आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
नव्वदच्या दशकात जग “ग्लोबल व्हिलेज” बनलं आणि फ़ॅशनही वैश्विक बनली. जगभरात विविध फ़ॅशन ब्रॅण्डसनी आपापली कार्यक्षेत्रं विस्तारत ही फ़ॅशन जगाच्या कानाकोपर्यात नेली. काही ब्रॅण्डनी त्यांचा क्लास जपत आपली उत्पादनं सामान्यांच्या आवाक्याबाहेरच ठेवली आहेत. या ब्रॅण्डसच्या फ़क्त गोष्टीच सामान्यांनी ऐकायच्या, इतक्या त्यांच्या किंमती अवाक्याबाहेरच्या असतात. उच्चभ्रूंच्या खिशाकडे बघून बनवलेले हे ब्रॅण्ड एक वेगळाच दबदबा राखून आहेत. असाच दबदबा असणारा एक ब्रॅण्ड अलीकडे वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला. या ब्रॅण्डचा संबंध थेट ना*झींशी असल्याचं उघड झालं. उघड झालं म्हणण्यापेक्षाही हा ब्रॅण्ड या संबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
या ब्रॅण्डचं नाव ज्या संस्थापकावरून पडलं त्या संस्थापकानं ना*झींचे गणवेश शिवले होते.
याच कारणासाठी या ब्रॅण्डचा इतिहास हा काळा आणि निंदनीय समजला जातो.
जर्मनीतल्या मेटजिंगेन या ठिकाणी १९२३ साली या ब्रॅण्डनं जन्म घेतला. हा काळ राजकीय आणि सामाजिक उलथापालथ घडत असणारा होता. दुसर्या महायु*ध्दाच्या सावटात सगळं जग कसंबसं श्वास घेत होतं. प्रत्येक जणच जगण्याची धडपड करत होता.
अशाच प्रयत्नातून ह्युगो बॉस या कंपनीची स्थापना झाली आणि संस्थापक होता अर्थातच ह्युगो बॉस!
मात्र आर्थिक मंदीचा तो भीषण काळ चालू होता. परिस्थितीच अशी होती की ही कंपनीही चालू झाल्यानंतर अल्पावधीतच दिवाळखोरीत निघाली. या आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ह्युगो बॉसनं एक धाडसाचा निर्णय घेतला. हाच निर्णय आज या ब्रॅण्डचा लाजिरवाणा भूतकाळ ठरला आहे.
कंपनीची पुर्नबांधणी करताना ह्युगो बॉसकडे होती केवळ सहा शिलाई मशिन्स आणि देणीदारांकडून घेतलेला जामिन. ह्युगो बॉसनं ना*झींशी हातमिळवणी केली. ह्युगो बॉस ना*झी पार्टीचा सदस्य झाला आणि त्याच्या आर्थिक दिवाळखोरीतून बाहेरच आला. एवढंच नाही तर त्यानं नफ़ा कमवायलाही सुरवात केली. अल्पावधीतच हा ब्रॅण्ड आर्थिक अनिश्चिततेपासून आजच्या त्याच्या समृध्द व्यापारापर्यंत पोहोचला.
ना*झींच्या निमलष्करी दलासाठी ह्युगोनं मोठाल्या रकमांच्या देणग्या दिल्या. लवकरच ह्युगो ना*झी पार्टीचा एक महत्त्वाचा आणि सन्माननीय सदस्य बनला.
या संबंधामुळेच ना*झींचे गणवेष बनवण्याची जबाबदारी त्याच्याकडे आली. दुसर्या महायु*ध्दादरम्यान जर्मन सैन्याचे गणवेश शिवणे हेच ह्युगो बॉसचे मुख्य काम होते.
पण, जगाला सं*हाराच्या उंबरठ्यावर नेऊन उभं करणार्या क्रु*रकर्मा हि*टल*रच्या सैन्यासाठी गणवेश शिवणं इतकंच पाप ह्युगो बॉसच्या नावावर नाही. त्यानं त्यापुढे आणि ना*झी समर्थकाला साजेशी कृत्यंही केली. गणवेशांची मोठ्या प्रमाणातली मागणी पूर्ण करण्यासाठी कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. ह्युगोनं या कामासाठी दीडशे गुलाम आणि चाळीस यु*ध्दकैद्यांचा वापर करून घेतला. यात मुख्यत्वे स्त्रियांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. अर्थातच यांच्याकडून केवळ काम करवून घेतलं नाही तर त्यांचं शोषणही केलं गेलं.
बॉसकडे एकूण २५० कामगार काम करत असत असं म्हणतात. मात्र यु*ध्दानं गंभीर स्वरुप घेतलं आणि कामगार मिळणं कठीण होऊन बसलं. गणवेशाच्या मागणीच्या रेट्यापुढे कामगारांची संख्या अपुरी पडू लागली. त्याकाळात पुरुषमंडळी उचलून जबरदस्तीनं सैन्यात भरती केली जात होती. हे आणखीन एक संकट होतं. अखेरीस जर्मनीनं जिंकलेल्या देशांमधून लोकांची भरती करण्यास त्यानं सुरवात केली. कसेबसे १४० कामगार जमा केले आणि ४० फ़्रेंच कामगार मिळवले. यापैकी कोणीही कैदी नव्हतं मात्र ते ज्या परिस्थितीत रहात होते ती मात्र भयानक होती.
बॉससाठी काम केलेल्या कामगारांच्या कथा जगासमोर आल्या आणि त्यामुळे त्याची प्रतिमा आणखीनच काळवंडली.
जॉन कोडॅक हा पोलिश मजूर बॉससाठी १९४२ ते १९४५ या कालावधीत काम करत होता. त्यानं त्याचा अनुभव सांगताना जे सांगितलं आहे ते ऐकून अंगावर काटा येतो.
