आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीचं कम्प्युटरशिवाय पानही हालत नाही. घर असो अथवा ऑफिस, सगळीकडेच कम्प्युटर ही एक नितांत गरजेची वस्तू बनली आहे. कम्प्युटर मानवाची मूलभूत गरज आहे हे म्हणणं आता अतिशयोक्तीचं ठरणार नाही. आर्थिक उलाढाल, बँकेचे व्यवहार, सरकारी कामे, तिकीट रिजर्वेशन्स अशी सगळी कामे कम्प्युटर एका क्लिकवर आणि काही सेकंदात करतो. म्हणूनच एकविसावे शतक हे कम्प्युटर्सचे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गरज ही प्रत्येक आविष्काराची जननी असते. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज भासणार नाही किंवा एखादे काम करताना काही समस्या उद्भवणार नाही, आणि आपण त्या समस्येवर किंवा ती गरज पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत आविष्कार होऊ शकत नाही.
एकोणिसाव्या शतकात अशाच प्रकारे एका गणिताच्या विद्यार्थ्याला काही समस्या आली असावी आणि त्याने एक भलंमोठं मशीनच आकडेमोड करण्यासाठी तयार केलं. या मशीनला डिफरन्स इंजिन हे नाव दिलं गेलं. हे मशीन फक्त गणिती आकडेमोड करण्यास सक्षम होतं, पण एखादी आकडेमोड बरोबर आहे की नाही हे तपासणं मात्र त्या मशीनच्या आवाक्याबाहेर होतं.
डिफरन्स इंजिन हे गणिती आकडेमोड करणारं मशीन १४ जून १८२२ रोजी ‘चार्ल्स बेबेज’ने तयार केलं. चार्ल्स बेबेज हा रॉयल सोसायटीचा सदस्य आणि एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ होता. डिफरन्स इंजिन एक स्वयंचलित मेकॅनिकल कॅल्क्युलेटर आहे, याचा वापर प्रामुख्याने पॉलीनॉमिअल फंक्शन्स सोडवण्यासाठी केला जात होता.
डिफरन्स इंजिनलाच पहिला संगणक मानले जाते. पण काही तज्ज्ञांचा डिफरन्स इंजिनला पहिला संगणक मानण्यास विरोध आहे. काहींच्या मते चार्ल्स बेबेजला कम्प्युटरसाठी आवश्यक मशीन तयार करता आलं पण तो संपूर्ण कम्प्युटर तयार करू शकला नाही. काही तज्ज्ञांच्या मते बेबेज जरी कम्प्युटर तयार करू शकला नाही तरी कम्प्युटर तयार करण्याचे पहिले पाऊल त्याने टाकले असे म्हणता येईल.

चार्ल्स बेबेजने एकोणिसाव्या शतकात डिफरन्स इंजिन या मशीनचा शोध लावल्यानंतर त्याप्रकारचे तंत्रज्ञान जाणून घेण्यात आणि तयार करण्यात लोकांचा रस वाढत गेला. कालानुरूप अनेक गोष्टी बदलत होत्या, तरीही अनेकांना कम्प्युटरसारख्या मशीनचा शोध लागण्याचा अंदाज नव्हता. युरोपातील विविध देशातील शास्त्रज्ञ नवे मशीन शोधण्याच्या प्रयत्नात होते.
विसाव्या शतकात या संशोधनाने निर्णयात्मक वळण घेतलं. एक जर्मन सिव्हिल इंजिनिअर, आद्य संगणक शास्त्रज्ञ आणि व्यापारी कॉनरॅड झ्यूसने जगातील पहिला प्रोग्रामेबल कम्प्युटर तयार केला. ‘प्रोग्रॅम-कंट्रोल्ड ट्युरिंग कम्प्लिट झी-३’ हे कार्यात्मक मशीन मे १९४१ मध्ये कार्यान्वित करण्यात आले. अनेक ठिकाणी झ्यूसलाच आधुनिक संगणकाचा संशोधक मानले गेले आहे.
