आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं. आपण आजवर कधी ना कधी क्रेडिट कार्ड वापरलंच असेल. या क्रेडिट कार्डला देखील एक इतिहास आहे. आज विविध बॅंक्स मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड्स देतात, पण सुरुवातीला बँक्सच्या ध्यानीमनी नसतानाच अमेरिकेतील डायनर्स क्लब या कंपनीने सर्वप्रथम क्रेडिट कार्ड बाजारात आणलं होतं.
डायनर्स क्लब – क्रेडिट कार्ड्स सुरु करणारी कंपनी
आज आपण अनेक फिनटेक म्हणजेच फायनॅन्शियल टेक्नॉलॉजी कंपन्यांबद्दल ऐकतो. फिनटेक कंपन्या आर्थिक सेवा-सुविधा पुरवण्याचं काम करतात, अशा सेवा-सुविधा नव्या प्रकारच्याच असल्या पाहिजेत असं अजिबात नाही, पण याच आर्थिक सेवा अधिक जलद गतीने, कमी किंमतीत आणि अधिक सोप्या पद्धतीने कशा पुरवता येतील यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. याच उद्योगाची सुरुवात डायनर्स क्लबने केली होती, त्यांची सेवा होती सोप्या पद्धतीने, महिन्याच्या शेवटी पेमेंट करायचा पर्याय उपलब्ध करून देण्याची.
डायनर्स क्लबच्या मते, १९४९ साली फ्रँक मॅकनामारा आपल्या एका क्लायंटला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो, तिथे त्याला आपण पाकीट घरी विसरलो असल्याचे लक्षात येते. तेव्हा त्याला पत्नीला बिल भरण्यासाठी बोलवावे लागते. या घटनेनंतरच रेस्टॉरंट्समध्ये प्रत्येक वेळी रोख रक्कम किंवा चेकद्वारे पैसे भरावे लागू नयेत आणि जे काही बिल होत असेल ते महिन्याच्या शेवटी भरता यावे यासाठी त्याला चार्ज कार्डची कल्पना सुचली.
डायनर्स क्लबच्या वेबसाईटवर हीच गोष्ट सांगण्यात आली आहे. खरंतर त्या माणसाने आपले कार्ड देखील पाकिटातच ठेवले असते, त्यामुळे त्याला पेमेंट करता येणार नव्हते, ही गोष्ट देखील विचारात घेण्यासारखी आहे. अलीकडे या कथेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. अशा प्रकारच्या गोष्टी एखाद्या ब्रँडची प्रतिमा आणखी उंचावू शकतात, कारण त्या ब्रॅण्डने खऱ्या अर्थाने एका समस्येवर उपाय शोधून काढलेला आहे असे आपल्याला वाटते. शिवाय अशा प्रकारच्या इंटरेस्टिंग गोष्टी संभाव्य कस्टमर्सच्या मनाचा ठाव घेतात.
क्रेडिट कार्डचा हा तथाकथित इतिहास २०२० मध्ये फ्रँक मॅकनामाराच्या एका मित्राने लिहिला होता. मॅटी सिमन्सच्या निधनानंतर त्याने ही गोष्ट तयार केली होती. मॅटी सिमन्स हा डायनर्स क्लबच्या संस्थापकांपैकी एक होता, शिवाय तो कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटचे नेतृत्व करत असल्याने त्याला खरी गोष्ट माहिती होती.
डायनर्स क्लबचा ‘खरा’ इतिहास
फ्रँक मॅकनामारा न्यू यॉर्क शहरात कामाला असताना एका ठराविक रेस्टॉरंटमध्येच दुपारचे जेवण करत असे. एक विश्वासार्ह आणि रेग्युलर कस्टमर म्हणून त्याला महिन्याच्या शेवटी सगळं बिल भरण्याची मुभा देण्यात आली. पण इतर रेस्टॉरंटच्या मालकांकडून ही गोष्ट फ्रँकला करून घेता आली नाही.
अशी पद्धत १९३० पासून अमेरिकेतील डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये देखील होती. ग्राहकाला एक विशिष्ट आयडेंटिफिकेशन देण्यासाठी त्यांना चार्ज-प्लेट्स दिले जात होते. त्यांनाच कालांतराने स्टोअर कार्ड्स नावाने ओळखले जाऊ लागले. एखाद्या मेटलपासून बनवलेले हे लहान कार्ड्स प्रत्येक स्टोअरकडे वेगवेगळे असायचे.

ग्राहकाने एखाद्या दुकानातून काही विकत घेतल्यानंतर, ती मेटल प्लेट एका मशीनमध्ये टाकली जात, या मशीनच्या साहाय्याने बिलच्या तीन प्रतींवर कार्बन पेपरचा वापर करून त्या प्लेटचा शिक्का उमटवला जात. तिन्ही प्रतींखाली ग्राहकाची स्वाक्षरी असणे अनिवार्य होते. त्यातील एक प्रत ग्राहक स्वतःकडे ठेवत तर दोन प्रती स्टोअरकडे ठेवल्या जात. या प्रतींच्याच मदतीने महिन्याच्या शेवटी एकूण बिल पत्राद्वारे ग्राहकाकडे पाठवले जात असत.
