आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
किंगफिशर आणि हेवर्ड्स ही नाव ऐकली की फेसळणारी बियर जशीच्या तशी कित्येकांच्या डोळ्यांपुढे उभी राहते. २०१५-१६ पर्यंत ही नावं बियरप्रेमी लोकांच्या तोंडावर असायची आणि या ब्रँडची बियर यांच्या पोटात. प्रचंड प्रसिद्धी आणि मार्केट याच्या जोरावर किंगफिशरने अक्षरशः या क्षेत्रात स्वतःचं एकमेव असं अढळ स्थान निर्माण केलं होतं. पिणाऱ्यांना आणि न पिणाऱ्यांना अशा सर्वांनाच हे नाव अगदी परिचयाचं झालं होतं.
पण काही गोष्टी सवयीच्या झाल्या की कंटाळवाण्या होऊ लागतात आणि माणसं त्याला पर्याय शोधतात आणि तसा पर्याय मिळाला की पुन्हा एकदा हाच सवय लागण्याचा आणि सुटण्याचा क्रम चालू होतो. बियर आवडणाऱ्या लोकांना असाच एक पर्याय अंकुर जैन नावाच्या उद्योगजगतात नवीन शिरलेल्या माणसाने मिळवून दिला. तो म्हणजे ‘बिरा ९१’ हा बियर ब्रँड !
भारतीय बनावटीच्या बियरची चव सुरवातीला भारतीयांनी घेतल्यानंतर बघता बघता याची मागणी अशाप्रकारे वाढत गेली की आज हाच ब्रँड जगभरात प्रसिद्धी मिळवतो आहे.
पण किंगफिशर किंवा हेवर्ड्स सारख्या बड्या ब्रँडनी अख्खं मार्केट आपल्या हातात ठेवलेलं असताना या नव्या बियर ब्रँडने अगदी कमी काळात देशातच नाही, तर जगभरात स्वतःचं नाव निर्माण केलं तरी कसं?
चला तर मग आज त्याचीच कहाणी जाणून घेऊया…
अंकुर जैन हा अमेरिकेतील मोटोरोला कंपनीमधला एक तरुण नोकरदार होता. काही वर्षं या क्षेत्रात काम केल्यावर त्याने एक आरोग्य विषयक सेवा देणारा व्यवसाय अमेरिकेतच सुरु केला. तिथे काही वर्ष काम करून बऱ्यापैकी या क्षेत्रातला अनुभवही घेतला आणि यातले बारकावेही समजून घेतले. तिथे जम बसतोय असं लक्षात येताच त्याने २००९ साली हा नवा व्यवसाय थांबवला.
विदेशातल्या लोकांची मानसिकता, तिथले व्यवहार, मिळणाऱ्या संधी आणि घेतलेला अनुभव या सगळ्यावर विचार करून अंकुरने अमेरिका सोडून भारतात प्रवेश केला, तो एक नवा विचार घेऊन. २००९ साली भारतात आल्यावर अंकुरने पुढची पाच वर्षं भारतात स्थिरावलेल्या उद्योगांचा पुरेपूर अभ्यास केला. कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण बाहेरच्या देशातून आयात करतो, कोणत्या भारतात बनूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत याचा आढावा त्याने घेतला.
२०१४ पर्यंत सगळ्या बाजूने विचार केल्यावर त्याला हे लक्षात आलं की महाग असलेली विदेशी बियर आणि अगदीच स्वस्तातली भारतीय बनावटीची बियर, या दोन बियरमध्ये प्रीमियम चव देणाऱ्या आणि आकर्षक असलेल्या बियरला सध्यातरी भारतात काहीच स्पर्धा नाहीये आणि असा विचार करून बाजारात उतरलेले कोणी उद्योजकही नव्हते. इथेच अंकुरला आपला भविष्याचा प्लॅन सापडला.
आजच्या तरुणाईमध्ये आणि त्यातही शहरी भागात राहणाऱ्या तरुणाईमध्ये वाढत जाणारी बियरची क्रेझ अंकुरने बघितली. तरुणांना बियर हवी तर असते पण बऱ्याचदा ती परवडत नसते. त्यामुळे इकडून तिकडून पैसे घेऊन, साठवून, गरजेचे पैसे खर्च करून हे तरुणतरुणी महागडी बियर खरेदी करतात.
अंकुरने सर्व लक्ष शहरी तरुणाईवर केंद्रित करूनच आपला प्लॅन कागदावर उतरवला. तो प्लॅन म्हणजे स्वतःचाच नवा कोरा बियर ब्रँड, नव्या कल्पनेसह आणि आकर्षक पद्धतीने जगासमोर आणणे !
याच संकल्पनेतून अंकुरने फेब्रुवारी २०१५ साली ‘B9 बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सुरु केली. परदेशी आणि भारतातले कित्येक मित्र तर होतेच ओळखीतले. त्यांच्याकडून जवळपास १५ लाख डॉलर त्याने जमा केले. यातून बऱ्यापैकी भांडवल भारतात मिळणं सहज शक्य होतं. झोमॅटो, स्नॅपडील, सारख्या बड्या कंपन्यांमधूनच कोट्यवधीचा निधी मिळवला आणि आपली स्वतःची वेगळ्या चवीची, पहिल्या घोटातच पिणाऱ्याचा कायमस्वरूपी ताबा घेणारी बियर बनवण्यावर त्याने काम सुरु केलं.
