The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅल्क्युलेटर्समुळे आपले पाढे, पावकी, निमकी, दिडकी पाठ करायचे कष्ट वाचत आहेत

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गणित म्हटलं की आजही बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. शाळेमध्ये सगळ्यात नावडता असणारा हा विषय, पुढेही आयुष्यभर नावडताच राहतो. आधी पाढे, मग मोठ्या पदावल्या, मग प्रमेयं आणि पुढे साईन-कॉस गणितात असं एका मागोमाग एक सगळ्या नावडत्याच गोष्टी येत राहतात. शाळेत तर या गणिताच्या हल्ल्यापासून आपल्याकडे काहीच नसतं. मात्र, मोठं झाल्यानंतर एक मोठं शस्त्र आपल्या हाती लागतं. गणिताशी दोन हात करण्यासाठी ढाल आणि तलवार अशी दोन्ही कामं करणारं हे शस्त्र म्हणजे – कॅल्क्युलेटर!

कॅल्क्युलेटर, म्हणजेच गणकयंत्राचा शोध अगदी इसवी सनापूर्वी लागल्याचं म्हटलं जातं. इसवी सन पूर्व २००० ते २५०० मध्ये सुमेरा प्रांतात (आता इजिप्त आहे तिथला भाग) गणिती प्रक्रिया करण्यासाठी अ‌ॅबॅकस सारख्या यंत्राचा वापर करत होते, असं म्हटलं जातं. इसवी सनानंतर नवव्या शतकात चीनमध्ये अ‌ॅबॅकसचा शोध लागल्याचंही सांगण्यात येतं. सुमेरामधील अ‌ॅबॅकसमध्ये वापरले जाणारे मणी आणि चीनच्या अ‌ॅबॅकसमध्ये वापरे जाणारे मणी यात फरक होता.

सुमेरामध्ये एका मण्याला एकच किंमत असल्यामुळे ठराविक मर्यादेपर्यंत आकडेमोड करता येत होती. चीनच्या अ‌ॅबॅकसमध्ये मात्र लहान मण्यांना लहान किंमत, तर मोठ्या मण्यांना मोठी किंमत होती. त्यामुळं यावर सुमेरापेक्षा जास्त मोठी आकडेमोड करणं शक्य होतं.

असं असलं, तरी याला खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेटर म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण यामध्ये मणी हे केवळ गणिती प्रक्रिया करण्याला मदत करण्याचं काम करायचे. सगळी प्रक्रिया मात्र आपल्यालाच – म्हणजे वापरणाऱ्याला करायला लागायची.

यासोबतच, हा अ‌ॅबॅकस वापरण्यासाठी जेवढा सोपा होता, तेवढाच तो कमी उपयोगाचाही होता. बेरीज-वजाबाकी अशा गोष्टी त्यावर करणं सहज शक्य असलं, तरी गुणाकार-भागाकार अशी जटिल प्रक्रिया त्यावर करणं शक्य नव्हतं. तरीही पुढची कित्येक शतकं अ‌ॅबॅकसच वापरात राहिला. या कॅल्क्युलेटरला कात टाकायला सोळावं शतक उजाडावं लागलं.



१६१७मध्ये जॉन नेपियर नावाच्या एका स्कॉटिश गणिततज्ज्ञाने एक गणकयंत्र तयार केल्याचा दावा केला. या यंत्राला ‘नेपियर्स बोन्स’ म्हणून ओळखलं जातं. ‘नेपियर्स बोन्स’च्या मदतीने बेरीज-वजाबाकी सोबतच गुणाकार आणि भागाकार करणंही सोपं झालं होतं. मात्र, यामध्येही आकडेमोड आपल्यालाच करावी लागत होती. मग नेपियरचे अल्गोरिदम आणि अ‌ॅबॅकसचं तंत्र वापरुन युरोपमधील एडमंड गंटेर, विल्यम औघट्रेड आणि काही जणांनी मिळून ‘स्लाईड रुल’ची निर्मिती केली. भिंतीवरील घड्याळाप्रमाणे दिसणाऱ्या या यंत्रामध्ये कित्येक गोलाकार पट्ट्यांचा वापर करण्यात आला होता. या यंत्राच्या मदतीने आकडेमोड करणं आणखी सोपं झालं होतं.

स्लाईड रुल एवढी प्रसिद्ध झाली, की पुढे १९८० पर्यंत शाळांमध्ये स्लाईड रुल वापरायला शिकवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर नासाच्या महत्त्वकांक्षी अपोलो मोहिमेमध्येही स्लाईड रुलचा वापर करण्यात आला होता. म्हणजेच, या एवढ्याशा गणकयंत्रानं मानवाला चंद्रावर पोहोचवलं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

स्वतःच सर्व गणिती प्रक्रिया करणारा पहिलं यांत्रिक गणकयंत्र हे १६४२मध्ये तयार झालं होतं. फ्रेंच गणिततज्ज्ञ ब्लेझ पास्कल यांनी या उपकरणाचा शोध लावला होता. याला त्यांनी ‘पास्कलाईन’ असं नाव दिलं.

