The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्य समाजाने मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात निजामाच्या मसनदीलाच सुरुंग लावला होता

by द पोस्टमन टीम
16 September 2025
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


महर्षी दयानंद सरस्वती यांनी इ.स. १८७५ साली आर्य समाजाची स्थापना केली. त्यांची मातृभाषा गुजराती. पण त्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास केला व आर्य समाजाच्या कार्याचा भारतभर विस्तार केला. हिंदू समाजाच्या दौर्बल्याबद्दल दयानंद सरस्वती फार अस्वस्थ असत. हिंदुंची हीन-दीन अवस्था पाहून त्यांचे मन बेचैन होई. सत्याचा प्रभावी प्रकाश देणारे वैदिक तत्त्वज्ञान आचरण्यात आणल्याशिवाय या देशाला तरणोपाय नाही या श्रद्धेने त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केला.

आर्यसमाजाचे अनेक अनुयायी, कार्यकर्ते त्यांनी तयार केले. वैदिक धर्माच्या प्रसारासाठी हिंदूंच्या मरगळलेल्या मनाला चालना देऊन, त्यांच्यात तेज निर्माण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अपार कष्ट भोगण्यास सिद्ध असणारे बुद्धिमान विचारवंत व प्रभावी वक्ते भारतभर निर्माण केले.

पुढे त्यांच्या या तेजस्वी अनुयायांनी गुरूकुल या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या शाळांमधून सर्व दृष्टीने आदर्श अशी तरुण पिढी तयार झाली. गुरुकुलात शिक्षण घेतलेला विद्यार्थी पाच-दहा हजार लोकांतही वेगळा व उठावदार दिसायचा.

बलवान शरीर, तेजःपुंज चेहरा, वाणीत ओज आणि सामर्थ्य, भरपूर आत्मविश्वास, देशावरची आणि वैदिक धर्मावरची निष्ठा असे त्याचे व्यक्तिमत्व समाजावर सहज प्रभाव पाडण्याइतके समर्थ असे. गुरुकुलातील शिक्षणात असामान्य वक्तृत्व संपादन हा एक खूप महत्त्वाचा घटक होता.



आर्य समाजाच्या प्रसारासाठी गुरुकुलातून विद्या संपादन करून बाहेर पडलेले वक्ते हजारो लोकांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करू लागले. त्यामुळे वैदिक धर्माचा हिंदुस्थानभर झपाट्याने प्रसार होऊ लागला .

हैदराबाद स्टेटमध्ये इ.स. १९२० साली आर्य समाजाची स्थापना झाली आणि पद्धतशीरपणे कार्य करणाऱ्या दोनशे शाखा दोन-तीन वर्षांत उघडण्यात आल्या. निझामी राज्यात हैदराबादचे बॅ. विनायकराव कोरटकर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते.

बन्सीलालजी मुख्यमंत्री होते. त्यांनी उदगीरला आपले मुख्य कार्यालय उघडले. ‘वैदिक संदेश’ नावाचे वृत्तपत्र सोलापूर येथून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. निझाम स्टेटमध्ये सर्वत्र सत्याग्रहात भाग घेण्यासाठी ते हैदराबाद स्टेटमध्ये रवाना झाले. वैदिक संदेश निझाम स्टेटमध्ये सर्वत्र पोचावे अशी व्यवस्था केली. अत्यंत शिस्तबद्ध व ध्येयवादी अशी ती संघटना होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मातृभूमीचे प्रेम आणि वैदिक धर्मावरील निष्ठा या दोन महत्वाच्या मानबिंदूसाठी प्रत्येक आर्यसमाजी प्राणाची बाजी लावण्यास तयार असतो.

हैदराबाद राज्यातील बहुसंख्य हिंदू समाजाला कोणी वाली नव्हता. उलट हिंदूंचा नायनाट करण्यासाठी निघालेली खाकसार पार्टी, निझाम सेना, इत्तेहादूल संघटना, दीनदार सिद्दीक याचे धर्मप्रचारक अनुयायी यांचा सर्वत्र थैमान चालू होता. या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूची आर्यसमाज ही एकमेव संघटना आहे, हे सर्वांना कळले.

