The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किंग जॉन खरोखरच इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात वाईट सम्राट होता का?

by द पोस्टमन टीम
12 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इंग्लंडचा राजा जॉन याला तिथल्या सर्वांत वाईट राज्यकर्त्यांपैकी एक मानलं जातं. तो अत्यंत संशयी, कपटी, क्रूर होता, त्याला सर्वांत अपयशी राजा म्हटलं जातं. त्याच्या कार्यकाळात इंग्लंडच्या राजवंशाला आपल्या विदेशातल्या मालमत्ता आणि जमिनी गमवाव्या लागल्या. याच काळात फ्रान्ससारख्या देशाकडून राजाच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला.

याच काळात इंग्लंडच्या राजसत्तेविरोधात अनेक बंडाळ्या झाल्या. त्यामुळे इंग्लंडची राजेशाही कमजोर झाली आणि याच राजा जॉन याला मॅग्ना कार्टा करारावर सही करून स्वातंत्र्याचा जाहीरनामा मान्य करावा लागला. हा करार ही त्या काळातली एक महत्वाची घडामोड होती. इंग्लंड आणि एकूणच युरोपात लोकशाहीची बीजे या करारामुळेच रोवली गेली.

राजा जॉनला मात्र, इतिहासकारांनी आणि जनतेनेही ‘जॉन लॅकलँड’ (जमिनी ताब्यात नसलेला राजा), ‘जॉन सॉफ्टस्वोर्ड’ (तलवारीत बळ नसलेला राजा) अशा बोचऱ्या आणि खवचट टोपण नावांनी हिणवले. 

जॉन याने सन ११९९ ते १२१६ या काळात राज्य केले; इतिहासात तो अपयशी आणि दुर्गुणी राजा म्हणून बदनाम ठरला. वास्तविक त्याच्या स्वभावातील वैगुण्यांना आणि त्याच्या अपयशी कारकिर्दीलाही त्याच्या आजूबाजूची परिस्थिती आणि वातावरण अधिक कारणीभूत असल्याचं दिसून येततं.

इंग्लंडच्या हेन्री दुसरा या राजाचा जॉन हा सर्वात धाकटा मुलगा. जॉनचा जन्म २४ डिसेंबर ११६७ रोजी ऑक्सफर्ड येथे झाला, राजाच्या मुलांपैकी तो सर्वात धाकटा मुलगा. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या राजगादीवर बसण्याची संधी मिळेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. राजा हेन्रीने त्याला सन ११८५ मध्ये लॉर्ड ऑफ आयर्लंड हे उमरावपद देऊन त्याची रवानगी आयर्लंडला केली. तिथे व्हाईसरॉय म्हणून काम करत असलेल्या जॉनने आपल्या अल्प कार्यकाळात इंग्रज अधिकारी आणि आयरिश बंडखोर या दोघांनाही वठणीवर आणण्याचे महत्वाचे काम बऱ्यापैकी पार पाडले. केवळ चार महिन्यांच्या कामकाजानंतर जॉन इंग्लंडमध्ये परतला.



जॉनच्या भावांनी प्रत्यक्ष आपल्या पित्यालाच आव्हान देऊन इंग्लंडची गादी बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फ्रान्सचा नवीन राजा फिलिप दुसरा याच्याशी संधान बांधले. या बंडाला खुद्द राणीने पाठिंबा दिला होता. अखेर हेन्रीने शेवटी मुलांच्या अटी मान्य केल्या. त्यानुसार त्याने थोरला मुलगा रिचर्डला त्याचा एकमेव वारस म्हणून मान्यता दिली. त्यानंतर अल्पकाळातच राजा हेन्री मरण पावला आणि रिचर्डला २ सप्टेंबर ११८९ रोजी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे राज्याभिषेक करण्यात आला.

