आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चीनमध्ये सध्या विंटर ऑलिम्पिक सुरू आहेत. बहुतांश देशांनी या विंटर ऑलिम्पिक्सवर बहिष्कार टाकलेला आहे. पण हा विंटर ऑलिम्पिकचा सोहळा दोन कारणांमुळे वादग्रस्त ठरला आहे. त्यातील पहिलं कारण म्हणजे चीनने विंटर ऑलिम्पिकची मशाल ही पीपल लिब्रेशन आर्मीच्या कर्नल की फबाओ याला दिली आणि दुसरं कारण म्हणजे चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन समस्येवर एक संयुक्त विधान केलं आहे.
आता दोन्ही देशांनी असं संयुक्त विधान केल्यामुळे, रशिया युक्रेन यांच्यात काय वाद आहे? नाटो आणि रशिया यांच्यात काय वाद आहे? रशिया युक्रेन वाद चालू असताना रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा चीन दौरा याचा अर्थ काय? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणुन घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड ..
चीन आणि रशिया हे दोन्ही देश दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी देश म्हणून अस्तित्वात आले. दोन्ही देश जरी साम्यवादी असले तरी त्यांच्यात सुरुवातीपासून मतभेद होते. 1920 ते 1949 पर्यंत दोन्ही देशात औपचारिकरित्या राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले नव्हते.
1949 साली चीनने अधिकृतपणे रशियासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 1950 पासून ते 1988 पर्यंत दोन्ही देशात ठीकठाक संबंध होते. पण 1989 ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी चीनला भेट दिली, यावेळी मिखाईल गोर्बाचेव्ह आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष डेंग झीओफंग यांच्यात पहिल्यांदा राजनैतिक चर्चा झाली व दोन्ही देशातील संबंधांमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली.
1991 ला दोन्ही देशांत राजनैतिक संबंध दृढ होतील या दृष्टीने करार झाले व चीनने रशियन फेडरेशनला मान्यता दिली. 1992ला दोन्ही देशांनी एकमेकांना मित्रराष्ट्र म्हणून घोषित केले. 1994 साली दोन्ही देशांमध्ये रचनात्मक भागीदारी आणि फायदेशीर सहकार्य वाढेल या साठी काही करार झाले. 1996 साली दोन्ही देशात “Partnership of strategic coordination based on equality” हा करार केला गेला. याच पठडीतील करार 2001, 2011, 2014 व 2019 साली राजनैतिक व सामरिक संबंध दृढ व्हावेत या करता केले गेले.
वरील परिच्छेदात आपण चीन आणि रशिया यांच्या राजनैतिक संबंधांचा संक्षिप्त इतिहास पहिला. आता रशिया व युक्रेन यांच्यात युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली हे थोडक्यात जाणून घेऊ.
2013 साली युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपियन युनियनसोबत सहयोगी होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला व देशात रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनची जनता यांच्यात संघर्ष सुरू झाला. युक्रेनवरची आपली पकड सैल होऊ नये व युक्रेनवर दबाव वाढावा याकरता रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत काबीज केला.
रशियाला 3 गोष्टींमुळे युक्रेनमध्ये स्वारस्य आहे, एक युक्रेनची खनिज संपत्ती, दोन ‘ब्लॅक सी’मुळे मिळणारा सामरिकदृष्ट्या फायदा आणि तीन ‘नाटो’सारख्या लष्करी आघाडीला शह देता येईल. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटावा म्हणून दोन मिन्स्क करार झाले पण त्याने हा वाद काही मिटला नाही. उलट आणखी चिघळत गेला.
पण तुम्हाला हा प्रश्न पडले असतील की हे नाटो काय आहे..? आणि रशिया आणि नाटो यांच्यात काय वाद आहे? आणि रशिया नाटो वादाचा रशिया युक्रेन संघर्षाशी काय संबंध?
1949 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका, युके, फ्रान्स, आणि इतर 9 देश एकत्र येऊन एक लष्करी आघाडी तयार झाली या लष्करी आघाडीला नाटो म्हणतात. नाटोची मुख्य जबाबदारी होती की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आणि नजीकच्या प्रदेशातला रशियाचा विस्तार थांबवणे.
नाटोला शह देण्यासाठी रशियाने पूर्व युरोपातील साम्यवादी देश एकत्र करून वॉरसाव पॅक्ट नावाची लष्करी आघाडी उभी केली. 1991 साली सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर बरेच पूर्व युरोपियन देश हे नाटोचे सदस्य झाले. रशियाला नाटो का नको आहे याचं कारण असं की, एक रशियाला पूर्व युरोपियन देशात स्वतःचा प्रभाव वाढवता येत नाही, दोन रशिया युक्रेनवर आपला हक्क सांगतो व नाटो रशियाचा हा हेतू साध्य होऊ देत नाही, तीन जर रशियाने जर कोणत्याही नाटो सदस्यावर हल्ला केला तर नाटोचे सर्व सदस्य देश हे एकत्रितरित्या रशियाविरुद्ध लढतील व ते रशियाला परवडणार नाही.
आता रशिया युक्रेन संघर्षात नाटोने काही पावलं उचलली ती पुढीलप्रमाणे.
