The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मृत्युच्या दारातून परत येण्याचा या माणसाचा संघर्ष प्रत्येकाने एकदा तरी बघावा

by द पोस्टमन टीम
16 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काही ऐतिहासिक घटना एवढ्या भयानक असतात की त्या खोट्या वाटतात. भाकडकथा म्हणून त्यांच्याकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. अशीच एक सत्य सूडकथा २०१५ साली सिनेमाच्या रुपात जगासमोर आली.

‘अलेजांड्रो जी. इनारिटु’ या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा “द रेवेनंट” नावाचा सिनेमा जगभर प्रसिद्ध झाला तो यातील अभिनेता ‘लिओनार्डो दी कॅप्रिओ’ याला मिळालेल्या त्याच्या पहिल्या-वहिल्या ऑस्करसाठी.

अतिशय उत्तम अभिनय, अगदी काहीही न बोलता फक्त चेहऱ्यावरील भावनांनी ‘ह्यू ग्लास’ हे पात्र या अभिनेत्याने साकारले आहे.

अस्वलाच्या ह*ल्ल्यात जखमी झालेल्या ह्यू ग्लासला त्याचे २ सहकारी मृत्यूच्या दारात टाकून येतात. या ह*ल्ल्यातून कसाबसा सावरत ह्यू या दोघांशी सूड घेण्यासाठी जातो. तो त्याच्या या योजनेत यशस्वी होतो की नाही, या प्रवासात येणारे अडथळे, त्याला होणारा त्रास या घटकांचे हृदयद्रावक चित्रण या सिनेमात दाखवले गेले आहे.

आता एका मोठ्या अस्वलाच्या ह*ल्ल्यात सापडून अगदी मृत्यूच्या दारात उभा असलेला व्यक्ती त्याच्या सहकाऱ्याने केलेल्या फसवणूकीचा सूड घेण्यासाठी रक्ताळलेल्या स्थितीत २००० मैल एवढा प्रवास करेल असं काहीतरी सांगितलं की ते भाकडकथा वाटणे साहजिकच.



परंतु या सिनेमाची ही गोष्ट अगदी खरी आहे. एवढंच नव्हे तर ह्यू ग्लास हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जास्त धोकादायक आणि धाडसी व्यक्ती होता असं सांगितलं जातं.

ह्यू ग्लासचा जन्म १७७५-१७८० या काळात पेन्सिल्वीनिया इथे झाला असावा. डोंगराळ भागात वास्तव्य असणाऱ्या काहींच्या मते तरुण असतानाच ग्लासने समुद्राचा रस्ता धरला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जहाजाचा कॅप्टन होण्याची त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने घर सोडले होते. त्याचं हे स्वप्न पूर्णही झालं, पण थोड्याच काळात त्याच्या जहाजाचं अपहरण करण्यात आलं.

कुप्रसिध्द समुद्री चाचा ‘जीन लाफाईट’ याने त्याला मृत्यू किंवा चाचेगिरी असे दोन पर्याय दिले होते. त्यावेळी साहजिकच त्याने चाचेगिरी निवडून जीनबरोबरच काही वर्षं काम केले.

काहींच्या मते त्याने अगदी विनाशकारक कृत्ये केली. काहींच्या मते तो अगदी विश्वासू आणि स्वाभिमानी व्यक्ती होता. थोडा विचित्रसुद्धा होताच. त्याच्या एका सहकाऱ्याच्या मते तो धीट, निष्काळजी आणि अतिशय स्वकेंद्रि व्यक्ती होता. तरीही तो अतिशय बुद्धीमान आणि शरीराने अगदी धष्टपुष्ट होता.

१८१८ मध्ये ह्यू ग्लास आणि त्याचे सहकारी चाचांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाले. गैल्व्हस्टन बेटावरुन टेक्सासच्या किनाऱ्यावर येऊन ते थांबले.

कारनकावा प्रजातीच्या नर*भ*क्षक लोकांपासून वाचण्यासाठी ते उत्तरेला गेले, परंतु तिथेही त्यांना पॉनीज लोक, जे आत्ताच्या कांसस प्रांतात राहत होते, त्यांनी पकडले.

पॉनीज लोकांची एक प्रथा होती. पाईन वृक्षाच्या लाकडाने आपल्या कैद्यांना भोसकून ते त्यांना जाळून टाकत असत. ग्लासने त्याच्या एका साथीदारास असे जळताना बघितले होते. अशा वेळी त्याने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कीटकाचा वापर केला.