त्या काळापर्यंत इंग्लंडच्या अनेक जमिनी फ्रान्समध्ये होत्या. राजा परिवारातील एंजेव्हिन्स (उर्फ प्लांटाजेनेट्स): नॉर्मंडी, मेन आणि अक्विटेन या कुटुंबांची मालकी त्या जमिनींवर होती. यापैकी काही मालमत्ता आपल्याला मिळाव्या, अशी जॉनची मागणी होती. मात्र, रिचर्डने जॉन त्या देण्यास नकार दिला, त्याने त्याच्या वडिलांना या जमिनींचा सांभाळ करण्याचे वचन दिल्याचा रिचर्डचा दावा होता. यामुळे भावांमधील वितुष्टात भर पडली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

रिचर्ड तिसऱ्या धर्मयुद्धात (सन ११८९-९२) परदेशात लढत असताना त्याला रोमन सम्राटाच्या सैन्याने जेरबंद करून कैदेत टाकले. त्या वेळी जॉनने सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फ्रान्सच्या राजा फिलिप(दुसरा) याची मदत घेतली. मात्र, ती फलद्रुप झाली नाही. रिचर्डचे चाणाक्ष मंत्री ह्युबर्ट वॉल्टर यांनी जॉनच्या बंडखोरीला आळा घालण्यात यश मिळवले.

रिचर्ड सन ११९४ मध्ये इंग्लंडला परतला. त्याला जॉनच्या बंडाळीबद्दल माहिती मिळाल्यावरही त्याने आपल्या भावाला माफ केले. इतकेच नाही, तर त्याला आपला अधिकृत उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं.

सन ११९४ मध्ये रिचर्डने फ्रान्समध्ये आपल्या अँजेविन-प्लँटाजेनेट भूमीचे रक्षण करण्यासाठी मोहीम हाती घेतली. परंतु ६ एप्रिल ११९९ रोजी चालुसच्या किल्ल्याला वेढा घातल्यावर फ्रान्स आणि रिचर्डच्या सैनिकांमध्ये चकमकी झाडू लागल्या. अशाच एका चकमकीत बाण लागल्याने रिचर्ड मरण पावला. त्यानंतर जॉनला इंग्लंडचा नवीन राजा बनवण्यात आलं.

२७ मे ११९९ रोजी त्याचा राज्याभिषेक झाला. जॉनने केलेल्या दुसऱ्या विवाहाला फ्रान्सच्या राजाचा विरोध होता. कारण, जॉनची दुसरी पत्नी झालेल्या इसाबेलने त्या पूर्वी एका बड्या फ्रेंच उमरावाला लग्नाचं वचन दिलं होतं. तिने हे वाचन मोडल्याने फ्रेंच राजा फिलिपने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रान्समधील सर्व प्रदेश जप्त केला.

जॉनने सैन्य पाठवून फ्रेंचांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संघर्षात त्याचा १७ वर्षीय पुतण्या प्रिन्स आर्थर याची हत्या झाली आणि इंग्रज राजघराण्याला फ्रान्समधील आपल्या यामिनी, मालमत्ताही गमवाव्या लागल्या. हा एक राजा म्हणून जॉनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का होता. या पराभवानंतरच त्याला ‘जॉन सॉफ्टस्वर्ड’ असे हिणवलं जाऊ लागलं. 

वास्तविक, जॉनने स्कॉटलंडचा राजा विल्यम द लायनच्या आक्रमणाला पायबंद घातला. त्याच्याकडून सरंजामही वसूल केला. त्याने सन १२१० चे आयरिश बंड मोडून काढले. या मोहिमेत बंडखोरांचा पराभव करून त्याने बंडखोर उमराव विल्यम डी ब्रूझ यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांना ताब्यात घेतले. त्याच्या या कृत्यावर मोठ्या प्रमाणांत टीका झाली.

ब्रूझ यांना त्याने विंडसर कॅसलमध्ये बंदिवासात उपाशी ठेवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जॉनने सन १२११ मध्ये ग्वेनेडचा त्रासदायक वेल्श राजपुत्र ल्लिवेलीन उर्फ ​​लिवेलीन द ग्रेट विरुद्ध आणखी एक मोहीम फत्ते केली.

मध्ययुगीन इतिहासकरांनी जॉनचे तो जितका दुष्ट आणि निरुपयोगी असल्याचे चित्र रंगवले आहे, ते अतिशयोक्त आहे, असे म्हणण्यास वाव आहे. त्याच्या वृत्तींमधला संशय आणि क्रौर्य हे देखील स्वाभाविक मानले पाहिजे कारण कळत्या वयापासून तो आपल्या थोरल्या भावांपासून आजूबाजूला तेच पाहत आला होता. त्यामुळे त्याच्या अंतस्थ शत्रू आणि निंदकांमध्ये भर पडत गेली. अखेर त्याचा खुद्द चर्चाबरोबरच वाद झडला.

