आपल्या झणझणीत तांबड्या-पांढऱ्या रस्स्याचा उगम प्राचीन हडप्पामध्ये झालाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


डाळ, हळद, मीठ, आले-लसूण आणि वांगे घालून केलेली पातळ भाजी कदाचित तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण, तुम्हाला माहितेय का ४००० वर्षापूर्वी हडप्पन संस्कृतीतील आपले पूर्वजही अशाच प्रकारचे जेवण जेवत होते. भारतातील प्रत्येक भागात अशा प्रकारे करीचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळतात. त्यातील घटक काहीसे वेगवेगळे असले तरी, भातासोबत खाण्यासाठी हा पदार्थ बनवला जातो. विशेष म्हणजे या पदार्थाशिवाय भारतीयांचे जेवण पूर्ण होतच नाही.

ही करी भारतीय खाद्यसंस्कृतीचा विशेष भाग असली तरी, पंधराव्या शतकापासून भारतात व्यापाराच्या निमित्ताने येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांसोबत भारतीय करीची ही पद्धत त्या-त्या प्रदेशातही पोहोचली आणि तिने तिथल्या प्रदेशातील प्रमुख पदार्थांसह स्वतःला जुळवून घेतले.

भारतात, धानसाक, कुर्मा ते रोगान जोश, कुझांबू अशा अनेक नावानी आणि प्रकारांनी हे चविष्ट मिश्रण परिचित आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीत करी म्हणजेच आमटी किंवा रस्स्याचे स्थान काही औरच!

विशेष म्हणजे परदेशात जरी या मिश्रणाला करी असे नाव असले तरी, कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेत याला करी म्हणून ओळखले जात नाही. मग या मिश्रणाला आंतरराष्ट्रीय भाषेत करी हे नाव कधी आणि कसे मिळाले? हे जाणून घेणे मजेशीर ठरेल.

यासाठी आपण दोन मेहनती पुरातत्वशास्त्रज्ञ, आधुनिक मायक्रोस्कोप आणि उत्खननात सापडलेल्या खरकट्या भांड्यांचा ढीग या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत.

२०१०मध्ये अरुणिमा कश्यप आणि स्टीव्ह वेबर या वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या दोन पुरातत्वशास्त्रज्ञांना हडप्पा येथील उत्खननावेळी फारमाना या ठिकाणी काही हंडी सापडल्या ज्यात करीसारख्या मिश्रणाचे अवशेष होते.

त्यांनी या अवशेषांचा अभ्यास करून, त्याकाळी लोक कोणत्या प्रकारचे अन्न सेवन करत होते, यावर थोडा प्रकाशझोत टाकण्यासाठी अभ्यास सुरु केला.

त्या हंडीत सापडलेल्या अवशेषांवरून त्यात वांगी, आले, हळद आणि मीठाच्या कणांचे काही अवशेष सापडले. शिवाय, या संशोधकांना बाजरी, गहू, मसूर, बार्ली, मुग डाळ, केळी आणि आले यांचे देखील अवशेष मिळाले.

आले, हळद यासारख्या मसाल्यांचा आहारातील वापर ४००० वर्षे इतका जुना आहे. म्हणजेच आज आपण ज्या प्रकारचे अन्न खातो ४००० वर्षापूर्वी हडप्पा संस्कृतीतील आपले पूर्वज देखील त्याच प्रकारचे अन्न खात होते.

परंतु, करी या शब्दाचा वापर कधी करण्यात आला हा मात्र थोडासा मतभेदाचा विषय आहे. द ऑक्सफर्ड कम्पॅनियन टू फूड या पुस्तकात लेखक ऍलन डेव्हिडसन याने तामिळीयन कारी या शब्दावरून करी शब्द आला असे म्हटले आहे. दक्षिण भारतात मसालेदार सूपप्रमाणे हा पदार्थ वाढला जातो. ज्याला मसालेदार सॉसही म्हंटले तर चालेल.

तर फूड हीस्टॉरीयन लिझी कॉलिंगहॅम याने पुर्तुगल शासित गोव्यामध्ये १६ व्या शतकात या शब्दाची उत्पत्ती शोधली आहे. विशेष म्हणजे १६ व्या शतकातील एका खाद्यपदार्थांच्या म्हणजेच रेसिपी बुक मध्ये शाही मेजवानी साठी केलेल्या करीचा उल्लेख आहे. हे पुस्तक समुद्र मार्गाने व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याने लिहिले आहे.