या किटकापासून बनवण्यात येणाऱ्या लाल रंगाचा वापर प्रजातीला सांगून त्याने स्वत:ला वाचवले. अगदी सिनेमासारखी वाटणारी ही गोष्ट सत्य परिस्थितीत किती भयानक असेल याचा अंदाज लावला तरी अंगावर काटा येतो.

पुढे ४ वर्षं तो याच प्रजातीबरोबर राहिला. जंगलात जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्याने शिकून घेतल्या. आदिवासी यु*ध्दनितीसुद्धा त्याने शिकून घेतली. हेच पुढे जाऊन त्याला फायदेशीर ठरणार होते.

१८२२ साली ग्लासने सेंट लुईस येथील ‘एश्ले-हेन्री’ फर कंपनीत शिकारी म्हणून काम करण्याचे ठरवले. कंपनीने उत्तरेकडील मोठे पठार आणि उत्तरी रॉकी पर्वतांमध्ये वसलेल्या उच्च मिसूरी परिसरात एक मोहीम आखली होती.

प्राण्यांच्या मऊ केसांमधून त्यावेळी बक्कळ पैसा कमावला जात होता. परंतु त्यासाठी तेथील इंडियन प्रजातींना हुलकावणी देणे, पुराने फेसाळलेल्या नद्या पार करणे, भुस्खलन, मोठी अस्वलं अशा सगळ्यांपासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे होते.

मोहिमेला सुरुवात झाली. आत्ताच्या दक्षिण डकोता प्रांतात मिसूरी नदी त्यांनी शांततेत पार केली. त्यांचं काम संपवून परत जाताना त्यांच्यावर ह*ल्ला करण्यात आला. १२ जणांचा या चकमकीत मृत्यू झाला. ग्लास आणि बाकीचे काही जण जखमी झाले होते. वाचलेले शिकारी येलोस्टोन नदीकडे जाण्यासाठी पायी निघाले.

जमेल तेवढं लपुन जात असल्याने त्यांचा वेग कमी होता. तसेच त्यांना खाण्यासाठी शिकार करावी लागत असे. शिकार करताना होणाऱ्या गोळीबाराच्या आवाजाने त्यांच्या स्थानाची माहिती मात्र बाकीच्या लोकांना कळत होती.

एकदा असंच शिकारीला गेलेले असताना ह्यू ग्लासने त्याच्या गटापासून दुर जाऊन एका मोठ्या अस्वलाला बघितले. अस्वलाची नजर ह्यूवर पडताच ते अस्वल ह्यूच्या दिशेने धावत आले. हातात असलेल्या बंदूकीतुन ह्यूने गोळी झाडली खरी, परंतु भल्या मोठ्या अस्वलाला त्याने काहीही झालं नाही.

ह्यू ग्लासच्या अंगावर त्या अस्वलाने झडप घातली आणि ह्यूच्या गळ्यावर मोठी जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.

आपल्या मजबूत नखांनी त्या अस्वलाने ह्यूच्या पाठीवर, खांद्यावर, हातांवर, पायांवर मोठमोठ्या जखमा केल्या.

ह्यूने चालवलेल्या गोळीने सतर्क झालेल्या बाकीच्या सहकाऱ्यांनी त्याच्या शरीराला पट्ट्या बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या जखमेला टाकेसुद्धा दिले. एवढ्या सगळ्या जखमा होउनही ग्लास जिवंत होता याचं नवल त्यांना वाटत होतं.

काहींच्या मते तीन तर काहींच्या मते सहा, दिवसानंतरही ह्यूला बोलताही येत नव्हतं आणि हलताही येत नव्ह्तं. हिवाळा जवळ येत असल्याने कमी वेगाने पुढे जात राहणे त्यांच्या गटासाठी धोक्याचे होते. त्यातच ह्यूला असंच सोडून जाणेही त्यांना योग्य वाटत नव्हते. म्हणून गटाचा प्रमुख असलेल्या हेन्रीने दोन जणांना थोडे पैसे देऊन ह्यूबरोबर थांबण्यास सांगितले.

हे दोन व्यक्ती होते जॉन फीट्जरगाल्ड आणि किशोरवयीन जिम ब्रिजर. पुढे काही दिवस नेमकं काय झालं याची माहिती आज उपलब्ध नाही. काहींच्या मते दोघांनी ह्यूला पाणी पाजले. त्याच्या गळ्याला अजूनही जखमा तशाच होत्या.

