आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटातील ‘गरुड’ नावाचा ड्रोन आठवतोय? उरी ह*ल्ल्याची योजना आखताना आणि ती अमलात आणताना या गरुडची मोठी मदत झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. साधारण ड्रोन असता तर तो कदाचित शत्रूच्या नजरेत आला असता. मात्र, या ड्रोनचा आकारच गरुड पक्ष्यासारखा होता त्यामुळं तो शत्रूच्या नजरेपासून सुरक्षित राहिला. असाच काहीसा विचार काही दशकांपूर्वी अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेनं (सीआयए) केला होता. त्यांनी एका मांजरीला हेर म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी ‘अकाउस्टीक किटी’ नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला होता. नेमका हा प्रोजेक्ट काय होता आणि त्यात सीआयएला यश आलं की नाही, याबाबत हा लेख…
मांजर हा लहान आणि अंगी चोरटेपणा असणारा प्राणी आहे. घरातील व्यक्तींना माहिती न होता आणि अजिबात आवाज न करता गुपचूप दूध पिण्याचं कौशल्य मांजरींकडं असतं. जे लोक मांजरप्रेमी नसतात त्यांचं तर आसपास असलेल्या मांजरींकडं सहज लक्षही जात नाही. कदाचित हीच गोष्ट लक्षात घेऊन १९६०च्या दशकात सीआयएनं हेरगिरीसाठी मांजरीचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
यामागे काही शास्त्रीय कारणे देखील होती. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनरच्या ‘ऑपरन्ट सायकोलॉजी’ आणि ‘बिहेविअर मॉडिफिकेशन’ या दोन अभ्यासांपासून ‘अकाउस्टीक किटी’ प्रोजेक्टला प्रेरणा मिळाली होती. स्किनरच्या मते, नियंत्रित वातावरणात प्राण्यांना ठेवल्यास त्यांच्या वर्तनाचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि त्यांना प्रशिक्षणही दिलं जाऊ शकतं.
आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यानं उंदरांना प्रशिक्षण दिलं होतं. स्किनरनं १९४८ मध्ये आपलं हे संशोधन सुरू केलं होतं. तशी ही संकल्पना एकदम नवीन नव्हतीच. शेकडो वर्षांपासून कुत्रा, गाय, बैल या प्राण्यांना आपण आपल्या गोष्टी ऐकण्याची सवय लावतच होतो. स्किनरच्या संशोधनामुळं त्याला शास्त्रीय आधार मिळाला.
त्यानंतर १९६० साली सीआयएनं मांजर आणि कुत्रा या पाळीव प्राण्यांना हेर म्हणून प्रशिक्षित करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला. हे दोन प्राणी अतिशय सामान्य पाळीव प्राणी असून ते सहजपणे कुठेही फिरू शकत होते. त्यामुळं जगभरात आणि विशेषत: सोव्हिएतमध्ये भटके प्राणी म्हणून हेर असलेले कुत्रा आणि मांजर आरामात वावरू शकले असते. सीआयएच्या मते, त्यावेळी यासारखी दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नव्हती.
प्राण्यांना हेर बनवण्याची ही योजना कागदावरून प्रत्यक्षात येण्यासाठी १९६८ उजाडलं. २१ जुलै, १९६८ च्या एका सीआयए मेमोमध्ये या प्रशिक्षण प्रक्रियेचं वर्णन ‘स्किनर बॉक्स कंडिशनिंग’ची सुधारित आवृत्ती म्हणून केलं गेलं आहे. मांजरींना विशिष्ट लक्ष्य शोधण्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीनं प्रतिसाद देण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यासाठी विविध पर्यांयाचा वापर करण्यात आला. मात्र, सर्वात जास्त भर तोंडी सुचनांवर देण्यात आला होता. कारण मांजरींनी सुचना देणाऱ्यांचा फक्त आवाज ऐकून कृती करणं अपेक्षित होतं.