रशिया युक्रेन संघर्षाचं गांभीर्य जाणून नाटोने त्यांच्या सैन्य तुकड्या थेट युक्रेनमध्ये तैनात न करता आसपासच्या पूर्व युरोपियन देशात तैनात केलेल्या आहेत. हे करण्यामागचं कारण असं, की जर नाटोने सैन्य थेट युक्रेनमध्ये तैनात केलं तर रशिया हा आरोप करू शकतं की युक्रेन सदस्य नसताना देखील नाटो दोन देशांतील प्रश्नात मुद्दाम हस्तक्षेप करत आहे. आणि यामुळे युक्रेनसाठी परिस्थिती अजून बिकट होईल.
नाटोने बाल्टिक राष्ट्रांच्या जवळ व पूर्व युरोपियन देशात आपली हवाई गस्त वाढवली आहे. अमेरिकेने युक्रेनच्या सुरक्षेसाठी Javelin Anti Tank Missile आणि Stinger Anti Aircraft Missile रशिया युक्रेन सीमेवर तैनात केलेल्या आहेत. युकेने Short range anti tank missile युक्रेनला देऊ केलेल्या आहेत. डेन्मार्क, स्पेन, फ्रान्स यांनी त्यांच्या युद्धनौका युक्रेनच्या मदतीला पाठवल्या आहेत. जर्मनीने सैन्य व सामान्य जनतेसाठी औषध पुरवठा करायला सुरुवात केली आहे.
सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष हे चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर असताना रशिया युक्रेन संघर्षाबद्दल चीन व रशियाने संयुक्तपणे विधान करणे ही काही साधी गोष्ट नाही. हे विधान करण्यामागे बरेच पैलू आहेत. चीनच्या दक्षिण चीन समुद्रात वाढतं वर्चस्व मोडून काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया, युके, आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे नौदल आघाडी उभी केली आहे ज्याला “Aukus” असे म्हणतात.
रशियाने चीनच्या दक्षिण चीन समुद्रात चालू असलेल्या कारवायांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. रशियाने चीनच्या “वन चायना पॉलिसी”लाही पाठिंबा दिला आहे. या वन चायना पॉलिसी अंतर्गत चीन तैवानवर आपला अनधिकृत हक्क सांगतो आहे.
2014 साली ज्यावेळी रशियाने क्रिमिया काबीज केलं होतं त्यावेळी अमेरिकेसकट बऱ्याच देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लादले होते त्यावेळी राजनैतिक पातळीवर आणि आर्थिक पातळीवरही चीनने रशियाला समर्थन दिले होते. या दोन्ही देशातील व्यापाराचे प्रमाण प्रचंड आहे, म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की एवढे जागतिक निर्बंध लादले असतानादेखील रशियाच्या अर्थव्यवस्थेवर काही फरक पडला नाही.
आपली लष्करी शक्ती वाढवण्यासाठी या दोन्ही देशांनी संयुक्तपणे युद्ध अभ्यास सुरू केला आहे. रशिया आणि चीन या दोन्ही देशांचे अमेरिका व इतर पाश्चात्य देशांशी फार काही चांगले संबंध नाहीत. त्यामुळे अमेरिका व इतर पाश्चात्य देशांविरोधात ठाम उभे राहण्याची चीन आणि रशियाला एक राहणे गरजेचे आहे.
जर युक्रेन सोबत युद्ध झालं आणि रशियावर आर्थिक निर्बंध लादले तर चीनने रशियन अर्थव्यवस्थेसाठी रशियन बँकांना स्वस्त दरात कर्ज, त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात तेल आयात करण्याची तयारी दर्शवली आहे. याचा पुरावा म्हणजे रशियन गॅस उत्पादन करणाऱ्या गॅझप्रोम कंपनीने गॅसची जास्तीतजास्त निर्यात ही चीनला करायची असं ठरवले आहे.
जर रशिया युक्रेन युद्ध झालं तर याचा सर्वात जास्त फायदा चीनला होणार आहे. कारण रशियाला थांबवण्यासाठी अमेरीका व इतर पाश्चात्य देश व्यस्त असतील आणि याच वेळी चीनला दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व वाढवायला व इतर सामरिक योजना अमलात आणायची संधी मिळेल.
रशिया आणि चीन ही गोष्ट चांगलीच जाणून आहेत की ते एकट्याने अमेरिका व इतर पाश्चात्य देशांशी लढू शकत नाही, त्यामुळे अस्तित्वात राहायचं असेल आणि साम्यवादी राजवट टिकून ठेवायची असेल तर रशिया आणि चीनला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही.
रशिया युक्रेन संघर्ष ही समस्या आता फक्त दोन देशांपूर्ती मर्यादित राहिलेली नाही. नाटो, चीन हे घटक यामध्ये सामील झाल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणातील समीकरण हे झपाट्याने बदलत आहे. रशिया युक्रेन संघर्ष हा आता एक बुद्धीबळाचा डाव झाला आहे. या संघर्षाची परिणीती कशात होणार याचं उत्तर हे येणाऱ्या काळाच्या गर्भात दडलेलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