श्वास घेताना त्याला अजुनही त्रास होत होता. काही दिवसातच त्याला तापपण चढला होता. अशा वेळी ह्यूचा मृत्यू जवळ आला असून आपण त्याला आता इथेच सोडून जाण्याची वेळ आली आहे असे फिट्जरगाल्डने ब्रिजरला सांगितले.

ब्रिजरने विरोध केला की नाही याबद्दल आजही दुमत आहे. परंतु दोघांनीही ह्यूला तिथेच सोडून बाकीच्यांसोबत सामील होण्याचा निर्णय घेतला.

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे दोघांनी ह्यूजवळ असणारी बंदुक, चाकू, कुऱ्हाड, गारगोटी, शिसे, गोळ्या या गोष्टी काढून घेतल्या. त्याला या गोष्टींचा आता काहीच उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी असे केले असावे. ताप चढलेला असतानाही ह्यू ग्लासला आसपास चाललेल्या या घटनांचा अंदाज येत होता.

काही वेळात ताप उतरल्यावर त्याने जवळ असलेल्या झाडाची फळे तोडली. फळांना हाताने दाबुन, पाण्यात टाकुन त्याने त्या फळांचा रस घेतला. पुढच्या दिवशी एक जाड मोठा साप त्याच्या दिशेने येत होता, त्याने त्याला खडकाने मारले आणि त्याचे कच्चे मांस खाल्ले.

ह्यूला अजून चालता येत नव्हते, पण आता तो रांगू शकत होता. त्याने फिट्जरगाल्ड आणि ब्रिजरला पकडून मारण्याचे ठरवले. स्वत:कडे शस्त्र नसताना येलोस्टोनला जाण्यात काही अर्थ नव्हता म्हणून त्याने ३५० मैल विरुद्ध दिशेला जाउन ‘फोर्ट कियोआ’ इथे जाउन शस्त्र मिळवण्याचे ठरवले.

एका ठिकाणी त्याला लांडगे म्हशीचे मांस खाताना दिसले, तेव्हा त्याने लांडग्यांना हुसकावून लावले आणि ते मांस स्वत: खाल्ले. तिथेच त्याने काही दिवस काढले. म्हशीच्या मांसाला चांगलं वाळवून त्याने आपल्या शरीराला पुर्ववत बनवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसात तो लंगडत चालू लागला.

याच प्रवासात त्याला ‘सू’प्रजातीच्या लोकांनी काही दिवस आश्रय दिला. त्यांनीच त्याच्या पाठीवर झालेल्या जखमांमधील अळ्या काढल्या. याच लोकांच्या मदतीने त्याने फोर्ट कियोआ गाठले आणि शस्त्र मिळवले.

त्यानंतर त्याने फ्रेंच-कॅनडीयन लोकांच्या एका समूहात सामिल होऊन मिसूरी नदी पार केली. येलोस्टोनला जाऊन आपला सूड पूर्ण होइल अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या ह्यूचा पुन्हा अपेक्षाभंग झाला.

सहा आठवडे प्रवास केल्यावर त्यांच्यावर अरिकारा जमातीच्या लोकांनी ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यात ग्लास सोडून सगळ्यांचा मृत्यू झाला. ह*ल्ला झाला तेव्हा ह्यू समुहापासून दूर शिकारीसाठी गेला होता. इथे ग्लासला अरिकारा जमातीच्या विरोधी असलेल्या मंडन यो*द्ध्यांनी  मदत केली.

पुन्हा त्याने आपला प्रवास सुरु केला. उत्तरी हिवाळा सुरु झाला होता. एक महिना त्याने अतिशय कमी तापमानात काढून शेवटी तो नवीन फोर्ट हेन्रीला पोहचला. बिग हॉर्न नदीच्या मुखाशी असलेला हा किल्ला आधी तिथून पुढे १०० मैलांवर वसलेला होता. काहींच्या मते नवीन वर्षाला तो तिथे पोहचला.

शरीरावर सगळीकडे जखमांचे वण आणि बर्फाने आच्छादलेला. त्याच्या साथीदारांनी त्याला जेव्हा बघितले तेव्हा ते थबकलेच. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या ग्लासला ते सगळे “रेवेनंट” समजत होते. रेवेनंट म्हणजे मृत्यूच्या दारातून परत आलेला.

आल्या आल्या त्याने फिट्जरगाल्ड आणि ब्रिजर यांची चौकशी केली. फिट्जरगाल्ड तिथे नव्हता. ब्रिजर मात्र तिथे होता. जेव्हा ग्लास ब्रिजरला भेटायला गेला तेव्हा तो अगदी नाजूक आवाजात त्याची माफी मागू लागला.