उत्तर हिंदुस्थानातून शेकडो आर्यसमाजी कार्यकर्ते मृत्यूची तमा न बाळगता निझाम राज्यात आल्यामुळे आर्य समाजाची शक्ती वाढली. त्यात विशेष करून मराठवाड्यात आर्यसमाजी नेते व कार्यकर्ते निझामाविरूद्ध लढा देण्यास तयार झाले.

दि. २/९/१९२९ रोजी दीनदार सिद्दीक पार्टी नावाची इस्लाम धर्म प्रसारक संस्था हैदराबाद राज्यात स्थापन झाली.

आपण स्वतः चन्नबसवेश्‍वराचे अवतार आहोत आणि बसवेश्‍वराच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मुस्लिम धर्म आहे, असे प्रतिपादन करून दीनदार सिद्दीक पार्टी व त्याच्या अनुयायांनी, हिंदूंना मुसलमान धर्माची दीक्षा देण्याचे कार्य सुरू केले.

आपल्या प्रचारात त्यांनी राम आणि कृष्ण या हिंदू अवतारी पुरूषांचा अवमान करून इस्लाम हाच एक जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे असा जोमाने प्रचार सुरू केला. त्यामुळे इ.स. १९२९ साली आर्यसमाजाच्या चळवळीला चांगली धार आली.

इ. स. १९३० साली तर हैदराबाद स्टेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यात आर्यसमाज संघटना स्थापन झाल्या.

भाई बन्सीलाल आणि श्यामलाल या उदगीरच्या दोघा बंधूंनी संस्थानात फार मोठे कार्य केले. हिंदू समाजातील दुबळेपणा नष्ट करून त्याला स्वाभिमानाने व ताठ मानेने उभे राहण्यास हैदराबाद राज्य आर्य समाज प्रतिनिधीचे प्रधान बॅ. विनायकरावजी विद्यालंकार, पं. नरेंद्रजी आर्य इत्यादींनी शिकविले.

आर्य समाजाची ही चळवळ आपल्या राज्यात फोफावत असल्याचे बघून निझाम सरकारची वक्रदृष्टी आर्य समाजाकडे वळली. इ. सन १९३५ साली निलंगा येथील हवनकुंड व आर्यसमाज मंदिर सरकारने आपल्या गुंडांमार्फत उध्वस्त केले. कोणाच्याही हातात “सत्यार्थ प्रकाश” हा ग्रंथ दिसला की निझामी पोलिस त्यास ताबडतोब अटक करीत.

निलंग्याच्या घटनेमुळे शेषरावजी वाघमारे (पिताजी-आनंदमुनी) व त्यांचे इतर धाडसी सहकारी पेटून उठले. शेषरावजी वाघमारे अत्यंत निर्भय, धाडसी आणि संघटनाकुशल बुद्धिमान नेते होते! त्यांनी हजारो लोकांना या अ*त्याचाराचा बदला घेण्यासाठी गावोगावी शस्त्रसज्ज आर्यसमाज संघटना स्थापन करण्यास प्रवृत्त केले.

भाई बन्सीलालजी, श्यामलालजी, शेषरावजी, दत्तात्रय प्रसाद, गोपाळदेव शास्त्री आदी आर्यसमाजाच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव फिरून हिंदूंना वैदिक धर्माच्या ध्वजाखाली ह*त्यारांसह एकत्रित केले. असंख्य गावांमध्ये आर्यसमाज मंदिर स्थापन करण्यात आले

गावावर इत्तेहादूल पार्टी किंवा रझाकार यांच्याकडून आक्रमण होणार आहे, अशी बातमी आली की आर्यसमाज मंदिरातली घंटा वाजू लागे! घंटेचा आवाज ऐकताच घराघरातील पुरूष, १८-२० वर्षाची तरूण कोवळी पोरे काठ्या, कुऱ्हाडी, भाले-बर्च्या, तलवारी, बंदुका घेऊन आर्यसमाज मंदिराकडे धावत येत.

