The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या खानसाम्याने चंपारणमधे गांधीजींचा जीव वाचवला होता

by द पोस्टमन टीम
4 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात बापुजींचे योगदान कुणीच नाकारणार नाही. तरीही स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट झाल्यानंतर त्यांचा खू*न करण्यात आला.. आजच्या काळात अहिंसेच्या पुजाऱ्यालाच गुन्हेगार ठरवून हिं*सा करणाऱ्यांचा उदोउदो करणे सुरु आहे.

बापूजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नेते होते. त्यांच्या आवाजात संपूर्ण देश ढवळून काढण्याची ताकद होती. इंग्रजांसाठीही गांधीजी म्हणजे त्यांच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील एक खूप मोठा अडसर होते. मिठाचा सत्याग्रह, कायदेभंग सत्याग्रह, चंपारण आंदोलन, चले जाव आंदोलन, अशा किती तरी आंदोलनांतून गांधीजींनी दाखवून दिले की ब्रिटिशांची अन्याय्य आणि मुजोर वागणूक भारतीय जनता सहन करणार नाही. त्यांनी जनतेतही शांततेने आणि अहिंसेने प्रतिकार करून अन्यायाला विरोध करण्याची क्षमता जागवली.

गांधीजींच्या मारेकऱ्याबद्दल तर खूप काही ऐकायला, वाचायला मिळतं, पण गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून आपले प्राण धोक्यात घालणाऱ्या बतख मियां यांच्याबद्दल तुम्ही कधी कुठे ऐकलं किंवा वाचलं आहे का? कोण होते हे बतख मियां, त्यांनी गांधीजींचे प्राण कसे वाचवले? जाणून घेऊया या लेखातून.

१५ एप्रिल १९१७ रोजी बिहारच्या चंपारण रेल्वे स्टेशनवर हजारो लोक गांधींची वाट पाहत होते. बिहारमधील स्थानिक शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांची अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गांधीजींनी हा दौरा आखला होता. इंग्रज अधिकारी तिथल्या शेतकऱ्यांवर निळीचे उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती करत होते. गांधीजींनी जेव्हा या भागाला भेट दिली तेव्हा त्यांना ब्रिटीश अधिकारी एर्विन यांनी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले. एर्विन हा भारतातील नीळ उत्पादनाचे व्यवस्थापन करणारा ब्रिटीश अधिकारी होता.



चंपारणमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालून गांधी आपल्या कामात अडथळा निर्माण करत आहेत असं वाटून एर्विनच्या मनात गांधीजींबद्दल प्रचंड संताप होता. म्हणूनच त्याने गांधींना संपवण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्याने एक योजना आखली. रात्री गांधीजींना जेवणाचे आमंत्रण देऊन त्यांच्या दुधात विष मिसळण्याचे ठरवले. एर्विनच्या घरी बतख मियां हे स्वयंपाकी म्हणून काम करत. त्याने बतख मियांना आपल्या या योजनेची माहिती दिली आणि गांधी घरी आल्यानंतर त्यांच्या दुधात विष मिसळून ते दुध गांधीजींना प्यायला देण्याची सूचना दिली. वरून बतख मियांनी जर हे काम सांगितल्याप्रमाणे केले नाही, तर त्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली.

एर्विनची ही योजना ऐकूनच बतख मियांना धक्का बसला. रात्री जेव्हा गांधीजी एर्विन साहेबाच्या घरी गेले तेव्हा बतख मियां त्यांच्यासमोर दुधाचा ग्लास घेऊन उभे राहिले. त्यांनी गांधीजींना एर्विनच्या कल्पनेची माहिती दिली आणि त्या दुधात विष मिसळलेले असल्याचेही सांगितले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हा प्रसंग घडत असताना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादही तिथे उपस्थित होते. बतख मियांनी आपला जीव धोक्यात घालून कशा प्रकारे गांधीजींचा जीव वाचवला हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पहिले. एर्विनच्या क्रू*र योजनेतून गांधीजींची सुटका झाली असली तरी बतख मियां मात्र त्याच्या तावडीत चांगलेच सापडले.

