आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चांगले पैसे कमावून विश्वभ्रमंतीला जाण्याचे स्वप्न सर्वच बघतात. पण केरळमधील एका जोडप्याने २०१९ साली चहा विक्री करून विश्वभ्रमंती करण्याचे आपले स्वप्न साकार केले. या जोडप्याने आतापर्यंत २३ पेक्षा जास्त देशांना भेट दिली असून भारतातील नामवंत उद्योगसमूह महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून त्यांचे कौतुक केले होते.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, फोर्ब्जच्या जगातील १० सर्वांत श्रीमंत लोकांमध्ये यांचा समावेश नसला तरी माझ्या दृष्टीने हे जगातील सर्वांत श्रीमंत जोडपे आहे. संपत्ती व जगण्याच्याबाबतीत त्यांच्या दृष्टिकोनाने प्रभावित झालेल्या महिंद्रांनी कोचीला गेल्यावर त्यांच्या दुकानातील चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
केरळच्या कोचीनमध्ये राहणाऱ्या विजयन आणि मोहाना या वृद्ध दाम्पत्याने आपल्या छोट्याशा चहाच्या दुकानाच्या बळावर विश्व परिक्रमेचे स्वप्न साकारले आहे.
त्यावेळी विजयन हे ६८ वर्षांचे होते तर मोहाना ६७ वर्षांच्या. दुर्दैवाने २०२१ साली विजयन यांचे निधन झाले. ‘बालाजी कॉफी हाऊस’ नावाचे चहाचे दुकान ते दोघे चालवत होते. विजयन आणि मोहाना रोज सकाळपासून कामाला सुरुवात करत व रोज गरजेपुरती कमाई झाल्यावर, रोजच्या कमाईतील ३०० रुपये बाजूला काढून ठेवत असत. ३०० रुपये रोज वाचावे म्हणून त्यांनी दुकानावर कुठला कर्मचारी देखील ठेवला नाही.
रोज चहा विक्री करून ३०० रुपये बाजूला काढले तरी त्यांना पैशाची कमतरता जाणवायची, अशावेळी ते कर्ज काढून आपली हौस पूर्ण करत. पुढे ते कर्ज तीन वर्षात फेडत असत. एकदा कर्ज फेडले की पुन्हा नवे कर्ज घेऊन हे जोडपे आवडत्या देशाचा दौरा करून येत.
दोघांच्या लग्नाला ४५ वर्षांचा कालावधी लोटला होता. लग्न झाले त्यावेळी दोघांना फिरण्याची प्रचंड आवड होती. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे नव्हते म्हणून त्यांनी हे दुकान उघडले.
चहाच्या दुकानात चहा विक्री व कर्जाचे चक्र सांभाळत त्यांनी विश्वभ्रमण केले.
७० वर्षांच्या वयात देखील इतर वयस्कर लोकांप्रमाणे आजारपणाच्या कुठल्याच तक्रारी त्यांना नव्हत्या. ते या वयात जगाच्या वेगवेगळ्या भागांना एक्सप्लोअर करत होते. त्यांच्या दुकानात पॅरिस, सिंगापूर आणि भारत या तिन्ही देशातील ‘वेळ’ सांगणारी घड्याळं होती. ही घड्याळं त्यांच्या मजबूत इच्छाशक्तीचे दर्शन घडवत. दुकानात त्यांनी वेगवेगळ्या देशात केलेल्या खर्चाचे आकडे लिहिले आहेत. त्यांच्या दुकानात चहा प्यायला गेलेल्या व्यक्तीला ते आपल्या विश्वभ्रमंतीचे किस्से सांगत असत.
त्यांनी एकूण २६ देशांचा दौरा केला आहे. चहाची विक्री करून वेगवेगळ्या देशांना भेट देणाऱ्या या जोडप्यांवर अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
‘इन्व्हिजिबल विंग्स‘ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हरी मोहनन यांनी केले असून २०१८ मध्ये फिल्म फेयर आवर्ड्समध्ये या चित्रपटाला बेस्ट नॉन फिक्शन फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
विजयन – मोहाना यांनी आयुष्य आपल्या मर्जीने व आपल्या धुंदीत कसं जगता येतं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










