आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
जगात काही लोक असे आहेत जे अत्यंत कठीण परिस्थितीत जगत असतात. ते अशा ठिकाणी राहतात जिथे सामान्य माणूस जाऊ देखील शकत नाही. आपल्या आयुष्यात आपण ज्या वस्तू व सेवांचा लाभ घेत असतो, यापैकी काहीच त्या लोकांच्या वाट्याला येत नाही. त्यांच्या चारही बाजूला असतो तो केवळ बर्फ आणि बर्फच…
हे लोक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जगभरात ज्यांना एस्किमो म्हणून ओळखले जाते तेच आहेत. हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीत गेल्या अनेक वर्षांपासून हे लोक राहतायत. एस्किमोचे जीवन हे सामान्य माणसाच्या जीवनापेक्षा खूप वेगळे असते. यांच्या आयुष्यात पदोपदी संघर्ष लिहलेला असतो.
आकाराने लहान असलेले एस्किमो हे १५० ते १६० सेंटीमीटर इतके उंच असतात. त्यांचे डोके गोलाकार, गळ्याचे हाड उंच आणि डोळे खोल असतात. यांचा चेहरा व शरीरयष्टी मंगोलियन वंशाच्या लोकांशी साधर्म्य साधते.
हे लोक अशा ठिकाणी राहतात जिथे सहा सहा महिने सूर्याची किरणे नजरेससुद्धा पडत नाहीत. वर्षातील बहुतांश महिने हा भाग हिमाच्छादित असतो. पालेभाज्या आणि शाकाहारी पद्धतीचे जेवण या लोकांसाठी केवळ अशक्य आहेत त्यामुळे यांचे जेवण मांसाहारी असते. मांसाहारासाठी हे लोक नियमितपणे शिकार करतात. हे लोक जमिनीवर चालणाऱ्या प्राण्यांपासून नदीत पोहणाऱ्या प्राण्यांपर्यंत अगदी कशाचीही शिकार करून खातात.
शिकार केलेल्या जनावराच्या चरबीचा उपयोग हे लोक उबदार कपड्यांसारखा करतात. तसा तर रेनडीअर हा एस्किमोंचा पाळीव प्राणी पण वेळप्रसंगी त्याची देखील शिकार करायला मागेपुढे पहात नाहीत. या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्या कारणाने हे लोक बर्फ वितळून त्यालाच पाणी म्हणून वापरतात.
क्याक नावाच्या एका बोटीच्या सहाय्याने हे लोक समुद्री जीवांची शिकार करायला जातात. बर्फात सामानाची ने-आण करण्यासाठी हे लोक स्लेज नावाच्या वाहनाचा वापर करतात. या वाहनाला ओढण्यासाठी ते कुत्र्यांची मदत घेतात.
हारपून हे एस्किमोचे प्रमुख हत्यार आहे. हे हत्यार चार ते पाच फुट लांब असतात आणि जनावरांच्या हाडांपासून बनलेले असतात. हे हत्यार इतके खतरनाक असतात की याच्या एका ह*ल्ल्यातच अनेक प्राण्यांची शिकार केली जाऊ शकते.
एस्किमो जिथे राहतात तिथे भयंकर थंड वातावरण असते. या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या लोकांना सील, रेनडियर, अस्वल, इत्यादी प्राण्यांची शिकार करून त्याच्या कातड्याची कपडे वापरावे लागतात. सुई-दोरा म्हणून हे प्राण्यांच्या नसा, आतड्या इत्यादींचा वापर करतात. थंड हवेपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारी टोपी देखील प्राण्यांच्या कातड्यापासून बनवली जाते.
पण, हे लोक एकाच ठिकाणी वास्तव्य करत नाही. कायम आपले स्थान बदलत असतात. थंडीच्या दिवसात हे लोक बर्फापासून इग्लू नावाच्या विशिष्ट पद्धतीच्या घरांची रचना करतात आणि त्यात राहतात. अर्धगोलाकार असलेल्या इग्लूमध्ये प्रवेश करण्यासाठी एखाद्या बोगद्याप्रमाणे दरवाजा तयार केलेला असतो. यातून रांगत आत जावे लागते. श्वास घेता येण्यासाठी येथे छोटे छिद्र केलेले असते.
बर्फ जरी थंड लागत असला तरी बर्फाचा नेचर गरम असतो, यामुळे इग्लूच्या आतील वातावरण हे उबदार असते. उन्हाळ्यात हे बर्फाचे इग्लू वितळू लागतात. इथे उन्हाळ्यात वातावरण थंडच असते. उन्हाळ्यात हे लोक प्राण्यांच्या कातड्याचे तंबू बनवून त्यात वास्तव्य करतात.
एस्किमोंची जीवनपद्धती इतर मनुष्यांच्या तुलनेत फारच वेगळी आहे. यांच्या संस्कृतीत कोणीही टोळीप्रमुख अथवा राजा अस्तित्वात नसतो. इथे स्त्रिया आणि पुरुष एकत्रितपणे शिकार करतात. ज्यावेळी या समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीराला उघड्यावर ठेवण्यात येते. यातून आत्म्याला मुक्ती मिळते, अशी या लोकांची श्रद्धा आहे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या भागात फेकण्यात येतात. आशिया खंडात राहणारे एस्किमो मृत व्यक्तीला जाळतात, ग्रीनलँडमध्ये आढळणारे एस्किमो मृत व्यक्तीला समुद्रात फेकतात, तर अलास्कामध्ये राहणारे एस्किमो पुरतात.
एस्किमोंना पुनर्जन्मावर विश्वास असून एखादी व्यक्ती मेल्यास त्याच्या शरीराला बर्फावर ठेवून त्याला चांगला जन्म मिळावा म्हणून हे लोक प्रार्थना करतात. हे लोक एका गंभीर वातावरणात वास्तव्य करत असून त्यांच्या विवाह पद्धती विचित्र आहेत. एस्किमो लोक बाल विवाह करतात. इतकेच नाही तर हे लोक घटस्फोट देखील सहजासहजी घेतात.
अत्यंत खडतर आयुष्य जगणाऱ्या एस्किमो समुदायाच्या काही प्रथा या प्राचीन इजिप्शियन संस्कृतीशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. एस्किमो आपले खडतर आयुष्य अत्यंत उत्साहात जगतात. हिमनगाच्या टोकावर वास्तव्य करणारे एस्किमो आजही जगाच्या इतर भागांपासून वेगळे राहणे पसंत करतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.