आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ऐतिहासिक राजघराण्याचा इतिहास, त्यांचं त्या काळातलं आणि आत्ता अस्तित्वात असलेल्या वंशजांचं राहणीमान, जीवनशैली याचं आकर्षण जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं. भारतातही दीर्घकाळापासून कित्येक राजघराणी होऊन गेली आणि त्यापैकी कित्येकांचे वंशज अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आजही खूप कुतूहल आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरातील संस्थानं सरकारने खालसा करून घेतली असली तरीही सर्वसामान्य जनता या राजघराण्यातील वंशजांना आजही ‘राजेपणा’चाच मान देते.
आपल्याकडच्या छोट्या छोट्या संस्थानिक, सरदार, दरकदारांच्या घराण्याची ही कथा; मग प्राचीनकाळापासून एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्थापना करणाऱ्या राजघराण्याच्या वंशजांबद्दल लोकांच्या मनात किती जिज्ञासा असेल? त्यातही हे साम्राज्य आजही अस्तित्वात असेल आणि त्याचे वंशज आजही सम्राटाच्या गादीवर विराजमान असतील तर?
सध्याच्या काळात साम्राज्य आणि राजेशाही जवळजवळ संपुष्टात आली असली तरीही त्यांचा इतिहास पिढ्यानपिढ्या उलटूनही आवर्जून अभ्यासला जातो. जपानचं साम्राज्य हे जगातल्या सर्वांत प्राचीन आणि सामर्थ्यशाली साम्राज्यांपैकी एक आहे. या साम्राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे साम्राज्य प्रतिकात्मक स्वरूपात का होईना, पण आजही अस्तित्वात आहे.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत या साम्राज्याच्या राजवंशाची काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये –
जपानच्या साम्राज्याची स्थापना ख्रिस्तपूर्व ६६० मध्ये सम्राट जिम्मू याने केली. सम्राट जिम्मूपासून या राजघराण्याचा वंश विद्यमान सम्राट हिरोनोमिया नारूहितो यांच्यापर्यंत थेटपणे चालत आलेला आहे; अशी जपानी लोकांची धारणा आहे.
अर्थात, एवढ्या पिढ्यांमध्ये वंशसातत्य राखणं अशक्य असल्याचा काही जणांचा दावा असला तरी सम्राटांच्या वंशसातत्याचं साधार खंडन आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ सम्राट जिम्मूचा हा राजवंश तब्बल २ हजार ६०० वर्ष अखंडीतपणे चालत आला आहे.
तब्बल अडीच हजार वर्षं वंशसातत्य राखल्यानंतर मात्र, या राजवंशासमोर अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला होता. सन १९९० च्या दशकात हा राजवंश लोप पावण्याच्या मार्गावर होता. दुसरं महायुद्ध संपुष्टात येताना, विसाव्या शतकाच्या मध्यावर जपानच्या राजवंशात गादी पुढे चालवणाऱ्या पुरुषांची कमतरता भासायला लागली.
त्या काळात राजघराण्यात अस्तित्वात असलेल्या राजपुरुषाचं वय झालं होतं आणि बहुतेकांना मुलगा झाला नव्हता. त्यामुळे वंशसातत्याला आणि पर्यायाने जगातील एका प्राचीन साम्राज्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या काळच्या सम्राटांनी जगातल्या अन्य प्राचीन राजघराण्यांशी संपर्क साधून त्यांच्या वंशातल्या स्त्रीपासून राजवंशाला; पर्यायाने जपानी साम्राज्याला अधिकृत वारस मिळवता येईल का, याची चाचपणी सुरू केली.
सुदैवाने या राजघराण्यात सन २००६ मध्ये मुलगा जन्माला आला आणि वारसाचा प्रश्न एका पिढीपुरता का होईना, पुढे ढकलला गेला.
पुरुष वारसदाराची वानवा असल्यामुळे राजघराण्यातल्या महिलेकडे साम्राज्याची धुरा सोपवावी का? याबद्दल जपानच्या राजवंशात सातत्याने चर्चा आणि वादविवाद होत राहिले. प्रत्यक्षात या राजघराण्याचा प्राचीन इतिहास किंवा श्रद्धा म्हणूया, त्याप्रमाणे या राजवंशाची उत्पत्ती देवापासून नाही, तर देवीपासून, देवतेपासून झाली आहे.
आपल्याकडे किंवा जगभरात बहुतेक घराण्यांचा उगम ‘मूळपुरुषा’पासून झाल्याचं मानलं जातं. जपानच्या राजवंशाचा उगम मात्र, ‘अमातेरासू’ या देवतेपासून झाल्याची मान्यता आहे.