त्याच्या त्या काकूळतीने ग्लासला त्याच्याबद्दल सहानूभूती वाटली आणि त्याने ब्रिजरला माफ केले. आता त्याला फिट्जरगाल्डला संपवायचे होते. त्यासाठी फोर्ट अटकिन्सनला जावे लागणार होते.

तिथे जाण्यासाठी फेब्रुवारीच्या महिन्यात त्याच्याकडे एक संधी चालून आली.

हेन्रीने ग्लास आणि अजून ४ लोकांना पत्र पोस्ट करण्यासाठी फोर्ट अटकिन्सनला जाण्याचे सांगितले. ग्लास आणि त्याच्या नवीन साथीदारांनी दक्षिणेला पावडर नदी ओलांडली आणि उत्तरेकडे गेले. तिथे ग्लासने म्हशींची आणि मोठ्या बैलांची शिकार करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या शरीराच्या आवरणावरुन चांगली नाव बनवता येऊ शकते हे तो पॉनीज लोकांकडून शिकला होता. अरुंद होत गेलेल्या नदीच्या प्रवाहात या छोट्या नाव कामी येणार होत्या. अरिकाराला पोहचताच त्यांच्यावर पुन्हा ह*ल्ला झाला. यात २ जणांचा मृत्यू झाला.

ग्लास वाचलेल्या २ साथीदारांपासून वेगळा झाला आणि त्याने फोर्ट कियोआ येथुन घेतलेली बंदूकही गमावली. तरीही स्वत:कडे असलेल्या मोजक्या शस्त्रांबरोबर त्याने एकट्याने प्रवास सुरूच ठेवला.

४०० मैल अंतर चालत गेल्यावर तो शेवटी फोर्ट अटकिन्सनला पोहचला. आपली सूडभावना एवढे दिवस मनात दाबून ठेवल्यानंतर शेवटी फिट्जरगाल्ड आपल्या हाती आला असा विचार करत असतानाच त्याला एक मोठा धक्का बसला.

फोर्ट अटकिन्सन आता एक मोठा सैनिकी तळ बनला होता. आणि फिट्जरगाल्ड एक शिकारी राहिलेला नसून एक सैनिक झाला आहे हे त्याच्या लक्षात आले.

फिट्जरगाल्डला मारून ग्लासला स्वत: जिवंत परत जाता येणे शक्य नव्हते. एवढे कष्ट, त्रास सहन करुन ज्या क्षणाची वाट बघावी त्या क्षणाने हुलकावणी द्यावी आणि आयुष्य संपल्यासारखं वाटावं अशी ह्यू ग्लासची अवस्था झाली.

परंतु मनोबल खचू न देता ग्लासने फिट्जरगाल्डकडून आपली बंदुक परत मिळवली. काहींच्या मते तो फिट्जरगाल्डला खांद्यात गोळी मारण्यात यशस्वीही झाला. तिथून पळत जाऊन तो एकटाच रहायला लागला. त्याच्या कारनाम्यांमुळे एका दंतकथेच्या स्वरूपात तो प्रसिद्ध झाला. एकटाच राहुन प्राण्यांचे केस गोळा करण्यात माहीर असलेला व्यक्ती म्हणून तो प्रसिध्द झाला.

१८३३ साली आपल्या दोन साथीदारांबरोबर गेलेला असताना अरिकारा यो*द्धयांनी त्यांच्यावर ह*ल्ला केला आणि त्यात ग्लासचा मृत्यू झाला. ५० वर्ष वय असताना त्याचा मृत्यू झाला. बिग हॉर्न, मॉन्टाना इथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूला हुलकावणी देत आलेल्या ह्यू ग्लासला शेवटी मृत्यूने पकडलेच.

ह्यू ग्लासची कहाणी खरी किती, खोटी किती हा नेहमीच वादाचा विषय राहिल. एवढं वादळी आयुष्य जगलेल्या माणसाच्या जीवनावर बनलेला ‘द रेवेनंट’ हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी बघावाच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रमुख म्हणून या मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली आहे

Next Post

जयप्रकाश नारायण भारताचे दुसरे प्रधानमंत्री होऊ शकले असते, पण…

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जयप्रकाश नारायण भारताचे दुसरे प्रधानमंत्री होऊ शकले असते, पण...

चंद्रकांतावर आजपर्यंत अनेक मालिका आल्या पण ओरिजिनलची सर कोणालाच नाही!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.