आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१ जानेवारी १९७८. रात्री ८ वाजताची वेळ. “नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत भारताच्या पहिल्या वहिल्या ‘जम्बो जेट’ने मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुबईकडे झेप घेतली. पण, अवघ्या तीन मिनिटांच्या आतच किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर अरबी समुद्रात हे विमान कोसळलं आणि तब्बल २१३ प्रवासी त्या धमाक्यात समुद्रात गुडूप झाले.
एअर इंडियाचं हे बोईंग ७४७, भारताचं पहिलं ‘जम्बो जेट’, म्हणजे आकाशातील एक महालच होता. या विमानाला सम्राट अशोकाच्या नावावरून नाव देण्यात आलं होतं. हे विमान म्हणजे एअर इंडियाची शान!
या आलिशान विमानात काय नव्हतं? विमानभर भारतीय शैलीचे चित्र लावले होते, महागडे गालिचे पसरवले होते, घागरा-चोळी घातलेल्या अतिशय देखण्या अशा हवाई सुंदरी होत्या. साध्या खुर्च्यांच्या जागी भारीतले सोफे होते. तुम्ही म्हणाल ते सगळं या “हवामहाल”मध्ये होतं.
फक्त एवढ्या लक्झरी सोयीसुविधाच होत्या असं नाही तर, सुरक्षेच्या दृष्टीनेही तेवढीच काळजी घेतली होती. आपत्तीजन्य परिस्थितीत जर विमानाचं इंजिन बंद पडतंय असं लक्षात आलं तर यात दुसरं एक इंजिन होतं, ज्याच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी विमान उतरवता येणं शक्य होतं. एवढी सगळी सोय असताना विमानाचा अपघात झालाच कसा हे कोडं मात्र काही उलगडलं नाही.
त्या रात्री विमानाने उड्डाण भरून ते साधारण ८००० फुटावर पोहोचल्यानंतर ग्राउंडला असलेल्या कंट्रोलर रूममधून पायलटसोबत संपर्क साधण्यात आला. त्यावेळी सगळं आलबेल होतं. विमानचालक मदन लाल कुकरने आवश्यक ती माहिती देऊन लाईन कट केली.
पण इतक्यात विमानात असलेल्या “ॲटीट्युड डायरेक्टर इंडिकेटर”ने (ADI) विमान उजव्या बाजूला झुकत असल्याचा इशारा केला. कुकर यांनी आपल्या को-पायलटसोबत परिस्थितीची पडताळणी करायला सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले की काही उपकरणं नीट काम करत नाहीत. रात्रीची वेळ. सगळीकडे अंधार. अशावेळी ADIच्या सूचना मानण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता.
कुकर एक अतिशय कुशल आणि अनुभवी पायलट होते. ADIच्या सूचनांनुसार त्यांनी विमान डावीकडे न्यायला सुरुवात केली.
पण अचानक, काय होतंय हे लक्षात यायच्या आत विमान अरबी समुद्रात जाऊन कोसळलं. विमानाच्या गतीमुळे ते समुद्रात कोसळल्यावर, स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. विमानाच्या पार चिंधड्या उडाल्या होत्या आणि त्यात बसलेल्या सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
भारतातील सगळ्यात मोठ्या अपघातांपैकी एक मानला जातो. याहीपेक्षा मोठी जीवितहानी झाली असती. काही कारणांनी विमान १२ तास उशिरा उडले. त्यामुळे अनेकांनी आपलं तिकीट रद्द केलं, दुसऱ्या विमानाने दुबई गाठलं होतं.
आता, कंट्रोल रूमशी संपर्क तुटल्या तुटल्या त्यांनी विमानाचा शोध घ्यायला सुरुवात गेली. अनेक दिवस ही शोधमोहीम राबवल्यानंतर सरतेशेवटी, विमानाचा मागचा भाग सापडला. दूरदूरपर्यंत विमानाचे तुकडे पडले होते. भारतातल्या “दि बेस्ट” विमानाची अशी अवस्था बघून सगळेच चकित झाले होते.
सगळीकडे एकच चर्चा, विमान क्रॅश झालंच कसं?
एअर इंडियाच नाही तर बोईंग कंपनीसाठीसुद्धा ही चिंतेची बाब होती कारण हे त्यांचं सगळ्यात जास्ती विकलं जाणारं विमान होतं. त्यांनी या घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुठलीही कंपनी जे करेल तेच त्यांनी केलं.
त्यांनी सांगितलं की, यात कुठलीही तांत्रिक अडचण नव्हती. सगळा दोष त्यांनी पायलट मदन लाल कुकरच्या माथी मारला. त्यांच्या म्हणण्यानुसार कुकरा यांनी उड्डाण करण्याच्या आधी मधुमेहाच्या गोळ्या घेतल्या होत्या. एवढंच नाही तर, ते मद्यपान करून विमान चालवत होते. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आणि अपघाताला सामोरं जावं लागलं.
यात अजून एक थिअरी येते. ज्यानुसार ADI म्हणजे ॲटीट्युड डायरेक्टर इंडिकेटरमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. या इंडिकेटरच्या मदतीने पायलटला विमानाची दिशा ठरवण्यात मदत मिळते. विमान डावीकडे वळवायचं की उजवीकडे हे या इंडिकेटरमुळेच कळत.
आता हे इंडिकेटरच खराब झाल्याने विमान उजवीकडे झुकलं आहे असं दाखवत होतं जेव्हा की विमान सरळच चालत होतं. बास! ही चूक आणि विमान ८००० फुटांवरून सरळ पाण्यात.
या बोईंग कंपनीचा दावा होता की आमचं हे विमान कधीच क्रॅश होऊच शकत नाही. अर्थात शेवटी विमान एक मशीन आहे त्यातही बिघाड होऊच शकतो. त्यामुळे त्यांनी सगळा दोष वैमानिकावर टाकला.
आजही या अपघाताची आठवण एअर इंडीयाच्या जुन्या लोकांना येते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










