The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या रियल लाईफ ‘जॅक स्पॅरो’ला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी जंगजंग पछाडलं तरी हाताशी आला नाही

by द पोस्टमन टीम
28 August 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’मध्ये जॉनी डेपनं साकारलेला कॅप्टन जॅक स्पॅरो कित्येकांच्या मनात घर करून बसला आहे. जॅक स्पॅरोला पडद्यावरती पाहिलं की, त्याची प्रत्येक गोष्ट लार्जर दॅन लाईफ वाटते. कारण कॅप्टनचा ‘ऑरा’ आहेच तसा. कॅप्टन जॅक स्पॅरोचं पात्र फिक्शनल (काल्पनिक) आहे, हे सर्वांनाचं माहिती आहे. मात्र, आजपासून साधारण साडे तीनशे वर्षांपूर्वी असा एक माणूस खरचं अस्तित्वात होता.

एकेकाळी समुद्रातून प्रवास आणि व्यापार करणाऱ्या लोकांमध्ये त्याची प्रचंड द*हश*त होती. मुघल बादशाहाच्या जहाजांचा ताफा लुटण्याची हिंमत करणारा तो एकमेव ब्रिटिश पायरेट होता. अवघ्या दोन वर्षांत समुद्रात फिरून त्यानं आणि त्याच्या टोळीनं डझनापेक्षा जास्त जहाजांची शिकार केली. त्यातून लाखो डॉलर्सची लूट मिळवली.

त्याच्या कारनाम्यांवर अनेक गाणी, पुस्तकं आणि नाटकं लिहिली गेली. ‘द सक्सेसफुल पायरट’ नावाचं गाणं तर अनेक वर्ष लंडनच्या स्टेजवर सादर केलं जात होतं. ब्लॅकबेर्ड किंवा बार्थोलोम्यू रॉबर्ट्ससारखी प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली नाही. मात्र, त्यानं आपल्या संक्षिप्त अन् वादळी कारकीर्दीमुळं अनेकांना चाचेगिरी करण्याची प्रेरणा दिली. ‘हेन्री एव्हरी’ असं या रिअल लाईफ जॅक स्पॅरोचं नाव आहे.

जन्मानं ब्रिटश असलेल्या हेन्री एव्हरीच्या सुरुवातीच्या आयुष्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. अगदी लहान वयापासून त्याचं आणि समुद्राचं नातं जुळलं होतं. काही इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, त्यानं काही काळ रॉयल नेव्हीमध्ये सेवा दिली होती. १६६३ मध्ये, त्याच्याबाबतची पहिली नोंद आढळते. नंतर हेन्रीनं समुद्री डाकू बनण्याचा निर्णय घेतला. 



आपल्या जहाजावरील साथीदारांसमोर त्यानं स्वत:ला जहाजाचा कॅप्टन म्हणून घोषित केलं. त्यानं जहाजाचं नाव बदलून ‘फॅन्सी’असं ठेवलं आणि आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडे जाण्याचं निश्चित केलं. आपल्या देशाची, म्हणजे तीन इंग्रजी व्यापारी जहाजं लटून त्यानं आपल्या लुटमारीच्या मोहिमेची सुरुवात केली.

त्याने पुढील कित्येक महिने आफ्रिकन किनारपट्टीवर लूट सुरू ठेवली. त्यानं अनेक फ्रेंच आणि डॅनिश जहाजं काबीज केली आणि त्यातील लोक आपले साथीदार म्हणून भरती करून घेतले. १६९५ च्या मध्यात ‘फॅन्सी’ मादागास्करला पोहचलं. तोपर्यंत ते जहाज १५० लुटारूंचं तरंगतं साम्राज्यच झालं होतं.

सुरुवातीच्या लुटींमुळं त्याच्या संपूर्ण क्रूमध्ये हेन्रीविषयी आदरयुक्त भीती होती. त्यांचा आपल्या कॅप्टनवर विश्वास निर्माण झाला आणि म्हणूनच आगामी सर्वांत मोठ्या मोहिमांमध्ये त्यांनी त्याला पुरेपुर साथ दिली. मुघल साम्राज्यातील जहाजांचा एक ताफा लाल समुद्राच्या बंदरातून सुरतच्या प्रवासासाठी निघाला असल्याची माहिती हेन्रीला मिळाली होती.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या ताफ्यामध्ये हज यात्रेवरून परत जाणारे मुस्लिम यात्रेकरू, अनेक ठिकाणच्या लुटीनं भरलेल्या व्यापारी जहाजांचा समावेश होता. मुघलांच्या या खजिन्यावर हेन्रीनं आपलं लक्ष केंद्रित केलं. हेन्रीनं आपल्या साथीदारांसह लाल समुद्राच्या दिशेनं कूच केलं. या कामासाठी त्यानं थॉमस टेव्हच्या नेतृत्वाखालील एका अमेरिकन जहाजाशी देखील हातमिळवणी केली होती.

लाल समुद्राच्या दिशेनं कूच केल्यानंतर काही दिवसातचं २५ जहाजांचा भला मोठा मुघल ताफा हेन्रीच्या नजरेस पडला. त्यानं ताबडतोब त्यांचा पाठलाग केला आणि ताफ्याच्या शेवटी असणाऱ्या फथ महम्मदी नावाच्या एका लहान जहाचा बळी घेतला. त्यातून त्याला सुमारे ५० हजार ब्रिटिश पौंड किमतीचे सोने-चांदी मिळालं.

