आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या गुगल, ॲपल, फेसबुक हे अगदी दैनंदिन जीवनातील शब्द झाले आहेत. तंत्रज्ञान ही अशी गोष्ट आहे जी रोज बदलत असते आणि या क्षेत्रातील कंपन्या आपण आपल्या ग्राहकांना नव नवीन गोष्टी देण्याचा सतत प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न करत असताना त्यांना आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांबरोबर संघर्ष करावा लागतो. आज ॲपल आणि फेसबुक यांच्यातील संघर्ष आपण समजून घेणार आहोत. तो संघर्ष का सुरू झाला? कशामुळे सुरू झाला? हे जाणून घेऊ.
आज जगात क्वचितच असा कोणता माणूस असेल ज्याला फेसबुक आणि मार्क झुकरबर्ग ही दोन नावे माहित नसतील. फेसबुक ही अतिशय लोकप्रिय व विनामूल्य सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ, संदेश पाठवू शकता. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात येऊ शकता.
मार्क झुकरबर्ग याने 4 फेब्रुवारी 2004 रोजी फेसबुकची स्थापना केली. मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा माजी विद्यार्थी. 2004 रोजी मार्क व त्याच्या तीन मित्रांनी हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एकमेकांशी संपर्क साधता यावा या करता एक वेबसाईट सुरू केली ज्याचे नाव फेसबुक, अर्थात ही वेबसाईट फक्त हार्वर्ड विद्यापीठापुरती मर्यादित होती. हळूहळू या वेबसाईटचा विस्तार झाला आणि आज ही जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाईट आहे.
जसे फेसबुक आणि मार्क झुकरबर्ग ही नावे सर्वांना माहिती आहेत तसेच ॲपल आणि स्टीव्ह जॉब्स हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. ॲपल ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे आणि मोबाईल उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ॲपलची स्थापना स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनियाक यांनी एप्रिल 1976 मध्ये केली होती.
ॲपल कंपनी ही इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ऑनलाईन सेवा विकसित करते आणि विकते. कंपनीच्या हार्डवेअर उत्पादनामध्ये आयफोन, आयपॅड, आयवॉच या गोष्टींचा समावेश होतो, तर सॉफ्टवेअर उत्पादनामध्ये आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम, आयट्युन्स, आयक्लाउड या गोष्टींचा समावेश होतो.
दोन्ही कंपन्यांचे उद्योग अगदी सुरळीत चालू होते मग असे काय झाले ज्याच्यामुळे यांच्यात संघर्ष सुरू झाला?
ॲपल कंपनीने त्यांच्या मोबाईलसाठी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टिम विकसित केली. या नवीन विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला “आयओएस 14” असे नाव देण्यात आले आणि या आयओएस 14 मुळे फेसबुक आणि ॲपल यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
आता आधीच्या ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा आयओएस 14 असे काय वेगळे होते की दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरू झाला आता हे जाणून घेऊ.
आयओएस 14 मध्ये एक नवीन प्रायव्हसी फिचर इंस्टॉल केला आहे, ज्याच्यामुळे फेसबुक आणि इतर ॲप्सला त्या ॲप्सवर जाहीरात प्रदर्शित करण्यासाठी आणि डिव्हाईसच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी युजरच्या परवानगीची गरज असते.
आता प्रत्येक आयफोनला एक “Identifier for advertisers” IDFA/आय.डी.एफ.ए हा कोड दिलेला असतो. फेसबुक आणि इतर ॲप्स या IDFA च्या मदतीने यूजरची सर्व ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करणे म्हणजे नेमके काय? तर एखाद्या मोबाईल डिव्हाईसचा वापर करून तुम्ही ज्या वेबसाईट किंवा ॲप्सला भेट दिली आहे किंवा त्यांचा वापर केला आहे याला ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करणे असे म्हणतात. यूजरच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी रेकॉडर्सच्या अनुसार, यूजरला त्याने भेट दिलेल्या वेबसाईटवर किंवा ॲप्सवर जाहिराती दिसायला लागतात.
चला एक उदाहरण घेऊन हा विषय समजून घेऊ, समजा तुमच्याकडे आयफोन आहे. तुम्हाला नवीन हेडफोन विकत घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या फोनवर ॲमेझॉन ॲप ओपन केले. ॲमेझॉन ॲपवर तुम्ही हेडफोन असा सर्च केला तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे हेडफोन दिसतील. आता इथे तुमच्या आयफोनमधील IDFA कोडने तुम्ही ॲमेझॉन ओपन केले, तिथे तुम्ही हेडफोन हा सर्च केला, ही तुमची ऑनलाईन ॲक्टिव्हिटीबद्दलची माहिती स्टोअर केली.