नव्या ब्रँडचं नाव काय असावं हा विचार सगळ्यात आधी अंकुर आणि मंडळींच्या डोक्यात आला. ब्रँडच्या नावात भारतीयपणा असावा आणि सगळ्यांना आवडावं असंही असावं, असं काहीतरी नाव सुचणं गरजेचं होतं आणि असं एक नाव पुढे आलं ते म्हणजे ‘बिरा 91’! या नावात बियर या शब्दाचा छुपा उल्लेखही येत होता आणि मुख्य म्हणजे देशात आणि विदेशातही सर्वांनाच हे नाव उच्चारणं सोपं होतं.
बिरा म्हणजे काय हे कळलं पण या ’91’ चा काय अर्थ असेल ? तर 91 हा भारतासाठी असलेला टेलिफोन कोड आहे. आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या वापरात असलेला 91 हा कोड त्याने या नावाचं भारतीयपण दाखवण्यासाठी जोडला. अशाप्रकारे हे नावंही ठरलं.
नावात असलेला बियर या शब्दाचा बिरा असा उल्लेख, 91 मधून दाखवलेला भारताचा कोड हे तर झालंच पण ग्राहकांना बघताक्षणी आकर्षित करेल असं आणखी एक काम अंकुर आणि टीमने केलं ते होतं या ब्रँडचा लोगो. या लोगोवर असलेलं माकड हे बियरच्या जोडीने येणाऱ्या मनोरंजनाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं. या लोगोवर आणि त्यातल्या माकडावर काम करण्यासाठी टीमला जवळपास सहा महिने लागले. कारण प्रत्येकाच्याच डोळ्यापुढे वेगवेगळे वेडे चाळे करणाऱ्या माकडाची चित्रं उभी रहात होती आणि तो त्या त्या चित्रांची मांडणी करत होता
अशाप्रकारे नाव, लोगो हे सर्व ठरलं आणि बियर बनवण्यासासाठी किंवा मिळवण्यासाठी टीमने बेल्जीयम देश गाठला. २०१५ अखेरपासून बेल्जीयमहून आलेली ही बियर ‘बिरा 91’ या नावाने विकली जाऊ लागली. सुरवातीला बिरा 91 ब्लॉन्ड, बिरा 91 व्हाईट, बिरा 91 स्ट्रॉंग, अशी अगदीच नवनवी बियर उत्पादनं बाजारात आली.
२०१७ पर्यंत बेल्जीयमहून बियर आणली जात होती पण या काळात येणारी बंधनं, खर्च आणि अनियमित विमान प्रवासाची यंत्रणा याचा विचार करून बिराच्या टीमने भारतातच आपलं उत्पादन सुरु केलं. पहिलं युनिट इंदूर आणि दुसरं युनिट नागपूरमध्ये सुरु होऊन याच ठिकाणी त्यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘बिरा 91 IPA’ ची उत्पादन प्रक्रिया सुरु करून ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘बिरा 91 IPA’ ही भारतीय बियर बाजारात आणली आणि ती लोकांच्या जिभेवर बघता बघता रुळली.
पण हे लोकांपर्यंत पोहोचणं एवढं सहज नाही झालं. सुरवातीला या कंपनीने आपली बियर वेगवेगळ्या मोठ्या बार आणि क्लबमध्ये स्वतंत्रपणे विकायला ठेवली. बाकीच्या ब्रँडसारखी टीव्ही आणि पेपरमध्ये जाहिरात देणं हे टाळलं आणि स्वतःची बियर गाडी तयार करून तीच रस्त्यांवरून फिरवून आपल्या ब्रँडची जाहिरात केली. ‘सावन’ या गाण्याच्या वेबसाईट आणि ॲपशी करार करून याच सावनवर आपलं ‘बिरा 91 हिपहॉप’ हे चॅनल सुरु करून त्याद्वारे आपला ब्रँड संगीताच्या माध्यमातून जगासमोर आणला.
एप्रिल २०१८ मध्ये नवी दिल्लीत एक मोठा फेस्टिव्हल आयोजित केला गेला. नाव होतं ‘एप्रिल फुल फेस्ट’. यात शहरी तरुणाईला जे जे काही आकर्षित करतं ते सगळं होतं. संगीत, हिपहॉपमधली गाणी, नाटकं, कॉमेडी अशा सर्व बाजूंनी हा फेस्टिव्हल सजला होता. इथेही प्रचंड प्रमाणात बिराचा खप झाला.
२०१९ मध्ये न्यूयॉर्कमधील काही फेस्टिव्हल्समध्ये बिराचं लॉन्चिंग झालं आणि बघता बघता भारताबाहेरच्या तरुणाईला बिराची नशा चढली. बिरा ही एकमात्र भारतीय बनावटीची बियर आहे जी अमेरिकेतही मोठ्या चवीने घेतली जाते.
भारतातल्या वाढत्या व्यवसायिक संधी बघता नवा बियर ब्रँड उभा करून त्यावर शेकडो कोटींचा धंदा करणं ही अंकुर जैन सारख्यांसाठी मोठी गोष्ट होती. त्यांनी ती साध्य केली ती आपलं स्वतंत्र तंत्र वापरून. आजच्या घडीला इंदूर, नागपूर, पुणे, बंगळुरू, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, कलकत्ता अशा कित्येक मोठ्या शहरांमध्ये हा ब्रँड आहे. भारताबाहेर अमेरिका, युरोप, थायलंड, सिंगापूरमध्ये ‘बिरा ९१’ मोठ्या दिमाखात आपलं स्थान टिकवून आहे आणि हेच सातत्य, प्रसार चालू ठेवला तर भविष्यात जगाच्या कानाकोपऱ्यात हा ब्रँड पोहोचेल यात काहीच शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.