रायगडावरचा महाराजांचा पुतळा आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून बसवलाय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जिप्सी, जोगी, ट्रॅव्हललॉगर … असे “कुल” शब्द आपण सध्याच्या पिढीत दर्जेदार कलात्मक दृष्टी असणाऱ्या आणि भटकंती करणाऱ्यांसाठी वापरतो. पण जेव्हा या संज्ञांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा या क्षेत्रात अतुलनीय असं काम करून गेलेला एक भटका महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलाय. साहित्यिक म्हणून आपल्याला ते कदाचित माहीतही असतील पण त्यांच्या लिखाणात आणि किस्स्यांत रमल्यावर मला त्यांची ओळख एक “कुल मराठमोळा जिप्सी” अशीच जास्त चपखल वाटते. मी बोलतोय आप्पांविषयी – गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्याविषयी. आज अप्पांची पुण्यतिथी.

वयाच्या तेराव्या वर्षी विदर्भातल्या परतवड्यातून आप्पा घर सोडून पळाले आणि गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. पुढे ते संत गाडगेबाबांसोबत गावोगाव फिरले. त्यांच्या आयुष्याला थोडं स्थैर्य आलं जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) काम करू लागले. याच कामानिमित्त ते पुण्याजवळ तळेगाव दाभाडे इथे मुक्कामास आले.

विदर्भातून आलेल्या आप्पांना पुणे मानवलं. इथे येऊन त्यांची फिरण्याची आवड जोपासायला त्यांना संधी मिळाली. किल्ल्यांची आणि लिखाणाची ओढ होतीच पण पुण्यात येऊन त्यासाठीचं अधिक पोषक वातावरण त्यांना मिळालं. 

संघाच्या कामानिमित्त पुण्याजवळील गावात त्यांचा प्रवास वाढला आणि काम संपलं की भटकंती असा क्रम सुरू झाला. या ओघात त्यांचे जवळचे किल्ले बघून झाले, आणि आवड आता जीवनाचा जास्त मोठा भाग बनायला लागली.

1976 साली आप्पांना त्यांच्या “स्मरणगाथा” या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र अशा जवळ जवळ 40-50 पुस्तकांचं त्यांनी लिखाण केलं. लेख आणि कथांचा आकडा तर माहीतही नाही.

आप्पांच्या लिखाणात नावीन्य आणि खरेपण होतं. माणसांच्या आयुष्याचं उत्कट प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात येतं. अशा प्रतिक्रिया तेव्हा ही त्यांना खूप मिळाल्या. पण मला या लिखाणाच्या प्रेरणा उलगडून सांगू वाटते, तिथं त्यांचं खरं वेगळेपण मला दिसतं.

बाकी लेखकांच्या लिखाणात येणारं सामान्य माणसाच्या आयुष्याचं चित्रण त्यांनी अनुभवलेल्या समाजातील लोकांच्या सोबतीचा आधार घेऊन वाढवलेलं एक काल्पनिक स्वरूप असतं. कधीतरी ते स्वतःच्या वैयक्तिक विचारप्रक्रियेतून अंतर्मुख करणारंही होतं. पण अप्पांनी त्या लोकांसोबत वेगवेगळ्या परिस्थितीत तेवढा जास्त काळ काहीच न करता वेळ घालवला आहे, त्यांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत.

आज आपल्यासाठी दुर्गभ्रमंती म्हणजे गाडीत बसणे, पायथ्याचं गाव गुगलवर शोधणे, मळलेल्या वाटेनं वर जाणे, 10-20 फोटो काढून परत झोपायला घरी. पण आप्पांची भटकंती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू होती, जेव्हा माहिती मिळविण्याची साधनं मर्यादित होती, प्रवासाची सोय सगळ्या गावी नसायची, संपर्क नसायचा. तेव्हा किल्ले फिरण्याचं खुळ डोक्यात घेणं हा सुट्टीत जोपासायचा छंद नसून अत्यंत गैरसोयीत जीवावर उदार होण्याचा धाडसी प्रयोग असायचा. पण या गोष्टी आप्पांसाठी कधीच अडथळा बनल्या नाहीत. 