१९३६ ते १९३८ दरम्यान त्याने आपल्या संशोधनावर काम केले. चार्ल्स बेबेजचे यंत्र पूर्णतः मानवी बुद्धीवर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून होते, पण कॉनरॅड झ्यूसने तयार केलेला कम्प्युटर प्रोग्रॅम एक्झेक्युट करण्यास सक्षम होता. कोनराडने त्याच्या या संगणकाला झी-१ असे नाव दिले.
कॉनरॅड झ्यूसच्या शोधानंतर जगाची पुनर्रचना होत होती. जग सतत युद्धाच्या छायेखाली राहत असत. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मात्र झ्यूसच्या या शोधामुळे पश्चिमी जगात एक वेगळंच वातावरण तयार झालं. झ्यूसने तयार केलेल्या कम्प्युटर्सची मागणी वाढू लागली. कारण हे अद्भुत यंत्र लाखो-करोडो रकमेचा हिशोब काही क्षणात करत होतं.
अनेक उद्योगांवर आणि कंपन्यांवर ‘कम्प्युटर’ नावाच्या या नव्या शोधाने मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला. कारण जे काम करायला कर्मचाऱ्यांची आणि प्रचंड खर्चाची आवश्यकता होती, ते काम एक कम्प्युटर अत्यंत सुलभरीत्या करत होता. या कारणामुळे अनेक लोक कम्प्युटरचे चाहते बनले. हा शोध इतका उल्लेखनीय आणि अद्ययावत होता की ‘हा शोध तंत्रज्ञान क्षेत्रातील शेवटचा!’ असे काही लोकांना वाटू लागले.
पण माणसाच्या बौद्धिक क्षमतेला कोणतीही सीमा नाही. म्हणूनच हे लोक भविष्यात लागणाऱ्या शोधापासून अनभिज्ञ होते असंच म्हणावं लागेल. वेळ वेगाने पुढे गेला आणि तंत्रज्ञानाच्या जगात दिवसेंदिवस नवीन बदल होत होते. या शोधाचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे ‘डिजिटल क्रांती’.
जॉन मौचली हे अमेरिकेतील उर्सिनस महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख होते. त्यानंतर ते अद्यायावत इलेकट्रोनिक्स अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बनले. काही कारणांमुळे त्यांनी मुरे स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी घेतली. पण शिक्षकाची नोकरी घेऊनही त्यांनी आपले संशोधनाचे काम सोडले नाही. त्यांनी व्हॅक्युम ट्यूबचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला.
‘डिफरन्शियल ॲनालायझर’ या यंत्रापेक्षा कित्येक पटीने वेगवान आणि अचूक गणना हा इलेक्ट्रोनिक डिजिटल कम्प्युटर करू शकत होता. ही गणना तोफखान्यासाठी आवश्यक असते. हा प्रस्ताव मुरे स्कूलबरोबर काम करणाऱ्या लेफ्टनन्ट हर्मन गोल्डस्टाईन यांना अचूक वाटला. एबर्डीन प्रोव्हिन्ग ग्राउंड येथे झालेल्या विशेष बैठकीत ९ एप्रिल १९४३ रोजी हा प्रस्ताव संचालक कर्नल लेस्ली सायमन, ओस्वाल्ड वेब्लेन आणि इतर अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला.
मुरे स्कूलचे प्रस्तावित कम्प्युटिंग यंत्र तयार करण्यासाठी हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या कम्प्युटिंग यंत्राचे नाव ‘इएनआयएसी’ म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक न्युमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर’ हे होते आणि ‘जे. प्रेस्पर एकर्ट’ला या प्रकल्पाचे मुख्य अभियंता बनवण्यात आले. इएनआयएसी प्रकल्प १९४५ च्या उत्तरार्धात पूर्ण झाला आणि १९४६ साली हा प्रकल्प सार्वजनिक स्वरूपात समोर आला.
अशाप्रकारे, एकर्ट आणि मोचलीच्या आविष्कारानंतर संगणकाला एक नवी ओळख मिळाली. पुढे डिजिटल संगणकाची उपयुक्तता पाहून अमेरिकन लष्कराने गणिती आकडेमोडीसह अनेक कारणांसाठी त्याचा वापर सुरू केला.