कँटरबरीच्या मुख्य बिशप पदासाठी स्टीफन लँगटन यांना मान्यता देण्यास जॉनने नकार दिल्याने चर्चच्या धर्मगुरूंचा रोष त्याने स्वतःवर ओढवून घेतला. लँगटन पोप यांच्या पसंतीचे उमेदवार असल्याने, पोप इनोसंट (तिसरे) यांनी नोव्हेंबर १२०९ मध्ये चक्क राजा जॉन यालाच बहिष्कृत केले आणि सर्व चर्च बंद करण्याचा आदेश दिला. 

राजाला देवाने राज्य करण्यासाठी निवडलेले असते ही तत्कालीन कल्पना धारणा! मात्र, पॉप यांनी थेट राजालाच बहिष्कृत केल्याने राजाच्या या ‘देवदत्त’ अधिकारालाच धक्का बसला. पोप यांनी सन १२१२ मध्ये तर अशी घोषणा केली की, जॉनला आता स्वतःला राजा म्हणवून घेण्याचाही कोणताही कायदेशीर अधिकार नाही. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील या टोकाच्या संघर्षानंतर राजाने माघार घेतली, लँगटनची आर्चबिशप म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि जॉनने हे मान्य केले की इंग्लंड आणि आयर्लंडमधील चर्चेस धर्मसत्ता पोप यांच्या अधिकारात आहेत.

चर्चबरोबरचा संघर्ष कसाबसा मिटवल्यानंतर राजा जॉनने समजुतीचे धोरण अंगीकारणे अपेक्षित असतानाही त्याने थेट शक्तिशाली जहागीरदार आणि उमरावांशीच पंगा घेण्यास सुरुवात केली. फ्रान्समधील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी जॉनने हाती घेतलेल्या मोहिमेसाठी राजाने आकारलेला अवाजवी कर अस्वस्थतेचे कारण ठरला. 

मुख्य म्हणजे, या मोहिमेतून ना राजाच्या हातात काही लागले ना इंग्लंडच्या जनतेच्या! जहागीरदारांना त्रास देणारे दुसरे धोरण म्हणजे स्थानिक न्यायालयांना टक्कर देण्यासाठी राजाने स्वतःच्या शाही न्यायालयांची निर्मिती केली, ज्यामुळे दोषींवर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम जहागीरदारांकडे न जात थेट राजखजिन्यात जमा होऊ लागली.

जॉनने स्वतःची कमाई वाढविण्यासाठी नक्कीच कल्पक उपाययोजना केल्या. त्याने जहागीरदार आणि उमरावांच्या मुला-मुलींच्या विवाहानंतर राजाला देण्याच्या देणगीतही वाढ केली. मुलाला वडिलांच्या मालमत्तेचा वारसा मिळाल्यावर त्यावरही राजाला देणगी देण्याचा नियम करण्यात आला. वारस नसताना जहागीरदार मरण पावला, तर त्याची जहागीर आणि जमिनी दुसर्‍या कुलीन व्यक्तीला देण्याची प्रथा होती परंतु जॉनने चर्चच्या जमिनींप्रमाणेच अशा जमिनीही जास्तीत जास्त काळ आपल्या ताब्यात ठेवल्या. व्यापारीही राजाच्या तावडीतून सुटले नाहीत आणि त्यांना प्रचंड करवाढ सहन करावी लागली.

बोविन्स येथे फ्रेंचांकडून झालेल्या पराभवाने इंग्रज उमराव, व्यापारी आणि नागरिकांच्या असंतोषाला तोंड फुटलं. त्यांनी राजसत्तेच्या विरोधात मोठा उठाव केला. या उठावाला स्कॉटलंडचा राजा अलेक्झांडर (दुसरा) याचा सक्रिय पाठींबा होता.

दि. १५ जून १२१५ रोजी रनीमेड येथे ऐतिहासिक ‘मॅग्ना कार्टा’ करारावर स्वाक्षरी करण्यास राजा जॉनला भाग पाडले. स्वातंत्र्याच्या या सनदेने सम्राटाच्या सामर्थ्यावर अंकुश ठेवण्यात आला आणि उमराव, जहागीरदारांच्या अधिकारांना संरक्षण देण्यात आले.

