आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक : सत्यम अवधूतवार
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “बिवी और मकान” (१९६६) या हिंदी चित्रपटाचा रीमेक असलेला “अशी ही बनवाबनवी” (१९८८) हा चित्रपट “मराठी कल्ट क्लासिक” चित्रपटांच्या यादीत पहिल्या दहा चित्रपटांत गणला जातो.
लेखक वसंत सबनीस आणि सर्वांचे लाडके महागुरू सचिन पिळगावकर सर, दोघे जण किरण शांताराम वनकुंद्रे (व्हि. शांताराम यांचे पुत्र) यांना भेटले आणि त्यांनी ‘बिवी और मकान’चा रिमेक बनवायची इच्छा व्यक्त केली. किरणजींकडे V. Shantaram Productions च्या युवा विभागची जबाबदारी होती (किरणजी V. Shantaram Foundation, Asian Film Foundation आणि प्रभात चित्र मंडळचे चेअरमन आहेत).
किरणजींना रिमेक करणं आवडत नसायचं. पण कथानक आणि एकंदरित संवाद एवढे भन्नाट होते की त्यांना नकार देता आला नाही. कथानकाचं पोटेंशिअल किरणजींनी तेव्हाच ओळखलं होतं.
कथानक त्यांनी तीन-चार वेळा वाचून काढलं. प्रोडक्शनच्या टिमला पण कथानक प्रचंड आवडलं.
बजेट पास झालं आणि व्हि. शांताराम प्रोडक्शन्सच्या युवा विभागाअंतर्गत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. २३ सप्टेंंबर १९८८ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि आज अशी ही बनवाबनवी चित्रपटाला पाहता पाहता ३५ वर्षे पूर्ण झालीत. १९८८ साली सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटाची नोंद झाली.
बनवाबनवी आजही एवढा का भावतो ? त्याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील संवाद. हिंदी चित्रपटाचा प्लॉट वापरुन रिमेक बनवलेल्या या चित्रपटाचे संवाद नाविन्यपूर्ण होते. हाच चित्रपटाचा आत्मा आहे. हीच गोष्ट बनवाबनवीला बिवी और मकान पासून वरच्या लेवलला नेते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे Timing and Spacing. संवादाचं असणारं जबरदस्त टाईमिंग आणि क्रिया-प्रतिक्रियांमध्ये काही सेकंदात घडणारा विनोद, हा सबंध चित्रपटात प्रत्येक सिनमध्ये आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे Staging and Blocking.
छायाचित्रणातील सर्वांत महत्वाचा नियम म्हणजे Staging and Blocking. अर्थात फ्रेममध्ये कुठले पात्र कुठे असेल. त्याची हालचाल आणि संवाद कशाप्रकारे कथानकात आलेले आहेत. त्यानुसार कॅमेरा मुवमेंट झाली पाहिजे. कोणत्या वेळी कोणत्या पात्रांचा संवाद आहे? त्यावर इतरांची प्रतिक्रिया काय असेल?
सिन शुट करताना कॅमेरा कुठे असेल? दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅमेऱ्यांची गरज असेल का? असल्यास त्या प्रत्येकाची लाईट सेटिंग्स आणि एक्सपोजर मेनटेन करणं. वगैरे… या सर्व गोष्टी विचारात घेऊन Scene Planning केलं जातं.
चित्रपटातील “धनंजय माने इथेच राहतात का?” हा लक्ष्या आणि अशोक मामांचा सिन Staging and Blocking चा मराठी चित्रपटातला एक सर्वोत्तम नमुना आहे. मोजक्या सहा शॉट्समध्ये हा भन्नाट विनोदी सिन बनवलाय. हा सिन आजही एवढा प्रभावशाली का वाटतो? कारण या मागे असलेली Scene Planning, Staging-Blocking आणि प्रत्येक कलाकाराची संवादातील Timing-Spacing.
चौघे मित्रं चहा पित चर्चा करत असताना अचानक दरवाज्याची कडी वाजते. ती कडी कुणी वाजवली हे आपल्याला फ्रेममध्ये दाखवलेलं नाही. फक्त कडी वाजवल्याचा आवाज येतो आणि कडीच्या आवाजाने चौघांची उडालेली धांदल पाहुन आपण हा अंदाज लावतो की बाहेर नक्की घरमालकच असेल.