ज्या यंत्राचा विचारही जगातील लोकांनी कधी केला नव्हता, ते मशीन एकर्ट आणि मोचली यांनी काही वर्षांच्या मेहनतीनंतर तयार केले होते. अनेक कॉम्बिनेशन्सद्वारे तयार केलेला संगणक ही त्यांची सर्वात मोठी ताकद बनली होती. कम्प्युटरच्या शोधानंतर, मोठ्या प्रमाणात कम्प्युटर्स बनवणे हे आता सर्वात मोठे आव्हान होते. एखाद्या कंपनीला संपूर्ण कम्प्युटरचा फॉर्मुला देणे आणि नंतर त्या फॉर्मुलानुसार अनेक संगणक तयार करणे हे सर्वांत मोठे काम होते. दोघांनाही कम्प्युटरचा फॉर्मुला बाहेर देणे योग्य वाटले नाही. म्हणूनच त्यांनी कम्प्युटर कम्पनी सुरु करण्याचे ठरवले.

पुढच्या काही महिन्यांतच एकर्ट आणि मोचलीने ‘इलेक्ट्रॉनिक कंट्रोल कंपनी’ सुरु केली. या कंपनीने बायनरी ऑटोमॅटिक कम्प्युटर (बीआयएनएसी) तयार केले. या कम्प्युटरचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे माहिती किंवा डेटा एका चुंबकीय (मॅग्नेटिक) टेपवर स्टोअर होऊ लागला. हे मशीन्स अमेरिकेत ऑगस्ट १९५० पासून वापरले जाऊ लागले.
यशाचे टप्पे पार करीत ‘इलेक्ट्रॉनिक कंट्रोल कंपनी’ लवकरच ‘एकर्ट-मोचली कम्प्युटर कॉर्पोरेशन’ बनली. या कंपनीला ‘युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर्स’ (युएनआयव्हीएसी) तयार करण्यासाठी ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स’ कडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या.

ही कंपनी उघडल्यानंतर जगात संगणक क्रांती होऊ लागली. डिजिटल कम्प्युटरच्या या शोधानंतर त्यांनी संगणक विश्वात सुमारे ८५ शोध लावले. डिसेम्बर १९५० मध्ये या दोघांनी मिळून युएनआयव्हीएसी-१ हे मशीन तयार केले. या सर्वांचे पेटंट्स त्यांनी स्वतःच्या नावावर घेतले. एकर्ट आणि मोचली यांना १९४९ साली हॉवर्ड एन. पॉट्स पदकाने सन्मानित करण्यात आलं. पण १९५० साली एकर्ट-मोचली कम्प्युटर कॉर्पोरेशन आर्थिक संकटात सापडली आणि ‘रेमिंग्टन रँड कॉर्पोरेशन’ने ते विकत घेतले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकर्ट आणि मोचली यांचे मोलाचे योगदान पाहता त्यांना १९६८ साली, ‘हाय-स्पीड इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर तयार, विकसित आणि सुधारित करण्यासाठी अग्रेसर आणि सतत योगदान दिल्याबद्दल’ राष्ट्रीय विज्ञान पदकाने सन्मानित करण्यात आले.
सन मायक्रोसिस्टम्स या कंपनीने १९५५ सालीच ‘ओक’ या तंत्रज्ञानाचा पाय रचला होता. याचेच पुढे जावा आणि संबंधित तंत्रज्ञानामध्ये रूपांतर होऊन सर्वाधिक प्रोग्रॅम्स याच भाषेत होऊ लागले. यानंतर १९७२ आणि १९७३ दरम्यान डॅनीस रिचे यांनी ‘सी’ प्रोग्रामिंग लँग्वेज चा शोध लावला आणि संगणकात चमत्कृतीपूर्ण बदल होऊ लागले.
काळाबरोबर कम्प्युटर्सची मागणी वाढत आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे वेगवेगळे स्वरूपही बदलत आहेत. आज यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने भर घातली असून ज्या वेगाने ‘संगणकीकरण’ होत आहे ते पाहता, भविष्यात संगणक ही घरातील मूलभूत वस्तू असेल आणि निश्चितरूपाने संगणक प्रत्येकाच्याच घरी असतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