पास्कलचे वडील एका शहराचे कर निरीक्षक होते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आकडेमोड करावी लागत. ही आकडेमोड करण्यासाठी सोपे यंत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कायम चिडचिड होत. यातूनच पास्कलला गणकयंत्र बनवण्याची प्रेरणा मिळाली. १६४२ ते १६४५ पर्यंत त्याने आपल्या गणकयंत्राचे तब्बल ५० प्रोटोटाईप बनवले. अखेर १६४५मध्ये त्याने आपलं ‘फायनल प्रॉडक्ट’ तयार करुन ते फ्रान्सचे चॅन्सलर पेर्री सेग्युएर यांना भेट दिलं. यानंतरही त्यानं गणकयंत्रामध्ये आणखी संशोधन सुरू ठेवलं. आजही त्याच्या एकूण डिझाईन्सपैकी नऊ डिझाईन युरोपच्या संग्रहालयांमध्ये आढळतात.

सतराव्या शतकात मग पास्कलच्या कॅल्क्युलेटरचीच कॉपी वाटणारे बरेच गणकयंत्र बाजारात आले. इंग्लंड, फ्रान्स, इटली अशा देशांमध्येही कित्येक गणिततज्ज्ञांनी आपापली गणकयंत्रे तयार केली होती. या सगळ्यातील उल्लेखनीय असं यंत्र म्हणजे ‘लेबनीज व्हील्स’. गॉटफ्राईड लेबनीज या गणितीने पास्कलचं यंत्र अधिक विकसित करण्याच्या प्रयत्नात याचा शोध लावला होता. ‘लेबनीज व्हील्स’ हे पूर्णपणे स्वतःच आकडेमोड करण्यास सक्षम नव्हतं. लेबनीजनेच काही वर्षांनंतर तयार केलेलं ‘स्टेप्ड रेकॉनेर’ हे यंत्र अशा प्रकारे आकडेमोड करू शकत होतं. मात्र, याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकलं नाही.

लेबनीजचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नसलं, तरी ते वाया गेलं नाही. १८२०मध्ये लेबनीज आणि पास्कलच्या कामापासून प्रेरणा घेत आणि शिकत थॉमस-दे-कोल्मार या गणिततज्ज्ञाने ‘अरिथ्मोमीटर’ म्हणून एक गणकयंत्र तयार केलं. हे छोटं होतं, जलदगतीनं काम करायचं आणि मोठ्या संख्येची आकडेमोड यावर शक्य होती. या सगळ्यामुळे हे दैनंदिन कामासाठी ऑफिसमध्ये वापरणं शक्य आणि सोपं होतं. अर्थातच १८५१ ते १९१५ पर्यंत मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेण्यात आलं. या उपकरणाची रिव्हर्स इंजिनिअरिंग करुन युरोपात कित्येक कंपन्यांनी याची कॉपी केली.

अरिथ्मोमीटर हे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण असं गणकयंत्र होतं. यामध्ये केवळ आपण आकडे टाकायचे होते. आपल्याला कोणत्याही प्रकारची आकडेमोड करण्याची गरज नव्हती. अरिथ्मोमीटर हे पुढे अमेरिकेमध्येही पोहोचलं.

अरिथ्मोमीटरपासून प्रेरणा घेत पुढे १८७७मध्ये ग्रँट मेकॅनिकल कॅल्क्युलेटिंग मशीन, आणि १८८६मध्ये पी१०० बरौघ्स अ‌ॅडिंग मशीन या गणकयंत्रांची निर्मिती करण्यात आली. याच्या पुढच्याच वर्षी १८८७मध्ये डॉर्र. ई. फेल्ट यांनी आपल्या ‘कॉम्प्टोमीटर’ या गणकयंत्रांचं अमेरिकेतील पेटंट घेतलं. आकड्यांची बटणं असलेलं हे पहिलं गणकयंत्र. बटणं दाबून संख्या टाकता येत असल्यामुळे हा कॅल्क्युलेटर यापूर्वीच्या सर्व कॅल्क्युलेटर्सपेक्षा जलद आणि अचूक होता. कारण या आधीच्या गणकयंत्रांमध्ये एक-एक करुन मॅनुअली नंबर टाकायला लागत होते, जे वेळखाऊ होतं. पुढे अनेक वर्षं अशा प्रकारचे अनेक कॅल्क्युलेटर बाजारात उपलब्ध झाले.