कारण तोपर्यंत त्या खडुस घरमालकाचं पात्रं आपल्या परिचयाचं झालेलं असतं, त्याचा स्वभाव आपल्याला कळालेला असतो. आता घरमालक तर दरवाज्यावर उभा आहे. इथे फक्त दोघांना परवानगी नसताना आपण चौघेजण राहत आहोत. हे जर घरमालकाला कळालं तर तो आपल्याला नक्कीच हाकलून देईल.
प्रेक्षक म्हणुन चित्रपट पाहत असताना आपल्याला या गोष्टीची उत्सुकता असते की धनंजय माने आता काय करणार? तो परशुरामला स्वतःच्या मागे लपवतो दरवाजा उघडल्यावर लगेच घरमालकाच्या तोंडापुढे पेपर धरुन परशुरामला दरवाजाच्या मागे ढकलतो. इथे प्रेक्षकांना माहित आहे की घरात चार माणसं आहेत. पण ही गोष्ट त्या घरमालकाला माहित नाही.
घरमालकाला थापा मारुन हाकलून लावण्याचा चालूअसलेला प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून परशुराम हळूच दरवाजातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि घरमालकाने वळून बघितल्यावर परशुराम जागेवर गोल फिरुन दरवाज्यावर हात आपटत ओरडतो – “धनंजय माने इथेच राहतात का ? ठक्… ठक्…!”
धनंजय आश्चर्यचकित होऊन त्याचं घरमालकासमोर त्याचं खोटं खोटं स्वागत करतो आणि घरमालकाला ओळख करुन देतो की हाच तो मित्र आहे जो इस्राईलला जाऊन तुमच्यासाठी औषध आणणार होता.
याआधी चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं असतं की धनंजय मानेने घरमालकाकडून औषधासाठी ५० रुपये घेतलेले असतात आणि आज चहा पिताना परशुराम २० रुपये मागतो. तेंव्हा इस्राईलवरुन औषध आणायला २० रुपये कमी पडत आहेत असं सांगून वरचे २० रुपये परशुरामला देतो.
आता परशुरामची ओळख करून देताना चांगली ओळख करून देणं गरजेचं होतं.
घरमालकाने परशुरामला बघितलेलं असतं म्हणून त्याची ओळख करुन देणं आवश्यक बनतं. या निमित्ताने धनंजय सांगतो की हाच तो मित्र आहे जो तुमच्यासाठी इस्राईल वरुन औषध आणणार आहे.
तेव्हा घरमालकाच्या मनात परशुरामबद्दल आदर निर्माण होतो आणि तो कसलाही विचार न करता २० रुपये देऊन टाकतो. धनंजयने परशुरामची चांगली ओळख करुन दिली नसती तर त्याचं पितळ उघडं पडलं असतं.
घरमालक त्याला नेहमीप्रमाणे घालूनपाडून बोलला असता आणि परशुरामसोबत सुधीरला पण घराबाहेर हाकलुन लावलं असतं.
या सहा शॉट्सच्या सिनमध्ये प्रत्येक पात्राची संवादाची टायमिंग, क्रिया प्रतिक्रिया एवढ्या परफेक्ट आहेत की हे आजही आपल्याला खळखळून हसवतात. सिनच्या पहिल्या शॉटमध्ये सुधीर संवादाला सुरुवात करतो. कॅमेरा झुम आऊट होतो आणि फ्रेममध्ये चौघे मित्रं दिसतात. कॅमेऱ्याची फ्रेम स्टेबल होते.
मोजके दोन-तीन संवाद बोलून सुधीर थांबतो. धनंजय आणि परशुरामचा संवाद चालू असताना नेमक्या त्याचवेळी घरमालक कडी वाजवतो. धनंजय परशुरामला सोबत घेऊन घाबरत घाबरत दरवाजा उघडायला जात असताना कॅमेरा त्यांच्यासोबत पॅन मुव्हमेंट घेतो.
आता इथे सुधीर आणि शंतनु महत्त्वाचे नाहीत म्हणुन ते फ्रेमच्या बाहेर जातात आणि कॅमेरा धनंजय-परशुरामसोबत पॅन मुव्हमेंट घेतोय. (पहिला शॉट अजून संपला नाही) दरवाजा उघडून धनंजय परशुरामला दरवाजाच्या मागे ढकलत घरमालकाच्या तोंडासमोर पेपर धरतो जेणेकरुन त्याला परशुराम दिसणारच नाही आणि त्याला बोलण्यात अडकवुन ठेवण्याच प्रयत्न करत असतो.