पाच-दहा मिनिटांत मुकाबल्यासाठी शिस्तबद्धपणे सज्ज राहत. खाकसार पार्टी, दीनदार सिद्दीक पार्टी, इत्तेहादूल संघटना आणि रझाकार यांच्या पाठीशी सरकार असल्यामुळे हे सर्व लोक हिंदूविरूद्ध बेफामपणे वागत. एखाद्या हिंदु व्यक्‍तीने रोहिले किंवा पठाण यांना सहजपणे जरी काही म्हटले तर ते ताबडतोब बंदुकीलाच हात घालीत आणि गोळी घालून ठार मारण्याची धमकी देत.

शिवाय हिंदूंना बाटविण्याचे कामही उत्तमरीत्या चालू होते. कारण त्यासाठी सरकारचे साहाय्य व प्रोत्साहन होते. सरकारच्या वतीने तीनशे मौलवी पगारावर या कामासाठी नेमलेले होते. या चळवळीस “तबलीक्” व “तंजीम” चळवळी असे म्हणतात.

निझामाने पगारी मौलवी नेमून हिंदू-मुसलमान समाजात शांतता राहावी म्हणून गावोगावी “अमन कमिटी” (शांतता कमिटी) बसवल्या होत्या. या अमन कमिट्या म्हणजे केवळ नाटक होते. पगारी मौलवी महारवाड्यात सर्वत्र हिंडून अस्पृश्य लोकांना हिंदूविरूद्ध चिथावणी देत असत. हे मौलवी मुसलमान गुंडांनाही चिथावून सोडत. ते गुंड काहीतरी कुरापत काढून दंगे उत्पन्न करीत आणि सरकारी नौकर त्यांचीच बाजू घेत.

उदा. तालुका कळंब गावाजवळील अंदुर नावाच्या गावी एक खाटीक गाय मारून तिचे मास विकण्याकरिता बाजारात बसला. तेंव्हा हिंदूंनी त्यास हरकत घेतली.

“वाटले तर तू तुझ्या घरात बसून गोमांसाची विक्री कर पण येथे भर रस्त्यात नको.”

तेव्हा तो खाटीक गांगरला. पोलिस पाटलानेही त्याच्याविरूद्ध फौजदाराकडे तक्रार केली. पण फौजदार साहेबांनी तर कमालच केली. तो स्वतः त्या गावी हजर झाला आणि त्याने त्या खाटकास मारूती मंदिराच्या कट्ट्यावर नेऊन बसविले.

हिंदू लोक फार चिडले व दंगा होण्याचे चिन्ह दिसू लागले. तेव्हा फौजदाराने त्यास कट्ट्यावरून खाली देवळासमोर आणून बसविले. असे होते सरकारी अधिकारी!

अशा घटनामुळे-आर्यसमाजाचे लोक अधिक संघटित झाले. तर इत्तेहादूल पार्टी आणि मुस्लिम जमातीमधील गुंड अधिक चेकाळून गेले. इ.सन.१९३८ साली गुंजोटीस वेदप्रकाशचा खून करण्यात आला. वेदप्रकाशच्या ह*त्येची वार्ता कळताच भाई बन्सीलाल आणि वीरभद्रजी आर्य तात्काळ गुंजोटीस आले. पोलिसांनी त्यांना अटक केली.

वेदप्रकाशचा खू*न हे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील पहिले बलिदान होय! त्यानंतर भाई शामलालजींना खराब अन्नपाणी देऊन त्रास देण्यात आला. आजारी असतांना दवाखान्यात पाठवले नाही. जेलमध्येच शामलालजींना विषप्रयोग करून मारण्यात आले.

सोलापूर, राजस्थान, दिल्ली, नागपूर, उत्तरप्रदेश, रावळपिंडी येथून अनेक कार्यकर्ते हैदराबादमध्ये दाखल झाले. असंख्य सत्याग्रहींना अटक करून जेलमध्ये घालण्यात आले. अनेकांना फटक्याची शिक्षा देण्यात आली. वाईट अन्नपाणी दिल्यामुळे अनेकजण आजारी पडले. त्यात कहर म्हणजे इत्तेहादूल संघटनेतील गुंड, पोलिसांच्या समक्ष जेलमध्ये घुसून मारहाण करीत.