१६ व्या शतकात गोव्यात करील हा पदार्थ कसा प्रसिद्ध होता आणि कितीने चवीने खाल्ला जात होता याबद्दल डच प्रवासी यान ह्युघे याने देखील लिहून ठेवले आहे. यात त्याने विशेष करून फिश करीचा उल्लेख केला आहे.

फिश करी कशाप्रकारे भातासोबत खाल्ली जात होती आणि त्याला कशी आंबट तिखट चव असे याचे तपशीलवार वर्णन या प्रवाशाने केले आहे. तसेच या मिश्रणाला गोव्यात करील म्हटले जात होते याचाही त्याने आवर्जून उल्लेख केला आहे.

१७ व्या शतकातील रोमन प्रवासी पीटर डेला व्हॅले याने देखील, डाळी आणि तूप यांच्या सहाय्याने बनवल्या जाणाऱ्या भारतीय पदार्थांचे वर्णन केले आहे. त्यानेही या पदार्थाचा उल्लेख करील असाच केला आहे.

ज्यात अनेक प्रकारचे मसाले विशेषत: दालचिनी आणि आले आणि शिवाय काही वनस्पतींची पाने आणि फळे घातली जात. हा पदार्थ शिजलेल्या भातासोबत खाल्ला जात असे, याचाही त्याने उल्लेख केला आहे.

म्हणजेच गोव्यात बनवल्या जाणाऱ्या ‘करील’ पदार्थांचा जगाशी ओळख करून देण्यात पोर्तुगीज व्यापाऱ्यांचा मोठा हात राहिला आहे. विशेष म्हणजे कोळंबीच्या रस्स्याला गोव्यात आजही काही ठिकाणी कॅमारो डे करील म्हणूनच ओळखले जाते.

दरम्यान भारतातच विविध प्रदेशात या करीचे त्या-त्या प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार अनेक प्रकार तयार झाले. पर्शियन प्रभावाने मटणाच्या रस्स्यात दही घालण्याचा प्रयोगही सुरु झाला. दक्षिण अमेरिकेतील करीत मिरच्या वापरल्या जात, हळूहळू दक्षिण भारतीय सांबारमध्येही मिरच्यांना स्थान मिळाले.

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बनला जाणारा हा पदार्थ शेवटी एकाच नावाने ओळखला जाऊ लागला. करी. यासाठी आपण ब्रिटीशांचे आभार मानले पाहिजेत.

त्यांच्या वसाहतवादी सम्राज्य विस्तार धोरणामुळे भारतातून बाहेरच्या देशात कारकून, कामगार, सैनिक असे अनेक नोकरदार त्यांच्या मागून देशोदेशी पोहोचले आणि त्यांच्या मागून त्यांची खाद्यसंस्कृतीही.

विशेष म्हणजे भारतीय रेल्वे मटण करीचा तर जोरात प्रसार झाला. वेगवेगळ्या देशात जाऊन या भारतीय करीने तिथल्या खाद्यसंस्कृतीशी जुळवून घेताना तिथले काही पदार्थही स्वतःत सामावून घेतले. प्रादेशिक भिन्नतेनुसार या कारीच्या घटकांत कितीही बदल झाले तरीही भारतीय करी या नावाशी असलेले साधर्म्य मात्र टिकून राहिले.

१७४७ साली हन्नाहग्लासे याने ‘टू मेक करी द इंडियन वे’ या शीर्षकाखाली इंग्लिशमधून करीच्या विविध प्रकारांची रेसिपी प्रकाशित केली होती. त्यानंतर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात रेडीमेड करी पावडर विकली जात असे.

करी करण्यासाठी भारतात जे साहित्य वापरले जाते त्यात आणि या करी पावडरमध्ये फारसे साधर्म्य नव्हते, तरीही त्याला करी पावडर हेच नाव देण्यात आले. भारतात करी किंवा आमटी बनवण्यासाठी अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर करीची ओळख करून देण्यास पुढाकार घेणाऱ्या भारतीयांना मात्र अशा प्रकारच्या साठवलेल्या पावडरीची करी करणे अजिबात मान्य नव्हते. इंग्रजांसोबत त्याच्या वसाहती देशात गेलेल्या भारतीयांनी तिथल्या प्रादेशिक पदार्थांचा वापर करून करी करण्याचा शोध लावला. ज्यामुळे त्यांना आपल्या घरगुती करीला काहीतरी पर्याय मिळाल्याचा आनंद झाला.

तेंव्हापासून जगभरात वेगवेगळ्या पदार्थांच्या सहाय्याने करीचे वेगवेगळे प्रकार बनवण्याच्या पद्धतीचे संशोधन सुरुच आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!