तेव्हा त्याला समोर शंतनु आणि सुधीर दिसतात, थोडासा आश्चर्यभाव चेहऱ्यावर ठेऊन घरमालक रागात पुढे चालत येतो तेंव्हा पहिला कट पडतो. (पहिला शॉट संपला. दुसरा शॉट सुरु) हटकत धनंजयला विचारतो हा तिसरा माणुस कोण आहे?
आता इथे फ्रेममध्ये दोन्ही कोपऱ्यात शंतनु आणि सुधीर दोघेजण पुस्तक वाचण्याचं नाटक करताना दिसत आहेत. थोडंसं सेंटरमध्ये घरमालक विश्वास सरपोतदार आणि धनंजय माने उभे आहेत आणि बरोब्बर सेंटरमध्ये दरवाजामागे लपण्याचा प्रयत्न करताना परशुराम दिसतो. हा दुसरा शॉट फ्रेम कंपोजिशनचं सर्वोत्तम उदाहरण आहे.
अश्याच प्रकारे पुढचे चार शॉट संवाद आणि क्रिये-प्रतिक्रियेसोबत Timing-Spacing, Staging-Blocking चा जबरदस्त वापर करत शुट केलेले आहेत. चित्रपटातील शेवटचा फाइट सिक्वेंस मध्ये सुद्धा Staging-Blocking चा उत्तम वापर केलाय.
धनंजय मानेचं पात्रं हे शंतनु माने आणि विश्वास सरपोतदारांच्या नंतर आपल्यासमोर येतं. धनंजय मानेच्या इंट्रोमध्ये आपल्याला कळतं की हा थापा मारुन लोकांना सहज बाटलीत उतरवू शकतो (सेल्समन असल्याचा हा फायदा). परशुराम आणि सुधीरचा इंट्रो “ही दुनिया मायाजाल” या गाण्यापासूनच होते.
Antagonist असलेल्या विजु खोटेच्या बळी या पात्राची वेशभुषा कॉमिक बुक्समध्ये असलेल्या चोरासारखी आहे. गडद रंगाची पँट, काळ्यापांढऱ्या लाईन्सचा टिशर्ट, गळ्यात बांधलेला टपोरी स्टाईल फिकट रंगाचा रुमाल, गालावर असलेली मस.
हे पूर्णतः कॉमिक बुकमध्ये असलेल्या चोर दरोडेखोरांच्या वेशभुषेशी तंतोतंत साधर्म्य असणारं आहे. सबंध चित्रपटात तो फक्त दोन वेळा टि-शर्ट बदलतो. पण त्याच्या टि-शर्टचा पॅटर्न एकसारखाच आहे. अजून अशी बरीच पात्रं आहेत.
640p × 480p चे डिजीटल फ्रेम रिजोलुशन असणारा 35mm वर शुट झालेला ‘बनवाबनवी’सारखा एक मराठी चित्रपट काही खूप जास्त तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हता. संकलन अर्थात इडीटिंगमध्येसुद्धा काही विशेष प्रयोग केले नव्हते.
प्रयोग केले ते चित्रपटाच्या संवाद लेखनात आणि छायाचित्रणात. कमी रिसोर्स वापरुनसुद्धा चांगला चित्रपट कसा बनू शकतो, हे त्याचं उदाहरण आहे.
२१व्या शतकातील एक चांगलं उदाहरण द्यायचं झाल्यास ‘देऊळ’ या चित्रपटाचं उदाहरण देता येईल. या चित्रपटात सुद्धा Staging-Blocking चा चांगला वापर झालाय. प्रत्येक सिनवर बारीकीनं काम केलं आहे आणि संवाद पण जबरदस्त आहेत.
मराठीतल्या ढिगभर कॉमेडी चित्रपटांच्या भाऊगर्दीत ‘अशी ही बनवाबनवी’ पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक कॉमेडी चित्रपट मराठीत बनतील पण बनवाबनवी हा एकमेवाद्वितीय आहे.
महागुरुंनी जरी ठरवलं आणि दुसरा बनवाबनवी बनवला तरीही त्याला याची सर येणार नाही. हिंदीमध्ये पेइंग गेस्ट नावाचा चित्रपट “बिवी और मकान”पासून प्रेरित होऊन बनवला होता. तो बॉक्स ऑफीसवर बेक्कार आपटला.
How to adapt a movie याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे वसंत सबनीस लिखीत ‘अशी ही बनवाबनवी’.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.