आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सातासमुद्रापार असलेल्या एका अनोळखी प्रांतातून, वेगळी भाषा बोलणारे, वेगळीच वेशभूषा असणारे मूठभर लोक जहाजात बसून आपल्याकडे येतात आणि आपल्याच लोकांमध्ये भांडण लावून, फूट पाडून हळूहळू आपल्यावर राज्य करू लागतात. थोडीथोडकी नाही तर तब्बल १५० वर्षे.
परकीयांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात येऊन भारतावर राज्य केलं आणि भारताचं शोषण केलं. त्यात सगळ्यात वरती नाव येतं, ईस्ट इंडिया कंपनी!
त्याकाळात फ्रेंच, स्पॅनिश, डच आणि पोर्तुगीजांनी आपला व्यापार अमेरिकेपासून ते वेस्ट इंडिज, आशियात चीन, जापान, भारत या प्रदेशात पसरवण्यास सुरुवात केली होती. तर दुसरीकडे ब्रिटिशांचा व्यापार फक्त युरोप खंडातच सीमित होता. त्यातच स्पॅनिश-आमर्डा यु*द्धात हार पदरी पडल्याने इंग्रजांच्या व्यापारी संघटना डगमगल्या होत्या कारण जवळजवळ त्यांची सगळी जहाजे जप्त करण्यात आली होती. याबरोबरच व्यापारी समुद्रमार्गांवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्याचं ब्रिटीशांचं स्वप्न पण धुळीला मिळाल्यात जमा झालं होतं.
सोने की चिडीया असलेल्या भारतात येऊन व्यापार करण्याचं स्वप्न प्रत्येकच व्यापारी त्याकाळी बघत असे. १६०० साली असाच एक इंग्रज व्यापाऱ्यांचा गट राणी एलिझाबेथ (पहिली) हिच्याकडे गेला. त्यांनी राणीच्या वतीने भारतात एकहाती व्यापार करण्याची सनद मागितली.
त्यांनी स्वतःच्या खिशातून सत्तर हजार पाउंड खर्च करून स्थापना केली ईस्ट इंडिया कंपनीची. ही एक अशी कंपनी होती, जिच्याकडे खुद्द इंग्लंडच्या राणीची सनद होती.
ईस्ट इंडिया कंपनीने आशिया, खासकरून भारताला आपले लक्ष्य बनवले आणि ते इंग्लंडमधून निघाले. पण सगळ्यात आधी त्यांनी मुक्काम केला तो इंडोनेशियामध्ये, १६०१ मध्ये. तिथे आपला जम बसवल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत व्यापार सुरू केला. दोन्ही देश हातात आल्यावर मग त्यांनी आपले जहाज भारताच्या दिशेने वळवले.
पण भारतात व्यापार करणं तितकं सोपं नव्हतं. इथे आधीच डच आणि पोर्तुगीजांनी आपला जम बसवला होता. इथे व्यापार करण्यासाठी परवानगी मिळवायला एक दोन नाही पूर्ण २० वर्षं इंग्रजांनी प्रयत्न केले.
व्यापाराची, कारखाने चालू करण्याची परवानगी घ्यायची म्हणजे मुघल शासकांना खुश करणे आवश्यक.
त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या, नाविन्यपूर्ण भेटवस्तू मुघल दरबारी पाठवायला सुरुवात केली. एकूणच मुघलांना ऐषोआरामाची आवड होती. भारतात संपत्ती भरपूर होती पण तरी सुखकर वस्तूंची कमतरता होती.
मुघल बादशहा जहांगीर या सगळ्या भेटवस्तू बघून खुश तर व्हायचा पण परकीयांना भारतात व्यापार करण्याची परवानगी देणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखे होते. शेवटी बादशहाने त्यांच्यासोबत एक करार केला. त्या करारान्वये गुजरात येथील सुरत शहरात ईस्ट इंडिया कंपनीने आपला पहिला कारखाना सुरू केला.
हळूहळू त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त मसाल्यांचा व्यापार करणारी कंपनी आता कापूस, रेशीम, चहा यातसुद्धा आपला जम बसवू लागली.
राणीकडून जी सनद त्यांना मिळाली होती त्याद्वारे मिळणाऱ्या सैन्य शक्तीचा उपयोग त्यांनी सुरुवातीला स्वसंरक्षणासाठी केला पण नंतर व्यापारातील शत्रूंना संपवण्यासाठी ते सैन्याचा वापर करू लागले.
पुढे १७५७ मध्ये बंगाल प्रांत पूर्ण स्वतःच्या हातात घेतला. निव्वळ तीन हजारांचे सैन्य बाळगणारा रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर बनला. त्याने बंगालमध्ये कर गोळा करण्यास सुरुवात केली. इंग्रज त्यावेळी भारतीय माल स्वस्तात विकत घेऊन कच्चा माल इंग्लंडला पाठवून तिथून आणलेला माल जबरदस्ती भारतात विकत. हळूहळू आपला व्यापार वाढवत त्यांनी फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांना भारतातून बाहेर काढले.
सुरत व बंगालनंतर ईस्ट इंडिया कंपनीने थोड्याच कालावधीमध्ये अवध, आग्रा, दिल्ली आणि त्यानंतर संपूर्ण भारतावर कब्जा केला, ज्या भागात त्यांना राज्य करता आले नाही तिथल्या स्थानिक राजा-महाराजांसमवेत त्यांनी जबरदस्ती काही करार केले.
आता त्यांचं सैन्यबळ देखील बरंच वाढलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीकडे जवळपास २ लाख ६० हजार इतके सैन्यबळ होते. हा आकडा ब्रिटिश सैन्यापेक्षा दुप्पट होता.
आता भारत पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला होता.
पण दिलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर करण्यास सुरुवात केली. या बातम्या पार इंग्लंडपर्यंत गेल्या. सुरुवातीला ब्रिटिश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण हळूहळू कंपनी ब्रिटीश सरकारला देखील ऐकेनाशी झाली. सरतेशेवटी १८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर १८५८ मध्ये ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील अधिकार काढून स्वतःच्या हातात घेतले.
१८७४ च्या शेवटी कंपनी विसर्जित करण्यात आली.
गुलामांच्या विक्रीपासून ते भारतात उगवलेल्या अफूचे चीनला व्यसन लावण्यापर्यंत, सगळे ईस्ट इंडिया कंपनीचेच कारनामे होते. भारताला तर कंपनी आणि नंतर आलेल्या इंग्रज सरकारने मुळापासून पोखरून टाकले. त्यानंतर कितीतरी लढाया, आंदोलने. असंख्य लोकांचे बळी आणि पूर्व-पश्चिमेला (आपल्यातीलच) शत्रू राष्ट्र तयार झाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
आज जरी ईस्ट इंडिया कंपनी नामशेष झाली असली तरी तीच्या रक्तरंजित पाऊलखुणा जगभरात बघायला मिळतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









