या व्यक्तीने ‘बेयर फुट कॉलेज’च्या माध्यमातून सोलर इंजिनिअर्सची चळवळ उभी केली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लेखक- मनोज शेडबाळकर

संजीत रॉय.

डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूलमधून शालेय शिक्षण.
दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री.
कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅशमध्ये प्राविण्य.
३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन – १९६५, १९६७ व १९७१.

एक यशस्वी, स्वप्नवत करीयर.

अत्यंत उज्ज्वल भवितव्य खुणावत असूनही या तरूणाने कुतुहलानेच बिहारच्या दुर्गम भागामध्ये दुष्काळ पडल्यानंतर १५ दिवस मदतकार्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. १९६५ साली पडलेल्या या भीषण दुष्काळामध्ये कमालीचे दारिद्र्य, उपासमार, पाणीटंचाई, भूकबळी या गोष्टी पहिल्यांदाच जवळून बघितल्याने आणि खडतर निसर्गाचा सामना करताना सगळ्यांची झालेली  दमछाक अनुभवल्यानंतर या तरूणाला असंख्य प्रश्न पडले.

आपल्या सुखवस्तू आयुष्याची तुलना तिथल्या गरिबीशी करताना, आपण यांच्यासाठी काय करू शकतो? हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला.

यावर मार्ग शोधून काढला- पाणीटंचाई कमी करण्यासाठी बिहारच्या दुष्काळी भागामध्ये विहीरी खोदणे.

दुष्काळ आणि पाणी टंचाईवर आपल्या पद्धतीने मार्ग शोधताना त्या तरूणाने एक अकुशल कामगार म्हणून विहिरी खोदण्यात आपला हातभार लावला – तब्बल पाच वर्षे. खेड्यातील अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आणि पिचलेल्या लोकांसोबत काम करताना एका क्षणी त्याला जाणीव झाली की ही परिस्थिती बदलायची असेल तर याहून अधिक काहीतरी केले पाहिजे.

काहीतरी वेगळे म्हणजे काय? आणि कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये बिहारपेक्षाही हलाखीची परिस्थिती असणारी ठिकाणे असतील का? असे अनेक प्रश्न मनात घेऊन त्या तरूणाने भारतभर प्रवास केला, १०० हून जास्त दुष्काळी ठिकाणे जवळून पाहिली आणि आपण कोणत्या ठिकाणी कामाला सुरूवात करावी यावर पुढचे काही महिने खर्च केले.

शेवटी त्याला एक ठिकाण सापडले. तिलोनीया – राजस्थान.

१०० ठिकाणांमध्ये विकासाची सर्वात जास्त गरज असलेले गाव. दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आणि गावाची एकूणच अत्यंत वाईट अवस्था. अजमेर, जयपुर अशा नावाजलेल्या शहरांपासून एक दोन तासांच्या अंतरावर असूनही या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये काहीही फरक पडला नव्हता. या ठिकाणालाच आपली कर्मभूमी मानून संजीत रॉय यांनी कामाला सुरूवात केली.

खेड्यांमध्ये असलेले ज्ञान हे कोणत्याही पुस्तकी शिक्षणापेक्षा खूप समृद्ध आहे आणि हे ज्ञान आणखी समृद्ध करून त्याचा खेड्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायचा असेल तर खेड्यांमध्येच अशी सोय उपलब्ध व्हावी. म्हणून अशिक्षीत परंतु अनुभवी आणि हुशार अशा लोकांचे, लोकांसाठीच एक कॉलेज उभे करण्याची कल्पना सुचली.

“बेअरफूट कॉलेज”

१९७२ साली बेअरफूट कॉलेज उभारण्यास सुरूवात झाली. गावातल्या जुन्या लोकांनी “शहरातला एक सुशिक्षीत मुलगा येथे येऊन काय काम करणार?”, अशा दृष्टीने या कामाकडे पाहण्यास सुरूवात केली. मात्र संजीत रॉय यांच्या प्रामणिकपणाची खात्री पटल्यावर एकच सल्ला दिला “शहरातील अतीशिक्षीत लोकांना येथे काम करण्यास कदापी आमंत्रण देऊ नका”, शिक्षीत लोकांबाबत त्यांचे अनुभव तसेच काहीसे होते.

बेअरफूट कॉलेजने सुरूवातीपासून काही अलिखीत नियम पाळण्यास सुरूवात केली.

कॉलेजमध्ये नोकरी देताना पदव्या किंवा पुस्तकी शिक्षणापेक्षा खेड्यांच्या विकासासाठी काम करण्यास प्राधान्य.
पगार केवळ पाच हजार रूपये.
नोकरीसाठी कोणतीही करारपत्रे नाहीत.
सर्वात महत्वाची अट – शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भूमिकेतून शिक्षण घ्यावे.