पायात हंटर बूट, धोतर, गोल टोपी, हातात एक काठी आणि कंबरेला कुकरी बांधून आप्पा मनसोक्त फिरायला निघायचे. मिळेल ते वाहन जिथपर्यंत नेऊ शकेल तिथपर्यंत जायचं आणि तिथून पुढे पायपीट करत गाव गाठायचं. सोबत काही दिवस पुरेल एवढा शिधा घेऊन, मिळेल तिथे चूल मांडून बेसन-भात खाऊन प्रवास पूर्ण व्हायचा. 

एकदा आप्पा घरातून निघाले की किल्ला तपशीलवार बघून पूर्ण होत नाही तोपर्यंत वरच मुक्कामी असायचे. सोबतीला काही हौशी मंडळी आणि असला तर एखादा गावकरी. किल्ला ओळखीचा झाला की आप्पा एकटेच जाऊन मन भरेपर्यंत किल्ल्यावर बागडायचे. 

त्यांनी लिहिलंय की पुण्यातून त्यावेळी एका खाजगी कंपनीची गाडी महाडपर्यंत जात होती. तिची बुकिंग आधी करावी लागायची. महाडपासून पुढे काही वाहन मिळालं तर मिळालं नाही तर पायपीट करत रायगडवाडी गाठायची आणि मग जंगलातून वाट काढत रायगडाच्या पायऱ्या लागतात. राजगडाला तर नसरापूर फाट्यापासून नद्या ओलांडत पायी जाण्याचे अनुभवही त्यांनी लिहिलेत. 

ते कधी किल्ल्यांच्या भिंतीत झोपले तर कधी उघड्यावर तर कधी स्वतःची झोपडी बांधून. त्याकाळी त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन द्यायला दुसरं काहीच कारण नव्हतं, होता तो महाराजांच्या पराक्रमाने भरलेला इतिहास. ही प्रेरणा त्यांना आयुष्यभर पुरली. 

आप्पा रायगडवर 200-250 वेळेस गेलेत असं जाणकार सांगतात. राजगडावारीची संख्या याच्या अर्धी पकडली तरी 100 होते. आणि प्रत्येक वारीत 2 दिवसांपासून तर अगदी महिनाभर वगैरे ही ते राहिलेत. सिंहगडावर एका पुस्तकाच्या लिखाणाला आणि रायगडवर संशोधनासाठी म्हणून त्यांनी कित्येक महिने सलग मुक्काम केलाय.

रायगडावर बाजारपेठेच्या मागे आजही अवकिरकर आजोबा त्यांच्या आठवणी सांगतात. बाबा त्यांच्या तारुण्यात आप्पांसोबतच वाघ दरवाज्याचा कडा चढलेत, उतरलेत. सऊ अवकीरकर हिला तर आप्पांनी बहिणीच मानलं होतं. रायगडाच्या प्रत्येक वारीत अवकिरकर परिवारासोबतच्या गोष्टींना आप्पांनी विस्तृत प्रकारे आपल्या पुस्तकात लिहिलंय. 

राजगडावर बाबुदा भिकुलेंच कुटुंब तर त्याहून अधिक चांगल्या प्रकारे लिखाणात त्यांनी मांडलं. ते वाचून कधी एकदा बाबुदाची झोपडी बघतो असं होतं. वनखात्याच्या सुधारित नियमावलीत आता बाबुदाला किल्ला सोडून खाली रहायला यावं लागलं हे जेव्हा आपण “दुर्गभ्रमण गाथेत” वाचतो तेव्हा आपल्याला आप्पांचं दुःख जाणवतं.

भेटलेल्या माणसाच्या भाषेच्या लहेजापासून तर बारीकसारीक हरकतींपर्यंत हे लिखाण एवढं समृद्ध आहे की ते पात्र अगदी एकटेपणातही कसं असेल इथपर्यंत आपण त्याला ओळखायला लागतो.

“माचीवरला बुधा” या शीर्षकाचं त्यांचं प्रसिद्ध पुस्तकच राजमाचीवर त्यांना भेटलेल्या एका पात्रावर आधारलेलं आहे. आजही हौशी लोक त्या बुधाची झोपडी कुठे असेल याचा अंदाज बांधत राजमाची फिरतात. फक्त लोकच नाही तर तिथला निसर्गही त्यांनी लिहिलाय. तिथं येणारी विशिष्ट फुलं, औषधी वनस्पती, तिथून दिसणारे सूर्योदय, सूर्यास्त, कुठल्या ऋतूत काय विशेष बघायला मिळतं हे सगळंच त्यांनी लिहिलं.

