आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन (युएसएसआर) या दोन महासत्ता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होत्या. त्यासाठी अ*ण्वस्त्रे, अंतराळ मोहिमा आणि माहिती तंत्रज्ञानाचा आधार त्यांनी घेतला होता. नवनवीन संसोधन करून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.
याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर १९६१ मध्ये, सोव्हिएत युनियननं आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील दुर्गम बेटावर एक बॉ*म्ब टाकला. हा बॉ*म्ब जमिनीपासून ४ किलोमीटरच्या उंचीवर फुटला तरी देखील त्याच्या ताकदीमुळं आर्क्टिकमधील बेट एखाद्या स्केटिंग रिंकसारखं सपाट झालं. स्फो*टातून निर्माण झालेला प्रकाश ६०० मैल (९६५ किमी) पेक्षा जास्त अंतरावरून देखील पाहणं शक्य होतं.
हा जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉ*म्ब होता! ‘झार’ (Tsar) असं या हायड्रोन बॉ*म्बचं नाव होतं. सोव्हिएतमध्ये त्याला आरडीएस २२० या नावानं ओळखलं जात असे. ३० ऑक्टोबर १९६१ रोजी सोव्हिएतनं घडवून आणलेला झार बॉ*म्बचा स्फो*ट हा इतिहासातील सर्वात शक्तिशाली मानवनिर्मित स्फो*ट आहे.
युली हॅरिटॉन यांच्या नेतृत्वाखालील भौतिकशास्त्रज्ञांच्या एका टीमनं झार बॉ*म्बची रचना केली होती. या टीममध्ये आंद्रे सकारोव्हे, व्हिक्टर ॲडमस्की, युरी बाबयेव्ह, युरी स्मिरनोव्ह आणि युरी ट्रुटनेव्ह यांचा समावेश होता. झार हा तीन-टप्प्यात डिझाईन केलेला हायड्रोजन बॉ*म्ब होता. ट्रुटनेव्ह आणि बाबयेव्ह या जोडगोळीनं याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची रचना केली.
थ्री-स्टेज हायड्रोजन बॉ*म्ब हा थर्मोन्यूक्लियर सेकंड स्टेज कॉम्प्रेस करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ‘फिजन’ प्रकारच्या अणुबॉ*म्बचा वापर करतो. या स्फो*टातून निर्माण होणारी ऊर्जा नंतर तिसऱ्या टप्प्याकडे सरकवली जाते आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते.
सैद्धांतिकदृष्ट्या विचार केला तर झार बॉ*म्ब १०० मेगाटन इतकी ऊर्जा निर्मिती करू शकला असता. परंतु, स्फो*टानंतर होणाऱ्या परिणामांनी धोकादायक पातळी गाठली असती. (याची तीव्रता १९४५ च्या हिरोशिमा-नागासाकीपेक्षा २५ टक्क्यांनी जास्त ठरली असती).
याव्यतिरिक्त, बॉ*म्ब टाकणाऱ्या डिलीव्हरी विमानाला सुरक्षित अंतरावरून माघार घेण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळाला नसता. म्हणून, आण्विक परिणाम कमी करण्यासाठी, झारच्या तिसऱ्या टप्प्यात युरेनियम -२३८ फ्यूजन टॅम्परऐवजी लीड टॅम्पर समाविष्ट केलं गेलं होतं. त्यामुळे जगानं पाहिलेली त्याची तीव्रता त्याच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा नक्कीच कमी होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
झारची निर्मिती केल्यानंतर त्याची चाचणी करून पाहणं अतिशय गरजेचं होतं. कारण, त्यामुळं सोव्हिएत अमेरिकेला शह देण्यात यशस्वी ठरला असता. चाचणी करण्यासाठी सोव्हिएतनं आर्क्टिक सर्कलमधील एका बेटाची निवड केली. २६ फूट लांब आणि ६.९ फूट रुंद असलेल्या झारचं वजन २७ मेट्रिक टन होतं. त्याला बेटापर्यंत वाहून नेण्यासाठी ‘टीयू – ९५ व्ही’ या लांब पल्ल्याच्या बॉ*म्बर विमानाची निवड करण्यात आली होती.