त्यानंतर हेन्री एव्हरी आणि त्याच्या माणसांनी पुन्हा मुघल ताफ्याचा पाठलाग सुरू केला. समुद्री चाच्यांनी भरलेल्या तीन जहाजांनी भारतीय ताफ्यातील सर्वात मोठे जहाज, गंज-ए-सवाईला वेढा दिला. हेन्रीचा हा सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय होता. गंज-ए-सवाई स्वतःचा बचाव करण्यास पूर्णपणे सक्षम होतं. ते भारताचं सर्वात मोठं जहाज होतं. त्यावर कित्येक डझन तोफांचा आणि सैन्याचा भरणा होता.

त्याला वेढा घालून हेन्रीनं एक प्रकारे जुगारचं खेळला होता. मात्र, त्याचं नशीब बलवत्तर होतं. हेन्रीच्या जहाजातून निघालेल्या पहिल्याचं तोफेनं गंज-ए-सवाईच्या तोफखान्याचा मोठा भाग उ*द्ध्वस्त झाला. तोफखाना मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे आणि स्फो*टांमुळे सवाईवर गोंधळ उडाला. याचाच फायदा घेऊन हेन्रीनं मुघल जहाजावर आपल्या लुटारूंची एक तुकडी पाठवली. लुटारू आणि जहाजांवरील मुघलांमध्ये भयंकर लढाई झाली. मात्र, काही वेळानंतर सवाईच्या कॅप्टननं डेकवरून पळ काढला आणि खाली जाऊन लपला.

असं म्हटलं जातं की, कॅप्टननं आपल्या जागी एका गुलाम मुलीला हेन्रीसोबत लढण्यासाठी पाठवलं होतं. आपला नेताच पळाल्याचं पाहून इतर सैनिकांचा धीर सुटला. त्यानंतर समुद्री चाच्यांनी गंज-ए-सवाईवर पूर्णपणे कब्जा केला आणि प्रवाशांचे हाल सुरू केले. पुरुषांचा छळ करून त्यांना ठार मारण्यात आलं आणि महिला-मुलींवर वारंवार बला*त्कार करण्यात आले. जहाजावरील सर्व संपत्ती फॅन्सीवर नेण्यात आली. गंज-ए-सवाईवरील रक्तरंजित लुटीची किंमत सहा लाख ब्रिटिश पाउंड इतकी होती. आता त्याचं मुल्य अब्जावधीमध्ये आहे.

लुटलेल्या संपत्तीचं विभाजन केल्यानंतर, हेन्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी समुद्री चाच्यांसाठी अनुकूल असलेल्या बहामासकडे कूच केलं. न्यू प्रॉव्हिडन्स येथे आल्यावर त्यांनी आपण गुलाम असल्याचं सांगितलं आणि किनाऱ्यावर काही दिवस राहू देण्यासाठी बेटाच्या गव्हर्नरला लाच दिली. जेव्हा न्यू प्रॉव्हिडन्सच्या पबमध्ये हेन्री आणि त्याची माणसं आनंद लुटत होते तेव्हा इंग्रजी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

हेन्रीनं सवाई आणि त्याच्या सोबतच्या जहाजांची लूट केली होती त्यामुळे ब्रिटनला अनेक राजकीय परिणामांना सामोरं जावं लागलं. या ह*ल्ल्यानं मुघल बादशाह औरंगजेब संतापला होता. ईस्ट इंडिया कंपनीतील अनेक उच्चपदस्थांना अटक केली होती. भारतासोबतचा व्यापारी करार रद्द होण्याच्या भीतीनं ब्रिटिशांनी मुघलांची लुटली गेलेली संपत्तीची भरपाई देण्याची आणि हेन्री एव्हरीला शोधून भारताच्या ताब्यात देण्याचं वचन दिलं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आणि रॉयल नेव्हीची जहाजं हेन्रीच्या शोधात समुद्रात फिरत होती. याशिवाय हेन्रीच्या डोक्यावर मोठं बक्षीस देखील ठेवण्यात आलं होतं.

ब्रिटिश नेव्ही आपल्या मागावर असल्याचं समजताचं हेन्री आणि त्याचे साथीदार वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले. बहुतेकांनी युरोप आणि अमेरिकेतील वसाहतींचा आसरा घेतला. मात्र, स्वत: हेन्री कुठे गेला याबाबत इतिहासकारांमध्ये दुमत आहे. काहींच्या मते, त्यानं ब्रिजमन नाव धारण करून आयर्लंडमध्ये वास्तव्य केलं. तर, काहींच्या मते, मादागास्करमध्ये त्यानं स्वत:चं चाचेगीरीचं साम्राज्य स्थापित केलं होतं.

एकेकाळी ब्रिटिश, युरोपीय व्यापारी आणि मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या हेन्री एव्हरीचा शेवट कसा झाला यापासून जग अज्ञातचं आहे. तो अतिशय धाडसी आणि हुशार होता. विधायक कामांमध्ये त्याची शक्ती वापरली गेली असती तर ब्रिटिशांना नक्कीच फायदा झाला असता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एअर इंडियाचं ‘१८२ कनिष्क’ विमान पाडून खलिस्तान्यांनी ३२९ नागरिकांचा बळी घेतला

Next Post

या एकट्या मतदारासाठी निवडणूक आयोगाने गीरच्या जंगलात मतदान केंद्र उभारलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या एकट्या मतदारासाठी निवडणूक आयोगाने गीरच्या जंगलात मतदान केंद्र उभारलं होतं..!

सीमा सुरक्षा दलाने गायींची तस्करी रोखण्यासाठी त्यांना विशेष ओळखपत्र द्यायला सुरु केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.