राजाला नियम, कायदे आणि निर्णयांची घोषणा करण्यापूर्वी उमराव, सल्लागार यांच्या मंडळाचा सल्ला घ्यावा लागेल. सर्व स्वतंत्र व्यक्ती शाही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपापासून संरक्षित असतील आणि त्यांना न्याया मागण्याचा आणि त्याची छाननी करण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारे ‘मॅग्ना कार्टा’ सनद नागरिकांना सार्वभौमत्व देऊन म्हणून कायद्याच्या राज्याचे प्रतीक बनली. भलेही उमरावांचा उठाव आणि सनद हा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अधिकारांना शाबूत ठेवण्यासाठी असला तरीही या कराराने लोकशाहीची बीज जगभरात रुजवली गेली हे निश्चित!

श्रीमंतांकडे लूट करून गरीबांना मदत करणारा ‘रॉबिन हूड’ ही व्यक्तिरेखा गोष्टींच्या माध्यमातून जगभरात पोहोचली आहे. राजा जॉनला बदनाम करण्याच्या भानगडीत त्याचाही संबंध रॉबिन हूडशी जोडण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही व्यक्तिरेखा खरोखर कधीकाळी अस्तित्वात असल्याचा पुरावाच उपलब्ध नाही. मात्र, त्या काळासंदर्भात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींप्रमाणे रॉबिन हूड हा राजघराण्यातच जन्माला.

मात्र, तो आणि त्याचा भाऊ तिसरे धर्मयुद्ध लढण्यासाठी गेले असताना राजघराण्याने त्यांच्या सगळ्या मालमत्ता हडप केल्या. त्यामुळे रॉबिन हूडला राजघराणे, अमीर-उमराव आणि जहागीरदारांबद्दल प्रचंड राग निर्माण झाला. त्याने त्यांना लुटून गरिबांना मदत केली; अशी एक गोष्ट प्रचलित आहे. दुसऱ्या एका वदंतेनुसार राजा जॉनच्या करवाढीचा विरोध म्हणून रॉबिन हूड हा जंगलात जाऊन करमुक्त, कायदेमुक्त आयुष्य जगला आणि जनतेच्या कायद्यावर स्वतःची तुंबडी भरणारे म्हणून त्याने श्रीमंतांना लुटले.

जॉनने काही काळातच आपला शब्द फिरवला. त्याने ‘मॅग्ना कार्टा’ची संनद आणि उमराव, जहागीरदार यांना दिलेली आश्वासने धुडकावून लावायला सुरुवात केली. अर्थातच, जहागीरदारांनीही त्याच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी लंडनवरील त्यांचा ताबा सोडण्यास राजाला नकार दिला आणि त्यांनी फिलिपचा मुलगा प्रिन्स लुईस याला इंग्रजी राज्य सांभाळानुयासाठी आमंत्रित केले. 

या काळात मोठे यादवी युद्ध सुरू झाले, एकीकडे जॉनने बलाढ्य रोचेस्टर कॅसलला वेढा घालून तो काबीज केला तर लुईसने लंडनच्या टॉवरसह आग्नेय इंग्लंडचा ताबा घेतला आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केले. पाठोपाठ लुईसने रोचेस्टर कॅसल परत मिळवण्यात यश मिळवले. असहाय्य जॉनने ऑक्टोबरमध्ये लिंकनहून त्याच्या सामानाची ट्रेन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीतच तापाने फणफणलेल्या राजा जॉनचा १८ ऑक्टोबर १२१६ रोजी नेवार्क कॅसल येथे मृत्यू झाला. त्यावेळी तो फक्त ४८ वर्षांचा होता.

मध्ययुगीन इतिहासकारांनी राजा जॉनला खलनायक ठरविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले असले तरीही शेक्सपियरच्या नाटकाचा विषय बनलेला राजा जॉन चांगल्या- वाईट, कशाही रूपात जगभरात पोहोचला आणि रसिकांच्या मनात शेकडो वर्ष ‘जिवंत’ राहिला हे नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गौतम बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे कुरळे केस हे केस नसून गोगलगायी आहेत

Next Post

ब्राझीलमधील या तुरुंगात सुरक्षाधिकारी म्हणून बदकांना नियुक्त केलं आहे!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ब्राझीलमधील या तुरुंगात सुरक्षाधिकारी म्हणून बदकांना नियुक्त केलं आहे!

त्या दोन वर्षात भारतीयांनी सगळ्यात जास्त काय खाल्लं असेल तर ती म्हणजे डोलो गोळी!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.