आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळं अनेक लहान-मोठ्या शारीरीक समस्या उद्भवत आहेत. कधी-कधी त्यावर आधुनिक उपचार पद्धतीसुद्धा प्रभावी ठरत नाही. अशा वेळी प्राचीन उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. सध्याच्या काळात प्राचीन उपचार पद्धतींकडे लोकांचा कल वाढत आहे. तुम्हीही तुमच्या आजूबाजूला अशा अनेक उपचार पद्धती पाहिल्या असतील. अशाच प्राचीन उपचार पद्धतींमध्ये हिजामा अर्थात कपिंग थेरेपीचा समावेश होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये हिजामाच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सामान्य लोकांप्रमाणेच मोठे-मोठे सेलिब्रिटीसुद्धा याचा वापर करताना दिसतात. अगदी रियल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर आणि फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा हिजामाचा फॅन आहे. काही दिवसांपूर्वी हिजामा थेरेपी घेतल्यानंतरचे फोटो करीमनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळं, नेमकी ही हिजामा थेरपी काय आहे? तिचा कसा वापर होतो? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्राचीन हिजामा थेरेपीबाबतचा हा लेख नक्की वाचा…
‘हिजामा’ (इंग्रजीमध्ये कपिंग) ही विविध रोगांवर उपचार करण्यासाठी एक प्राचीन आणि समग्र पद्धत आहे. कपिंग थेरपीची नेमकी सुरुवात कुठे झाली हा वादाचा विषय आहे. इजिप्शियन आणि चीनी वैद्यकीय पद्धतींमध्ये या उपचार पद्धतीचा वापर झाल्याचं दस्तऐवजीकरण करण्यात आलेलं आहे. पुढे विविध मानवी संस्कृतींनी हिजामा थेरपी सुरू ठेवण्यासाठी योगदान दिलं आहे.
विविध ठिकाणच्या वर्णनात्मक पुनरावलोकनात हिजामाचा इतिहास, व्याख्या, त्याची उपकरणं आणि थेरपीचं वर्णन केलेलं आहे. हिजामा थेरपीचं वर्णन पूर्वेकडील आणि पाश्चात्य प्राचीन अशा दोन्ही मानवी संस्कृतींमध्यं आढळतं.
चायनिज लोक कपिंग आणि इतर तत्सम थेरपींमध्ये होलिझमच्या दाओवादी मॉडेलचं अनुसरण करतात. होलिझम हे तत्त्वज्ञान आहे. चीनमधील रूग्णालयांमध्ये १९५० पासून अधिकृतपणे पारंपरिक चिनी औषध पद्धतींमध्ये हिजामाचा वापर केला जात आहे. २०१२ पर्यंत चीनमध्ये कपिंग सर्वाधिक लोकप्रिय प्राचीन उपचार पद्धती झाली होती.
हिजामा थेरेपीमध्ये एक थेरपिस्ट, सक्शन तयार करण्यासाठी काही मिनिटांकरिता आपल्या त्वचेवर विशेष कप ठेवतो. हे कप काच, बांबू, माती किंवा सिलिकॉनपासून तयार केलेले असतात. हिजामा थेरेपीचे, ड्राय आणि वेट असे दोन प्रकार पडतात.
दोन्ही प्रकारच्या कपिंग दरम्यान, तुमचा थेरपिस्ट एका कपमध्ये अल्कोहोल, औषधी वनस्पती किंवा कागदासारखे ज्वलनशील पदार्थ टाकतो आणि त्याला आग लावतो. ही आग विझल्यानंतर ते कप तुमच्या त्वचेवर उलटे ठेवले जातात. कपातील हवा थंड झाल्यावर त्यात व्हॅक्युम तयार होतो. यामुळं तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून त्वचा काहीशी सुजते आणि लाल होते.
