ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनाच हिंदुजांनी घरी नोकर म्हणून ठेवलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


परदेशात स्थायिक होऊन आपल्या परिश्रमाने आणि कष्टाने भारताचे नाव उज्वल करणाऱ्यांमध्ये हिंदुजा कुटुंबाचे नाव वरच्या स्थानावर आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केला जातो. लंडनमधील हिंदुजा कुटुंबियांच्या घराला ऐतिहासिक महत्व आहे. लंडनच्या प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्तीतील हे घर अत्यंत महागडे आहे.

लंडनमधील संडे टाइम्स या वृत्तपत्राने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित केली ज्यात हिंदुजा परिवार सर्वोच्च स्थानावर आहे. संडे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाकडे १,३६५ अब्ज पौंड (१२ हजार २७० कोटी रुपये) इतकी संपत्ती आहे. तेल, गॅस, बँकिंग, आयटी आणि रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या व्यवसायाचा यशस्वी विस्तार केला आहे.

गेल्या काही वर्षापासून हिंदुजा परिवाराच्या समृद्धीत सातत्याने वाढ होत आहे. लंडनमध्ये त्यांच्या श्रीमंतीच्या अनेक अद्भुत कथा सांगितल्या जातात.

हिंदुजा कुटुंबाच्या अनेक व्यावसायिक संस्थेत अनेक इंग्रज लोक कर्मचारी म्हणून आहेत.

या कुटुंबाने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आलिशान घरातील स्टाफमध्येही इंग्रज लोकांची संख्या जास्त आहे.

२००६ साली वेस्टमिन्स्टर भागातील किंग जॉर्ज पंचमच्या आलिशान अशा सहा मजली इमारतीचा लिलाव करण्यात आला. जगभरातील अनेक श्रीमंत लोक या इमारतीसाठी बोलणी लावण्यास हजर होते. मात्र लंडनच्या हिंदुजा परिवाराने हा अलिशान महाल विकत घेऊन संपूर्ण ब्रिटनला आश्चर्याचा धक्का दिला होता. तेंव्हापासुन ब्रिटनमध्ये या कुटुंबाचा दबदबा वाढतच आहे. सहा-सहा मजली चार इमारतींना जोडणारा हा एक मोठा अलिशान महल आहे.

फोर्ब्ज मासिकाच्या अहवालानुसार ६७ किमी परिसरात पसरलेला हा महाल हिंदुजा कुटुंबाने ५०० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३५२ कोटी रुपयांना विकत घेतला होता. हा महाल खरेदी करण्यासाठी जगातील अनेक श्रीमंत लोकांनी बोली लावली होती. परंतु हिंदुजा परिवार या महालाचा ताबा घेण्यात यशस्वी ठरला.

२००६ साली हिंदुजा कुटुंबीयांनी या महालाची खरेदी केली. परंतु पुढील पाच वर्षे या महालाचे रिनोव्हेशन करण्यातच गेले. हे रिनोव्हेशन करताना या महालाच्या मूळ ढाच्यात, सौंदर्यात काहीही बदल करण्यात आले नाहीत. फक्त या महालाच्या सौंदर्यात भर पडेल असे आधुनिक शैलीला साजेसे काही बदल करण्यात आले आहेत. परंतु हे करत असताना या महालाच्या मूळ भव्यतेला आणि प्राचीन सौंदर्याला कुठेही धक्का लागू दिलेला नाही. पाच वर्षानंतर हिंदू रीतीरिवाजानुसार हिंदुजा कुटुंबाने या इमारतीत विधिवत पूजा घातली आणि तिथे राहण्यास गेले.

हिंदुजा परिवाराच्या या भव्य इमारती शेजारीच बकिंगहम पॅलेस आहे. जिथे ब्रिटनचा राजपरिवार राहतो. म्हणूनच ब्रिटनमध्ये या परिसराला विशेष महत्व आहे.

हिंदुजा कुटुंबीयांनी विकत घेतलेले हे घर खूपच भव्य आहे. या महालात २५ बेडरूम आहेत. संपूर्ण पांढऱ्या रंगातील ही इमारत जॉर्जियन शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या देखरेखीसाठी आणि इतर व्यवस्था पाहण्यासाठी अनेक नोकरचाकर तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये इंग्रज लोकांचाच भरणा अधिक आहे. या महालाच्या सुरक्षा व्यवस्थेपासून ते बागकाम आणि हाउसकीपिंगची कामे हेच लोक करतात.

लंडनच्या वेस्टमिन्स्टर अनेक जुन्या इमारती आहेत. परंतु त्यातही याच इमारतीचे रिनोवेशन अत्यंत चांगल्या दर्जाचे झाले आहे. इमारतीचे ऐतिहासिक सौंदर्य आणि त्याची भव्यता अधिक खुलून दिसते. इमारत पाहताना कुणाचेही भान हरपून जाईल. या इमारतीचा प्रत्येक कोपरा न कोपरा इतक्या सुंदर प्रकारे सजवण्यात आला आहे की पाहणाऱ्याने फक्त पाहतच रहावे.