प्रशिक्षणादरम्यान, मांजरींना उजवीकडे वळणे, लक्ष्य उजवीकडे आहे, लक्ष्य डावीकडे आहे, आहे त्याच जागी थांब, अशा विविध सुचना वारंवार ऐकवण्यात आल्या. त्यांना विविध सिग्नल ओळखण्याचं देखील प्रशिक्षण देण्यात आलं. सुरुवातीला एका मोठ्या पेनमध्ये (मांजरींचा पिंजरा) त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं. जिथे मांजरींच्या योग्य प्रतिसादांना बक्षीसही देण्यात आले. तिथे हँडलर्सनी मांजरींना ट्रॅफिकचे आवाज देखील ऐकवले जेणेकरून त्या वास्तविक आवाजांसाठी संवेदनशील होतील. तेथील वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर त्यांना ओपन यार्डमध्ये आणलं गेलं.
हे सर्व केल्यानंतरही एक सर्वात मोठं आणि सुस्पष्ट आव्हान सीआयएसमोर होतं. मांजरींना कितीही प्रशिक्षित केलं तरी, त्यांच्याकडे हेरगिरीमधून मिळवलेली माहिती हॅन्डलरपर्यंत पोहचवण्यासाठी संभाषण कौशल्य नसतं. सीआयएनं मायक्रोफोन प्रत्यारोपणाद्वारे ही समस्या सोडवली. दीड तास शस्त्रक्रिया केल्यानंतर एका मांजरीच्या कानात मायक्रोफोन, छातीमध्ये त्यासाठी लागणारा पावर सोर्स आणि पाठीच्या कडेला एक सुक्ष्म अँटेना लावला. याच्या मदतीनं हॅन्डलर मांजरीला मार्गदर्शन करू शकत होते. एकदा मांजर त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचलं की, तेथील संभाषण देखील मायक्रोफोनच्या मदतीनं हॅन्डलर ऐकू शकत होते.
१९६७ मध्ये एक ‘अकाउस्टिक किटी’ बनवण्यात आली होती. वॉशिंग्टनमधील एका पार्कमध्ये बसलेल्या दोन सोव्हिएत माणसांच्या जवळपास वावरून त्यांचं संभाषण ऐकण्याचं काम तिला देण्यात आलं होतं. परंतु आपल्या लक्ष्याकडे जाताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारनं या किटीला धडक दिली आणि तिचा मृत्यू झाला.
मात्र, २०१३ मध्ये सीआयएच्या तांत्रिक विभागाचे माजी संचालक रॉबर्ट वॅलास यांनी त्या अपघातात मांजरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. मांजरीला गरजेनुसार वागण्याचं प्रशिक्षण देण्यात अडचणी आल्यामुळं सीआयएनं हा प्रकल्प सोडून दिला होता. पहिल्या किटीमध्ये लावलेली सर्व उपकरणं पुन्हा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतर ते मांजर दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगलं, असं वॅलास म्हणाले होते.
ज्या वर्षी मांजरांना प्रशिक्षण दिलं, त्याच वर्षी म्हणजे १९६७ मध्ये सीआयएन हा अकाउस्टीक कीटी प्रोजेक्ट रद्द केला. मांजरींना आपण प्रशिक्षण देऊ शकतो. मात्र, विविध ठिकाणचं वातावरण आणि सुरक्षेच्या घटकांमुळं त्यांचा वापर जास्त व्यावहारिक ठरत नसल्याचा निष्कर्ष शेवटी सीआयएच्या संशोधकांनी काढला.
सीआयएच्या इतर असंख्य गुप्त प्रकल्पांप्रमाणं हा प्रकल्प देखील कमालीचा गुप्त होता. मात्र, २००१ मध्ये सीआयएच्या ताब्यातील ही ‘हायली क्लासिफाईड’ माहिती बाहेर पडली.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा जगातील सर्वोत्तम यंत्रणा मानली जाते. शीतयु*द्धाच्या काळात सोव्हिएतला शह देण्यासाठी आकाश-पाताळ एक केलं होतं. याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्राण्यांना गुप्तहेर करण्याचा महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली होती. दुर्दैवानं त्यात सीआयएला यश आलं नाही. नाहीतर आज आपल्या अवती भोवती देखील असे मांजरींच्या रुपातील गुप्तहेर फिरले असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