अमातेरासू ही जपानी राजवंशाच्या शिंतो धर्मामध्ये सूर्याची देवता मानली जाते. या धर्मानुसार अमातेरासू देवता विश्वाचं नियमन करण्याचं काम करते. दिव्य तलवार, चमकतं रत्न आणि आरसा या साधनांद्वारे ती या विश्वाचं नियंत्रण आणि नियमन करते.
या देवतेचे वंशज मानले गेल्यामुळे आजही जपानच्या राजवंशाची तलवार, रत्न आणि आरसा ही अधिकृत राजचिन्ह आहेत. जपानचा सम्राट हा जगभरातल्या शिंतो धर्मियांचा सर्वोच्च धर्मगुरूही असतो. थेट देवतांशी नातं सांगणारा जपानचा राजवंश हा सध्या अस्तित्वात असलेला अखेरचा राजवंश उरला आहे
सध्या जगभरात अधिकृतपणे ‘सम्राट’पद मिरवणारे जपानचे सम्राट हिरोनोमिया नारूहितो हे एकमेव आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतेक सम्राटांचं सम्राटपद काढून घेतलं गेलं आणि अनेकांचे प्राणही गेले. मात्र, दुसऱ्या महायुद्धातल्या पराभवानंतर जपानने सन १९४५ मध्ये अमेरिकेसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर जपानची जबाबदारी अमेरिकेने आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी जपानच्या सम्राटांचं सम्राटपद कायम ठेवलं.
आजही जगभरात अनेक राजघराणी अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांचा राजा किंवा सम्राट म्हणून अधिकृत दर्जा शिल्लक राहिलेला नाही. एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजघराण्यानेही भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या सम्राटपदाचा त्याग केला आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानच्या सम्राटपदावर असलेल्या हिरोहितो याच्याकडे एक क्रूरकर्मा म्हणून बघितलं जातं. जपान आणि चीन यांच्यातलं युद्ध असो किंवा दुसरं महायुद्ध; या सम्राटाला लाखो बळींसाठी जबाबदार धरलं जातं. पराकोटीचा संकुचित राष्ट्रवाद आणि सैन्यबळाच्या आहारी जाऊन त्याने जपानलाच नव्हे तर निम्म्या जगाला संकटांच्या खाईत ढकलल्याचा आरोप केला जातो. तरीही महायुद्धातल्या पराभवानंतर का होईना, शरणागती पत्करल्याने त्याचं सम्राटपद कायम राहिलं.
सम्राट हिरोहितो याच्यानंतर त्याचा मुलगा अकिहितो याला सम्राटपद देण्यात आलं. सम्राट अकिहितो मानवतावादी विचाराचा होता. त्याने सतत राजमहालात बसून राहण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेत मिसळणं पसंत केलं. सर्वसामान्य नागरिकांशी ते सहजपणे संवाद साधत. त्यांना जपानच्या जनतेने प्रेमाने आणि आपुलकीने ‘जनतेचे सम्राट’ ही पदवी बहाल केली. वृद्धापकाळामुळे त्याने आपल्या सम्राटपदाचा त्याग केला.
सामन्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा सम्राट अकिहोतोचा संदेश घेऊनच त्याचा मुलगा विद्यमान सम्राट नारूहितो याने राजगादीची जबाबदारी स्वीकारली.
सम्राट नारूहितो उच्चविद्याविभूषित, बहुभाषिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. स्वच्छ पाण्याच्या अधिकाराचा पुरस्कार करणारे जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पाणी पुरवठा आणि जलनिःस्सारण विभाग महासचिवांच्या सल्लागार समितीचे मानद अध्यक्ष म्हणून सन २००७ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या सम्राटपदापेक्षा पर्यावरण रक्षणाचं काम त्यांना अधिक मोलाचं वाटतं.
राजेरजवाडे आणि राजघराण्यातल्या नामवंतांचा राजेशाही थाटमाट, विलासी जीवनशैली यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये सुप्त आकर्षण असतं किंवा सत्ता आणि अधिकारांचा गैरवापर करून देशालाच नव्हे तर जगाला युद्धाच्या खाईत ढकलणाऱ्या हिरोहितो यांच्यासारख्या सम्राटाच्या नावाने बोटं मोडण्यात आपण धन्यता मानतो. तरीही त्यांच्याच नावाची चर्चा दशकानुदशकं केली जाते. मात्र, जनतेची सुख-दुःख वाटून घेणारे सम्राट अकिहितो यांचं नावंही आपल्याला माहिती नसतं आणि सम्राट नारूहितो यांच्या पर्यावरणरक्षणाच्या कामाचा आपल्याला गंधही नसतो, ही लाजीरवाणी बाब आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.