आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पंधराव्या शतकात समतेची आणि भक्तीमार्गाची पताका खांद्यावर घेऊन गुरुनानक सिंग यांनी स्थापन केलेल्या शीख धर्माचा भारतीय समाजाच्या जडणघडणीत अपूर्व योगदान आहे. या धर्माने क्लिष्ट कर्मकांडाच्या जोखडातून सामान्य माणसाची मुक्ती करून दिली आणि ऐहिक जीवनाचा निर्मळ आनंद उपभोगण्याचा मार्ग खुला केला.
बाबा बिनोद सिंह हे शिखांच्या निहंग दलाचे पहिले जथेदार होते. गुरु अंगद देव यांचे थेट वंशज असलेले बिनोद सिंह हे शीख इतिहासातील एक महान योद्धे होते. गुरु गोविंद सिंग यांच्या सेनेतही त्यांचा समावेश होता. शिखांचे महान योद्धे बंदा सिंग बहादूर यांच्यासोबतही त्यांनी अनेक लढायांत सहभाग घेतला. बंदा सिंग यांचे तर ते उजवा हात होते असे म्हटले जाई. अनेक ऐतिहासिक लढायात त्यांनी विजय मिळवला. शिखांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी यांनी कधीही आपले हत्यार खाली ठेवले नाही.
अकाली बाबा बिनोद सिंग यांनी शीख धर्मियांसाठी स्वतःच्या प्राणांची देखील दिली.
बाबा बिनोद सिंग हे शिखांचे दुसरे गुरु श्री गुरु अंगद देव यांचे वंशज होते, असे मानले जाते. शिवाय दहावे गुरु श्री गोविंद सिंह यांच्या सैन्यातील ते एक बहाद्दूर लढवय्ये होते. गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत नांदेडमध्ये जी सैनिकांची तुकडी होती, त्यामध्ये बाबा बिनोद सिंगही होते. बाबा बिनोद सिंग यांनी आपल्या शौर्याने आणि प्रामाणिक वर्तणुकीने गुरु गोविंद सिंग यांचा विश्वास जिंकला. त्यांचे निकटवर्ती सहकारी बंदा सिंग बहाद्दर यांचाही बिनोद सिंग यांच्या पराक्रमावर आणि बुद्धीमत्तेवर प्रचंड विश्वास होता. बंदा सिंग आणि बिनोद सिंग यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत गेली.
युद्धनीतीपासून ते कारभारापर्यंतचे सर्व निर्णय बिनोद सिंग यांना विचारूनच घेतले जात असत. बंदा सिंग यांचे सल्लागार बनून ते पंजाबात स्थलांतरित झाले.
बंदा सिंग यांच्या प्रत्येक लढाईत बिनोद सिंग यांनी त्यांना प्रामाणिक साथ दिली. आपल्या पराक्रमाची साक्षच जणू त्यांनी या लढाईतून दिली. १७१० साली सरहिंदच्या प्रदेशात झालेल्या लढाईतही त्यांनी आपली तलवार पाजळली. परंतु दुर्दैवाने या लढाईत वजीर खानच्या सैन्यासमोर शीख सैनिकांचा निभाव लागला नाही.
बिनोद सिंग यांचा पराक्रम आणि शीख धर्माच्या तत्वांवर असलेली त्यांची असीम निष्ठा पाहून त्यांना शिखांच्या निहंग दलाचे पहिले जथेदार बनवण्यात आले. शिखांच्या सैन्याची पाच वेगवेगळ्या तुकड्यात विभागणी करून प्रत्येक तुकडीवर निरनिराळी जबाबदारी सोपवण्याचे आदेश गुरु गोविंद सिंगांनी दिले. तेव्हा पहिल्या तुकडीचे नेतृत्व बिनोद सिंग यांच्याकडेच सोपवण्यात आले. आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीने बिनोद सिंग अक्षरश: भारावून गेले. ही जबाबदारी नसून गुरूंचा आशीर्वाद आहे असे समजूनच त्यांनी त्याचा स्वीकार केला. शीख धर्मावर जेव्हा जेव्हा संकट येईल असे वाटले तेव्हा तेव्हा ते आपले शास्त्र उगारत असत. अनेक लढाईत त्यांनी हिरीरीने भाग घेतला.
बिनोद सिंग यांचा मुलगा कानन सिंग मोठा झाल्यावर वडिलांच्या कामाचा भर उचलू लागला. काही काळाने बंदा बहाद्दर आणि बिनोद सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यांच्यातील ही दरी हळूहळू वाढतच गेली. शिखांच्या या दुफळीचा फायदा घेत मुघलांनी शीख सैन्याची ताकद कमकुवत केली.
गुरु गोविंद सिंग यांना चार मुले होती. पण त्यांची चारही मुले युद्धात शहीद झाली होती. त्याच्या पत्नी म्हणजे माता सुंदरी यांनी एका मुलाला दत्तक घेतले होते. काही लोकांना या दत्तक मुलाबद्दल आकस होता. त्यांना वाटत होते, या दत्तक पुत्रच पुढे जाऊन पंथाचा उत्तरधिकारी होईल. पण, ते शक्य नव्हते.
बंदा बहाद्दरलादेखील याच संशयाने पछाडले होते. बिनोद सिंग आणि बहाद्दर यांच्यात दरी निर्माण होण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरली. याच दुफळीचा फायदा घेत मुघलांनी पंजाब आणि दिल्लीतील शीखांमध्ये अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात केली.
कानन सिंगने बंदा बहाद्दरपासून फारकत घेतली आणि तो खालसा सेनेत सामील झाला. त्याच्या सोबत हजारो सैनिक बंदा बहाद्दरची साथ सोडून गेले.
बिनोद सिंग यांनीही बंदा बहाद्दरपासून फारकत घेतल्यानंतर खालसा सेनेत दोन गट पडले. बिनोद सिंग यांनी आपल्या खालसा दलाला तट खालसा असे नाव दिले. तर बंदा बहाद्दरच्या सैन्याला बंदई खालसा नाव मिळाले.
पुढे जाऊन शिखांच्या या दोन गटातच संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाली. हरिमंदिर साहिबचा करभार पाहण्यावरून या दोन गटात पुष्कळ हमरीतुमरी झाली. शेवटी बाबा दीप सिंग यांनी स्वतः न्यायनिवडा करून हरिमंदिर साहिबचा कारभार तट खालसा गटाकडे सोपवला.
मुघलांसोबतच्या एका लढाईत बिनोद सिंग धारातीर्थी पडले. बिनोद सिंग यांनी शीख धर्माच्या आणि शीख धर्मियांच्या रक्षणासाठी बलिदान दिले असे काही इतिहासकर आजही मानतात. शीख धर्मियांसाठी बिनोद सिंग यांनी केलेले कार्य आजही अजरामर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.