या रोपांना घेऊन मायदेशी पोर्तुगालला परतला.

पुढे पोर्तुगीज खलाशी वास्को-दि-गामाने भारताचा शोध लावला आणि पोर्तुगीजांनी गोव्यात आपली वसाहत स्थापन केली, त्यात त्यांनी तंबाखुसह इतर रोपांची लागवड केली.

पुढे तंबाखू पिकवण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना सक्ती करायला सुरुवात केली. भारतात यामुळे धान्यांऐवजी तंबाखूचेच उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली. देशपातळीवर ब्रिटिश शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण व्हायला तंबाखु निमित्त बनली.

१८७०मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरु झाले, या काळात तंबाखूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली, याचा परिणाम असा झाला की भारतातल्या जमिनीचा मोठा भाग तंबाखूच्या लागवडीखाली आली.

१९१०च्या सुमारास इम्पेरियल टोबॅको लिमिटेड ( ITC) ची स्थपना करण्यात आली.

ब्रिटीश लोक सिगारेट ओढतात म्हणून आपणही ओढावी, अशा भावनेतून ब्रिटीशांची चाकरी करणारे भारतीय लोक सिगारेट ओढू लागले.

पुढे कामगार वर्गात याचाफैलाव झाला. १९१३ला भारतातील पहिला सिगारेट कारखाना बंगळुरूमध्ये आकारास आला. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात तर तंबाखूच्या विक्रीत अजून वाढ झाली. मिस्त्री नावाचा तंबाखूचा प्रकार महिला वर्गात लोकप्रिय झाला आणि सिगारेट परवडत नाही म्हणून गरीब लोक बिडीच्या आहारी गेले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील परिस्थिती फारशी पालटली नाही, अनेक राजकारणी, सिनेकलाकार मोठ्या प्रमाणावर तंबाखूचे सेवन करायचे. अनेकांना धूम्रपानाचे व्यसन होते. यांचा आदर्श घेऊन तरुणांना देखील या गोष्टींचे आकर्षण निर्माण झाले. यामुळे १९८० च्या दशकात तंबाखू सेवनाचे प्रमाण फार प्रचंड वाढले.

१९९० मध्ये गुटखा हा नवीन प्रकार अस्तित्वात आला हा प्रकार तंबाखू आणि काचेचा भुसा एकत्र करून तयार करण्यात आला होता. गुटख्यामुळे लोकांच्या तोंडाला इजा होत होती, तरी त्याच्या सेवनाचे प्रमाण कमी होईना.

पुढे तंबाखूवर संशोधन होऊन त्याचे आरोग्यविषयक दुष्परिणाम जगाच्या समोर येण्यास सुरुवात झाली, भारतात देखील जनजागृतीची प्रक्रिया आरंभ झाली. गोव्यात डॉक्टर शरद वैद्य यांच्या नेतृत्वात १९९७ साली सार्वजनिक स्थळी तंबाखू सेवन करण्यास मज्जाव करणारे कायदे अस्तित्वात आले.

ज्या गोव्याने भारताला तंबाखू दिला, तिथूनच तिला सर्वप्रथम हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली.

१९९८ साली वाजपेयी सरकारने देखील १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मज्जाव केला. अनेक दंडात्मक कारवाया करायला सुरवात केली. महाराष्ट्र सरकारने देखील गुटखा बंदीची घोषणा केली खरी पण ती घोषणा हवेतच विरली. तरीही भारतात आज मोठ्या प्रमाणवर तंबाखू जन्य पदार्थ विरोधात जनजागृती केली जात आहे.

भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे स्वत: तंबाखू विरोधी कार्यक्रमाचे अग्रणी असून मोदी सरकार देखील यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत आहे.

लवकरच युरोपियन लोकांनी भारतात आणलेल्या या तंबाखूपासून भारत स्वतंत्र होईल अशी आशा ठेवूयात!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!