या अ*त्याचारात सोलापूरचा सदाशिव विश्वनाथ पाठक हैदराबाद जेलमध्ये दिनांक १२-८-१९३९ रोजी मरण पावला. राजस्थानचे स्वामी ब्रह्मानंदजी चंचलगुडा जेलमध्ये मृत्युमुखी पडले. दिल्लीचे शांतीप्रकाश हैदराबाद जेलमध्ये दि. २७-७-१९३९ रोजी मृत्यू पावले.

नागपूरचे पुरुषोत्तम प्रभाकर हैदराबाद जेलमध्ये दि. १६-१२-१९३८, उत्तरप्रदेशहून आलेले मलखानसिंग हैदराबाद जेलमध्ये १-७-१९२९, रावळपिंडीचे पंडित परमानंदजी हैदराबाद जेलमध्ये दि. ८-७-१९३९, बेंगलोरचे स्वामी सत्यानंदजी चंचलगुडा जेलमध्ये दि. २८-४-१९३९, विष्णू भगवंत अंदूरकर चंचलगुडा जेलमध्ये दि. २-५-१९३९, व्यंकटराव कंधारकर बकील निजामाबाद जेलमध्ये दि. ९-४-१९२३९ रोजी मृत्युमुखी पडले.

एकूण २३ व्यक्तींना जेलमध्ये हौतात्म्य आले!

उमरी जिल्हा नांदेड येथे गणपतराव, गंगाराम आणि दत्तात्रय या तीन आर्य समाजी प्रचारकांना पठाणांनी दगडाने ठेचून मारले!

इ.स. १९४२ साली उदगीर येथे बॅ. विनायकरावजी विद्यालंकार यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद भरली. या परिषदेत निझामी पोलिसांच्या व रझाकारांच्या अमानुष अ*त्याचारांच्या सर्व कुकृत्यांबद्दल निझाम सरकारला इशारा देण्यात आला. तेव्हा पोलिस व इतर संघटनांकडून  ठिकठिकाणी हिंदूंच्याच घरांवर, दुकानांवर ह*ल्ले चढवले गेले. हुमनाबाद येथील एका मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार करून पाच जणांस ठार केले.

इ.स. १९४३ साली निजामाबाद येथे पुन्हा आर्य समाजाची परिषद घेण्यात आली. आर्य समाज चळवळीतील प्रत्येक व्यक्तीची देशावरील, धर्मावरील आणि ध्येयावरील निष्ठा अढळ आणि वर्तणूक शिस्तबद्ध होती. या परिषदेत पंचवीस हजाराचा एक समूह स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच

या लढ्यासाठी अनेक ठिकाणी अधिकाधिक पाठशाळा काढून देशावर व वैदिक धर्मावर निष्ठा ठेवणारे शिस्तबद्ध तरुण अशा पाठशाळेतून बाहेर पडावेत असा निर्णय घेण्यात आला!

निझाम सरकारने आर्यसमाज धर्माची दीक्षा घेतलेल्या सरकारी नोकरांना कामावरून काढून टाकण्याचे फर्मान काढले. एवढेच नव्हे तर सरकारी नोकर आर्य समाजी व्यक्तीबरोबर बोलत असल्याचे जरी दृष्टीस पडले तर त्यांना ताबडतोब नोकरीतून काढून टाकावे अशा सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या होत्या. एकूण निझाम सरकारचे आर्य समाजी लोकांबद्दल अत्यंत कडक धोरण होते.

लातूर येथील एका नवीन जोडप्याला मुद्दाम वारंवार पोलिस ठाण्यावर बोलावणे येत असे. हे जोडपे त्रासून गेले. पोलिसांच्या त्रासातून त्यांची मुक्तता करण्यास कोणी समर्थ आहे असे दिसेना. तेव्हा कोणीतरी त्यांना “तुम्ही आर्य समाजी व्हा” असा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते आर्य समाजी बनले आणि आश्चर्य हे की दुसर्‍या दिवशी त्यांना ठाण्यावर बोलावण्यासाठी कोणी पोलिस, जमादार आला नाही.

