The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्याला माहितही नसलेल्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव नासाने चंद्रावरील क्रेटरला दिलंय

by द पोस्टमन टीम
24 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


१९६०च्या दशकात अंतराळ विज्ञानाने थोडीफार प्रगती केली होती. अवकाश संशोधनातून चंद्रासह अनेक ग्रहांबाबत काही ना काही माहिती हाती लागली होती. ग्रहांवर आणि उपग्रहांवर खोल खड्डे आढळून आले ज्याला शास्त्रीय भाषेत क्रेटर म्हणजे विवर म्हटले जाते. भारताने पाठवलेल्या चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ ने चंद्रावरील अशा काही क्रेटर्सचे फोटो पाठवले होते, याशिवाय त्या क्रेटर्सवर संशोधन करणेही सुलभ झाले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ज्वालामुखीचा स्फोट झाल्यामुळे असे क्रेटर्स निर्माण झाले आहेत. या क्रेटर्सना ओळखण्यासाठी आणि त्यांचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांचे नामकरण करणे गरजेचे होते.

चंद्रयान-२ने ४३७५ किमी उंचीवरून काढलेल्या या फोटोंमध्ये जॅक्सन, मित्रा, मॅक आणि कोरोलेव्ह या क्रेटर्सचे फोटो आहेत. यातील मित्रा हे नाव एका भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले.

शिशिर कुमार मित्रा याच भारतीय वैज्ञानिकाचे नाव या क्रेटरला देण्यात आले.

शिशिर कुमार मित्रा यांचा जन्म १८९० साली बंगाल प्रांतात झाला. भारतातील सुरुवातीच्या काळातील महान वैज्ञानिकांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश होतो. सर आशुतोष मुखर्जी, डॉ. सी. व्ही. रमन यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकल्यानंतर मित्रा यांनी युरोपात जाऊन वैज्ञानिक शोध लावले होते.

जगप्रतिष्ठित शास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री, मेरी क्युरी आणि कॅमिल गटन या शास्त्रज्ञांसोबत त्यांच्या शोधकार्यात मित्रांनी सहभाग घेतला होता. भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात मित्रा यांनी केलेले काम अतुलनीय आहे.



२४ ऑक्टोबर, १८९० रोजी कलकत्ता येथे मित्रा यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील पेशाने शिक्षक आणि डॉक्टर होते. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. इथेच त्यांची भेट भारतीय विज्ञान क्षेत्रातील दोन मोठ्या शास्त्रज्ञांशी झाली, जगदीशचंद्र बसू आणि पी. सी. रे.

एम.एस.सी पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ जगदीशचंद्र बसू यांच्यासोबत काम केले. परंतु त्यांना फेलोशिप मिळू शकली नाही. त्यामुळे स्वतःचा किमान खर्च भागवण्यासाठी ते एका छोट्याशा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले.

१९१६ साली त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांच्यासोबत काम सुरु केले. इथे सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रकाश किरणांचे विघटन आणि परस्परांवर आदळणाऱ्या प्रकाश किरणांचा अभ्यास केला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

नंतर ते पुढच्या अभ्यासासाठी पॅरीसमधील सोर्बोन युनिव्हर्सिटीत गेले. इथे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास केला. फॅब्री हे ऑप्टीक्स आणि स्पेक्ट्रोस्कोपीच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होतं. यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रेडियम येथे मेरी क्युरी यांच्यासोबत काम केले.

पॅरीस येथील नान्सी युनिव्हर्सिटीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स’ येथे त्यांनी प्रोफेसर कॅमिल गटन यांच्या मार्गदर्शनाखाली रेडीओ वेव्ह्जचा अभ्यास सुरु केला. रेडीओ विज्ञानाच्या अभ्यासालाच त्यांनी आपले अंतिम ध्येय मानले.

रेडीओ विज्ञानात अजून पुरेसे संशोधन झाले नव्हते. हे क्षेत्र पूर्णतः नवीन होते. याच क्षेत्रात अभ्यास आणि संशोधन करण्याचा मित्रा यांचा निर्णय हा खूपच धाडसी होता. भारतातील कोणत्याही विद्यापीठातील अभ्यासक्रमात अजून तरी रेडीओ वेव्ह्जचा समावेश झालेला नव्हता. त्यामुळे या विषयातील काही संशोधन साहित्य किंवा सुविधा उपलब्ध असण्याचा तर विषयच नव्हता.