पण एक कार्ड दुसऱ्या दुकानात वापरता येत नव्हते ही खरी समस्या होती..
डायनर्स क्लबचे पहिले कार्ड
विविध रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांना मात्र असे अनेक स्टोअर कार्ड्स आपल्याबरोबर ठेवणे शक्य नसायचे, म्हणूनच डायनर्स क्लबने सर्वप्रथम रेस्टॉरंट्ससाठी स्टोअर कार्ड तयार करून त्यांना या समस्येवर उपाय दिला. सुरुवातीला रेस्टॉरंट्सनी याला मान्यता दिली नाही, पण कंपनीच्या लोकांनी शेवटी त्यांना पटवून दिले आणि इथूनच आधुनिक क्रेडिट कार्ड आकाराला येण्यास सुरुवात झाली.
फेब्रुवारी १९५० मध्ये फ्रँक मॅकनामाराचे आवडते आणि तो नेहमी जात असणारे रेस्टॉरंट ‘द मेजर केबिन ग्रिल’ने सर्वांत आधी चार्जकार्डद्वारे पेमेंट घेतले. हे चार्जकार्ड डायनर्स क्लबचे होते आणि ते पुठ्ठ्यापासून तयार केलेले होते.
८ फेब्रुवारी १९५० रोजी डायनर्स क्लब कंपनीची स्थापना झाली. यावेळी कंपनीला १५ लाख डॉलर्सचा निधी मिळाला होता. आज त्याची किंमत १ करोड ८ लाख डॉलर्स आहे. न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमध्ये पेमेंट करण्याची एक पर्यायी पद्धत म्हणून चार्ज कार्ड्सची सुरुवात झाली, पण हॉटेल्स, कार्स भाड्याने देणाऱ्या कंपन्या, आणि अगदी फुलांच्या व्यापाऱ्यांनी देखील या पद्धतीचा स्वीकार केला.
कंपनीची विक्रमी घोडदौड
साधारणतः एखादा उद्योग चांगला चालतो असं दिसल्यानंतर अगदी तसाच उद्योग दुसरीकडे सुरु करायचा आणि नफा मिळवायचा ही कॉपी-कॅट पद्धत त्या वेळी देखील होती, डायनर्स क्लबसारखीच एक कंपनी कॅलिफोर्नियामध्ये सुरु झाली, पण लवकरच डायनर्स क्लबने त्या कंपनीला विकत घेतले आणि विलीनीकरण केलं. १९५० च्या अखेरीस डायनर्स क्लबचे २० हजार कार्डधारक होते.
डायनर्स क्लबने ३ डॉलर्स वार्षिक शुल्क आकारण्यास सुरुवात केली, काहीच दिवसांत वार्षिक शुल्क ५ डॉलर्स झाले. आपल्या ग्राहकांपर्यंत महिन्याभराचा हिशोब पोहोचवण्यासाठी त्यांनी एक भन्नाट शक्कल लढवली. नुसताच महिन्याभराच्या हिशोबाचा कागद पाठवण्यापेक्षा त्यांनी त्याबरोबर स्वतःचे एक वृत्तपत्र देखील पाठवण्यास सुरुवात केली आणि या वृत्तपत्रांत जाहिरातींसाठी राखीव जागा ठेवत आणखी एक इन्कम सोर्स सुरु केला.
क्रेडिट कार्डधारकांना बाहेर जाताना रोख रक्कम बाळगण्याची गरज नव्हती, ते एका कार्डद्वारे महिन्याभराचे बिल्स भरू शकणार होते. कोणत्याही कम्प्युटर सिस्टीम किंवा डेटा मॅनेजमेंट सिस्टीम अस्तित्वात नसूनही या बिजनेस मॉडेलमधून डायनर्स क्लबने प्रचंड नफा कमावला होता.
१९५३ साली डायनर्स क्लबची सुरुवात इंग्लंड, कॅनडा, क्युबा, आणि मेक्सिको या देशांमध्ये देखील झाली. तर १९५५ पर्यंत डायनर्स क्लबचे फ्रेंचायझी नेटवर्क युरोप, आशिया आणि मध्य पूर्व मध्ये जगभरात पसरले होते. १९५९ साली डायनर्स क्लबचे न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग झाले.
क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ते त्यांचा महिन्याभराचा हिशोब तयार करण्यापर्यंतची सगळी कामे ही पेपर-वर्क होती. याशिवाय व्यापाऱ्यांना या व्यवहारात ७% खर्च करावा लागणार असूनही डायनर्स क्लबने त्यांना नवीन पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यास पटवून देण्याचे आव्हान लीलया पेलले.
१९६१ साली त्यांनी नव्या प्रकारचे म्हणजेच प्लॅस्टिकचे कार्ड्स तयार केले होते. १९६८ पर्यंत डायनर्स क्लबकडे कॉम्प्युटर्स नव्हते, तरीही कंपनी उत्तम पद्धतीने सुरु होती.
२०२० साली कंपनीने ७० वर्षे पूर्ण केली, कंपनीचा ७० वर्षांचा इतिहास अविश्वसनीय आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.