चंद्रकांतावर आजपर्यंत अनेक मालिका आल्या पण ओरिजिनलची सर कोणालाच नाही!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


केबल येण्यापूर्वी भारतामध्ये फक्त दूरदर्शन दिसायचे. दूरदर्शनवरील मालिका म्हणजे आठवणींचा खजिनाच आहे. पूर्वी कुठलीही मालिका आठवड्यातून एकच दिवस दाखवल्या जायची. आता सारखं वर्षानुवर्षे, रोज बबड्या आणि त्याच्या आईला बघावं लागत नव्हतं.

एपिसोडची संख्या कमी असली तरी मालिकांचा दर्जा मात्र उत्कृष्ट राहायचा. शिवाय एकदा एक भाग बघितल्यानंतर संपूर्ण आठवडाभर दुसऱ्या भागात काय असेल याची उत्सुकता लागून असायची.

त्यातल्या त्यात पुन्हा रविवारचा दिवस म्हणजे मनोरंजनाचा दिवस असायचा. अनेक चांगले चांगले कार्यक्रम रविवारी प्रसारित केले जायचे. सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रमांची रेलचेल सुरू असायची. सुरुवातीला हेमामालिनी जुन्या बहारदार हिंदी गाण्यांचा कार्यक्रम “रंगोली” घेऊन यायची.

रंगोली संपल्यानंतर घराघरातील तमाम प्रेक्षकांना उत्सुकता असायची ती एकाच मालिकेची ती मालिका म्हणजे चंद्रकांता!

चंद्रकांता की कहानी
के माना है पुरानी
है पुरानी होकर भी
बडी लगती है सुहानी

मालिकेचे शीर्षक गीत लागल्याबरोबर घरातील प्रत्येकजण ते गुणगुणायला लागायचा. चंद्रकांताने भारतीय टेलिव्हिजनच्या पडद्यावर इतिहास घडवलेला होता. महाभारत आणि रामायण याप्रमाणे ही एक अत्यंत गाजलेली मालिका.

ही मालिका बाबू देवकीनंदन खत्री यांच्या “चंद्रकांता” कादंबरीवर आधारित होती.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु मूळ स्वरूपातली चंद्रकांता ही कादंबरी 1888 साली प्रसिद्ध झाली होती. ही कादंबरी तेव्हा इतकी प्रसिद्ध झाली होती की फक्त ही कादंबरी वाचण्यासाठी अनेक लोकांनी हिंदी भाषा शिकून घेतली.

आजही ही कादंबरी किंवा उन्यास हिंदी साहित्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मैलाचा दगड म्हणून नावाजलेली गेलेली अभिजात कलाकृती आहे.

या कादंबरीमध्ये तिलिस्म नावाच्या एका अभिजात जादूच्या प्रकाराविषयी माहिती दिलेली होती. ऐय्यार नावाच्या गुप्तहेरांबद्दल देखील रोचक वर्णने या कादंबरीत आढळतात.

पूर्वीच्या काळी ऐयार लोक गुप्तरितीने माहिती काढण्यासाठी सगळीकडे फिरत असत. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ज्या जादूच्या तरकीबी शिकून घेतलेल्या होत्या त्याला तिलिस्म असे म्हटले जायचे. ही खरंतर जादू वगैरे काही नाही निव्वळ हातचलाखी असायची.

या मूळ कादंबरीची कथा काहीशी पुढील प्रमाणे.

नवगड आणि विजयगड नावाचे दोन साम्राज्य असतात. नवगड साम्राज्याचा राजकुमार विरेंद्रसिंह याचे विजयगड साम्राज्याची राजकुमारी चंद्रकांतावर प्रेम असते आणि अर्थातच प्रत्येक प्रेमकहाणी प्रमाणे या दोघांच्या वडिलांमध्ये पण पिढीजात वैर असते. याचे कारण म्हणजे विरेंद्रसिंहच्या काकांची हत्या विजयगडच्या राजाने केली असा त्याच्या वडिलांचा आरोप असतो.

प्रत्यक्षात विरेंद्रसिंहच्या काकांची हत्या विजयगडचा अत्यंत पाताळयंत्री आणि दुष्ट मंत्री क्रूरसिंग याने केलेली असते.

हा क्रूरसिंग अत्यंत कपटी आणि जादूटोणा करण्यात प्रवीण होता. क्रूरसिंगला चंद्रकांताबरोबर लग्न करून विजयनगरचे साम्राज्य मिळवायचे असते. तिकडे विरेंद्रसिंहच्या वडिलांनी आपल्या कुलदेवीच्या देवळात जाऊन शपथ घेतली असते की मी माझ्या मुलाचे लग्न चंद्रकांताबरोबर कधीही होऊ देणार नाही. जर असे झाले तर माझे शिर मी तुझ्यासमोर अर्पण करेल.

