आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आधुनिक भारताचे जनक, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्यप्रणेते, राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक, स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी, श्रेष्ठ अर्थतज्ञ, असे अनेक व्यक्तिमत्त्वाचे पैलू असणारे दादाभाई नौरोजी हे ब्रिटीशांच्या कनिष्ठ सभागृहात निवडून जाणारे पहिले आशियाई व्यक्ती होते.
ब्रिटीश सभागृहाची ही ऐतिहासिक निवडणूक लढवत असताना, ते म्हणाले होते की, “ही निवडणूक म्हणजे भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व क्षण आहे. तसेच, ब्रिटीश साम्राज्याच्या इतिहासातील देखील हा एक अद्भुत क्षण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ब्रिटिशांमधील न्यायप्रियता आणि स्वातंत्र्यप्रियता या गुणांचा हा परिपाक आहे.”
ब्रिटिशांकडून मानमरातब मिळवण्यासाठी सामान्य भारतीयांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागत होता अशा काळात दादाभाई यांनी ब्रिटीश संसदेतील कनिष्ठ सभागृहात निवडून जाण्याचा इतिहास रचून दाखवला होता.
दादाभाईंचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून झाले. त्याच कॉलेजमध्ये पुढे ते गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक पदावर नेमले गेलेले ते पहिले भारतीय होते.
नोकरीव्यतिरिक्त ते व्यवसाय देखील करत असत. १८५५ मध्ये ते कामा अँड कंपनी लंडनचे मॅनेजर होते. वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःची कापसाचा व्यापार करणारी दादाभाई नौरोजी अँड कंपनी स्थापन केली.
व्यवसायाच्या क्षेत्राकडे वळले असले तरी त्यांच्यातील हाडाचा शिक्षक कायम नेहमी जिवंत असे. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यांना गुजराती भाषा शिकवण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले. दादाभाईंच्या आयुष्यातील हा मैलाचा दगड होता.
व्यवसाय आणि नोकरी दोन्हींचे व्याप सांभाळून मधल्या वेळेत दादाभाई ब्रिटीश सत्तेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करू लागले. त्यांच्या या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. आपल्या अभ्यासातून लिहिलेल्या प्रबंधाचे एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी इकोनॉमिक ड्रेन या नावाने हा प्रबंध प्रकाशित केला.
या अभ्यासातून ब्रिटीश कशाप्रकारे भारतीय महसूल आपल्या घशात कोंबत आहेत, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. ब्रिटीशांच्या या मनमानी कारभारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे चाक आणखी खोलात रुतत असल्याचे त्यांनी सिद्ध केले. १८१४ ते १८४५ या काळात ब्रिटीशांनी ३५ करोड पौंड इतकी संपत्ती भारतातून नेल्याचे म्हटले.
दादाभाईंनी फक्त या समस्येकडे भारतीयांचे लक्षच वेधले नाही तर, ब्रिटीश संसदेत त्यांनी या प्रश्नांवर आवाज देखील उठवला.
१८८५ मध्ये पूर्व भारत मंडळ आणि भारतीय राष्ट्रीय मंडळ यांचे एकत्रीकरण करून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून भारतीयांचे स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करून दाखवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी भारतीयांनी ब्रिटीश संसदेत प्रतिनिधित्व मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. “संसदेत जाऊनच आपण आपला लढा लढू शकतो,” असे ते नेहमी म्हणत.
त्यांनी १८८६ साली झालेल्या ब्रिटीश सभागृहाच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निश्चय केला. फ्लॉरेन्स नाईटएंजलसारख्या उदारमतवादी व्यक्तींनी दादाभाईंना पाठींबा दिला. या पहिल्या निवडणुकीत त्यांना फक्त १९५० मते मिळाली. तर, त्यांच्या विरोधकाला ३६५१ मते मिळाली.
ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान लॉर्ड सॅलीस्बरी यांनी ब्रिटीश संसद अजूनही काळ्या लोकांना आपल्यात सामावून घेण्यास तयार नाही, हेच यातून सिद्ध होत असल्याचे वक्तव्य केले.
“मनुष्यजातीची किती जरी प्रगती झाली तरी, आणि आपल्या जुनाट विचारांवर आपण किती जरी प्रभुत्व मिळवले असले तरी, ब्रिटीश संसद कधीही एका कृष्णवर्णीयाला निवडून देऊ शकत नाही,” असे विधान त्यांनी जाहीरपणे केले होते.
परंतु, काही उदारमतवादी ब्रिटीश आणि वृत्तपत्रांनी या वक्तव्याची छानबीन सुरु केली. गव्हाळ वर्णीय भारतीयासाठी काळा शब्द वापरणे कितपत योग्य आहे, यावरही चर्चा झडल्या. या चर्चेमुळे दादाभाईंना ब्रिटीशांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली.
दादाभाईंनी याच संधीचा फायदा उठवत पुढची सहा वर्षे ब्रिटीश उदारमतवाद्यांचा पाठींबा मिळवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. विशेषत: ज्यांनी पंतप्रधानांच्या त्या व्यक्तव्याचा निषेध केला होता त्यांचा.
त्यांनी सेन्ट्रल फिन्सबरीमधून पुढील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती लंडनमधील हा असा भाग होता जिथे बहुसंख्य मतदार हे कामगार होते. यावेळी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी देखील दादाभाईंना पाठींबा दिला. मुहम्मद अली जिना आणि चित्तरंजन दास यांसारखे विद्यार्थी कार्यकर्ते देखील दादाभाईंच्या पाठीशी उभे राहिले.
दादाभाई भारतीयांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवत होते, तेंव्हा गांधीनी देखील त्यांना पत्र लिहून कळवले की, “एका वडिलधाऱ्या व्यक्तीकडून लहान मुलाला जशा अपेक्षा असतात अगदी तशाच पद्धतीने भारत तुमच्याकडे डोळे लावून बसला आहे. ही या देशातील लोकांची सच्ची भावना आहे.”
१८९२ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते पाच मतांनी विजयी झाले. पण, त्याच्या विजयामुळे लॉर्ड सॅलीस्बरी मात्र नाराज झाले. या निवडणुकीच्या निकालात काही अफरातफर झाल्याचा संशय आल्याने त्यांनी नव्याने मतमोजणी करण्याची मागणी केली. अर्थात, त्यांची मागणी अजिबात चुकीची नव्हती. कारण दादाभाई पाच मतांनी विजयी झाले होते.
संसद सदस्य या नात्याने केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी ब्रिटीशांच्या भारतातील जुलमी अन्याय्य राजवटीबद्दल भाष्य केले. त्यामुळे या निवडणुकांनी कशा पद्धतीने त्यांना त्यांचे हक्क मागण्याचा अधिकार दिला हे देखील सांगितले. या माध्यमातून दोन्ही देशांतील संबंध सुधारतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेताना त्यांनी बायबलला प्रमाण मानण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी झरतृष्टांच्या खोरादेह अवेस्ताला प्रमाण मानून शपथ घेतली.
त्या क्षणापासून दादाभाईंनी भारतीयांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे स्वराज्य हेच मुद्दे पुढे रेटले. अर्थात, ब्रिटिशांच्या कनिष्ठ सभागृहात जाण्याचा त्यांचा हाच एकमेव उद्देश होता.
याशिवाय त्यांनी इथे स्त्री शोषण, भारतीयांचे नागरी अधिकार आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीय कामगारांच्या समस्येवरही आवाज उठवला. त्यांनी मोफत शिक्षणासारख्या सुधारणावादी उपाययोजनांचाही पुरस्कार केला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








