शाहरुख खानच्या आधी या साबणाच्या जाहिरातीने ‘राहुल’ नाव भारतीयांमध्ये लोकप्रिय केलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


राहुल!

हे नाव भारतात फार लोकप्रिय नाव आहे. एखाद्या शाळेच्या वर्गात शोधलं तर राहुल नावाचा एक तरी मुलगा सापडतोच. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड असो की अभिनेता राहुल बोस, उद्योगपती राहुल बजाज असो की काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी. ‘राहुल’ या नावाची भारतात व्याप्ती फार मोठी आहे. बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटात मुख्य नायकाचे नाव ‘राहुल’ असे ठेवण्यात आले आहे.

पण तुम्हाला माहितीये का हे ‘राहुल’ नाव भारतात लोकप्रिय करण्याचं काम एका जाहिरातीने केलं होतं?

‘ला सेन्सि’ या साबणाच्या जाहिरातीमुळे ‘राहुल’ हे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झालं होतं. एक १० वर्षांचा मुलगा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जातो पण आंघोळ करण्याऐवजी तो शॉवर चालू करून, नाचायला लागतो. इतक्यात त्याचा आईचा आवाज येतो की “राहुल पानी चला जायेगा” पण हा राहुल आईचं न ऐकता रेडिओचा आवाज अजून मोठा करून नाचायला लागतो. या दरम्यान त्याच्या ‘ला सेन्सि’ साबणावर पाणी पडत राहते. पण राहुल नाचत राहतो, मग तो एकदाचा अंगाला साबण लावतो आणि अचानक पाणी जाते व त्या मुलाची पंचायत होते.

शेवटी एक तिसरा आवाज म्हणतो ‘इस दुनिया में जहाँ कुछ नही चलता वहा ला सेन्सि चलता है.’

१९९३ मध्ये आलेल्या या जाहिरातीमधील या लहानग्या ‘राहुल’ने त्यावेळी लोकांच्या मनाचा ताबा घेतला. इतका की लोकांनी त्यांच्या मुलांचे नाव ‘राहुल’ ठेवण्याचा सपाटाच लावला. या जाहिरातीचा व्हिडीओ युट्युबवर आहे त्याच्याखाली अनेक ‘राहुल’ने आपल्या नावाचा इतिहास या जाहिरातीशी कसा जोडला गेला आहे, याचा खूप रंजक आठवणी शेयर केल्या आहेत.

‘ला सेन्सि’ या साबणाच्या ब्रॅंडने या जाहिरातीतून आपला साबण कसा टिकतो हे दाखवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी हा साबण भारतीय बाजारपेठेत अल्पकाळासाठीच टिकला होता. भले त्याच्या जाहिरातीने अनेकांच्या मनाचा ताबा घेतला होता पण त्याचा साबणाच्या विक्रीवर फारसा परिणाम होऊ शकला नाही.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे प्रॉडक्ट असलेला ‘ला सेन्सि’ हा साबण ९० च्या दशकात लॉंच करण्यात आला, या साबणाने काही काळातच प्रसिद्धी मिळवली. त्यात त्याच्या जाहिरातीचा वाटा मोठा होता. भास्कर विश्वनाथन या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने या साबणाच्या आठवणी लोकांसमोर ठेवताना म्हटले होते की, ‘साबणाचा अनोखा गोलाकार आकार, हे त्याकाळी साबणाच्या लोकप्रियतेचं एक कारण होतं, जो या साबणाचा वापर करायचा, त्याला लोक “हा ला सेन्सि वापरतो” अशा शब्दात टोमणा देखील मारायचे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘अच्छे दिन’ आणि गुजरात सरकारच्या ‘कुछ दिन तो गुजारिये गुजरात में’ या प्रसिद्ध जाहिरात गीतांची निर्मिती करणाऱ्या पियुष पांडेंनी त्यावेळी ला सेन्सिच्या जाहिरातीची निर्मिती केली होती.

पांडेंनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की या जाहिरातीची निर्मिती करताना त्यांना फार मजा आली होती. ला सेन्सिचा उगम १९७१ साली चिली या देशात झाला आणि त्या ब्रॅंडने जगभरात नाव कमावले होते. १९९० मध्ये ज्यावेळी हा ब्रँड भारतात आला त्यावेळी त्याच्या पाठी प्रसिद्धी होती. फक्त भारतात त्याला ओळख करून देण्यासाठी एका जाहिरातीच्या पॅटर्नची निर्मिती करण्यात आली. यावेळी तत्कालीन परिस्थितीला अनुकूल जाहिरातीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पियुष पांडे यांनी हरीश मेवानी, जे पुढे हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीइओ झाले होते, यांच्यासोबत ला सेन्सिच्या जाहिरातीच्या निर्मितीचे काम हाती घेतले. त्या जाहिरातीत त्यांनी ला सेन्सिचा विशिष्ट आकार आकर्षण बिंदू ठेवला होता आणि पुढे त्या साबणाच्या दीर्घ काळ टिकण्याचा क्षमतेवर भाष्य करणारी जाहिरात लिहिली होती. त्यावेळी भारतीयांना सतावत असलेल्या पाण्याच्या समस्येला जाहिरातीत व्यवस्थितपणे प्रस्तुत करण्यात आले होते सोबतच त्या जाहिरातीतील नावांची निवड देखील फार विचारपूर्वक केली होती.

साबणाची संपूर्ण भिस्त त्याच्या दीर्घकाळ टिकण्याचा क्षमतेवर आणि सुंदर आकारावर अवलंबून होती. दीर्घकाळ टिकणारा साबण हे दर्शवण्यासाठी ‘राहुल पाणी चला जायेगा’ची उत्तम टॅगलाईन तयार करण्यात आली होती. लोकांच्या मनावर जाहिरात कशी बिंबवता येईल याची संपूर्ण काळजी निर्मात्यांनी घेतली होती.

परंतु कुठल्याही उत्पादनाला त्याची जाहिरात चांगली म्हणून यश मिळत नाही, त्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्वाची असते. ला सेन्सिची जाहिरात सुंदर होती पण त्यांचे उत्पादन जास्त काळ बाजारपेठेत टिकले नाही व हद्दपार झाले. यासाठी अनेक तज्ञ त्याच्या चुकीच्या पॅकिंगला दोष देतात.

ज्यामुळे बऱ्याचदा साबण फॅक्टरीतुन दुकानापर्यंत पोहचताना खराब होऊन जायचे, त्यांचे तुकडे झालेले राहायचे, यामुळे ग्राहक हे साबण विकत घेण्याला कचराई करायचे.

असं असलं तरी त्याकाळी या साबणाने एकूण मार्केटपैकी ३० टक्क्यांपर्यंत आपली पकड बनवली होती, हे फक्त जाहिरात आणि विशिष्ट आकार यामुळे शक्य झाले होते.

अनेक तज्ञ असं देखील मत व्यक्त करतात की पॅकेजिंगच नाही जाहिरातीतील एका मूलभूत चुकीमुळे लोकांनी ला सेन्सिकडे पाठ फिरवली होती. त्या काळात बहुतांश लोकांचा ओढा हा सौंदर्यप्रधान, सुगंधी आणि जंतू नाशक साबणांकडे होता. साबण लवकर संपला तरी त्यांची हरकत नव्हती, त्यांच्या गरजा वेगळ्या होत्या. ले सेन्सिच्या जाहिरातीत या मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने हा साबण भारतीय बाजारपेठेतुन हद्दपार झाला.

ला सेन्सि हा आज फक्त ‘राहुल’ या नावाच्या आठवणीत उरला असला तरी त्याच्या जाहिरातीने आजही अनेकांच्या आठवणी समृद्ध केल्या आहेत हे मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!