आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना होऊन आता १३६ वर्षांचा काळ लोटला आहे. २८ डिसेंबर १८८५ ला ऍलन ह्युम यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. ऍलन ह्युम यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ऍलन ह्युम हे एक पर्यावरण प्रेमी अधिकारी होते. त्यांना वन्यजीव व वनस्पती यांच्यावर विशेष प्रेम होते. ज्यावेळी शत्रूसैनिक त्यांच्या मागावर होते तेव्हा ते एका गावात वेष बदलून राहिले होते. असे म्हणतात की ह्युम हे त्या गावात साडी घालून एक स्त्री म्हणून बराच काळ वावरले होते.
ह्युम १८४९मधे भारतात आले. ब्रिटिश सरकारचे कर्मचारी म्हणून त्यांची भारतात बदली करण्यात आली होती. त्यांची उत्तर पश्चिम प्रांताच्या असलेल्या इटावा जिल्ह्यात रवानगी करण्यात आली. (आज हा जिल्हा उत्तर प्रदेशात आहे.) त्यांनी १८४९ ते १८६७ या काळात जिल्हाधिकारी म्हणून या भागाचा कारभार पाहिला होता. त्यांच्या कार्यकाळातच १८५७ च्या उठावाचे बिगुल वाजले.
इटावाजवळ मेरठ येथे सैनिकांचा पहिला उठाव झाला. ब्रिटिश सैन्यात मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक होते. ज्यावेळी त्यांना कळले की ते वापरत असलेल्या बंदुकीच्या काडतुसांचे आवरण गाय आणि डुकराच्या चरबीने तयार केले आहे, त्यावेळी त्यांच्यात असंतोष पेटला.
मेरठच्या आसपासच्या सर्व जिल्ह्यांना ब्रिटिशांनी असुरक्षित घोषित केले. इटावामधील भारतीय सैनिकांनी ह्युम यांच्यावर हल्ला करण्याची योजना तयार केली. परंतु ह्युम यांना त्यांच्या या कटाची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या घरातून पलायन केले व सुरक्षित ठिकाण शोधायला सुरुवात केली. त्यांनी साडी परिधान करून महिलेच्या वेशात इटावा येथून पळ काढला व आग्र्याला गेले. तिथे एका अज्ञातस्थळी ते ७ दिवस लपून बसले होते. पुढे त्यांनी आग्र्याच्या किल्ल्यात ६ महिने शरणार्थी म्हणून काढले.
ह्युम एक सुधारणावादी होते. इटावा जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले. तेथील पोलीस व कायदे विभागात मोठ्या प्रमाणात बदल घडवले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. १८६३ मध्ये अल्पवयीन गुन्हेगार तुरुंगात रवाना न करता, त्यांच्यासाठी बालसुधार गृहे उघडली. इटावामध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उघडल्या. १८५७ पर्यंत त्यांनी १८१ शाळा सुरू केल्या होत्या .
ऍलन ह्युम यांचे पशुपक्षांवर विशेष प्रेम होते. त्यांनी असंख्य प्रजातींचा अभ्यास केला होता. त्यांच्यावर त्याने अनेक पुस्तके व डायरी लिहल्या.आपल्या प्रवासात जमवलेल्या ८२ हजार प्रजातींची माहिती त्यांनी ब्रिटिध लायब्ररीत संकलित केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.