मेजर आंद्रेई डर्नोवस्टेव्ह या विमानाचा पायलट होता. बॉम्बरसोबत टीयू -१६ हे निरीक्षक विमान होतं. हे विमान चाचणीचं चित्रीकरण करणार होतं. स्फो*टानंतर विमानांच्या पृष्ठभागांचे थर्मल नुकसान कमी करण्यासाठी त्यावर रिफ्लेक्टिव पांढरा रंग लावला होता. बॉ*म्बर आणि निरीक्षक विमानाला स्फो*ट होण्यापूर्वी ग्राउंड झिरोपासून ३० मैल दूर अंतरावर जाण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून झारला १ हजार ८०० पौंड वजनाच्या पॅराशूटसोबत जोडण्यात आलं होतं. सुरक्षेच्या उपाययोजना करूनही विमानांमध्ये असणाऱ्या वैमानिकांच्या वाचण्याची शक्यता फक्त ५० टक्केच होती!
३० ऑक्टोबर १९६१ रोजी झारला उत्तर आर्क्टिक सर्कलच्या बेटावर असलेल्या मित्युशिखा बे न्यूक्लियर टेस्टिंग रेंजवर ३४ हजार फूट उंचीवरून टाकण्यात आलं आणि दोन्ही विमानांनी जीवाच्या आकांतानं परतीची वाट धरली. झारमधून निर्माण झालेली ऊर्जा हिरोशिमा आणि नागासाकीपेक्षा कितीतरी जास्त होती असं म्हटलं जातं. दुसऱ्या महायु*द्धात फुटलेल्या सर्व पारंपरिक शस्त्रांमधून जितकी उर्जा निर्माण झाली होती त्यापेक्षा झार १० पट अधिक शक्तिशाली होता.
त्याच्या चाचणीनंतर मालमत्तेचं अतोनात नुकसान झाल्याची नोंद आहे. ग्राउंड झिरोपासून ३४ मैल (५५ किलोमीटर) अंतरावर असलेल्या सेवेर्नी या ठिकाणावरील लाकडी आणि विटांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या. शंभर मैलांवर असलेल्या इतर सोव्हिएत जिल्ह्यांमधील घरांचं अतोनात नुकसान झालं. आण्विक प्रभावामुळं रेडिओ संप्रेषण प्रणाली देखील खंडित झाली होती. १७० मैलावर (२७४ किलोमीटर) अंतरावर पाहणी करत असलेल्या निरीक्षकाला गॉगल घालूनही थर्मल इफेक्ट जाणवले हाते.
स्फो*टातून निर्माण झालेली तीव्र उष्णता ग्राउंड झिरोपासून ६२ मैल (सुमारे १०० किलोमीटर) अंतरावर असलेल्या व्यक्तीला थर्ड-डिग्री बर्न्स करण्यास सक्षम होती. ४३० मैल (६९३ किलोमीटरवर) दूर असलेल्या डिक्सन वसाहतीपर्यंत या स्फो*टाचे धक्के जाणवले होते. अगदी नॉर्वे आणि फिनलँडमधील घरांच्या खिडक्या देखील तडकल्या होत्या.
सिस्मोग्राफ झारपासून निर्माण झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.२५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. झारच्या स्फो*टातून निर्माण झालेल्या मशरूम ढगांची उंची साधारण ४० मैल (६५ किलोमीटर), म्हणजेच एव्हरेस्टपेक्षा सात पट जास्त होती! या ढगांच्या वरच्या भागाची व्याप्ती ५९ मैल (९५ किलोमीटरपर्यंत) होती.
सुदैवानं झारची ही फक्त चाचणी होती. सर्व काळजी घेऊनच तो निर्जन ठिकाणी फोडण्यात आला होता. मात्र, त्याच्यासारख्या थर्मोन्यूक्लियर शस्त्रामुळे झालेलं प्रचंड नुकसान आणि विनाश अकल्पनीयच आहे. जर न्यूयॉर्क, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, दिल्ली, मुंबई, लंडन, मेलबर्न सारख्या मोठ्या शहरांत या घातक शस्त्राचा स्फो*ट झाला तर ही महानगरं आणि त्यांच्या आसपासच्या उपनगरांचं नामोनिशाणचं मिटून जाईल.
पुढील कित्येक वर्ष याठिकाणी जीवनाचा अंश देखील दिसणार नाही, याची कल्पना जगाला आली. १९६३ मध्ये मॉस्कोमध्ये एक करार झाला. त्यानुसार वातावरण, बाह्य अवकाश आणि पाण्याखाली अ*ण्वस्त्रांच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून सर्व चाचण्या जमिनीखाली होतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