आता तुम्ही फेसबुक ॲप ओपन केले. तिथे तुम्हाला हेडफोनच्या विविध जाहिराती दिसतील. आता तुम्ही विचाराल की मी ॲमेझॉनवर हेडफोन सर्च केला होता तर त्याची माहिती फेसबुकला कशी मिळाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्या फोनचा IDFA कोड. फेसबुकला तुमच्या IDFA कोडचा ॲक्सेस आहे, आणि या IDFA कोड वरून फेसबुकला तुमच्या सर्व ऑनलाईन ॲक्टिव्हिटीची माहिती मिळते, आणि यामुळेच तुमच्या फोनमधील फेसबुकवर हेडफोनच्या जाहिराती दिसायला लागतात.
आता आयफोनच्या iOS 14 मुळे, फेसबुक आणि इतर ॲप्सना युजरची ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी युजरचा परवानगीची आवश्यकता आहे आणि याच गोष्टीचा फेसबुक विरोध करत आहे. जी यूजरची ऑनलाईन ॲक्टिव्हिटी, युजरच्या परवानगी शिवाय फेसबुक आरामात ट्रॅक करत होते, आता आयफोन iOS 14 मध्ये तीच ऑनलाईन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी यूजरची परवानगी लागणार आहे.
iOS 14 मुळे फेसबुकच्या बिजनेस मॉडेलवर विपरीत परिणाम होणार आहे आणि ज्यामुळे फेसबुकचे आर्थिक नुकसानही होणार आहे. आता फेसबुकचे बिजनेस मॉडेल नेमके काम कसे करते? फेसबुकचे बिजनेस मॉडेल समजून घेण्यासाठी वरील परिच्छेदात आपण ॲमेझॉन वरून हेडफोन खरेदी करण्याचे उदाहरण घेतले, तेच इथे लागू करू. फेसबुक ॲप हे विनामूल्य आहे, फेसबुक त्यांच्या युजर्सकडून त्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी किंवा तो मेनटेन करण्यासाठी कोणतेही पैसे घेत नाही.
फेसबुकला युजर्सचा IDFA कोडचा ॲक्सेस असल्यामुळे त्यांच्याकडे यूजरच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीचा डेटाबेस असतो. फेसबुक त्यांच्या युजर्सचा डेटा हा ॲमेझॉनला देतो व त्या डेटाच्या बदल्यात फेसबुकला ॲमेझॉन पैसे देते व ॲमेझॉनला फेसबुकवर काही ठराविक काळासाठी जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क मिळतात. यालाच म्हणतात “टार्गेटेड ॲडवरटिझमेंट”.
प्रत्येक युजरचा डेटाच्या बदल्यात फेसबुकला भरपूर पैसे मिळतात. आता iOS 14 मुळे फेसबुकला ॲपल युजर्सच्या IDFA कोडचा ॲक्सेस मिळणार नाही. याचे कारण कोणत्याच यूजरला त्याची ऑनलाईन ॲक्टिव्हिटी कुणीही ट्रॅक केलेली आवडणार नाही. तर अशाप्रकारे iOS 14 मुळे फेसबुकचे टार्गेटेड ॲडवरटिझमेंटवर आधारीत बिजनेस मॉडेल कोलमडू शकते.
फेसबुकचे बिजनेस मॉडेल हे टार्गेटेड ॲडवरटिझमेंटवर आधारीत आहे. याच टार्गेटेड ॲडवरटिझमेंटच्या जोरावर फेसबुकला 98% उत्पन्न मिळते आणि याच गोष्टीमुळे फेसबुक iOS 14 चा विरोध करत आहे.
आज जे काही छोटे मोठे उद्योग चालू आहेत त्यांचा उद्योग विस्तार हा टार्गेटेड ॲडवरटिझमेंटवर अवलंबून आहे. iOS 14 मुळे जर फेसबुकला IDFA चा डेटा मिळाला नाही तर हे सर्व छोटे मोठे उद्योग बुडतील आणि हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही.
फेसबुकचा सगळा बिजनेस हा युजरचा डेटा सर्वेलन्सवर अवलंबून आहे तर ॲपलचा सगळा बिजनेस हा डेटा प्रायव्हसीवर अवलंबून आहे. डेटा सर्वेलन्स आणि डेटा प्रायव्हसी या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी असल्याने फेसबुक आणि अँपल यांच्यातला हा संघर्ष कधीही न संपणारा आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर “द सोशल डायलेमा” नावाचा समाज माध्यमांवर आधारित माहितीपट आहे. या महितीपटातील एक डायलॉग फार सुंदर आहे, “इफ यु आर नॉट पेयींग फॉर द प्रोडक्ट देन यु आर दी प्रोडक्ट”. फेसबुक आणि ॲपलचा हा संघर्ष सध्या न्यायप्रविष्ट असल्याने या संघर्षात नक्की कोण बाजी मारेल हे येणारा काळच सांगेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.