आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मनुष्य आणि पक्षी यांचं एक वेगळंच नातं आहे. मनुष्य काही पाळीव पक्षी पाळतो आणि त्याच्यावर जिवापाड प्रेम करतो किंवा असंही मनुष्य पक्षांना दाणा-पाणी घालतो. आता तर जनजागृतीमुळे गॅलरीत, बागेत पक्षांसाठी पाणी ठेवणे, किंवा तांदूळ, गहू असं धान्य ठेवणे हे सर्रास चालू असते, पण मनुष्य आणि पक्षांमध्ये यु*द्ध झाल्याचं कोणी ऐकलंय का?
आश्चर्य वाटेल पण खरंच हे एक वेगळ्या प्रकारचं यु*द्ध आहे आणि ते ऑस्ट्रेलियात मनुष्य आणि पक्षांमध्ये झालं. या यु*द्धातलं वेगळेपण हेच आहे की, हे यु*द्ध माणसा-माणसांतलं नसून माणूस आणि पक्षी यांच्यामधलं आहे.
कदाचित असं वाटेल की ही काहीतरी चेष्टा आहे, पण मित्रहो तसं काही नाही. जाणून घेऊया या वेगळ्या यु*द्धाबद्दल. या यु*द्धाचं नाव आहे ‘इमू यु*द्ध’ याला ‘ग्रेट इमू यु*द्ध’ असंही म्हणतात. १९३२ मध्ये ऑस्ट्रेलियात हे यु*द्ध झालं. इमू हा ऑस्ट्रेलियातील एक विशाल असा पक्षी आहे. ऑस्ट्रेलियाचा तो राष्ट्रीय पक्षी आहे.
जगातील सर्वांत मोठ्या पक्षांत याचा दुसरा नंबर आहे. आपल्याकडील शहामृगासारखा तो दिसतो. त्याची उंची जवळजवळ दोन मीटर इतकी असते. तो उडू शकत नाही. हा अत्यंत जड, पण चपळ पक्षी आहे. त्याचे पंख अतिशय सुंदर आणि चमकदार असतात. या पक्षातील नर पक्षात व मादीमध्येसुद्धा गळ्याजवळ एक विचित्र असा फुगा असतो. ज्यामधून वेगळाच आवाज येतो.
इमूचे पाय मजबूत असतात तो ताशी पन्नास किमी वेगाने धावता येतं. हा पक्षी नेहमीच समूहाने आढळतो. गवत, फळं, वन्य वनस्पती, कीटक, सरडे, उंदीर हे त्याचे आवडते खाद्य आहे. इमू पक्षात मादी आकाराने मोठी असते नर लहान असतो. गवत असलेल्या आणि जमिनीपासून काही उंचीच्या अंतरावर इमू आपले घरटे बनवते.
मादी इमू एका वेळी दहा ते बारा अंडी देते. अंड्यापासून पक्षी तयार होऊन इमूचं पिल्लू स्वत:च्या पायावर उभं राहिपर्यंत नर इमू त्यांची काळजी घेतो.
या इमूमुळे पिकांचे नुकसान होत होते, त्यामुळे इमूची संख्या कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील लोकांनी प्रयत्न केले. पण या यु*द्धात त्यांचा पराभव झाला म्हणून हे एक दुर्मीळ यु*द्ध मानले जाते.
१९३२ साली म्हणजे पहिल्या महायु*द्धानंतर हे यु*द्ध सुरू झाले. ऑस्ट्रेलियन सैनिक यु*द्धाहून परत आल्यावर परत एकदा सामान्य जीवन जगू लागले. ऑस्ट्रेलियातील जास्तीत जास्त सैनिक सामान्य नागरिक म्हणजे शेतकरी किंवा मेंढपाळ होते.
पहिले महायु*द्ध संपून जेव्हा ते मायदेशी परतले तेव्हा सरकारने त्यांना चरितार्थ चालविण्यासाठी ‘सैनिक सेटलमेंट स्कीम’ आणली. ज्यात सुमारे ५०३० माजी सैनिकांना जमिनी दिल्या. ज्यामध्ये ते गहू लागवड किंवा मेंढ्या पाळणे असे उद्योग करू शकले असते. तशा जमिनी काही फार उत्तम स्थितीत नव्हत्या त्यामुळे सैनिक नाखूष होते.