ज्या बराकींमधे हे काम चालत असे तिथे उवा आणि पिसवांचा सुळसुळाट होता. जेवण तर घशाखाली उतरत नसे इतकं निकृष्ट दर्जाचं असायचं. हे सगळं कमी म्हणून की काय, हवाई ह*ल्ले होत असतानाही या कामगारांना बराकी सोडून सुरक्षित आश्रयस्थानांवर जाण्यास परवानगी नव्हती.
जीव मुठीत घेऊन त्यांना बराकीतच थांबावं लागत असे. या बराकींमध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसायची. कोणाला काही दुखापत झाली, आजारपण आले तर मरण समोर दिसेल अशी भयानक अवस्था होती. एकदा का कामगार म्हणून भरती झालं की बराक सोडण्यास परवानगी नसे. या कामगारांवर पाळत ठेवली जात असे. बोटांमधून रक्त येई, डोळे साकाळत मात्र गणवेश शिवण्याचं काम थांबवता येत नसे. कोणी यातूनही पळून जाण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला पकडून छळछावणीत डांबण्यात येत असे.
दुसरं महायु*ध्द संपेपर्यंत ना*झींसोबत त्याचं काम चालूच राहिलं. त्यानंतर मात्र ह्युगोचे ग्रह बदलले. त्याच्यावर कार्यकर्ता आणि राष्ट्रीय समाजवादाचा समर्थक आणि लाभार्थी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. परिणामी त्याच्याकडून मतदानाचा हक्क, व्यवसाय करण्याचा हक्क काढून घेण्यात आला तसेच त्याला ७० हजार डॉलर्स इतका जबरी दंडही ठोठावण्यात आला आजच्या भाषेत बोलायचं तर ही रक्कम १० लाख डॉलर्स इतकी आहे.
अनेक चढ उतार आणि लाजिरवाणा इतिहास असणार्या या ब्रॅण्डच्या संस्थापकाविषयी नेहमीच कुतुहल वाटत आलं आहे, ना*झींचे अ*त्याचार डोळ्यांसमोर दिसत असूनही त्यानं त्यांच्यासाठी गणवेश का शिवले असतील?
हा संस्थापक म्हणजे, ह्युगो बॉसनं १९२४ साली दोन भागीदारांसोबत स्वत:चा व्यवसाय चालू केला. एक छोटेखानी कारखाना थाटून तयार कपड्यांचं प्रामुख्यानं पुरुषांच्या शर्ट, टीशर्ट, स्पोर्टसवेअर यांचं उत्पादन केलं जात होतं. कंपनीच्या ग्राहकांपैकी एक होता, रुडॉल्फ़ बॉर्न. ज्यानं बॉसला नॅशनलिस्ट पार्टीसाठी ब्राऊन रंगाचे शर्ट जे गणवेष म्हणून वापरले जाणार होते ते बनविण्याचा प्रस्ताव दिला. पुढे रुडॉल्फ़ ना*झींना सामिल झाला.
इकडे पोस्टमन आणि पोलिस यांच्यासाठी बॉसनं गणवेश बनवून देण्यास सुरवात केली. जिथून जिथून कमाईची संधी तिथे सर्व ठिकाणी त्यानं गणवेशांचा पुरवठा करण्यास सुरवात केली. मात्र ही परिस्थिती फ़ार काळ टिकली नाही. जागतिक मंदीच्या रेट्यात बॉसचा व्यवसायही अडकला. त्यानं यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून ना*झींचा सहारा घेण्याचा ठरवलं.
इतर अनेक जर्मन्सप्रमाणेच त्याचाही विश्वास होता की हि*टल*रच या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढू शकतो आणि म्हणूनच त्यानं ना*झींसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
प्रारंभीच्या काळात तो काही या पार्टीचा समर्थक नव्हता. तो एक आपल्या व्यवसायाशी इमान राखणारा सच्चा व्यावसायिक होता. व्यवसाय हाच त्याचा धर्म होता. वास्तववादी विचार करणार्या पक्क्या व्यावसायिक बॉसला माहित होतं की व्यवसाय तगणं आणि त्यासाठी तडजोडी करणं अपरिहार्य आहे. म्हणूनच कदाचित त्यानं ना*झींसाठी गणवेश शिवून आपला व्यवसाय वाचवण्याचा निर्णय घेतला असावा. आता राहिला प्रश्न त्यानं केलेल्या अत्याचारांचा! तर त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे की त्यानं हे असं काहीच केलं नव्हतं. आता काय खरं आणि काय खोटं हे तर ह्युगो आणि त्याचे कामगारच जाणो!
१९४८ साली बॉसचं निधन झालं मात्र त्याच्या पश्चातही त्याचा ब्रॅण्ड चालूच राहिला. बॉसचा जावई, युजेन होली यानं कंपनीची सूत्रं हातात घेतली. आज जगभरात जो ह्युगो बॉस ब्रॅण्ड आहे त्याची चौकट याच युजेन होलीची देणगी आहे. ना*झींच्या सावलीचा काळेपणा पुसत त्यानं या ब्रॅण्डला नाव कमावून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा प्रवास काही सोपा नव्हता. व्यवसायावरचे निर्बंध काढून पुन्हा एकदा नवी आणि यशस्वी सुरवात करणं कठीण आव्हान होतं. युजेन होलीनं ते समर्थपणे पेललं.
कंपनीला १९५० साली पहिली मोठी ऑर्डर मिळाली. पुरुषांसाठी सूट बनविण्याची ही घाऊक ऑर्डर कंपनीचं भविष्य बदलविणारी आणि वाईट दिवस सरून सुवर्णकाळाची नांदी ठरली!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