बेअरफूट कॉलेजच्या इमारतीची उभारणी सुरू झाली. १२ अशिक्षीत लोकांनी इमारतीचे आराखडे तयार केले. स्थानिक कामगारांच्या सहाय्याने इमारत उभारली. या इमारतीच्या छताचे काम सुरू असताना मजेशीर प्रकार घडला. छत गळू नये म्हणून त्यावर एक विशिष्ट थर देताना कामावरील सर्व स्त्रियांनी पुरूषांना तेथे येण्यास मज्जाव केला. “हे ज्ञान फक्त स्त्रियांपुरते राखीव आहे आणि ही पद्धत आम्ही पुरूषांसोबत ‘शेअर’ करणार नाही”, असे स्पष्ट सांगून गूळ, गोमुत्र आणि अनेक घटक वापरून न गळणारे छत तयार केले. आजतागायत ते छत तसेच टिकून आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीमध्ये “रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम” वापरली आहे. पावसाच्या पाण्याचे मोल दुष्काळी भागात कळते हेच खरे!

कॉलेजच्या इमारतीभोवती झाडे लावणे आवश्यक होते. एका वनखात्याच्या अधिकार्‍याला सल्ला विचारला असता त्याने “येथे काहीही उगवणार नाही” असे सांगून यांची बोळवण केली. मात्र खेडयातल्याच एका अनुभवी वयस्कर गृहस्थाने कोणती झाडे लावावीत आणि कशी देखभाल करावी याचे ज्ञान दिले. आजही कॉलेजच्या भोवती असलेली हिरवीगार झाडे पुस्तकी शिक्षण आणि निसर्गातून मिळणारे ज्ञान यातील फरक अधोरेखीत करत आहेत.

यादरम्यान संजीत रॉय यांच्याकडे बेअरफूट कॉलेजमधून नक्की काय साध्य करायचे याचा आराखडा तयार होत होता. अत्यावश्यक गरजेच्या सोयी नसलेल्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची गरज भासेल असेल याचा त्यांनी विचार केला आणि कामाला सुरूवात केली.

वीज नसलेल्या ठिकाणी प्रकाशाची सोय करण्यासाठी एकाच गोष्टीचा आधार होता- सोलार एनर्जी. फक्त ८वी पास झालेला एक पुजारी यांच्या मदतीला आला आणि सोलार इंजिनिअर घडवण्यास सुरूवात झाली.

बेअरफूट कॉलेजमध्ये शिक्षण देताना खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर खेड्यातील महिलांनाच शिक्षण दिले पाहिजे या आग्रही विचाराने संजीत रॉय यांनी खेड्यातील महिला त्यातही “मदर्स आणि ग्रँडमदर्स”ना शिक्षण देण्यास सुरूवात केली.

भारतामध्ये भूतानपासून लेह-लद्दाखपर्यंत आणि सेर्री लिओन, गँबीयासारख्या अनोळखी देशांपासून संपूर्ण आफ्रिका खंडातील “मदर्स आणि ग्रँडमदर्स”नी बेअरफूट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.

अशिक्षीत आणि दुर्लक्षीत महिला बेअरफूट कॉलेजमध्ये येऊन सहा महिने प्रशिक्षण घेतात आणि आपापल्या खेड्यांमध्ये “सोलार इंजिनिअर” म्हणून परततात व सोलार पॅनेल्स बसवतात. जेथे आजपर्यंत वीज पोहोचली नाही ती खेडी या सोलार इंजिनिअर्सच्या अथक परिश्रमांमुळे प्रकाशमान होत आहेत.

भारत सरकारचा बेअरफूट कॉलेजला भक्कम पाठींबा आहेच. जगाच्या पाठीवर वसलेल्या कोणत्याही खेड्यातील स्त्रीसाठी त्या ठिकाणाहून तिलोनीयापर्यंत व परतीचा प्रवास तसेच सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा खर्च भारत सरकार उचलते. सोलार पॅनेल्स आणि बाकी सामग्रीचा खर्च ते देश उचलतात.

आकडेवारीतच बोलायचे तर ६४ देशांमधील ७४०हून जास्त “मदर्स आणि ग्रँडमदर्स” आपापल्या खेड्यांमध्ये सोलार इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. वीज नसलेल्या ठिकाणी वीज तयार करत आहेत.

वीजेच्या बाबतीत खेडी स्वयंपूर्ण झाल्यानंतर पुढचे कौतुकास्पद पाऊल म्हणजे खेड्याचा सर्वांगीण विकास त्यातही आपल्या परीने मूलभूत गरजांची पूर्तता करताना बेअरफूट कॉलेज त्यांच्या “इंजिनिअर्सना” बोअरवेल, दंतशास्त्र, रेडीओ, कूटीरोद्योग आणि वैद्यकीय सेवांचे प्रशिक्षण देतात. उद्याचे नागरिक घडविण्यासाठी रात्रशाळाही चालवतात.

फक्त “मदर्स आणि ग्रँडमदर्स”ना वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पारंगत करून खेड्यांचा उध्दार करताना बेअरफूट कॉलेजने साधलेल्या वुमन एम्पॉवरमेंटची झलक दिसून येते.

संजीत रॉय, त्यांची पत्नी अरूणा रॉय आणि पडद्यामागचे अनेक नायक-नायिका बेअरफूट कॉलेजच्या माध्यमातून जे साध्य करत आहे ते सर्वच येथे लिहून काढणे आणि त्यांचे कंगोरे टिपणे हे अशक्य कोटीतले काम आहे.

म्हणूनच हा लेख अपूर्ण आहे. प्रत्येक “ग्रेट स्टोरी” प्रमाणेच!!


ही माहिती वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल संजीत रॉय आणि बेअरफूट कॉलेज यांचे आभार.
http://www.barefootcollege.org 


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!