एर्विनने बतख मियांना अटक करवली. त्यांच्या कुटुंबियांनाही इतका त्रास दिला की त्यांना घर आणि गाव सोडून जाण्यास भाग पाडले. बतख मियांचा जेलमधेही अतोनात छळ केला. त्यांचे घर पाडून टाकण्यात आले.

त्यानंतर गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची ह*त्या झाली.

१९५० साली डॉ. राजेंद्र प्रसाद मोतीहारी गावाला भेट देण्यासाठी गेले. त्याकाळी हे गाव चंपारण जिल्ह्याचे मुख्यालय होते. मोतीहारी जवळच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींना पाहण्यासाठी रेल्वे स्टेशनवर अमाप गर्दी जमली होती. त्या गर्दीतून एक वृद्ध व्यक्ती वाट काढत काढत राष्ट्रपतींच्या दिशेने आला.

तो व्यक्ती नजरेच्या टप्प्यात येताच राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना लगेच ओळखले. तेच होते बतख मियां. राजेंद्रप्रसाद स्वतः चालत त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. इतक्या वर्षानंतरही राजेंद्र प्रसादांनी त्यांना ओळखले होते.

राजेंद्र प्रसाद यांनी बतख मियांची चौकशी केली. त्या प्रसंगानंतर ब्रिटीशांनी त्यांना कसे छळले, त्यांचे कुटुंब कसे उघड्यावर पडले आणि आजही त्यांच्या कुटुंबाला दोन वेळच्या अन्नासाठीही कशी वणवण करावी लागते हे सांगितले. डॉ. राजेंद्र प्रसाद बतख मियांना स्टेजवर घेऊन गेले. त्यांना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसवले आणि त्या सभेत बतख मियांची खास ओळख करून दिली. बतख मियांनी कशाप्रकारे गांधीजींचे प्राण वाचवले याची गोष्ट सांगितली.

त्यावेळी जर बतख मियां तिथे नसते तर गांधी त्याच दिवशी मारले गेले असते आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळेच वळण मिळाले असते. कदाचित देशाचा इतिहासच बदलून गेला असता.

पण, बतख मियांचा परिवार अजूनही गावाबाहेरच राहत होता. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही ठोस साधन नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इतका मोठा त्याग करणाऱ्या माणसाची अवस्था अशी असावी ही किती लाजिरवाणी बाब होती. त्यांच्या अडचणी आणि परिस्थिती ऐकल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बतख मियांना आणि त्यांच्या तीन मुलांना मिळून २४ एकर शेती देण्याची घोषणा केली.

या घटनेमुळे चंपारणच्या नागरिकांना बतख मियांची आठवण झाली.

पहिल्या राष्ट्रपतींनी बतख मियांच्या कुटुंबियाला जी मदत जाहीर केली होती तिचे काय झाले. त्या लोकांना मिळाली का मदत? तर नाही! अजूनही राष्ट्रपतींनी जाहीर केलेली मदत त्यांना मिळालेली नाही.

२०१० साली जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनीही चंपारणच्या जिल्हा न्यायाधीशांना या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हे प्रकरण निकालात काढण्याचे आदेश दिले होते. परंतु आजही यावर कसलीच अंमलबजावणी झालेली नाही.

आज बतख मियां आणि त्यांची पत्नी हयात नाही. चंपारणमधील सिस्वा अजगरी या गावात बतख मियां आणि त्याच्या पत्नीला दफन करून त्यांची छोटीशी कबर बांधण्यात आली आहे, पण या कबरीकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे.

बतख मियांनी जर त्यावेळी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं नसतं तर आज भारताचा इतिहास काही वेगळाच झाला असता. स्वतःचे प्राण आणि कुटुंबियांचे स्वास्थ्य धोक्यात घालून गांधीजींचे प्राण वाचवणाऱ्या बतख मियांना आज कोणीही ओळखत नाही याहून मोठी दुर्दैवाची गोष्ट ती कोणती?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ही महिला जगातली पहिली साहित्यिक मानली जाते

Next Post

भटकंती – निसर्गाचा गूढ आणि अद्भुत चमत्कार ‘बेलम गुहा’

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भटकंती - निसर्गाचा गूढ आणि अद्भुत चमत्कार 'बेलम गुहा'

आपल्या धाडसाच्या बळावर या गुलामाने असंख्य गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.