एक कप साधारणपणे तीन मिनिटांपर्यंत एका जागेवर ठेवला जातो. हिजामाच्या एका आधुनिक व्हर्जनमध्ये कपच्या आत व्हॅक्युम तयार करण्यासाठी आगीऐवजी रबर पंप वापरला जातो. काहीवेळा थेरपिस्ट सिलिकॉन कपही वापरतात. हिजामामध्ये सक्शन तयार झाल्यानंतर काही प्रमाणात शरीरातील रक्तदेखील बाहेर काढतात. त्यानंतर, संसर्ग टाळण्यासाठी अँटिबायोटिक मलम लावून पट्टी केली जाते. साधारण १० दिवसांनंतर तुमची त्वचा पुन्हा सामान्य दिसते. हिजामामुळं शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ निघून जातात, असं म्हटलं जातं.
जगभरातील अनेक लोक हिजामा थेरेपीचा वापर करतात. फुटबॉलर करीम बेंझेमानं अनेकवेळा या पद्धतीनं उपचार घेतले आहेत. २०१९मध्ये देखील त्यानं ब्रेकवर असताना हिजामाचा अवलंब केला होता. याशिवाय, पॅरिस सेंट-जर्मेनियन फॉरवर्ड नेमार आणि मँचेस्टर सिटीचा रियाद महरेझ हे फुटबॉलपटूसुद्धा कपिंग थेरपीप्रेमी म्हणूनही ओळखलं जातात.
नेमारनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कपिंग थेरेपीचे फोटो पोस्ट केले होते. दिग्गज ऑलिम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्प्सनंही अनेकदा हिजामा वापर केलेला आहे. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये त्याच्या त्वचेवर, पाठीवर आणि खांद्यावर हिजामाच्या असंख्य खुणा दिसल्या होत्या. अँथनी जोशुआ, खाबीब नूरमागोमेडोव्ह आणि कोनोर मॅकग्रेगर यांसारख्या लढाऊ खेळाडू तर दुखापतींपासून सुटका करण्यासाठी हिजामाचे नियमित अवलंबन करतात.
हिजामाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी अद्याप त्याबाबत पुरेशा प्रमाणात सायटिंफिक रिसर्च झालेला नाही. ट्रॅडिशनल आणि कॉम्प्लिमेंटरी मेडिसीन जर्नलमध्ये २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, हिजामा मुरुम, नागीण आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
२०१२मध्ये PLOS One जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातही हीच गोष्ट अधोरेखित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन आणि चीनी संशोधकांनी कपिंगवरील १३५ अभ्यासांचे पुनरावलोकन केलेलं आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की, नागीण, पुरळ, चेहऱ्याचा पक्षाघात, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस या आजारांवर हिजामा प्रभावी ठरू शकतो.
ब्रिटिश कपिंग सोसायटीनं दिलेल्या माहितीनुसार, अशक्तपणा व हिमोफिलिया यासारखे रक्त विकार, संधिवात, प्रजनन आणि स्त्रीरोगविषयक विकार, उच्च रक्तदाब, मायग्रेन, चिंता आणि नैराश्य, ऍलर्जी या आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून हिजामाचा वापर होतो.
हिजामा थेरेपीचे जसे काही फायदे आहेत तसेच त्याचे काही साईड इफेक्टदेखील आहेत. जर तुम्ही प्रशिक्षित हेल्थ प्रोफेशनलची मदत घेतली तर हिजमा बर्यापैकी सुरक्षित आहे. परंतु, ज्या भागात कप तुमच्या त्वचेला स्पर्श करतात तेथे तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतात. त्वचेची आग होणं, स्कीन इन्फेक्शन, खाज येणं यासारख्या अल्पकालीन समस्या हिजामानंतर जाणवू शकतात.
या थेरेपीमध्ये वापरले जाणारे कप आणि इतर उपकरणं दूषित झालेली असतील आणि त्यांचं योग्यरित्या निर्जंतुकीकरण केलेलं नसेल तर, हिपॅटायटीस बी आणि सी सारखे रक्तजन्य रोग पसरू शकतात. त्यामुळं जर तुम्हाला हिजामाचा अवलंब करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचीच मदत घेणं योग्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.