आतापर्यंतचे सर्व कॅल्क्युलेटर हे बॉक्स टाईप होते. यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं म्हणजे अवघड काम होतं. एखाद्या टाईपरायटरच्या आकाराचे हे कॅल्क्युलेटर्स त्यामुळं केवळ ऑफिसांमध्येच राहत. १९४०ला आलेल्या ‘कर्ट कॅल्क्युलेटर’ने मात्र लोकांच्या खिशात मावतील एवढी छोटी गणकयंत्रं तयार केली. ऑस्ट्रियाचा इन्व्हेंटर कर्ट हेर्झस्टार्कने या कॅल्क्युलेटरचा शोध लागला होता. या कॅल्क्युलेटरमुळं गणितं सोपी झालीच. मात्र, कर्टचा जीवही वाचवला होता. कर्टचे वडील ज्यू असल्यामुळं त्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या हुशारीचा आपल्याला उपयोग करुन घेता येईल असं वाटल्यामुळं नाझींनी त्याला ठार करण्याऐवजी कैदी बनवून ठेवलं. कित्येक दशकं ‘ट्रेंडिंग’ राहिलेलं कर्ट कॅल्क्युलेटर हे पहिलं आणि शेवटचं ‘मेकॅनिकल पॉकेट कॅल्क्युलेटर’ ठरलं.

कर्ट हे शेवटचं मेकॅनिकल पॉकेट कॅल्क्युलेटर ठरण्याचं कारण म्हणजे डिजिटल युगाची झालेली सुरुवात. १९४६मध्ये आलेला ‘एनिए‌ॅक’ (इलेक्ट्रॉनिक न्युमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर) हा त्या काळी उपलब्ध असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रो-मेकॅनिकल कम्प्युटरपेक्षा हजार पटींनी जलद होता. तसेच त्यामध्ये दहा आकडी संख्याही आरामात सेव्ह राहत होत्या. मात्र, याचा आकार हा एखाद्या लहान खोलीएवढा होता, आणि वजन २७ टन होतं.

पुढे १९६१मध्ये आलेला ‘अनिता’ (अ न्यू इन्स्पिरेशन टू अरिथमॅटिक अकाऊंटिंग) हा जगातला सर्वात पहिला पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असा डेस्कटॉप कॅल्क्युलेटर ठरला.

कंट्रोल सिस्टिम्स या ब्रिटिश कंपनीने तयार केलेल्या या गणकयंत्रामध्ये पुश-बटन कीपॅड दिलं होतं. १९६५मध्ये आलेल्या ‘ऑलिव्हेट्टी प्रोग्रॅम १०१’ या कॅक्ल्युलेटरने बरेच औद्योगिक पुरस्कार जिंकले. हा कॅल्क्युलेटर मॅगनेटिक कार्ड्स वाचू शकत होता, उत्तरं डिस्प्ले करु शकत होता, आणि यामध्ये एक इनबिल्ट प्रिंटरही होता.

याच दरम्यान बल्जेरियाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॅल्क्युलेशन टेक्नॉलॉजीसने आपला ‘एलका २२’ हा आठ किलोचा कॅल्क्युलेटर लॉंच केला. एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढता येणारा हा जगातील पहिला कॅल्क्युलेटर. हे सर्व कॅल्क्युलेटर्स अर्थातच चांगल्या प्रकारे काम करत होते. यांमुळे मोठ्ये संख्यांची आकडेमोड सहज शक्य होती. मात्र, यांचा आकार हा यांचा सर्वात मोठा तोटा होता.

‘टेक्सास इंस्ट्रुमेंट्स’ या कंपनीने लॉंच केलेल्या ‘कॅल टेक’ या प्रोटोटाईपनं सगळंच बदललं. एका हातामध्ये मावेल एवढ्या आकाराचा हा कॅल्क्युलेटर होता. सामान्य गणिती प्रक्रिया करण्यासोबतच यात एक विशेष गोष्ट अशी होती, की आपल्याला हवं असलेलं उत्तर तो कागदाच्या एका पट्टीवर प्रिंटही करु शकत होता. मात्र हा कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी तो मुख्य कम्प्युटरसोबत जोडलेला असावा लागत होता. त्यानंतर मग टेक्सासच्या या कंपनीने जपानमधील कॅनॉन आणि इतर काही कंपन्यांसोबत मिळून काही वर्षं आणखी यावर काम केलं. यातून तयार झाला – ‘शार्प क्यूटी-८डी’ हा कॅल्क्युलेटर. यासोबतच त्यांनी ‘शार्प क्यूटी-८बी’ हे मॉडेलही तयार केलं. ‘क्यूटी-८बी’ची खासियत अशी होती, की त्यामध्ये रिचार्जेबल सेल्सचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळं आता कॅल्क्युलेटर कुठंही घेऊन जाणं शक्य झालं होतं. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन मग पुढे ‘शार्प-ईएल८’, ‘कॅनॉन पॉकेट्रॉनिक’ आणि ‘सान्यो आयसीसी-००८१ मिनी कॅल्क्युलेटर’ अशी बरीच गणकयंत्रं बाजारात उपलब्ध झाली.