धाराशिव जिल्हा निझाम स्टेटमधील सीमेवरचा जिल्हा असल्याने संग्रामात या जिल्ह्याचे कार्य आणि महत्त्व फार मोठे आहे. हैदराबाद स्टेटच्या स्वातंत्र्य चळवळीला सरहद्दीवर कॅम्प उघडून प्रेरणा आणि गती देणे, लोकांना जुलुमांपासून संरक्षण देणे आणि या कँप्समधूनच संस्थानात असंतोषाचा अग्नी पेटविणे या कामी धाराशिव जिल्ह्याची कामगिरी अनन्यसाधारण आहे.

इ.स. १९२४ साली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात आर्य संमाजाची स्थापना करण्यात आली. केशवराव कोरटकर, अघोरनाथ चटोपाध्याय, श्रीपादराव सातवळेकर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात अनेक ठिकाणी आर्य समाज संघटना उभी करण्यात आली. आर्य समाज मंदिरे उघडण्यात आली.

बापूराव मास्तर, रामभाऊ मैंदरकर, तुळजाराम सुरवसे यांनी धाराशिव जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यांस गती दिली. यांच्यासोबत सन्मित्र समाजाचे दत्तोपंत जिंतूरकर, बलभीमराव हिंगे, ग्यानुराव साळुंके, डांगे, देविदासराव मुरूमकर, पुरुषोत्तम माशाळकर यांनी स्वातंत्र्य लढ्याची तयारी म्हणून व्यायामशाळा काढून बलोपासना सुरू केली.

महाराष्ट्र समाजाचे कार्यकर्ते द. या. गणेश, न. ग. मालखरे, शंकर नायगावकर, चंदूलाल गांधी, सुपेकर, जिंतूरकर यांनी गावोगाव जाऊन जनजागृतीचे कार्य केले. स्वतः सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना शिक्षाही झाली.

धाराशिव शहरातील क्रांतिकारक तरुणांनी सरकारी कचेऱ्या जाळण्याचा प्रयत्न करून आपला असंतोष प्रकट केला.

इ. स. १९३७ साली स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली पहिला सत्याग्रह झाला. त्यात कालिदासराव धारूरकर, श्रीकृष्ण अयाचित, धोत्रीकर, नरहर भूमकर यांनी भाग घेतला. बी. एस. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली दिगंबरराव जिंतूरकर, गोविंदसिंग तेरकर, माधवराव भोजगुडे वगैरे विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार घालून वंदेमातरम्‌ चळवळीस पाठिंबा दिला.

वैशंपायन यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव येथे ‘फ्रीडम क्लब’ नावाची संस्था स्थापण्यात आली. आर. बी. बेडब हे त्या संस्थेचे चिटणीस होते. इ.स. १९४६ ला हैदराबाद स्टेट काँग्रेसवरची बंदी उठवण्यात आली. तेव्हा धाराशिव जिल्ह्यात बर्दापूरकर, अपसिंगेकर यांनी कम्युनिस्ट पुरस्कृत विद्यार्थी संघटना हैदराबाद स्टेट काँग्रेसशी संलग्न करून टाकली.

याच सुमारास सोलापूरला दयानंद कॉलेजची स्थापना झाली. मराठवाड्यातील लोकांना सोलापूर हे हैदराबादपेक्षा शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सोयीचे असल्यामुळे दयानंद कॉलेजमध्ये मुलांची संख्या भराभर वाढू लागली. इंग्रजाविरूद्ध व निझामशाहीविरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्य संग्रामासाठी तरुणांना प्रेरणा देण्याचे कार्य या कॉलेजने केले हे उघड सत्य आहे.

कॉलेजचा विद्यार्थी आर्य या विचाराने भारून जाऊन निझामाविरुद्ध झेंडा सत्याग्रह व वंदेमातरम्‌ सत्याग्रहात हिरिरीने भाग घेऊ लागला. दयानंद कॉलेजमध्ये मराठवाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी “हैदराबाद स्टुडंट्स युनियन”ची स्थापना केली.

बॅ. विनायकरावजी विद्यालंकार, पंडित नरेंद्रजी, भाई बंसीलालजी आदि आर्य समाजी नेत्यांच्या ‘युनियन’च्या वतीने कॉलेजमध्ये भाषणे होऊ लागली आणि भाषणांनी स्वराज्य प्राप्तीसाठी विद्यार्थी मंतरला जाऊ लागला.

