आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तीव्र आंदोलनं, मोर्चे आणि निदर्शनं यांमुळे आपण अनेकदा जागतिक ‘रेकॉर्डस्’ होताना पाहतो. आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने आणि मोर्चा काढण्याची पद्धत बहुधा भारतातूनच सुरु झाली असावी. आपल्या “योग्य” मागण्या सरकारकडून मान्य करवून घेण्याचा आंदोलने आणि निदर्शने यांपेक्षा प्रशस्त मार्ग कोणताही नाही.
पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या आंदोलनांच्या माध्यमातून आपापल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येते. लोकांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून आणि खोटी माहिती देऊन रस्ते अडवणे, पायाभूत सोयीसुविधा अडवून सामान्यांना आणि सरकारला वेठीस धरणे ही कामे आंदोलनांच्या माध्यमातून होताना दिसत आहेत. विसाव्या शतकात मात्र आंदोलन या सार्वजनिक लढ्याच्या प्रकाराने अनेक मोठे बदल घडवून आणले. अगदी असंच काहीसं २३ ऑगस्ट १९८९ रोजी युरोपात झालं. नेमका काय होता तो मुद्दा आणि कशा प्रकारे या आंदोलनाने एक विश्वविक्रम केला, त्याबद्दल हा विशेष लेख..
२३ ऑगस्ट १९८९ रोजी, मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर स्वाक्षरी केल्याच्या ५० वर्षांनंतर सुमारे वीस लाख लोक बाल्टिक राज्यांच्या सत्तेविरोधात शांततेने निषेध करण्यासाठी जमले. तीन बाल्टिक राज्यांतील लोकांनी ६०० किलोमीटरपर्यंत पसरलेली मानवी साखळी तयार केली. या सर्वांची संपूर्ण जगाला स्वातंत्र्याची इच्छा दाखवायची इच्छा होती, तसेच त्यांना एकत्र आणणारी एकता देखील त्यांनी यातून दाखवून दिली.
दुसऱ्या महायु*द्धादरम्यान, २३ ऑगस्ट १९३९ रोजी, मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार नॉन-ॲग्रेशनच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराचे नाव दस्तऐवजावर स्वाक्षरी करणाऱ्या जर्मन परराष्ट्र मंत्री व्याचेस्लाव मोलोटोव्ह आणि रशियन परराष्ट्र मंत्री आचिम वॉन रिबेनट्रॉप यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. कराराद्वारे, दोघांनी पूर्व युरोप आणि बाल्टिक देशांना जर्मन आणि सोव्हिएत प्रभावक्षेत्रांमध्ये विभागले.
पेरेस्ट्रोइका सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे यूएसएसआरच्या आत आणि बाहेर या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला गेला. १९८६ साली, लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क, लंडन, ओटावा, वॉशिंग्टन यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये निदर्शने झाली आणि लोकांना सोव्हिएतकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल जागरूक करण्यात आले. पेरेस्ट्रोइक या रशियन शब्दाचा अर्थ पुनर्रचना असा होतो. १९८०च्या दशकात रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरु करण्यासाठी राजकीय आणि आर्थिक सुधारणांची मालिका म्हणजे पेरेस्ट्रोइका.
याच दशकाच्या उत्तरार्धात, मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप कराराचे परिणाम अजूनही जाणवत होते, कारण बाल्टिक राज्यांवर सोव्हिएतचे अजूनही नियंत्रण होते. शिवाय, तीन देशांना स्वेच्छेने यूएसएसआरचे सदस्य व्हायचे आहे असे सोव्हिएत युनियनने ठामपणे सांगितले. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पन्नास वर्षांनी, ज्या तीन देशांना युएसएसआरचा भाग व्हायचे होते, त्यातील लोकांनी युएसएसआरकडे करार सार्वजनिक करण्याची मागणी केली तसेच त्यांना बाल्टिक प्रदेश सार्वभौम असावा अशी इच्छा होती.
सोव्हिएत आणि बाल्टिक राज्यांमधील तणाव वाढत होता. लिथुआनियन लोकांनी एका याचिकेवर २० लाखांहून अधिक स्वाक्षर्या गोळा करण्याचे ठरवले होते. या याचिकेमध्ये लाल सैन्याने माघार घ्यावी यासाठी लिथुआनियन लोकांचे मत सांगण्यात आले होते. निदर्शकांकडून हिं*सक प्रतिक्रियेची सोव्हिएट्सना भीती वाटत होती, परंतु रोमानिया आणि पूर्व जर्मनीचे नेते, निकोले सेउसेस्कू आणि एरिक होनेकर यांनी सोव्हिएट्सना हे कथित बंड शमवायचे असल्यास सशस्त्र मदतीचे वचन दिले.
२३ ऑगस्ट १९८९ रोजी मानवी साखळीची कल्पना नक्की कोणाला आली हे कोणालाच माहिती नाही. संध्याकाळी ७ वाजता, सुमारे २० लाख लोकांनी हस्तांदोलन केले आणि एक मानवी साखळी तयार केली. ही मानवी साखळी जी राज्ये युएसएसआरमध्ये सामील होणार होती त्या तीन राज्यांच्या राजधान्यांमधून गेली. २० लाख लोकांनी तयार केलेली ही ६०० किलोमीटरची भव्य मानवी साखळी टॅलिनपासून सुरू झाली, रीगामधून विल्निअसला पोहोचली.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी मानवी साखळीचा नकाशा तयार केला होता, जेणेकरून साखळी अखंडित राहील. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही कारखान्यांनी कामगारांना एक दिवस सुट्टी दिली, तर काहींनी त्यांच्या वाहतुकीसाठी निधी दिला. ॲस्टोनियामध्ये तर, देशभरात प्रत्येकाला कामातून मुक्त केले गेले. विशेष म्हणजे कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी रेडिओवर अनेक कार्यक्रम सुरु होते.
मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यामुळे या कराराला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी युरोपियन समुदायाला एक याचिका केली. रियूटर्सच्या (Reuters) अहवालानुसार ७ लाख ॲस्टोनियन, ५ लाख लिथुआनियन आणि १० लाख लॅटव्हियन लोकांनी मानवी साखळीत भाग घेतला होता. याचबरोबर बर्लिन, मॉस्को, लेनिनग्राड, टोरंटो, तिबिलिसी, आणि जगाच्या इतर भागातही निदर्शने झाली.
“स्वातंत्र्य साखळी” किंवा “बाल्टिक साखळी” ही बाल्टिक राज्यांनी सोव्हिएत संघांपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली सर्वात महत्त्वाची मोहीम होती. निषेधानंतर, सोव्हिएट युनियनने हा करार अवैध घोषित केला, हे बाल्टिक राज्यांच्या स्वातंत्र्यासाठी टाकलेल्या सर्वात महत्वाच्या पावलांपैकी एक आहे.
तीन देशांमधील एकतेच्या भावनेने आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवली आणि इतर हे आंदोलन म्हणजे सोव्हिएटने व्यापलेल्या इतर देशांसाठी स्वातंत्र्याची प्रेरणा होती. फ्रीडम चेनची साक्ष देणारी कागदपत्रे २००९ साली युनेस्कोच्या जागतिक मेमरी रजिस्टरमध्ये ठेवण्यात आली आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