अगदी इसवी सन पूर्व २५०० पासून कॅल्क्युलेटर वापरात असले, तरी त्यात सर्वात जास्त बदल हे गेल्या ६०-७० वर्षांमध्येच झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं, नव्या नॅनो-टेक्नॉलॉजीमुळं कॅल्क्युलेटरमध्येही वेगाने बदल घडत गेले. उदाहरण द्यायचं झालं, एचपी या कंपनीने आणलेला ‘एचपी-३५’ हा पहिला सायंटिफिक कॅल्क्युलेटर ठरला. यामध्ये ट्रिग्नोमेंट्री आणि अलजेब्राचे फंक्शन्स होते.

त्यानंतर काही महिन्यांमध्येच आलेल्या टेक्सास एसआर-१० मध्ये आणखी पुढचे सायंटिफिक नोटेशन्स दिले गेले होते. एसआर-११ मध्ये ‘पाय’चं विशिष्ट बटन दिलं गेलं. तर, १९७४मध्ये आलेल्या एसआर-५० या मॉडेलमध्ये लॉग आणि ट्रिग हे फंक्शन्स दिले गेले. एचपीने मग आणखी एक पाऊल पुढे टाकत एचपी-६५ लॉंच केला. यामध्ये १००हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा देता येत होत्या. १९८० च्या सुरुवातीच्या काळात एचपी, कॅसिओ आणि इतर कंपन्यांमध्ये जणू स्वस्त आणि पोर्टेबल कॅल्क्युलेटर बाजारात आणण्याची स्पर्धाच लागली होती. त्यामुळं पॉकेट कॅल्क्युलेटर हे अगदीच सामान्य झाले होते.

९०च्या दशकामध्ये कॅल्क्युलेटर्स सामान्य होण्यासोबतच कंपन्यांसाठी आणखी एक धोका तयार झाला होता – मोबाईल फोन्स. १९९२मध्ये बेल साऊथ/आयबीएम सायमन पर्सनल कम्युनिकेटर बाजारात आला. यामध्ये फोन, ई-मेल, कॅलेंडर आणि अर्थातच कॅल्क्युलेटरही होतं.

पुढे १९९३मध्ये अ‌ॅपलनेही आपला न्यूटन पीडीए लॉंच केला, ज्यामध्ये कॅल्क्युलेटरचं फंक्शन दिलं गेलं होतं. मात्र, १९९६मध्ये आलेल्या ‘नोकिया ९००० कम्युनिकेटर’ने या सगळ्याला मागे टाकलं. या डिव्हाईसमध्ये कॅल्क्युलेटरसोबतच मोबाईल, पीडीए आणि चक्क इंटरनेटही होतं. जगातील पहिल्या स्मार्टफोन्समध्ये या डिव्हाईसचा समावेश होतो.

एकविसाव्या शतकात तर स्मार्टफोन्सच्या लाटेमध्ये कॅल्क्युलेटर कुठल्या कुठे निघून गेलं. सर्व मोबाईल फोन्समध्येच कॅल्क्युलेटर मिळत असल्यामुळं आता कोणी पॉकेट कॅल्क्युलेटर विकत घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. कॅल्क्युलेटर हा केवळ आता दुकानदार, कॉमर्स आणि सायन्स स्टुडंट आणि अशाच प्रकारच्या व्यवसायांमध्ये असलेले लोक वापरतात. बाकीच्यांकडे तर खिशातल्या स्मार्टफोनवरच सगळी गणितं होतात!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या गावाच्या कुंभकर्णी झोपेच्या आजाराचा शास्त्रज्ञांना अखेर उलगडा झालाय

Next Post

कुख्यात गुंड ‘अल कपोन’मुळे दुधाच्या पॅकेटवर एक्स्पायरी डेट छापायला सुरु झाली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

कुख्यात गुंड 'अल कपोन'मुळे दुधाच्या पॅकेटवर एक्स्पायरी डेट छापायला सुरु झाली

या राणीच्या योगदानामुळे कोरिया आणि तामिळ संस्कृतीमध्ये एवढं साधर्म्य दिसून येतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.