या पार्श्वभूमीवर राजकुमार विरेंद्रसिंह आणि चंद्रकांताची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.

इतके द्वेषपूर्ण वातावरण आणि युद्धजन्य परिस्थिती असताना राजकुमार वीरेंद्रसिंह आणि राजकुमारी चंद्रकांताच्या प्रेमाचा विजय कसा होतो आणि लग्नबंधनात अडकतात का? ही चंद्रकांताची मुख्य कथा. या दोघांना मदत करणारे तेजसिंह आणि चपला हे दोघेही ऐय्यार दाखवले आहेत. कादंबरीच्या शेवटी या दोघांचेही लग्न होते असे दाखविण्यात आले आहे.

1994 साली दूरदर्शनवर नीरजा गुलेरी प्रॉडक्शन हाऊसने चंद्रकांताला मालिकेच्या स्वरूपात पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरवले. चंद्रकांताच्या भूमिकेसाठी तेव्हाची मिस इंडिया शिखा स्वरूपची निवड झाली, तर विरेंद्रसिंहच्या मध्यवर्ती भूमिकेत शहाबाज खान हा झळकलेला होता.

या मालिकेचे एकूण १३३ भाग प्रसिध्द झाले. 1994 ते 1996 अशी दोन वर्षे ही मालिका चालली.

ही मालिका त्यावेळी घराघरामध्ये चर्चेचा विषय बनली होती. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिवंगत नट इरफान खान याने आपल्या करिअरची सुरुवात देखील चंद्रकांतामधूनच केली होती. या मालिकेत इरफानने बद्रीनाथ आणि सोमनाथ या दोन जुळ्या भावांची भूमिका केली होती.

मालिका दूरदर्शनवर प्रचंड गाजली तर खरी पण या मालिकेवर तेवढीच टीकादेखील झाली. देवकीनंदन खत्री यांच्या वंशजांनी या मालिकेच्या निर्मात्यावर खरपूस टीका केली होती.

सुरुवातीला चंद्रकांता आणि राजकुमार विरेंद्रसिंहची प्रेमकहाणी दाखवणारी ही मालिका नंतर नंतर भलतीचकडे शिरली. मूळकथा सोडून चूनारगड आणि चूनारगडचा राजा शिवेंद्रसिंह मालिकेत आला आणि त्याचीच कथा दाखवण्यात येऊ लागली.

नको ते पात्र मालिकेमध्ये जास्ती ग्लोरिफाय केले गेले. चंद्रकांता कादंबरीचा मूळ गाभाच हरवला. अर्थात ज्यांनी पुस्तक वाचले होते त्यांनाच या गोष्टी समजत होत्या. भारतभर असे अनेक लोक होते ज्यांनी मूळ चंद्रकांता कादंबरी वाचली नव्हती. त्यांना मात्र ही मालिका खुप आवडली.

1996 साली दूरदर्शन या मालिकेचे प्रसारण थांबवले. दूरदर्शनने या मालिकेचे सगळे हक्क स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे ही मालिका पुन्हा प्रसारित होऊ शकत नव्हती. याविरुद्ध मालिकेच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली आणि हा लढा जिंकला.

त्यानंतर ही मालिका 1999 साली सोनी आणि स्टार प्लस या दोन्ही चॅनल पुन्हा दाखविण्यात आलेली होती परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 133 एपिसोडनंतर या मालिकेचे प्रसारण थांबले.

यानंतर सहारा टीव्हीने या चंद्रकांताची कहाणी वीस वर्षे पुढे नेली. कहानी चंद्रकांता की या नावाने नव्याने ही मालिका सहारा टीव्हीवर सुरू झाली.

यात काही जुन्याच मालिकेतील आणि दुसरे नवीन कलाकार घेतले परंतु जुन्या चंद्रकांता इतकी या मालिकेला प्रसिद्धी लाभली नाही. थोडा काळ चालून पुन्हा ही मालिका देखील बंद पडली.

त्यानंतर लाईफ ओके या चॅनेलने २०१७ साली “चंद्रकांता प्रेम या पहेली” या नावाने ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस आणली. ही मालिका चंद्रकांता कादंबरीवरून फक्त प्रेरणा घेऊन बनविण्यात आली होती. त्यामुळे यात बरेच प्रसंग बदलले होते. साधारणपणे 52 भागात ही मालिका संपली.

बाकी चंद्रकांतावर कितीतरी मालिका आजपर्यंत आल्या तरी 1994 साली दूरदर्शनवर झळकलेल्या पहिल्या वाहिल्या चंद्रकांताची सर बाकी दुसऱ्या कुठल्याही मालिकेला आली नाही.

मूळ कादंबरी आजदेखील तितक्याच आवडीने वाचली जाते. थोडक्यात चंद्रकांता नावाचे गारुड भारतीय जनमानसावर कायम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!