त्यात ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे गव्हाचे दर १९२९ साली झालेल्या आर्थिक महामंदीमुळे खूपच कमी झालेले होते, पण यापेक्षाही आणखीन एक मोठे संकट आले की ज्यामुळे सर्व पिकांचा नाश होऊ लागला. त्याचे कारण इमू पक्षी. इमू पक्षाने पिकांचा नाश सुरू केला. जोमाने आलेल्या या नव्या पिकांकडे इमूने आपला मोर्चा वळवला.
शेतकरी याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते. सुरुवातीला शेतकरी म्हणजे जे माजी सैनिक होते त्यांनी इमूवर गोळी*बार सुरू केला.
कारण ते माजी सैनिक होते. परंतु तरीही शेकडो पक्षांचा नाश केल्यानंतर देखील सतत वाढणार्या पक्षांच्या संख्येला आळा बसत नव्हता. म्हणून त्यांनी सरकारला ऑस्ट्रेलियन सैन्याची मदत देण्यासाठी विनवले.
या यु*द्धाची सुत्रे मेजर मेरीडिथने हाती घेतली होती. १०,००० दारूगोळा आणि लुईस बंदुका घेऊन इमूच्या नाशासाठी दाखल झाला. थोडे पक्षी मारले गेले, परंतु जादा पक्षांना मारण्यात यश आले नाही. पक्ष्यांच्या मागे धावून त्यांना लक्ष करणे मोठे कठीण काम होते. इमूची संख्या कमी करण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी मेरिडिथ सैन्य घेऊन कॅम्पियन इथे गेले तिकडे ५० इमू पक्षी होते, पण ते बंदुकीच्या ह*ल्ल्यात जखमी होत नव्हते.
जेव्हा ह*ल्ला होतोय असे त्यांना समजले तसे पक्षांनी हुशारीने छोटे छोटे गट केले आणि पळून गेले, त्यामुळे त्यांना टार्गेट करणे सैन्याला कठीण झाले. त्यामुळे या पहिल्या ह*ल्ल्यात फारच कमी म्हणजे डझनभरच पक्षी मारले गेले. सैन्याला या पक्षांनी चांगलेच दमवले.
४ नोव्हेंबर रोजी मेरिडेथने स्थानिक धरणाजवळ ह*ल्ल्याची तयारी केली होती. त्या हद्दीत जाताना १ हजार हून अधिक इमू दिसले होते. पण बंदूक सुरू करेपर्यंत सर्व पक्षी आश्चर्यकारकरित्या दिसेनासे झाले.
गोळीबार झाला, पण फक्त १२ पक्षी मारले गेले. पक्षांनी सैन्याला चांगलेच चकवले होते.
नंतरच्या ह*ल्ल्यात चांगला निकाल मिळाला म्हणजेच जास्त इमू मारले गेले. पण एक इमू मारण्यासाठी १० बुलेट खर्च झाल्या होत्या. हा आकडा पाहून सरकारने हे योग्य नसल्याचे ठरवले. आणि मेजर मेरिडिथला मिशन थांबवून परत बोलावले गेले. म्हणजेच परत इमूच जिंकले. म्हणून या यु*द्धाला ‘ग्रेट इमू वॉ*र’ असे म्हणतात.
असे म्हणतात की, त्या काळात इमूची संख्या बर्याच प्रमाणात घटली, कारण स्थानिकांनासुद्धा परिस्थितीशी सामना करण्यासाठी दारूगोळा पुरवण्यात आला होता, पण इमूने ही तितक्याच ताकदीने त्यांना प्रतिकार केला.
इमूने मोठ्या शौर्याने, कौशल्यतेने आणि बुद्धिमत्तेने लढा दिला. मेजर मेरिडिथ यांनी इमूची तुलना झुलसशी केली. आणि गंभीर जखमी झाल्यावरसुद्धा त्यांनी कसा प्रतिकार केला हे सांगितले.
ते म्हणतात, ‘‘जर या पक्ष्यांच्या बुलेट वाहून नेण्याच्या क्षमतेसारखा आपला लष्करी विभाग असेल तर जगातील कोणत्याही सैन्याला सामोरे जाता येईल. त्यांनी मशीनगनचा सामना अभेद्यपणे केला. त्यांना बुलेट देखील थांबवू शकले नाहीत.’’
एका विरोधकाने शत्रूबद्दल काढलेले हे उद्गार आहेत. म्हणजे शत्रू किती प्रभावी होता हे लक्षात येते. त्यामुळचे लोकांच्या हृदयात या पक्षाने एक वेगळेच स्थान बनवले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