पुढे गांधीजींच्या सांगण्यावरून कॉलेज छोडो आंदोलनास उग्र स्वरूप आले व विद्यार्थी भराभर कॉलेजच्या बाहेर पडू लागले.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा सरहद्दीवरील प्रत्येक शिबीरात दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आघाडीवर असल्याचे आढळून येत असे. आधी स्वराज्य मग शिक्षण या ध्येयाने हैदराबाद संस्थानात, हैदराबाद शहरापर्यंत दयानंद कॉलेजचे विद्यार्थी सत्याग्रहासाठी जाऊन पोचले.

त्या काळातील प्रिन्सिपॉल श्रीराम शर्मा, ज्यांची जगातल्या प्रख्यात इतिहासकारांत गणना होते, त्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, धर्मप्रेम आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शक्ती दिली. विद्यार्थ्यांना निर्भय बनविले.

दयानंद कॉलेज म्हणजे क्रांतीसाठी जिवंत शस्त्रे पुरविणारे एक कोठारंच होते!

लहान-मोठ्या गावात आर्य समाज संघटना स्थापन झाल्यामुळे दिनदार सिद्दिक संघटनेचा प्रभाव कमी होऊ लागला. मुरूम (ता. उमरगा) येथे आर्य समाजाची स्थापना झाली.

तेव्हा निझामने तेथे दोनशे फौजी जवानांची एक तुकडी ठेवली. लष्कराच्या मदतीने दिनदार सिद्दीक आणि खाकसार पार्टी कार्य करू लागली. आष्टा (कासार) येथे सिद्दिकीच्या भाषणाने लोक पेटून उठले. कारण भाषणापूर्वी सिद्दिक संघटनेने मशिदीत गाय कापण्यासाठी आणली होती.

शामलालजींना ही बातमी कळताच ते आष्टा (कासार) येथे आले. त्यांनी आष्टा (कासार), मुरूम वगैरे खेड्यात भाषणे देऊन हिंदूंना आर्य समाजाची दीक्षा दिली व यज्ञोपवीत घातले. आर्य समाजाची चळवळ हैदराबाद स्टेटच्या सरहद्दीपर्यंत पोचल्याचे पाहून निझामाने मुरूमला ठेवलेल्या मिलिटरीचा खर्च हिंदूवर कर लावून वसूल करायला सुरुवात केली. त्यामुळे असंतोष अधिकच वाढला.

सर अकबर हैदरी त्यावेळचे निझामचे प्रधान होते. अनंतराव काका आष्टा (कासार), राम पांढरे व करबसप्पा ब्याळे (मुरूम) हे हैदराबादला जाऊंन हैदरी साहेबास भेटून आले. हा सर्व खर्च हिंदू रयतेवर लादणे अन्यायकारक आहे असे निवेदन देऊन आग्रह धरला. तेव्हा हैदरी साहेबांनी हिंदूबरोबर मुसलमान रयतेवरही समान खर्च बसवला. पण रयतेने मिलिटरीचा खर्च देणे ही शुद्ध अन्यायकारक बाब कायमच राहिली.

सोलापुराहून प्रकाशित होणारे वैदिक संदेश व सुदर्शन या आर्य समाजाच्या मुखपत्राद्वारे लढ्याची माहिती, पुढील सूचना वगैरे लोकांपर्यंत पोहचू लागल्या.

वैदिक संदेशने “निझाम सरकार के काले कानून” हे पुस्तक प्रसिद्ध केले. हैदराबाद स्टेटमधील धाराशिव जिल्ह्यात ज्यांच्यावर भाषणबंदी व लेखनबंदीचा हुकूम जारी केला आहे अशा तेरा लोकांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. त्यात राम पांढरे यांचे नाव पण होते. नागवार बागी म्हणून या तेरा व्यक्तींना निझाम सरकारने नोटीसा दिल्या होत्या.