१९२३ साली मित्रा कलकत्त्याला परत आले. त्यांना भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विद्यापीठात नियुक्त करण्यात आले. मुखर्जी यांच्या सहाय्याने त्यांनी वायरलेस कोर्सचा अभ्यासक्रमात समावेश करून घेतला. रेडीओ वेव्ह्जच्या प्रसारणाच्या आणि इलेक्ट्रॉन ट्यूब्जच्या अभ्यासासाठी त्यांनी एका प्रयोगशाळेची स्थापना केली.

मित्रा यांच्या कामाचा आवाका आणि त्याचे महत्त्व समजण्यासाठी तुम्हाला आयनोस्फीअर म्हणजे काय याची थोडीतरी माहिती असायला हवी.

आयनोस्फीअर हा पृथ्वीच्या वातावरणातील एक थर आहे. जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ६० किमीपासून ते हजार किमी इतक्या उंचीवर असतो. यातून कमी लांबीच्या रेडीओ वेव्ह्ज रिफ्लेक्ट (परावर्तित) होत असतात. रेडीओवरील संभाषणाच्या प्रसारणासाठी या लहरींचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे असते.

१९२६ साली मित्रा आपल्या प्रयोगशाळेतून रेडीओ कार्यक्रमाचे प्रसारण करत असत. १९२७ पर्यंत इंडियन रेडीओ ब्रॉडकास्टिंग कंपनीची स्थापना होईपर्यंत याच स्टेशनवरून कार्यक्रम प्रसारित केले जात असत. पुढे याचेच रुपांतर ऑल इंडिया रेडीओमध्ये करण्यात आले.

त्यांनी लिहिलेले ‘अप्पर ॲटमॉस्फीअर’ हे पुस्तक आयनोस्फीअरच्या अभ्यासासाठी आजही अत्युच्च दर्जाचे पुस्तक समजले जाते.

एका ब्रिटीशकालीन सायन्स मॅगझीनमध्ये छापून आलेल्या एका लेखानुसार, मित्रा हे देशातील पहिलेच शास्त्रज्ञ होते, ज्यांनी देशाला पहिल्यांदा रेडिओ कम्युनिकेशन क्षेत्राची ओळख करून दिली.

अंतराळ संशोधन आणि जास्त उंचीच्या रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रमांचे आयोजन करण्याची क्षमता भारतात विकसीत झाली पाहिजे याचा ते सातत्याने पुनरुच्चार करत असत. त्यांच्या मृत्यूनंतर १९६३ साली भारताने पहिले रॉकेट लॉंच केले. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी अभ्यासासाठी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल १९५८ साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.

भारत सरकारने १९६२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. यानंतर एका वर्षातच म्हणजे १३ ऑगस्ट, १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

आंतरराष्ट्रीय अवकाश युनियनने ग्रहांच्या नामकरणासाठी एका गटाची स्थापना केली आहे. या गटाच्या टास्कफोर्सकडून जास्तीत जास्त मते ज्या नावाला दिली जातात ते नाव ग्रहाला किंवा ग्रहाच्या एखाद्या भागाला दिले जाते. या संघटनेत १००हून जास्त देशांचे मानद खगोलविज्ञान शास्त्रज्ञ काम करतात. त्यांनी बहुमताने चंद्रावरील या क्रेटरसाठी पद्मभूषणाने सन्मानित मित्रा यांच्या नावाचे समर्थन केले.

१९७० साली चंद्रावर सापडलेल्या या क्रेटरचे नाव मित्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तेव्हा भारतात अंतराळ संशोधन अगदी बाल्यावस्थेत होते.

आयनोस्फीअरीक सायन्स आणि रेडीओ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ते पहिले संशोधक होते. त्यानंतर दूरसंचार क्षेत्रात आणि अवकाश संशोधन क्षेत्रातही भारताने प्रचंड मोठे यश संपादन केले. याचा पाया शास्त्रज्ञ शिशिर मित्रा यांनीच घालून दिला होता. त्यांच्या योगदानाशिवाय आणि परिश्रमाशिवाय भारताला हे यश मिळवणे शक्य नव्हते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगप्रसिद्ध बीटल्स कलकत्त्यातील या छोट्याशा दुकानातून सितार खरेदी करत

Next Post

त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचं साहस आपण कधीच विसरू शकणार नाहीत

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचं साहस आपण कधीच विसरू शकणार नाहीत

डॉक्टर कोटणीसांचे उपकार चीनी सैनिक आजही विसरले नसतील

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.