किल्ल्याचा इतिहास त्यांच्या पिढीतल्या बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे यांनी लिहिलाच, पण आप्पा तिथंच थांबले नाही तर त्यांनी किल्ला जिवंत ठेवणाऱ्या लोकांबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल, वारसा सांगणाऱ्या अवशेषांबद्दल लिहिलं. कोणी किल्ल्यावर दिसलं की त्यांना ते हौशीने किल्ला फिरवत. 

आज इन्स्टाग्रामच्या जगात बुलेटवर लडाखला जाऊन आलेली तरुण मंडळी तिथल्या म्हाताऱ्याचा भयंकर सुंदर आणि स्पष्ट फोटो टाकून #wanderlust #people असं लिहितात आणि आपल्याला वाटायला लागतं की असं काहीतरी करावं, to fill the soul. पण दुर्गभ्रमणगाथा वाचून, त्यातले फ़ोटो बघून, त्यामागच्या गोष्टी वाचून आपली रसिकता खूपच तोकडी वाटायला लागते. जग फिरायला निघालेल्या लोकांकडे काही फोटो आणि आठवणी असतात पण त्या भागाशी त्यांची नाळ जुडत नाही, त्यांची माहिती निरीक्षणातून आलेली असते, अनुभवातून नाही.

आयुष्याला प्रवासाने समृद्ध करण्याच्या या कलेत आप्पांनी आदर्श प्रस्थापित करून ठेवलाय. म्हणून मी त्यांना खऱ्या अर्थाने “जिप्सी” म्हणतो, फिरायची आवड असणाऱ्यांसाठीची प्रेरणा.

आप्पांच्या उतरत्या वयात त्यांच्यावर काही जबाबदाऱ्याही आल्या. रायगड संशोधन, व्याख्यानं असं बरंच काम त्यांनी केलं.

रायगडावर होळीच्या माळावर आज आपण जो महाराजांचा पुतळा बघतो, तो आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून तिथं बसवलाय.

अशीच एक चळवळ त्यांनी एका राज्याभिषेक सोहळ्यासाठी केली. भारतातील सगळ्या नद्यांचं आणि कितीतरी समुद्रांच्या पाण्याला घेऊन कित्येक मावळे भारतातून एकत्र आले आणि ते पाणी समाधीवर चढवलं.

भिडे गुरुजींच्या धारकाऱ्यांना राजगड ते रायगड प्रवासात मदत आणि किल्ल्याची माहिती सांगण्याचा उपक्रम, अशा बऱ्याच कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं.

राजगडावरून राजधानी रायगडावर हलवताना राजकुटुंबाच्या काही जुन्या देवांच्या मुर्त्या पायथ्याच्या गुंजवण्यात एका पुजाऱ्याकडे ठेवल्या होत्या, त्याने त्या आप्पांकडे दिल्या. समाधीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला तिथे महाराजांच्या पवित्र रक्षा सापडल्या होत्या. आप्पांनी त्यातील काही अंशही स्वतःकडे ठेवला. 

असा हा माणूस शिवभक्तीत नखशिखांत बुडालेला होता. प्रसंगी यातील काही भाग धार्मिक कर्मकांड आणि दैवतीकरणाचाही आहे हे मान्य करावं लागतं, पुरतावत्व विभागाचे नियम न मानता त्यांनी पुतळा बसवला ही चूकही असेल कदाचित. पण यामुळं त्यांच्या कामाची आणि हेतूची किंमत कमी होत नाही. त्यांनी कित्येक किल्ल्यांचा शोध लावला, वाटा शोधल्या, माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली, उत्सुकता वाढेल असं लिखाण केलं. 

आज किल्ल्यावर तरुण पिढीचं जे गैरजबाबदार वागणं वाढत चाललं आहे ते बघून गो. नी. दांडेकरांच्या कामाची त्यांना आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. पण एक जेष्ठ लेखक म्हणून नाही तर पहिला मराठी ट्रॅव्हल लॉगर किंवा कुल मराठमोळा जिप्सी म्हणून. प्रवासाच्या दुनियेतील हा आदर्श त्याच्या प्रेरणेसह ट्रेंडमध्ये यावा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!