हुतात्मा रामा मांग

तावशी ता. लोहारा (पायगा) येथे रामा मांग या नावाच्या गृहस्थाने आर्य समाजाची दीक्षा घेतली होती. इ.स. १९३२ साली तावशीला हिंदू देवालय पाडून मशीद बांधण्याचा उद्योग सुरू केला. तेव्हा पेटलेल्या आर्यसमाजी लोकांनी मशिदीचा ओटा पाडून टाकला.

तावशीच्या रझाकारांनी भोवतालच्या गावी जाऊन दोन ट्रक भरून सशस्त्र पठाण व अरबांना बोलावून आणले. आता आम्हांस विरोध करण्याची कोणात हिम्मत आहे अशा आरोळ्या ठोकीत देवालय पाडण्यास निघाले.

सशस्त्र पठाण व अरब पाहून सर्व हिंदू निमूटपणे उभे राहिले. पण एवढ्यात “मी बहादर तुमच्याशी मुकाबला द्यायला तयार हाय! देवळाच्या दगडाला हात लावाल तर एकेकाचे मुडदे पाडीन.” अशी गर्जना ऐकू आली.

तो होता राम मांग! एकटाच पण बळकट देहाचा.

रामा पुढे येताच दुरून एका पठाणाने त्याच्यावर गोळी झाडली. ती त्याच्या मांडीत घुसली. तशा अवस्थेत रामा मांग, पठाण व अरबांच्या घोळक्यात तुटून पडला. पहिल्या झटक्यातच त्याने चार पठाण व एका अरबास लोळविले. एका पठाणाच्या हातातील बंदूक घेऊन बंदुकीच्या तुंब्याने चार-पाच पठाण व अरबांची टाळकी फोडली. एका पठाणाच्या हातातील तमचा हिसकावून घेतला. रामाचा अवतार बघताच पठाण व अरबांनी पळ काढला.

लोकांनी रामा मांगास तुळजापूरच्या दवाखान्यात नेले. तेथून धाराशिवला नेले. कारण मांडीत घुसलेल्या गोळीमुळे रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध झाला होता. धाराशिवच्या दवाखान्यात तो मरण पावला!

आर्य समाजाच्या एका शाखेचे अध्यक्ष माणिकराव याजवर गुंडांनी ह*ल्ला करून त्यांना जखमी केले. दि. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी त्यांचे दवाखान्यात निधन झाले. पोलिसांनी त्यांचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. तेव्हा आर्य समाजी तरुणांनी निषेधार्थ मिरवणूक काढली. पोलिसांनी पं. देविलाल व २० आर्य समाजी कार्यकर्त्यांना अटक करून नेले.

असा निझामचा आर्य समाजी लोकांवर फारच राग होता. हिंदूंचे संघटन करणाऱ्या आर्यसमाजाच्या चळवळीस चिरडून टाकण्यासाठी त्याने अनेक मार्गांचा अवलंब केला.

त्याची प्रतिक्रिया आर्य समाजाच्या शाखा द्विगुणित होण्यात दिसून येऊ लागली. आर्य समाजाने केवळ हिंदूंचे संघटन केले असे नाही तर बळजबरीने बाटवलेल्या हिंदूंना तसेच जन्मजात मुसलमानांनाही वैदिक पद्धतीने दीक्षा देऊन शुद्धीकरण करण्याचे कार्य द्रुतगतीने चालू ठेवले.

अनेक अस्पृश्यांना आर्य समाजात घेऊन त्यांच्यापुढे हिंदू धर्माचा, हिंदू राष्ट्राचा अभिमान जिवंतपणे उभा केला. हे आर्य समाजाचे कार्य फार मोठे आणि मोलाचे आहे. आर्य समाज संघटना होती म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसला पाय रोवून उभे ठाकता आले!


लेखक : स्व. वसंत पोतदार

साभार – मासिक – वैदिक गर्जना, परळी जि. बीड ( महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा )


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या जेएनयूच्या स्थापनेमागची गोष्ट

Next Post

कामसूत्र लिहिणारा वात्सायन आयुष्यभर ब्रम्हचारी होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कामसूत्र लिहिणारा वात्सायन आयुष्यभर ब्रम्हचारी होता

रवींद्रनाथ टागोरांनी जन-गण-मन जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिलं होतं का...?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.