आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. तर मग आता वस्त्र या प्रकारात अंतर्वस्त्रसुद्धा येतं. आज माणसासाठी अंतर्वस्त्र हे बाहेरच्या कपड्यांच्याइतकंच महत्त्वाचं आहे.
पण ही अंतर्वस्त्रे वापरण्याची सुरुवात केव्हा झाली ? किंवा हे त्या काळात का वापरले जायचे ? आणि आज आपण वापरत असलेली पुरुषांची अंतर्वस्त्र कशी तयार झाली ?
सुरुवातीला लंगोट हे सर्व पुरुषांचं अंतर्वस्त्र होतं. जे आता फक्त पहिलवान व्यायाम करताना वापरताना दिसतील. तर मग हे लंगोट कालबाह्य कसं झालं ? या लंगोटाची जागा अंडरपॅन्टने कशी घेतली याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
लंगोट हे काही आजकालचं अंतर्वस्त्र नाही तर त्याचा इतिहास बराच मागे जातो. असं म्हणलं जातं की पौराणिक काळापासून लंगोट हे माणूस प्रजातीला चिकटलेलं आहे.
लंगोटाची सुरुवात केव्हा व कोणी केली या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे असेल असे वाटत नाही. पण याचा उपयोग खूप पुरातन काळापासून होत आला आहे.
पौराणिक कथांत पाहिलं तर आपल्याला रामायणात हनुमान हे लंगोट वापरताना दिसतात. ते लंगोट लाल रंगाचे होते आणि लाल रंगाचे लंगोट हे ब्रम्हचार्याचे प्रतीक असल्याने पहिलवानसुद्धा याच रंगाचे लंगोट वापरतात. इतकंच नाही तर असंही म्हणलं जातं की लंगोट हे शारीरिक ताकद दाखवतं व मानसिक स्थिरतासुद्धा प्रदान करतं.
हेच कारण आहे की दरवेळी आपल्याला हनुमानाची मूर्ती लाल लंगोटात दिसते. पण हे झालं रामायणात, आपल्याला महाभारतातसुद्धा लंगोटाचा वापर दिसतो.
महाभारतात यु*द्ध सुरू होणार असते तेव्हा दुर्योधनाची आई गांधारीला असं वाटतं की आपल्या वर्षानुवर्षे बंद असलेल्या दृष्टीच्या शक्ती दिल्यास दुर्योधनाच्या शरीरावर एक कवछ तयार होईल. यासाठी गांधारी दुर्योधनाला तिच्याकडे संपूर्ण नग्नावस्थेत बोलावते जेणेकरून ती त्याला वरदान देऊ शकेल. पण इथे श्रीकृष्ण मध्ये येतात व ते म्हणतात की अशा नग्नावस्थेत आईसमोर जाणं योग्य नाही आणि ते दुर्योधनाला लंगोट घालायला सांगतात.
लंगोट घातल्याने दुर्योधनाच्या मांड्यांवर कवछ चढत नाही व भीम त्याच्या मांडीवर वार करून त्याचा वध करतो. महाभारतातल्या या प्रसंगावरूनसुद्धा आपल्याला लंगोटाचा संदर्भ लक्षात येऊ शकतो.
(दुर्योधन गांधारीकडे जाताना केळीचे पान गुंडाळून गेला कि लंगोट याबद्दल अभ्यासकात मतभेत आहेत)
केवळ रामायण व महाभारताच नाही तर या लंगोटाचा संदर्भ आपल्याला सिंधू संस्कृतीतसुद्धा आढळतो. सिंधू संस्कृतीत लोक आपल्या शरीराला झाकण्यासाठी लंगोटाचा वापर करायचे. पण त्या काळात असणारे लंगोट आजच्यापेक्षा वेगळे होते. त्या काळात ते थोडे लांब असत आणि त्याचा एक भाग अंतरवस्त्राप्रमाणे शरीराला बांधला जायचा. हे त्या काळात पूर्णपणे शरीराला झाकणारे वस्त्र असायचे.
इतकंच नाही तर या काळात काही लोक मेंढीच्या लोकरीची तर काही जनावरांच्या कातडीचेसुद्धा लंगोट घालत असायचे. लंगोट घालण्यामागे त्यांचा हाच उद्देश असायचा की आपले शरीर जास्तीत जास्त झाकले जावे.
जसा जसा काळ बदलत गेला तसतसं लंगोट मागे पडत गेलं. आता शरीर झाकण्यासाठी धोतर वगैरे वस्त्र उपलब्ध होते. तेव्हा लोकांना अंतर्वस्त्र म्हणून काही घालायची गरजच वाटत नव्हती. खूप वर्षं असेच चालत राहिले. मग १६९९ साली दहावे शीख गुरू, गुरू गोविंदसिंग हे कच्छा नावाचं एक वस्त्र जगासमोर घेऊन आले.
शीख समाजाच्या ५ मुख्य गोष्टींमध्ये याची गणना केली गेली. हे अंतर्वस्त्र बनवण्यामागे उद्देश हाच होता की शीख बांधव आपले शरीर व्यवस्थित झाकू शकतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे केवळ पुरुषांसाठीच न ठेवता महिलांसाठीसुद्धा अंतरवस्त्र म्हणून वापरायला दिले.
