आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
जगात अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. जगात अनेक अश्या असंख्य जागा आहेत ज्या अत्यंत वेगेवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. ते ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत, त्या गोष्टी एकतर प्रचंड भूषणावह आहेत नाहीतर अत्यंत विचित्र !
आपल्या पृथ्वीवर असच एक बेट आहे, ज्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बेटावरील बहुतांश लोकांना रंगांधळेपणाचा विकार आहे. त्या लोकांना पांढरा आणि काळा हे दोनच रंग उमजतात, अर्थात त्यांना डोळ्यांना जे काही दृश्य दिसतं ते कृष्णधवल स्वरूपाचं असतं. त्यांना इतर रंगांधळ्या लोकांप्रमाणे लाल अथवा हिरव्या रंगाची दृश्ये दिसत नाहीत.
पिंगलेप अटॉल असे या द्वीपाचे नाव असून हे द्वीप पॅसिफिक महासागरात आहे.
या द्वीपाचे वैशिष्ट्य हे आहे की येथील लोकांना अक्रोमोटॉप्सिया या नेत्राच्या विकाराने ग्रासले आहे. या बेटावरील तब्बल १० टक्के लोकांना हा आजार असून जगभरात हा आजार ३० हजार लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला असतो.
शास्त्रज्ञांच्या मते हा आजार होण्याचे प्रमुख कारण हे उत्क्रांती नसून १७७५ च्या आसपास या बेटावर आलेलं एक चक्रीवादळ आहे.
या चक्रीवादळाने या बेटाला पूर्णपणे नेस्तनाबूत करून ठेवलं होतं. या बेटावर राहणाऱ्या बहुतांश लोकांचे या चक्रीवादळात प्राण गेले होते. फक्त एक व्यक्ती वाचला ज्याला त्या बेटांचा राजा संबोधले जाते, तो या रंगांधळेपणाने ग्रस्त होता. त्याचाच वंश पुढे चालल्याने इथल्या बहुतांश लोकांना या आजराने ग्रासले आहे. हे अगदी माणसात आढळून येणाऱ्या डावखुरेपणासारखे पसरले.
रंगांधळेपणा म्हणजे काय ?
कलर व्हिजन हे डोळ्यातील तीन प्रकारच्या कोन आणि रॉड सेल्स कन्ट्रोल करत असतात. या सेल्स लाल, हिरव्या आणि निळ्या रंगासाठी संवेदनशील असतात. अक्रोमोटॉप्सियामध्ये डोळ्यातील एक ही कोन सेल कार्यरत नसते. यामुळे रंगाचा संवेदनाच नष्ट होता. यालाच मराठीत रंगांधळेपणा म्हणतात.
बऱ्याचवेळा व्यक्तीला एखाद्या रंगाच्या संवेदना देखील असतात. त्याला तोच रंग दिसत असतो. याचं एक उदाहरण म्हणजे फेसुबकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग होय!
झुकरबर्गच्या रंगांधळेपणामुळे फेसबुकच्या लोगोत त्याने निळ्या रंगाचा वापर केला असे म्हणतात, कारण त्याचा दृष्टीला निळा रंग पडत नाही.
अक्रोमोटॉप्सियाग्रस्त लोकांना कुठल्याच रंगाची संवेदना नसल्याने त्यांना रंगा रंगात फरक करणे शक्य होत नाही. त्याला दिसणाऱ्या कृष्णधवल चित्रात त्याला समाधानी व्हावे लागते. पिंगलेप अटॉलच्या बहुसंख्य लोकांना हा विकार असून याची ओळख जगाला पटायला १९९६ उजाडावं लागलं.
या विकाराने त्या लोकांना दिवसाच्या तीव्र उन्हात बघायला त्रास होतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होत असून बहुतांश लोक दिवसा डोळे लुकलुकत बसलेले असतात. त्यांच्यातील रॉड सेल्स फक्त ग्रे स्केल लाईट्सला मॅनेज करतात. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की या रंगांधळेपणामुळे या बेटावरील लोकांची रात्रीची दृष्टी चांगली आहे. याचाच परिणाम म्हणून हे लोक रात्रीच्या वेळी मासेमारी करतात.
एका बेल्जीयन पत्रकाराने या बेटाला भेट दिल्यावर तिला आढळून आलं की इथल्या लोकांचे नुसते डोळे लुकलुकत नसून त्यांना समोरचं काही दिसतं फक्त त्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्रकाराने केलेल्या निरीक्षणात तिला आढळून आलं की त्या भागातील बहुतेक लोकांना लाल आणि निळ्या रंगाच्या काही छटा ह्या दृश्यमान आहेत. तर काही छटा नजरेस देखील पडत नाहीत.
तिने एक प्रयोग केला, तिने काही छायाचित्र काढले आणि त्यात काही छायाचित्राना तिने ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिला आणि काही फोटोना इन्फ्रारेड इफेक्ट दिला.
या बेटावर तिने केलेल्या अभ्यासामुळे तिने हे विशिष्ट फोटोग्राफ्स तयार केले. या फोटोग्राफ्समधून तिला रंगांधळ्या लोकांच्या दृष्टीचे दर्शन चित्रण करायचे होते.
तिचे हे फोटोग्राफ्स आता ऍमस्टरडॅम येथील एका संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. रंगासोबतचं मानवी विश्व आणि रंगाविना मानवी विश्व कसं आहे हे चितारण्याचा तिचा प्रयत्न असून या बेटावरील लोकांवर ही पत्रकार लवकरच डॉक्युमेंट्री तयार करणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.