हिंदुजा कुटुंबातील परमानंद हिंदुजा यांनी १९१७ साली पाकिस्तानमधील (तेंव्हाचा फाळणीपूर्व भारत) कराची येथे आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले. परदेशातही आपल्या व्यवसायाची पताका फडकावावी म्हणून त्यांनी आधी इराणकडे कूच केले. इराणमध्ये त्याच्या कंपनीला काही महत्वाचे प्रोजेक्ट मिळाले.

कित्येक वर्षे हिंदुजा ग्रुपचे मुख्यालय इराणमध्येच होते. परंतु तिथे झालेल्या क्रांतीने देशात अस्थिरता आणि अशांतता माजली ज्यामुळे हिंदुजा कंपनीचे कामकाज १९७९ मध्ये लंडनमध्ये हलवण्यात आले. आत्ता हे कुटुंब कायमचे इथेच स्ठायिक झाले आहे. लंडनमध्ये व्यवसायाचे स्थलांतरण केल्यापासून हिंदुजा कंपनीने अनेक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. एका छोट्या कंपनीचे रुपांतर आता ‘हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज’मध्ये झाले आहे. शिवाय, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत या कंपनीचे मोठे योगदान आहे.

वेस्टमिन्स्टरमधील अलिशान इमारतीखेरीज हिंदुजा कुटुंबियांची जुनी इमारतही त्यांच्याच ताब्यात आहे जिथे ते पूर्वी राहत होते. सध्याच्या कार्लटन हाउसपासून ही इमारत अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हिंदुजा कुटुंबियांच्या या इमारतीत कधीकाळी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल राहत होते. ही इमारतही २५किमि परिसरात पसरलेली आहे.

हिंदुजा बंधू लंडनमध्ये आले तेंव्हा त्यांनी ओल्ड वॉर ऑफिस व्हाईटहॉलमध्ये आपले कार्यालय सुरु केले. आज या ठिकाणी ते एक अलिशान हॉटेल उभारत आहेत.

या कुटुंबाचा व्यवसाय तेल, ऑटोमोबाइल, आरोग्यसेवा, आयटी उद्योग, लोहउद्योग, स्थावर मालमत्ता, बँकिंग क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात विस्तारलेला आहे. जगभरातील ३८ देशांत त्यांचा व्यवसाय पोहोचला आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या या व्यवसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या कुटुंबात श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा अशी चार भावंडे आहेत. जगातील अनेक मोठ्या देशांत या कुटुंबाचे एक तरी घर आहेच. विशेष म्हणजे या कुटुंबातील एकही व्यक्ती दारू किंवा इतर कोणत्याच पदार्थाचे व्यसन करत नाही. संपूर्ण कुटुंब आजही शुद्ध शाकाहारी आहे.

गोपीचंद हिंदुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबावर वैदिक धर्मानुसार संस्कार केले आहेत. जगभरात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमवटवणाऱ्या या कुटुंबाने आपल्या पारंपारिक रीतीरीवाजाचे आजही तितक्याच आस्थेने जतन केले आहे. या कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रम वैदिक रीतीरीवाजानुसारच पार पाडले जातात.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण मध्ये अणुचाचणी घेतली तेंव्हा संपूर्ण जगाने भारतावर निर्बंध लादले होते. वाजपेयी सरकारला ब्रिटीश सरकारसमोर आपली बाजू मांडण्यासाठी हिंदुजा कुटुंबातील गोपीचंद हिंदुजा यांनी मदत केली.

ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गोपीचंद यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. गोपीचंद यांनी टोनी ब्लेअर यांच्यासमोर भारताची बाजू मांडली, ज्यामुळे ब्रिटनने भारतावरील निर्बंध उठवले. अडचणीच्या काळात हा परिवार भारतासाठी एखाद्या संकटमोचकाप्रमाणे धावून आला.

या कुटुंबातील तिसरे बंधू प्रकाश अहुजा स्वित्झर्लंड येथे राहतात. स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा लेकच्या समोरच त्यांना अलिशान बंगला आहे. असे म्हंटले जाते की प्रकाश हिंदुजा यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे जहाज आहे, ज्याला त्यांनी आपल्या आईचे नाव दिले आहे. हिंदुजा कुटुंबीयांकडे अशी अनेक खाजगी जहाजे (याच) आहेत, शिवाय खाजगी जेट विमाने देखील आहेत. परंतु त्यांनी कधीच आपल्या संपत्तीचे जाहीर प्रदर्शन मांडले नाही. तर या कुटुंबातील सर्वात धाकटे बंधू अशोक हिंदुजा यांच्याकडे भारतातील व्यवसायाची जबाबदारी सोपवली आहे.

विशेष बाब म्हणजे हिंदुजा कुटुंबीयांनी आजही आपली एकत्र कुटुंब पद्धती आवर्जून राखली आहे. भारतीय संस्कृतीचे वैश्विक पातळीवरील प्रतिनिधी म्हणून या कुटुंबाकडे पाहता येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!