त्या काळात हे वस्त्र कपड्यांच्या तुकड्यांना जोडून तयार केलं जायचे. मागे वळून पाहिलं तर असासुद्धा संदर्भ दिसतो की शीख लोकांचं लक्ष विचलित होऊ नये, ते आपल्या ध्येयावरच सगळं लक्ष समर्पित करू शकावेत म्हणून त्यांना हे वस्त्र घालायला धार्मिक सक्तीचं होतं. आता हे कच्छा नामक वस्त्र शिखांमध्ये तर चांगलच प्रसिद्ध झालं. लोकांनी त्याला अंगिकारलेसुद्धा.
पण गुरू गोविंदसिंगांनी तयार केलेलं हे कच्छा नामक वस्त्रसुद्धा जास्त दिवस राहिलं नाही. थोड्याच दिवसात लोक याला विसरून गेले पण लंगोट कायम होतं. पहिलवान या काळातसुद्धा लंगोट वापरत असत.
बदलत्या वेळेप्रमाणे भारतात आता इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतात बऱ्याच गोष्टी घेऊन आले होते त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बॉक्सर शॉर्ट. या शॉर्टला सरळ सरळ अंडरपॅन्टसारखं वापरलं जाऊ लागलं होतं. इंग्रजांनी आणलेल्या बॉक्सर शॉर्टस भारतीयांना आवडल्या तर काही त्याच्यापासून अलिप्तच राहिले.
थोड्याफार लोकांनी ही अंडरपॅन्ट वापरण्यात उत्साह दाखवला पण याची मागणी वाढली ती दुसऱ्या महायु*द्धाच्या दरम्यान. जेवढे भारतीय सैनिक ब्रिटिशांकडून लढण्यास गेले होते त्यांना बॉक्सर शॉर्टस देण्यात आल्या होत्या, आणि सैनिकांनासुद्धा त्या खूप आवडल्या होत्या.
त्यांनी या शॉर्टस वापरायला सुरवात केली होती. असं म्हणलं जातं की याच काळात अंडरपॅन्टचा फायदा लोकांच्या लक्षात आला. त्यांना हे वस्त्र वापरल्याने आरामदायी वाटायला लागलं होतं. पण तरीसुद्धा भारतातील समाजाचा काही घटक यापासून लांबच होता.
आता साल १९७० आलं होतं आणि लोकं धोतर सोडून पॅन्टचा वापर करू लागले होते. तर या पॅन्टच्या आत लंगोट घालणे हे चुकीचं वाटत असायचं पण त्या काळात अंडरपॅन्टसुद्धा बाजारात उपलब्ध नव्हत्या आणि ज्या उपलब्ध होत्या त्या खूप मोठ्या असायच्या. त्या वापरायला कठीण वाटत असायचं. नंतर याच अंडरपॅन्टला पुढे जाऊन थोडंस लहान केलं गेलं व याचा आकार बदलण्यात आला. आकार बदल्यानंतर या अंडरपॅन्ट ची एक लाटच निर्माण झाली.
भारतात काही अंडरपॅन्टचे ब्रँड आले व लोकांनी त्याचा वापर चालू केला. असं म्हटलं जातं की अंडरपॅन्टचा जास्त वापर होण्यामागे त्या काळातील बॉलीवूडचासुद्धा सहभाग होता. कारण बॉलीवूडमधल्या कलाकारांचं लोक अनुकरण करत असत, मग जेव्हा हे नट अंडरपॅन्ट वापरतात हे पाहून सामान्य लोकांनीसुद्धा त्यांच्या अंडरपॅन्टचं देखील अनुकरण करत तिला वापरण्यास सुरुवात केली.
यानंतर भारतात खूप सारे विदेशातील ब्रँड्ससुद्धा आले. या वस्त्रांचा खप वाढत गेला. याचा आकार बदलत गेला. दिवसेंदिवस अंडरपॅन्टचा आकार लहान होत गेला जेणेकरून ती वापरण्यास कम्फर्टेबल व्हावी.
कधीकाळी ज्या अंडरपॅन्टचा भारतात उपयोगच होत नसत, त्या उद्योगात आता कित्येक पैश्यांची उलाढाल होताना आपल्याला दिसतेय. आज हे मार्केट एवढं वाढलं आहे की तुम्हाला याचा अंदाजसुद्धा येणार नाही. यातून अंतर्वस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्या किती नफा कमावतात ते आपण या २०१८ च्या एका सर्व्हेच्या आकडेवारीतुन पाहूया.
२०१८ मध्ये या अंतर्वस्त्रांच्या बाजारात तब्बल १३,८४८ मिलियन इतका रेव्हेन्यू उत्पन्न झाला आहे. इतकंच नाही तर हे मार्केट वर्षाला ११ टक्क्यांनी वाढत आहे.
पण तरीसुद्धा आज भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडरपॅन्ट वापरली जात असताना लंगोट मागे पडले आहेत, पण ते वापरायचे बंद झालेत असे नाही.
आजही आपल्या देशात कित्येक साधू व पहिलवान लंगोट वापरतात. लंगोट भलेही सामान्य लोकांच्या जीवनातून बाहेर झाले असेल तरीसुद्धा ते या लोकांनी ओल्या श्रद्धेपोटी जपलं आहे.
तर आपल्या भारत देशाचा हा लंगोट ते अंडरपॅन्ट हा प्रवास खरच खूप रोचक होता. माणसाच्या गरजा कशा बदलतात याचा अंदाज आपणांस या लेखातून आलाच असेल. आज भलेही लोक अंडरपॅन्ट वापरत असतील पण लंगोटाने आपले महत्त्व कायम टिकवून ठेवले आहे.
तुम्हाला या प्रवासाबद्दल काय वाटलं ते आम्हाला नक्की कळवा..!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








